*"प्रभु श्रीरामचंद्रांना बहीण आहे ?"*
*कोण होती श्री रामाची बहीण ?*
प्रभु श्रीरामांची एकुलती एक बहीण कायमच रामायणाच्या कथेपासून आणि भक्तांच्या श्रद्धेपासून दूर राहिली. असं का घडलं? कोण होती ही बहीण? रामाच्या या बहिणीची नेमकी कथा काय? हे जाणून घ्या.
प्रभु रामचंद्रांना बहीण आहे हेच अनेकांना ठाऊक नाही त्यामुळे जितक्या सहजेने रामायणातील इतर पात्र आपल्याला आठवतात, तितक्याच ताकदीने शांता हे नाव मात्र आपल्याला आठवत नाही.
कोण होती देवी शांता? तुम्हाला वाटत असेल की रघुकूल वंशात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा चार मुलांचाच जन्म झाला, मात्र त्यापुर्वीही दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांच्या पोटी आधीच एका कन्येने जन्म घेतला होता.
रघुवंश कुळातील ही सर्वात ज्येष्ठ कन्या होती. शांतेचा जन्म झाला आणि राणी कौसल्येच्या मांडीवर ती खेळू लागली. मात्र त्यानंतर पुढील तब्बल १२ वर्ष दशरथ राजाला मुलगा होत नव्हता.
शांता लहान असतानाच दशरथ राजाकडे कौसल्या राणीची बहिण वर्षीणी आणि तिचे पतीदेव राजा रोमपद आले होते. दशरथ राजा आणि कौसल्या राणी यांनी त्यांचे आगतस्वागत केले. मात्र चर्चादरम्यान राणी वर्षीणी दुःखी असल्याचे कौसल्या राणीला कळले.
विवाहानंतर अनेक वर्ष उलटली तरीही अपत्यप्राप्ती नसल्याने हे दाम्पत्य दुःखी असल्याचे कळताच राजा दशरथाने उदार मनाने आपली लाडकी लेक शांता या दाम्पत्याला दत्तक म्हणून देण्याचे जाहीर केले.
अर्थात शांता ही मावशीच्याच घरी राहणार असल्याने तिचे उत्तम प्रकारे संगोपन होईल याची कौसल्या राणीला खात्री होती. शिवाय या निर्णयाने आपली बहीण आनंदी राहील या विचारांनी राणी कौसल्येने राजाच्या निर्णयाला होकार दिला आणि तेव्हापासून लहानगी शांता रोमपद राजाच्या राजवाड्यात आनंदाने नांदू लागली.
अंगद देशाच्या राजा रोमपद यांच्या राजवाड्यात लाडाने वाढणाऱ्या शांतेला वेदशास्त्र, धनुर्विद्या, कला अशा वेगवेगळ्या विषयांचे ज्ञानही अवगत असल्याचे आख्यायिका सांगतात.
का म्हणून रामायणात फारसा उल्लेख नाही. रामायणाची कथा सुरु होते ती दशरथ राजा आणि त्याच्या तिन्ही राण्यांना अपत्यप्राप्ती होत नसल्याच्या चिंतेपासून! शांताच्या जन्मानंतर पुन्हा एकदा आपल्या घरात बाललिला दिसू लागतील या विचारांनी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांनी आपल्या लेकीला बहिणीला दत्तक दिले, मात्र त्यानंतर अनेक वर्ष त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. अशातच राणी कैकयी आणि सुमित्रा यांच्याही पदरी मुलबाळ नव्हते.
राजा दशरथ यांनी श्रृंगी ऋषींच्या आदेशाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्याचेच फलित म्हणजे अयोध्येत चार बालकांचा जन्म झाला.
शांतेचा विवाह :- रोमपद राजाच्या घरी लाडाने वाढणाऱ्या शांता देवीच्या विवाहाबद्दलही एक आख्यायिका सांगितली जाते. रोमपद राजा मुलगी शांतेशी खेळण्यात, तिच्याशी गप्पा मारण्यात व्यस्त असताना एका याचकाने आपल्या शेतीसाठी राजाकडे याचना केली. मात्र राजाने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. राजाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने याचक चांगलाच संतापला. हा याचक इंद्र देवाचा भक्त होता. इंद्रदेवाला आपल्या याचकाच्या अपमानामुळे राग आला, त्यामुळे रोमपद राजाला अद्दल घडवण्यासाठी इंद्रदेवाने शाप दिला. यामुळे पुढील वर्षी रोमपद राजाच्या राज्यात पाऊस पडला नाही, दुष्काळामुळे राज्यातील जनता आणि पर्यायाने राजाही हैराण झाला.
या समस्येतून मार्ग काढण्यासाठी राज्याने श्रृंग ऋषींना पाचारण केले. ऋषींच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्याच नेतृत्वाखाली हा यज्ञ भक्तीभावाने केला गेला आणि त्यानंतर दुष्काळाचे संकट टळले.
राज्यात सारं काही अलबेल झाल्याचे पाहून रोमपद राजाने खूश होत आपली कन्या शांता हिचा विवाह ऋषींशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शांता देवी आणि ऋषी श्रृंग हे कुल्लू येथे राहू लागले अशी कथा आहे.
कुल्लू येथून ५० किलोमीटर अंतरावर देवी शांता यांचे मंदिर आहे. या मंदिरात शांता देवीसह त्यांचे पती ऋषी श्रृंग यांचीही पुजा केली जाते. आजही देशातून अनेक भाविक या मंदिरात नित्यनियमाने पुजा करतात.
शांता देवी ही रामाची बहीण होती, हेच भरपूर लोकांना माहिती नाहीये, तर रामायणाचे प्रकार किती कसं माहिती असणार? यात मौखीक रामायण हे जास्त प्रचलित आहे. प्रांतानुसार वेगवेगळे रामायण येते. तसेच धर्मानुसार वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी नाती समोर येतात, किंवा तश्या लिहून ठेवल्या आहेत. जवळपास ३०० लिखित व अलिखित मौखीक रामायणाचे प्रकार जगभरात सापडतात.
जैन धर्माच्या मुनी विमलसूरी यांच्या प्राकृत भाषेतील रामायण हे जैन धर्मात अधिकृत मानले जाते, त्यात रामाचे नाव पद्म असे होते... दशरथ जातक या कथा बौद्धधम्म् नुसार रामायणच आहे असंही म्हटलं जातं.
आज साधारण लोकांच्या डोक्यात असते ते तुलसीदासकृत रामायण (१६-१७ व्या शतकात लिहले गेलेले) व ते ही कदाचित रामानंद सागर यांनी तयार केलेल्या धारावाहिक मध्ये त्याचा जास्त प्रभाव असल्यामुळे असेल.
वाल्मिकी रामायण हे सर्वात जुने रामायण (आर्ष रामायण) म्हटले जाते, ते काव्य स्वरूपात होते व लिखित स्वरूपात सापडत नाही. त्यात २४,००० श्लोक होते असं म्हणतात व ते ६ कांडांमध्ये विभागलेले होते. त्यात ७ वे उत्तरा कांड नव्हते, जे नंतर टाकण्यात आले आहे.
या व्यतिरिक्त *अद्भुत रामायण, कृत्तिवास रामायण, बिलंका रामायण, मैथिल रामायण, सर्वार्थ रामायण, तत्वार्थ रामायण, प्रेम रामायण, संजीवनी रामायण, उत्तर रामचरितम्, रघुवंशम्, प्रतिमानाटकम्, कम्ब रामायण, भुशुण्डि रामायण, अध्यात्म रामायण, राधेश्याम रामायण, श्रीराघवेंद्रचरितम्, मन्त्र रामायण, योगवाशिष्ठ रामायण, हनुमन्नाटकम्, आनंद रामायण, अभिषेकनाटकम्, जानकीहरणम्* आदी रामायण कथा आहेत.
विदेशात सुद्धा *तिबेटी रामायण,* पूर्वी तुर्किस्तानात *खोतानी-रामायण*, इंडोनेशिया मध्ये *ककबिन-रामायण*, जावा मध्ये *सेरतराम, सैरीराम, रामकेलिंग, पातानी-रामकथा,* इण्डोचायना मध्ये *रामकेर्ति* (रामकीर्ति), *खमैर-रामायण,* म्यानमार मध्ये *यूतोकी रामयागन*, थाईलैंड मध्ये *रामकियेन* आदि रामचरित्रांचे शाश्वत वर्णन केले आहे.
या व्यतिरिक्त काही विद्वान असेही मानतात कि ग्रीसचे कवि होमर यांचे प्राचीन काव्य *इलियड*, रोमचे कवि नोनस यांचे *डायोनीशिया* व भारतातील *रामायणाची कथा* यांच्यात अतिशय अद्भुत समानता आहे.
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
।। जय श्री शांतादेवी ।।
No comments:
Post a Comment