श्रीराम समर्थ
*थोरल्यारामा समोरील मारुतिचे प.पू तात्यासाहेब केतकर* यांनी सांगितलेलें महत्व.
गोंदावल्यास असतांना एकदा बापूसाहेब मराठ्यांनी पू तात्यासाहेब केतकर यांस म्हटले की, *'श्रीमहाराज देहात असतांना १९०४ ते १९१३ या कालावधीत आपणांस श्रीमहाराजांच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. ते भाग्य आम्हास आत्ता कदापीही मिळणार नाही, याबद्दल मन उद्विग्न होते'.*
उत्तरादाखल लगेच तात्यासाहेब म्हणाले, 'सोन्याबापू असे मन खट्टू करून घेण्याचे काय कारण आहे? ते भाग्य अजूनही आहे'. ते कसे काय असें बापूसाहेबांनी त्यांस विचारता पू तात्यासाहेब म्हणाले कीः
'थोरल्या राम मंदिरातील राम तर श्रीमहाराजांना प्रत्यक्ष रामरायच वाटे, त्यामुळेच तर तीनदा त्याचे डोळ्यांतून अश्रुपात सर्व लोकांस पाहावयास मिळाला. *त्याचे पायावर आपण डोके ठेवले म्हणजे प्रत्यक्ष श्रीमहाराजांच्याच पायावार डोके ठेवल्यासारखे आहे.* तो सतत सोवळ्यांत असतो त्यामुळे देहांत जसे आम्हांला केव्हांही श्रींचे पायावर डोके ठेवतां येत होते तसे आता करता येणार नाही हे मी मान्य करतो.
ही अडचण येणार हे लक्षात घेऊन ती दुर करण्याकरतां, *रामरायासमोर जो मारुति आहे तो श्रींनी स्वतः तयार करून त्याची स्थापना स्वहस्ते रामासमोर केली आहे. तो कधी सोवळ्यात नसतो. त्यामुळे त्याच्या पायावर कधीही डोके ठेवतां येते. श्रीमहाराज प्रत्यक्ष मारुतीचेच अवतार होते, त्यामुळे त्या मारुतीचे पायावर कधीही तूं डोके ठेवलेस तर देहांत असताना आम्ही जसे श्रींच्या पायावर डोके ठेवीत होतो तेच भाग्य आतासुद्धा तुला पुर्णपणे लागेल हे ध्यानांत ठेव. मनातील एखादी रुखरुख श्रींचे कानावर घालावीशी वाटली तर ती या मारुतीरायाला सांगितली तर श्रींचेच प्रत्यक्ष कानावर घातल्यासारखे होईल.* नामस्मरण खूप करून मन जसजसे सूक्ष्म होईल तसतसे त्याचे उत्तरही तुला त्या मूर्तीकडून मिळेल.
हे त्यांचे सांगणे माझ्या [बापूसाहेब मराठ्यांच्या] मनाला इतके पटले की गोंदवल्यास गेल्यावर मी [बापूसाहेब मराठे] *अगदी न चुकता थोरल्या राममंदिरात दर्शनासाठी रोज जातोच जातो, व तेथे गेल्यावर श्रीरामरायाचे दर्शन घेऊन मारुतिरायाच्या पायावर डोके ठेवतो.* त्यावेळी प. पूज्य तात्यासाहेबांचे वरील बोल लक्षात येऊन मनाला प्रसन्नता वाटते.
*******
* *[थोरल्या रामासमोरच्या मारुतिची हकीकत अशी आहे की तडवळे या गावांवरुन राम, लक्ष्मण व सीता यांच्या मुर्ती गोंदावल्यास आल्या परंतु मारुतीरायाची मूर्ति भंगल्यामुळे ती गोंदवल्यास आणली नाही. तेव्हा श्रीमहाराजांनी स्वतः चुना, वाळू, व मेण यांच्या साहाय्याने आपल्या हातांनी मारुतीरायाची मूर्ति बनवली व थोरल्या रामरायासमोर स्थापन केली.]*
*********
संदर्भः *चैतन्यराम १९९२* पान ११५, ११६ व ३५
संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन
No comments:
Post a Comment