#आपुल्या वंशजाचे उणे.....
©®दीपाली थेटे-राव
समृद्धी! अगsss
किती हे बेताल वागणं तुझं.
कसंही... काहीही बरळतेस.
आई आहे मी तुझी
थोडा तरी विचार करून बोलत जा. उचलली जीभ...लावली टाळ्याला.
तुम्ही कसेही वागायचं आणि आई-वडिलांना चिंता.
अभ्यासात थोडंसं जास्त लक्ष दिलं असतं तर आज अॅडमिशनसाठी इतकी पळापळ करायला लागली नसती..पण तुम्हाला कोणी सांगायचं?
आई-वडिलांचं दुःख कळणार कधी ग? त्यांचा त्रास जाणवणार कधी तुम्हाला? तुम्ही आपल्याच मस्तीत..
वेळ निघून गेली की काही उपयोग नाही.
फक्त पस्तावा....
.................
आई प्लीsssज
इतक ओव्हर रिऍक्ट करण्यासारखं काहीही घडलेलं नाहीये.
तुला तर काय कारणंच लागतं बडबड करायला. थोडसं समजून घेतलंस मला तर कळेल..
किती टेन्शन असतात आम्हाला सुद्धा..
ही इतकी कॉम्पिटिशन..त्यातून तुमच्या अपेक्षा... अगं 100% पडले ना तरीही काहीतरी कमी राहीलच...
आम्हीही प्रत्येक क्षणाला लढतोच आहोत.
गोष्टी तुमच्या काळाइतक्या सोप्या राहिल्या नाहीयेत आता.
'कस' लागतो प्रत्येक ठिकाणी.
त्यात तुझं भलतच चालू असतं काहीतरी. तुझ्यापेक्षा त्या मिताची आई बरी!
कटकट तरी करत नाही तुझ्यासारखी. कायमच भुणभुण माझ्या मागे.
..............
हो! हो! जा मग त्यांच्याचकडे रहायला.
ते काय एकदम श्रीमंत आहेत. त्यांना काय फरक पडणार आहे.
किती का मार्क मिळोत लेकीला. त्यांच्यासारखाच गडगंज जावई बघतील आणि लग्न करून देतील.
तिला नोकरी थोडीच करायची आहे....
आमच्या मागे कायमच वनवास.. मन मारून जगणं. ..
तुझी देखील तीच गत व्हायला नको या चिंतेपाई ही कळकळ ग!
पण नाही कळणार तुम्हाला....
आई-वडील शत्रूच वाटतात.
चार चांगल्या गोष्टी सांगतो...बंधनं घालतो...म्हणून मग आमचं बोलणं म्हणजे कटकटच वाटणार. ...
.
.
.......आई आणि लेकीची बोलणी रीमाच्या सासुबाई देवाची पूजा करता करता ऐकत होत्या. आताशा तर हे रोजचंच झालं होतं.
समृद्धी वयात आली होती. तिला तिच्या मनाप्रमाणे जगायचं होतं आणि
रीमा..आपला हेका सोडायला तयार नव्हती. तिला समृद्धीचा पूर्ण कंट्रोल हवा होता. ती मान्यच करायला तयार नव्हती की आता समृद्धी मोठी झाली आहे. तिचे निर्णय..काळजी....ती स्वतः घेऊ शकते. मग यावरून दररोजची खडाजंगी. त्याचं पर्यावसन रागात आणि भांडणात.
वाईट वाटायचं त्यांना फार.
चाळीशीत जाणाऱ्या वयामुळे की मनावरच्या ओझ्याने...आताशा रीमाचे शब्दही जहाल होत चालले होते.
ताळ तंत्र उरायचं नाही तिला. मग काहीही बोलू लागे..गत आयुष्यातलं घडून गेलेलंही मग बर्याचदा ओठांवर आणि डोळ्यात यायला लागे. हळूहळू घरातलं वातावरण बिघडत चाललं होतं. त्यांनी घट्ट डोळे मिटले आणि ओघळणारं पाणी पदराने पुसून घेतलं. इकडे रीमाचं अजूनही चालूच होतं. ..
.
.
आई झालीस ना ss मग कळतील माझ्या यातना.
होssऊ दे तुलाही असाच त्रास. होऊ देss
तुझी मुलं अशीच वागली...तुला उद्धट, उलटी उत्तरं देऊ लागली की समजेल तुला. त्यांनी अभ्यास नाही केला आणि असं तुझ्यासारखं वागले की मग आठवतील माझे शब्द.
तुझ्या मुलांनी तुला असा त्रास दिल्याशिवाय तुला माझा त्रास कळणार नाही. अशीच तळतळ होऊ दे तुझीही...
देव करो आणि असंच घडो...
रडता रडता रीमा बोलत होती.
थांsssब रीमाss !!
पोथी वाचता वाचता ती अर्धवट सोडून सासुबाई बाहेर आल्या.
आवर स्वतःला.
काय बोलते आहेस?
शुद्ध आहे का तुझी तुला?
स्वतःच्या त्रासापायी इतकी वेडी झालीस की सारासार विवेक बुद्धीही सोडलीस?
तोंडाला येईल ते बोलतीयेस फटाफट. अग पोथी वाचतेस ना तू सायंकाळची..मग काय लिहिले आहे त्यात. नुसते शब्द नका वाचू.. भाव जाणा आणि आचरणात आणा..
आज तिच्या सासुबाईंचा देखील पारा चढला होता.
नको ग नको..नssको!
मागे घे तुझे हे असे अविचारी शब्द.
फार फाssर ताकद असते ग शब्दांमध्ये...
शेजारच्या मोरे काकू आठवतात?...
त्यांचा मुलगा लहान होता. मस्तीखोर होता. खूप त्रास द्यायचा...त्या सारख्या ओरडायच्या, मारायच्या त्याला.
एकत्र कुटुंब...त्याने केलेल्या खोड्यां मुळे त्यांना फार ऐकून घ्यावं लागायचं. प्रत्येक जण शेवटी...आईने वळण लावलं आहे की नाही?..या प्रश्नावर यायचा.
अतिशय वाईट वाटायचं त्यांना..रडायच्या..स्वतःलाही मारून घ्यायच्या.
मग नंतर नंतर मुलाची मस्ती आणि त्यांचा त्रागा इतका पराकोटीला गेला की त्या सतत त्याला मारताना....मरत का नाहीस तू एकदाचा?..म्हणायला लागल्या.
रागात त्या बोलून जायच्या...नंतर लेकाला जवळही घ्यायच्या...लाड करायच्या..खाऊपिऊ घालायच्या...
पण...पण वास्तू देवतेनी त्यांच्या मनापासुन तळतळून रागाने बोललेल्या शब्दांना तथास्तु म्हटलं होतं.
एके दिवशी शाळेतून अमित घरी येत होता. सगळे मित्र मिळून गोटया खेळत खेळत चालत होते. मधेच भांडणं झाली आणि एकानं अमितला जोरात ढकललं. तो रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांमध्ये जाऊन पडला. एक टोकदार दगड डोक्यात घुसला. मुलं रडत रडत घरी सांगायला आली. हे सगळेजण तिथे जाऊन पाहतात तोवर फार उशीर झाला होता.
अति रक्तस्त्रावामुळे अमित बेशुद्ध पडला होता...दवाखान्यात
नेऊ- नेऊस्तोवर त्याचा खेळ संपला. मोरे काकूंचा एकुलता एक मुलगा...आता त्यांना परत कधीच त्रास द्यायला येणार नव्हता. त्यांना छळणार नव्हता की खोड्या काढणार नव्हता.
त्या सैरभैर झाल्या आणि तशातच डोक्यावर परिणाम झाला त्यांच्या.
म्हणून म्हणते ग! हात जोडते तुला. नको बोलूस वाईट भरल्या घरात.
जा ! देवाजवळ जा. नमस्कार कर.
चुकले म्हणून माफी माग आणि तुझे शब्द परत घे. त्याला सांग....सांग त्याला परत परत...चुकून बोललेलं मागे घे. वास्तू देवतेची विनवणी कर. तिला म्हणाव...नको म्हणूस तथास्तु.
जा आधी जा
...
आता रीमालाही भान आलं होतं. आपण काय बोलून बसलो हे कळलं होतं तिला. लगबगीने ती देवाजवळ गेली...निरंजनातली वात मोठी केली आणि त्या उजेडात दिसणाऱ्या देवाला हात जोडून विनवणी केली, "देवा! चुकले मी. माफ कर. या माझ्या संसारात सगळ चांगलच घडू दे. माझ्या समृध्दीला खूप मोठं कर. तिचं पुढचं आयुष्य सुख- समाधानाचं असू दे बाबा! कशाचीही कमतरता नको.. उत्तम घर, नवरा, लेकरं मिळू दे माझ्या काळजाच्या तुकड्याला. कसल्याही विवंचना नको. "
नमस्कार करून ती बाहेर आली. सासुबाई समृद्धीलाही समजावित होत्या.."अगं नाही वागू असं. आईला मी आत्ता बोलले याचा अर्थ तू बरोबर आहेस असा होत नाही. चूक तर तुझी पण आहेच. तू योग्य वागलीस.. नीट अभ्यास केलास तर तिचा त्रागा होणार नाही. तिचंही वय वाढतंय ग आता!
वय वाढतंय पण जबाबदाऱ्याही कमी होण्याऐवजी वाढतातच आहेत. कळतं ग मलाही सगळं. मग माझ्या परीनं जेवढं करता येतं तेवढं करते. तुही का नाही हे समजावून घेत.
जा जवळ घे तिला आणि चुकलं म्हणून माफी माग तिची. पुन्हा असं वागणार नाही हेही कबूल कर.
खूप अभ्यास करा..मोठे व्हा आई-वडिलांना आणखी काय हवं आपलं मूल आपल्या नजरे देखत जाणतं झालं..मार्गी लागलं..तर त्यातच त्यांचं समाधान. त्यांना काही नको हो तुमच्याकडून. "
समृद्धीने जाऊन आईला जवळ घेतलं. सॉरी म्हटलं. पुन्हा असं वागणार नाही..खुप अभ्यास करणार...हेही कबूल केलं. ©®दीपाली थेटे-राव
नात्यांमधलं मळभ दूर झालं होतं. प्रेमावर पडलेलं विरजण आजीनं हलकेच दूर करून त्याला नवीन झळाळी आणली होती. दोघी मायलेकी मग आजीच्या पाया पडल्या आणि हसत हसत रीमा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करू लागली. समृद्धी ही तिला मदत करू लागली
समाधानाने आजी परत देवासमोर आली..पोथी वाचू लागली..
.....
। चित्ती समाधान असो द्यावे सदासर्वदा।
।आपुल्या वंशजाचे उणे पाहो नये कदा ।।
.......
.... 🙏🙏🙏
No comments:
Post a Comment