TechRepublic Blogs

Tuesday, December 31, 2024

अष्टावक्र गीता

 🕉️ *अष्टावक्र गीता/ प्रथम अध्याय-१*🕉️


*सत्य काय ?*


अष्टावक्र गीता हा जनकमहाराज व अष्टावक्र मुनी यांच्यातील संवाद आहे. तसं बघितलं तर जनक महाराज स्वतः विद्वान होते. त्यांच्या पदरी अनेक पंडित होते. पंडितांना आत्मज्ञान म्हणजे काय ते माहीत होते पण त्यांना त्याची अनुभूती नव्हती. म्हणजे आत्मज्ञान झालेल्या माणसाच्या मनःस्थितीची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे जागृतअवस्था व स्वप्नावस्था यातील खरी कोणती ? असा प्रश्न जनकमहाराजांनी दरबारात विचारला असता पंडितांपैकी कुणालाच समाधानकारक उत्तर  सांगता येईना. तेव्हा सभेतील पंडित एकमुखाने म्हणाले , " याचं उत्तर अष्टावक्र मुनीच देऊ शकतील , कारण ते आत्मज्ञानी आहेत."


दरबारातल्या पंडितांचं म्हणणं ऐकून जनक महाराजांनी अष्टावक्र मुनींना विचारलं , " मुनिवर , माणसाला वाघ मागं लागल्याचे स्वप्न पडले असेल तर स्वप्नात तो घाबरून पळत सुटतो. कारण त्यावेळेस तो मागं लागलेला वाघ स्वप्नात अनुभवत असतो. पण जेव्हा तो जागा होतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे वाघ वगैरे काही नाही मी तर माझ्या घरी गादीवर आरामात झोपलेलो आहे. 


आता माझा प्रश्न असा आहे की , वाघ मागं लागलाय म्हणून पळत सुटलाय ही स्वप्नावस्था व घरी गादीवर आरामात झोपलाय ही जागृत अवस्था या दोन्ही अवस्थांपैकी सत्य कोणती ?"


वरील प्रश्नाचं सामान्य उत्तर जागृत अवस्था हीच खरी असं वाटणं सहाजिक आहे परंतु जनक महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर देताना आत्मज्ञानी अष्टावक्र मुनि म्हणतात , " राजा , या दोन्हीही अवस्था खोट्या आहेत. जोपर्यंत तू दोरीला साप समजतोस तोपर्यंत तू घाबरलेला असतोस आणि ती दोरी आहे हे कळल्यावर तू निर्धास्त असतोस. या घाबरणे आणि निर्धास्त असणे या दोन्हीही अवस्था तात्पुरत्या असतात. तसं स्वप्न व जागृती या दोन्हीही अवस्था तात्पुरत्या आहेत आणि म्हणूनच असत्य आहेत.


*तू मूळचा  परमेश्वरी अंश आहेस तेवढंच फक्त सत्य आहे.*


कारण ,


मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं. कालांतराने त्याचं बारसं करून नाव ठेवलं जातं. आईबापांच्यावरून आडनाव मिळतं. जात ठरते. त्यानुसार संस्कार होतात. कुळाचा अभिमान बाळगला जातो. असा काहीसा प्रत्येकाचा आयुष्यक्रम चालू राहतो. 


पण तू बेसावध राहू नकोस. एक लक्षात घे , आपण सर्व मूळचे ब्रह्माचे अंश आहोत. म्हणून आपलं कुळ ब्रह्माचं आहे. त्याला शोभेल असं वर्तन ठेव. *आपण सर्व या सर्व दृश्य जगापेक्षा वेगळे आहोत हे लक्षात घेऊन यापासून अलिप्त होऊन रहायला हवं.*


मुनींच्या उत्तराने जनकमहाराजानी अतिशय प्रभावित झाले. त्यांनी अष्टावक्र मुनींना गुरु केले. त्यांची आत्मज्ञान विषयक जिज्ञासा जागृत झाली आणि त्यांना पडलेल्या तीन प्रश्नापैकी एक प्रश्न मुनींना विचारला की , *महाराज वैराग्य कसं येतं ?*


*क्रमशः*✍️

पंचामृत

 

             आपण आधी पंचामृताचे महत्त्व आणि त्याचा प्रतीकात्मक अर्थ देखील बघूया.

           शारीरीकदृष्ट्या दुध दही तूप साखर आणि मध ह्या पदार्थांचे आपले आपले उत्तम गुण आहेत. योग्य प्रमाणात जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांचे गुण अधिक पटीने वाढतात. उदा - :दुधाने रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्याच बरोबर प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन ए, बी १२ पण मिळते. दही हे प्रोबायोटीक रुपात कार्य करते, यात अमिनो अॅसिड असल्याने आपल्या पचनसंबधित समस्या दूर होतात. गायीच्या तूपात अँटी - इंफ्लामेट्री गुणधर्म असल्याने ते चेहरा खुलवतात, तसेच डोळे, गळा, आणि हृदयाला अधिक निरोगीपण प्रदान करतात. साखर ही उर्जा देणारी म्हणून महत्वपूर्ण मानली जाते आणि मध हे पंचामृतामध्ये वापरल्या गेलेल्या या सर्व गोष्टींचा प्रभाव वाढवण्याचे काम करते. ह्या फायद्यांशिवाय अजून खुप फायदे या प्रत्येक घटकात आहेत.

           थोडक्यात पंचामृत प्रसाद म्हणूनच नाही तर दैनंदिन आहारात जर समाविष्ट केले तर त्याच्या सेवनाने बुद्धी तल्लख होते, स्मरणशक्ती वाढते, तसेच त्वचा निरोगी राहते. पंचामृत पित्त शामक असून ते शरीरातील पित्ताला संतुलित ठेवते. त्याचे सेवन पचनक्रियेसाठी उत्तम ठरते.

          आणखी वैशिष्ट्य म्हणजे दुध शुद्धता आणि पवित्रता दर्शवते. दही समृद्धीचे प्रतीक आहे. तूप शक्ती आणि विजयासाठी असते. साखर आनंद आणि गोडवा आहे.. तर मध समर्पण आणि एकाग्रतेचे प्रतीक आहे.

                 ||श्रीराम ||

आम्ही *"बी घडलो

 🙏खालील लेख सर्व वाचला तर खरोखरच मानव जन्माला येऊन आपण काय करत आहोत हे कळेल .👏


*भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणस..!!!* 


रायगड १००० वेळा चढून जायचा प्रण कोणी करेल का....???

पण *श्री सुरेश वाडकरांनी* तो केला, आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. 

सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्षांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसाद देतात. 


*ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते.* 


ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात. 


*एक  जेधे नावाच्या तरुण आहे.* 

हा तरुण *२७ जानेवारी* आणि *१६ ऑगस्टला* एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. *हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून...!!!* कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.                                      


*डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत.* 

रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की रूळ ओलांडू नका, पुलावरून जा. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर. तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार...? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील. 


*मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच "वेडा" सिंधी दिसतो.*

 दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात *"जलसेवा"* असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने  ह्या सिंध्याला बोलत केलं होतं. त्याने सांगितलं, 

"आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो." आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण साहब, अब वक्त बदल गया..., आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.


*ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात.*


खरंच हे जग चालवतो कोण..??? 


स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री म्हणत; खंडाळा घाटात आडवा आलेला डोंगर फोडून त्यात बोगदा बनवण्याचं वेड काहींना लागलं होतं. म्हणून मुंबईची रेल्वे घाटातून वर चढून सगळीकडे गेली.  *ज्यांना वेड लागतं तेच हे जग घडवत आहेत, सुंदर बनवत आहेत.*


वरवर पाहता ही माणसे वेडी वाटतात. कारण जे चारचौघे करत नाहीत ते हे करत असतात. पण त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे. 


*एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही..!!!*


किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची. 

आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका...!!! आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले आहे. प्रत्येकाने वरील माणसासारखा *"वेडा"* विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल. 


एक छोटी प्रतिज्ञा देशाच्या अर्थकारणात बदल घडवेल.


अमेरिका, युरोप सुंदर आहेत हे आपण खूप ऐकलं. आता आपला देशही सुंदर घडवू. थोडा वेडेपणा करू. 


*अजून एक उदाहरण. शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो.* 

जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसील, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या असे उपाय सुचवतो.


सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो. 

म्हणून ह्या माणसाला *"ऍसिडिटी मॅन"* नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्या शिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो...??? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो. 


*असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी.*

 पती-पत्नी दोघेही *सायकिऍट्रिस्ट* आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. *म्हणून त्यांना  Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.* 


*अशी ही बिघडलेली माणसे आहेत.* आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. *अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं.* 

*आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.*


एक अभंग आहे....;

*"आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना"*

नीट वाचलं की समजतं;  आम्ही *"बी घडलो,"*

तुम्ही *"बी घडाना..! आवडलं म्हणून कॉपी पेस्ट केलं तुम्ही पण पुढे पाठवा आणि काही तरी प्रतिज्ञा करा*🙏🙏ॐ

🙏🙏

सुंदर विवेचन

 _अत्यंत सुंदर विवेचन आहे._

पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. 

याला भयसापळा असे म्हणता येईल. 


जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे. "हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही..!


माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे. एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व शरीराने मडक्‍यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.


आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच मुक्तिदायक नाही काय?


पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं, 

हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.


भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.

-- डॉ. विकास आमटे

दोन्हीही उदाहरणे ज्ञानेश्वर 

माउलींनी ज्ञानेश्वरीत दिलेली आहेत  छान मेसेज म्हणून पाठवला 👏🏻



Sunday, December 29, 2024

आईचा दिवस

 *आईचा दिवस,  एक शोकांतिका....*


खरं तर एक स्त्री रोग तज्ञ म्हणून हे प्रसंग मला नवीन नाहीत पण हे सगळे मागच्या तीन ते चार दिवसात एकत्रित घडलेत . Mother's day च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आईप्रती भावनांचा जो काही धुमाकूळ घातला जातोय, आजचा लेख त्यावर शोकांतिका म्हणून नक्की वाचा! एकच वाटतं, अजुनही,  नको तो जन्म बाईचा....


प्रसंग १

    १९ वर्षाची पहिलटकरीण,  बाळाचे ठोके कमी होताय म्हणून सिझरला शिफ्ट करत असताना, नवरा हात जोडून, " मॅडम, बाळ वाचेल ना? लवकर करा सीझर ...." तोच नवरा मुलगी झाली हे कळल्यावर तोंडावर सांगून गेला, " आधीच्या दोन बायकांना मुलीच झाल्या म्हणून तिसरं लग्न केलं होतं, हिलाही मुलगीच झाली. माझा आणि हिचा काही संबंध नाही...." 


     तिसरं लग्न त्याचं, हिचं पहिलं? कोणी लावलं? इतके लग्न officially कसे करू शकतं कोणी? आता ही काय करणार? सगळे प्रश्न अनुत्तरित ठेवून तो माझ्या डोळ्यासमोर निघून गेला.


प्रसंग २

      प्रचंड सुजलेली , BP वाढलेली, दिवस पूर्ण भरलेली बाई आणि नवरा लेबर रुमला आले. येताच पहिलं वाक्य, पैसे नाहीत, करायला कुणी नाही. हॉस्पिटल मॅनेजमेंट ला फोन करून बिलात सवलत मिळवून घेतली. डिलिव्हरी झाल्यावर गुंतागुंतीमुळे पेशंटला ICU त ठेवले. पैशाची सोय करून येतो म्हणून तिला लेबर रूम मध्ये गेलेला नवरा अजुनही परत आलेला नाही. तिला घरच्यांचा नंबरही पाठ नाही. हॉस्पिटलने, डॉक्टरांनी कशी आणि किती जबाबदारी घ्यायची ? आहे उत्तर ? 


प्रसंग ३

     २७ वर्षीय बाई, परवा रात्रीपासून ब्लिडिंग होतंय म्हणून अर्धवट बेशुद्ध अवस्थेत दाखल. नाडी १३०, bp ८०/५०, पांढरीफटक पडली होती. हिमोग्लोबिन रिपोर्ट आला ३ ग्रॅम. योग्य ते उपचार, रक्त देऊन तिला सेटल केल्यावर रागावले, "इतकं कशाला अंगावर काढायचं? यायचं ना लगेच... जीवावर बेतलं असतं" तिचं त्यावर उत्तर, " ताई, नवऱ्याला दोन दिवस सांगते आहे, दारूला पैसे असतात पण मला दवाखान्यात न्यायला नाही. चक्कर येऊन पडले म्हणून उचलून आणली "


    काय बोलणार, आहे उत्तर ?


प्रसंग ४

     गर्भनलिकेत राहिलेला गर्भ फुटून ( ectopic pregnancy ) पोटात रक्तस्त्राव झाला होता. Emergency ऑपेरेशन करून त्या बाजुची गर्भनलिका काढून टाकली आणि बाईचा जीव वाचला. नवऱ्याची प्रतिक्रिया, " दुसऱ्या नळीवर प्रेग्नन्सी राहीलच असं लिहून द्या, तरच बिल भरतो. नाहीतर एवढ्या बिलात तर दुसरं लग्न होईल माझं...." 

    चूक डॉक्टरची , तिची की नवऱ्याच्या प्रवृत्तीची ? 


    काल २४ तासांची ड्युटी करून हा लेख लिहिण्याचा अट्टहास मी एवढ्यासाठी केला की उद्या mother's day म्हणून खूप कौतुक करतांना ह्या असहाय आयांची तुम्हाला आठवण यावी. अरे, नका देऊ आईला लाखोंचे गिफ्ट्स, द्या एका स्त्रीला सन्मान, काळजी घ्या तिच्या आरोग्याची. बदला दृष्टिकोन तिला creation आणि recreation चे साधन म्हणून बघण्याचा !


    एक कळकळीची विनंती, आजुबाजुला अशी महिला दिसली तर जरूर मदत ( उपकार नाही ) करा. Mothers day ला घ्या ना विकत १०० लोहाच्या गोळ्या आणि वाटा तुमच्या घरातल्या कामवाल्या बायांना, सिक्युरिटीच्या बायकांना किंवा साईटवर काम करणाऱ्या महिलांना. घेऊन जा एखाद्या प्रेग्नन्ट गरीब महिलेला दवाखान्यात किंवा द्या तिला सकस आहाराचं पॅकेट !


   प्रत्येक स्त्री मध्ये आई बघा, आई बघा....


©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

स्त्री रोग तज्ञ

शंका

 *चित्रं वटतरोर्मूले*

*वृद्धाः शिष्या गुरुर्युवा।*

*गुरोस्तु मौनं व्याख्यानं* 

*शिष्यास्तुच्छिन्नसंशयाः॥*



पाहा, कशी ही अद्भुत गोष्ट आहे, वटवृक्षाच्या मुळाजवळ वृद्ध शिष्य बसलेले आहेत आणि गुरू तरुण आहेत. गुरू केवळ मौन अवस्थेत बसले आहेत. पण तेवढ्यानेच शिष्यांच्या सगळ्या संशयाचे निराकरण होत आहे.



गुरुंनी सविस्तर व्याख्यान/प्रवचन/स्पष्टीकरण केले, तर शिष्यांच्या शंका दूर होण्याची शक्यता असते. पण या श्लोकात असे सांगितले आहे की, गुरू काही बोलत नाही, पण शिष्य मात्र निःशंक होतात, हे महान् आश्चर्य आहे. 


*यातील कल्पना अशी आहे :-* 

गुरूच्या सांनिध्याचे/सामीप्याचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे की त्या सामर्थ्यामुळे शिष्यांच्या मनातील सर्व शंका संपतात.किंवा असे म्हणता येईल :- गुरू काही बोलत नाही, पण ते ज्ञानाचे मानसिक संक्रमण शिष्यांमध्ये करतात आणि शिष्यांच्या सर्व शंका नष्ट होतात.


*(श्री दक्षिणामूर्ति स्तोत्र - श्री आद्यशंकराचार्य)*



श्रद्धा

 आपली नामावरती श्रद्धा कशी पाहिजे? एकदा सद्गुरूंनी नाम दिल्यानंतर त्याला उच्च मूल्य दिलं  पाहिजे. मग अडचण असो, काही मिळवण्याचे असो, मनाची स्थिति कशीही असो या सगळ्याला उपाय भगवंताचे नाम. एक अप्रतिम उदा. पु.श्रीगुरुदेव रानडे याना देह ठेवण्याचत आधी एक दोन वर्षे क्षयाची बाधा झाली. त्यांना आधी मेंदूचा क्षय होताच. सोलापूरच्या डॉ.नी त्यांची थुंकी तपासली तर त्या ते क्षयाचे जंतू निघाले. नंतर त्यांना डॉ.नी औषधे दिली. पण यांनी काय केले तर त्यांच्या घरासमोर एक लहानसा खड्डा होता. त्यात ते रोज दहा वाजता उन्हात बसायचे आणि नामस्मरण करायचे. त्यांनी औषधे घेतली  नाहीत. आठ दिवसानंतर त्यांची थुंकी तपासली त्यात क्षयाचे जंतू सापडले नाहीत. यावर श्री.गुरुदेव म्हणाले " औषधाचे सगळं सामर्थ्य नामात नाही का?" अशी श्रद्धा गुरूने दिलेल्या नामात असणं हा परमार्थ आहे. सद्गुरूने जे सांगितले आहे . तोच माझा परमार्थ आहे. अन्य परमार्थ मला माहित नाही. अशी श्रद्धा नामावरती पाहिजे.

एक श्री.बाबा गांधी नावाचे श्रीगोंदवलेकर महाराजांचे शिष्य होते. त्यांना कॉलरा झाला. त्यात ताप व जुलाब होत होते. त्यांना विचारले " तुम्ही औषध काय घेता ?" तर ते म्हणाले " काही नाही . माझं औषध म्हणजे भांडयात पाणी घेतो, सद्गुरूंनी दिलेले नाम घेतो आणि पाणी पितो." ते त्यातून बरे झाले. हे कसं झालं हे विचारल्यावर ते म्हणाले " नाम देणारा जो गुरू आहे तो महाज्ञानी आहे . मी नाम घेणार ज्ञानी नसेन , पण जे नाम त्यांनी दिल आहे ते परमात्मास्वरूप म्हणून दिलं आहे ना , मग ते नाम घेतल्यानंतर रोग बरा झालाच पाहिजे."

Saturday, December 28, 2024

वेळेचं गणित

 🤷🏻‍♀️👩🏼👱🏻‍♀️👵🏻👩🏻‍🏫🤰🏻

*खरंतर ती पाठीशी उभी राहते आणि  थांबते म्हणूनच सगळं चाललंय.....व्यवस्थित.*

       😌🙏🏻🌹

असं म्हणतात की  वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही...

पण वेळेचं गणित साधणाऱ्या 'ती' ला मात्र थांबावं लागतं वेगवेगळ्या रूपात ! --उदाहरणार्थ .....

अगदी साध्या-साध्या गोष्टी आहेत....

पोळपाटावर एक पोळी लाटून तयार असते, इतकी जलद ....

पण 'ती' तिथे थांबून रहाते, तव्यावरची आधीची पोळी नीट भाजून होईपर्यंत, कंटाळा आला म्हणून अर्धी-कच्ची सोडत नाही....

कधी घामाघूम होऊन, कधी पाय, कधी पाठ दुखत असते.... 

तरीही...

सगळी कामे आटोपल्यावरही,

ती ओट्यापाशी थांबते, गॅसवरचं दूध ओतून  वाया जाऊ नये म्हणून.

तशीच,

जोडीदार आकाशी उंच झेप घेत असताना, घरट्यातल्या पिलांच्या पंखात बळ येईपर्यंत , 'ती' थांबते....

गरोदर पणात पोटातले बाळ चागले वाढेपर्यंत  थांबते...

जमेल तसे काम आणि जमेल तसा आराम करून ती बाळंतपण होईपर्यंत जीवघेण्या कळा सोसत ....नऊ महिने होईपर्यंत वाट बघत असते....

बाळ झाल्यावर सर्व शारीरिक त्रास सहन करून ...त्याचे संगोपन करण्यासाठी तेवढ्याच ताकदीने उभी रहाते.

शी-सू सांगता येणाऱ्या, पण आपले आपण आवरता न येणाऱ्या मुलांबाळांसाठी, 

कधी सोबतीला.... बाथरूमच्या दारापाशी ती बिचारी थांबून असते.

मुलांकडून अभ्यास करून घेताना, शब्द- वाक्य- गणितं- व्याकरण सगळं बरोबर येईपर्यंत 'ती' थांबते.

मुलं लहान असो नाहींतर मोठी परीक्षा.... पालक-सभा,

 त्यांचं अभ्यासासाठी पहाटे लवकर उठणं, रात्री उशिरा झोपणं.... सगळ्यासाठी ती त्यांच्या पाठीशी थांबते.

चहा-कॉफीचा एक एक निवांत घोट नवऱ्यासोबत घ्यायचा म्हणून थांबते...

तेवढ्याच चार निवांतपणाने छान गप्पा होतील, एकमेकांचे त्रास-ताण , शेअर करण्यासाठी.

घरातल्या सगळ्यांना जेवण वाढून होईपर्यंत.... 

कुणी उशिरा येणार असेल तर तोपर्यंत.... 'ती' थांबते, जेवायची.

सगळ्यांच्या पाठीशी 'ती', थांबते.

खरंतर ती पाठीशी थांबते म्हणून सगळे चाललंय. व्यवस्थित... 

काय हरकत आहे हे मान्य करायला...

*तिच्या या, थांबण्यातही एक ऊर्जा आहे* ...त्या ऊर्जेमुळेच सर्वांची कामे चांगली चालली आहेत.

अशा वेळेस प्रत्येक घरात, ती मात्र पाठीशी 'थांबून' आहे ....

अगदी स्ट्रॉंग, ऊर्जावान...

एकही दिवस किचन बंद नाहीये, कंटाळा येतो, थकवा ही.... येतो...

तरीही

रोजच्या-रोज सगळी स्वछता,  काळजी, 

कोणत्याही आजार

पणाला घरात शिरकाव करू द्यायचा नाही असं तिने मनाशी पक्क ठरवलेले असते. 

म्हणूनच म्हटलं, तिच्या या, थांबण्यातही एक ऊर्जा आहे..

त्या ऊर्जेमुळेच ही अशी अनेकदा आलेली  कठीण वेळ ही निघून जात असते...!!!

*प्रत्येक घरातील "तिला" सादर प्रणाम.*

 🙏🏻🌹😌

देह

 एकदा एक इसम श्रीगोंदवलेकर महाराजांना भेटण्यास मालाडला (वाणी अवतारात) दुपारी साडेतीन ते चारचे सुमारास आला. श्री बेलसरे त्यावेळी तेथे हजर होते. श्रीमहाराजांनी त्या इसमाची नेहमीप्रमाणे विचारपूस केली.  व नंतर एकदम त्यास म्हणाले "जप एकदम वाढवू नये. त्रास होण्याचा संभव असतो." या संदर्भरहीत बोलण्याचा श्री बेलसरे यांना उलगडा झाला नाही व तो इसम तेथून उठल्यावर त्यांनी त्याबद्धल विचारले. तेव्हा तो म्हणाला " मी तेच विचारण्याकरिता आलो होतो. एरवी ऑफिसमधून आल्यावर पाच हजारापेक्षा जास्त जप होत नाही. म्हणून मी सध्या रजा घेवून घरी बसलो आहे आणि नेहमीच्या पांच हजाराच्या ऐवजी आता मी रोज वीस हजार जप करावयास सुरुवात केली. परंतु हल्ली माझे डोके दुखू लागले आहे. तेव्हा याचा जपवाढीशी काही संबंध आहे की काय ते मी श्री महाराजांना विचारण्यास आलो होतो. परंतु त्यांनी विचारण्यापूर्वीच उत्तर दिले. त्यानंतर श्री बेलसरे यांनी श्रीमहाराजांना पुन्हा भेटल्यावेळी त्याबद्धल विचारले तेव्हा ते म्हणाले " तो इसम समोर आल्यावर त्याच्या आत जपामुळे निर्माण झालेली स्पदने मला दिसत होती. माझ्याकडे माणूस येतो तेव्हा मी त्याच्या बाहेरचा देह न पाहता त्याचा सूक्ष्म देह पाहतो व मला त्याचा मागचा जन्म, हा जन्म व पुढचा जन्म असे तीनही जन्म दिसतात."

Friday, December 27, 2024

मदत

 *मदत* 

  

  एखाद्याला मदत करण्याची कृती आपण स्वतः करतो ...(?)

की ती आपल्याकडून करवून घेतली जाते???

 दोन्ही प्रश्नाचे उत्तर' हो' असेच असेल नाही का?   

तर मदतीच्या कृतीबाबतचा एक किस्सा असा ....


     आर्ट ऑफ लिविंग चा बेसिक कोर्स करत असताना एकदा आम्हाला सांगितले की आता पुढेचे 15 मिनिट या हॉलच्या बाहेर जा आणि कुणाला तरी मदत करून या.  वेळ सुरू झाला आणि आम्ही बाहेर पडलो.


     आमची मदत घेण्यासाठी कोणी दिसते का शोधू लागलो.  

रस्ता रहदारीचा होता. एक आजी हातात जड पिशवी घेऊन चालत होत्या.  आमच्यापैकी एक जण धावतच तिथे गेला आणि अगदी विनयाने म्हणाला," आजी कुठे जायचे तुम्हाला? थोडे अंतर मी पिशवी घेतो ," त्याच्या या बोलण्यावर आजी संशयाने बाजूला झाल्या आणि चढ्या आवाजात म्हणाल्या, "बाजूला हो ....आला मोठा मदत करणारा" 😡 ...  एक प्रयत्न तर फसला😔 


    वेळ आता दहाच मिनिट उरला होता. पुन्हा शोधा शोध सुरू. 

रस्त्याच्या कडेला मळकटलेल्या कपड्यातली एक गरीब मुलगी दिसली. आम्ही तिकडे धावलो. शेजारीच वडापावचा गाडा होता. तिला म्हणालो  चल तुला वडापाव खायला देतो. त्यावर ती  आमच्याकडे संशयाने पाहू लागली. नको नको म्हणत दूर पळून गेली🫣🫣 

    आता पाच मिनिटे राहिले😟 

शेवटी वडे तळणाऱ्या बाईंना आमच्या टास्क बद्दल सांगितले.  आणि तुम्हाला काही मदत करू का असे विचारले. त्यावर तिनेही नकार दिला, माझे वडे बिघडवून ठेवाल असे म्हणाली.  वेळ संपला आणि कुणालाही मदत न करता आम्ही परत आलो😔😔


    आल्यावर सरांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर ते म्हणाले,

आता तुमच्या लक्षात आले असेल मदत करण्यासाठी तुमची निवड व्हावी लागते.  कुणी ही मदत करू शकत नाही ,मदत तीच व्यक्ती करते ज्याची परमेश्वराने निवड केलेली असते.  त्यामुळे इथून पुढे आयुष्यात जर कुणाला तुमच्या माध्यमातून मदत झाली तर "मी केली" असे म्हणू नका.  ती परमेश्वराने केलेली असते.पण कृतीचे माध्यम म्हणून तुम्हाला निवडले आहे हे विसरू नका...आणि त्याच्या  इच्छे शिवाय हे शक्य नाही हे ध्यानात ठेवा. 

    ही शिकवण त्यानंतरच्या प्रत्येक मदतीच्या कृती वेळी मला आठवत राहिली.  आणि आपण फक्त माध्यम आहोत, हे सतत जाणवत राहिले.यामुळे *'अहंकाराचा वारा'* काही प्रमाणात का असेना थोडा दूर रहातो हे मात्र नक्की😊

लाचारी

 पु.श्री.परमाचार्य नावाचे मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे एक शिष्य म्हैसूरच्या न्यायालयात न्यायाधीश होते. हे सद्गृहस्थ श्री.शंकराचे भक्त होते. "ओम नम: शिवाय " या मंत्राचा पाच हजार जप केल्याशिवाय ते जेवत नसत. त्यांना ईश्वरदर्शनाची ओढ होती.

 निवृत्त झाल्यावर ते सद्गुरूंकडे आले आणि म्हणाले " मला ईश्वरदर्शनाचा मार्ग सांगा " सद्गुरू त्याला म्हणाले " मी मोठा न्यायाधीश होतो हे आधी विसरा" 

( अमानित्व) ते  विसरण्यास काय करायचे ते सांगा असे म्हटल्यावर सद्गुरू म्हणाले " जेथे आपणांस कोणी ओळखणार नाही अशा ठिकाणी जाऊन भीक माग." मग ते न्यायाधीश सद्गुरुंच्या आज्ञेनुसार घर सोडून द्वारकेला गेले. 

तेथे श्रीकृष्णाच्या मंदिरासमोर ते भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये बसून भीक मागू लागले. कमरेला एक पंचा, खांद्यावर एक टॉवेल व हातामध्ये एक पत्र्याचा डबा असा त्यांचा अवतार होता. एकदा तेथे म्हैसूर सरकारचे एक शिक्षण अधिकारी मे महिन्याच्या रजेत द्वारकेला गेले. 

श्रीकृष्णाच्या दर्शनाला जाताना त्यांनी या भिकाऱ्याला पाहिले. या माणसाला कुठेतरी पाहिले आहे असे त्यांच्या मनात आले.पण बरोबर आठवेना. बारा वाजता मंदिर बंद झाले तसे भिकारी उठून जाऊ लागले.

 हे आधिकारी त्या न्यायाधीशाच्या मागे जाऊ लागले.  न्यायाधीश आपल्या खोलीवर गेले . कुलूप काढताच या अधिकाऱ्याने त्यांना ओळखले . नमस्कार करून विचारले " हे असे का ?"

 न्यायाधीश म्हणाले " माझ्या मनातील मोठेपणाची भावना नाहीशी करण्यासाठी सद्गुरूंनी हे करायला सांगितले." मग ते साधले का ? असे विचारल्यावर न्यायाधीश म्हणाले "

 मी मोठा न्यायाधीश होतो हे मी खरच विसरलो. पण लोकांजवळ भीक मांगताना अजून खऱ्या भिकाऱ्याची लाचारी येत नाही. मला पेन्शन आहे हे विसरणे कठीण जाते ."

अनुकरण

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🍀कृष्णलीलांचे चिंतन व रामचरित्राचे अनुकरण!🍀*


*एकदा एका भक्ताने अशी गमतीची शंका विचारली की, नरकासुराचा वध केल्या नंतर त्याच्या बंदिवासातून सोडविलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांशी श्रीकृष्णांनी लग्न केले इतकी लग्ने करायला त्यांना किती वेळ लागला असेल ?*

*श्रीमहाराज म्हणाले, "राम नाम घ्यायला याच्या उत्तरावाचून काही अडचण आहे का ? पण असो किती दिवस लागले असतील असे तुम्हाला वाटते ?" त्यावर ते गृहस्थ म्हणाले " अगदी एक  दिवसात एक म्हटले तरी जवळ जवळ पंचेचाळीस वर्षे लागतील !" 

श्रीमहाराज म्हणाले "श्रीकृष्णपरमात्म्याने हे सर्व एका दिवसांत उरकले "ते गृहस्थ आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, "ते कसे काय ?"  तेव्हा महाराज म्हणाले, "अहो तुम्ही रोज विष्णुसहस्त्रनाम म्हणता ना ? त्यात त्याचे उत्तर आहे शेवटच्या नमनात काय शब्द आहेत ?

 "नमोsस्तनंताय सहस्त्रमुर्तये". हजारो रुपांनी वावरणारा असेच वर्णन आहे ना ? तर प्रभूंनी सोळा हजार रुपे धारण करुन सोळा हजार स्त्रीयांशी लग्न करण्याचे काम एकाच दिवसांत उरकले. मात्र अशा अनंत रुपानी व्यक्त होण्याचे सामर्थ्य ज्याचे असेल त्यानेच अशी लग्ने केली तर शोभतात.

 एका लग्नाने रडकुंडीस येणारा या फंदात पडेल तर घसरेलच त्या गृहस्थांनी पुढे आणखी प्रश्न केला की, "महाराज कृष्णप्रभूंनी त्या स्त्रीयांना आपल्या पतीकडेच का पाठवून दिले नाही? त्यावर श्रीमहाराज म्हणाले, "त्या असुरांच्या बंदिखान्यात ज्यांना दीर्घकाळ कंठावा, लागला 

त्या स्त्रियांना पुन्हा पूर्वी इतक्याच प्रतिष्ठेने त्यांच्या पतींनी स्विकार केला असता असे तुम्हाला वाटते ? आणि मग त्या बिचाऱ्यांची समाजात काय अवस्था झाली असती ? अगदी साधे जगणेही त्यांना अशक्य झाले असते आणि सर्व समाज अनीतीने किडून सडून गेला असता म्हणून केवळ समाजधारणेसाठी प्रभूंनी त्यांचा स्वीकार केला त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.

 त्यांचा उध्दार केला आपण हे लक्षांत ठेवावे की श्रीकृष्ण हे लीलापुरुषोत्तम होते त्याच्या लीलांचे चिंतन करावे. आश्चर्य करावे. अनुकरण योग्य नाही*

 *अनुकरणासाठी मर्यादा पुरुषोत्तम रामरायाचेच चरित्र डोळ्यापुढे ठेवावे."*


*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*


*प.पू.सदगुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*

Thursday, December 26, 2024

ठिकाण

 गोंदवल्याहून फलटणकडे येणाऱ्या मार्गावर झीरपवाडी नावाचे छोटे गाव लागते. तिथून एक फाटा आत वळतो. तो थेट नेतो आपल्याला गिरवी नावाच्या छोट्याशा गावाकडे.

दाट झाडीच्या कमानीतून जाणारी ती वाटच इतकी लुभावनी आहे, की ती पोहोचते ती जागा किती सुंदर असेल याची झलक जणू दाखवते.

१७-१८ कि.मी. अंतर आत गेलं की गिरवी गाव लागते. या गावातलं देशपांडेपण असलेल्या बाबुराव देशपांडे यांनी ५०० वर्षांपूर्वी बांधलेलं गोपाळकृष्णाचं मंदिर बघण्यासाठी खास वाट वाकडी करून या गावी आम्ही गेलो होतो. आहेच तसं हे मंदिर. गाव संपल्यावर शांत निवांत हिरव्यागार वातावरणात विसावलेलं एका जुन्या वाड्यातलं हे मंदिर आहे.

आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होतं. आताचे देशपांडे वंशज पुण्यात आणि फलटणला असतात. मंदिर असलेला जुना वाडा आणि त्या परिसराची देखभाल एका कुटुंबाकडे दिलेली आहे. पुजारी सकाळी गावातून येऊन पूजा करून गेले होते. त्यांच्याकडे कुलुपाची किल्ली असल्याचे कळले. 

आमची मंदिर आणि गोपालकृष्णाच्या दर्शनाची तीव्र इच्छा बघून एक मुलगा सायकलवरून गावात गेला. बऱ्याच वेळाने तरुण पुजारी बाबा आले. साधा सरळ भला मानुष होता. सगळे मंदिर आतून बाहेरून दाखवले. मूर्तीची कथा ऐकवली. गाभाऱ्यात जाऊन जवळून मूर्तीचे निरीक्षण करू दिले. फोटो काढू दिले.

मूर्तीची कथा मूर्तीसारखीच आगळीवेगळी आहे.

५०० वर्षांपूर्वी बाबुराव देशपांडे या सात्विक गृहस्थांना दृष्टांत झाला कि त्यांच्या शेतात शाळीग्राम आहे. त्यांनी ठराविक जागेवर शोध घेतल्यावर मोठी काळी शिळा मिळाली. या शिळेची, त्यांच्या आराध्याची, गोपाळकृष्णाची मूर्ती घडवावी असे त्यांच्या मनाने घेतले. अनेक कारागिरांना त्यांनी बोलावले. पण त्यांच्या मनात असलेली मूर्ती बनवण्यास कारागिरांनी असमर्थता व्यक्त केली.

निराश बाबूरावांनी भगवंतावर हवाला सोडला. आणि एके दिवशी सकाळी त्यांच्याकडे दोन कलाकार आले. बाबुरावांना हवी तशी अखंड एका शिळेतली मूर्ती घडवून देण्याचे त्यांनी कबुल केले.

पण बाबुराव त्यांच्याकडे हताश होऊनच बघत होते. कशी घडवणार हे दोघे मूर्ती? एक आंधळा तर दुसरा थोटा.

पण दोघांनी त्यांना मूर्ती घडवण्याचे आश्वासन दिले. एका बंद खोलीत त्यांचे काम चालू झाले. जेवणखाण त्यांना पुरवले जात होते. पण मूर्ती मात्र कशी घडतेय ते बघता आलं नाही कोणाला.

काही काळानंतर त्यांनी खोलीचे दार उघडून बाबुरावांना आत बोलावून मूर्ती दाखवली. अप्रतिम.. अप्रतिम बनली होती मुर्ती. बाबुरावांच्या कल्पनेतल्यापेक्षाही खूपच सुंदर. हातात बासरी घेऊन वाजवत असलेला गोपाळकृष्ण, त्याच्या पायाशी बसून मान उंचावून ती बासरी ऐकण्यात तल्लीन झालेल्या दोन गायी, त्यांच्या चेहऱ्यावरची आर्तता, गोपाळकृष्णाच्या अंगाखांद्यावरचे दागिने.. या दागिन्यांचे डिझाईन थेट वृन्दावनातल्या दागिन्यांसारखेच होते. घाट तिकडचा होता. 

वर कडी म्हणजे या मूर्तीत हरि आणि हराचे ऐक्य दाखवले होते. गोपाळकृष्ण उभा आहे त्याखाली शिवाची मोठी पिंडी आहे. 

मूर्तीखाली सही केल्यासारखे त्या कारागिरांनी आपले चित्र कोरले आहे. एक आंधळा आणि एक थोटा.. आणि त्यांच्या बरोबर आहेत श्रीविष्णूचे भालदार चोपदार...जय,विजय. 

इतकी सुरेख मूर्त बघून बाबुराव भारावले. कारागिरांचा उचित सत्कार करण्यासाठी त्यांनी मेजवानी आयोजित केली. जेवणापूर्वी स्नान करून येतो म्हणत दोघे वाड्या मागच्या शेतातल्या विहिरीवर गेले... गेले ते गेलेच. परत काही आले नाहीत. आज त्या वावीवर त्या दोघांची समाधी त्यांची आठवण म्हणून बांधली आहे.

काही काळाने बाबुरावांनीही देह ठेवला. त्यांची समाधी मंदिराखालच्या भुयारात आहे. पुजारी बाबांनी आम्हाला त्या ठिकाणीही नेले. पलीकडेच देशपांडे कुलाच्या मूळपुरुषाची समाधी आहे. समाधी समोर गणपतीचे छोटे मंदिर आहे.

जुना वाडा, त्या वरच्या महिरपी, कुठे कुठे उगवलेली झुडुपे, गणपतीची त्या समाधी समोरची प्राचीन मूर्ती, सुं सुं आवाज करत घोंघावणारा माळरानावरचा वारा.. असं वाटत होतं वाड्याच्या त्या कोपऱ्यात काळ गोठून गेलाय.

पुण्याच्या श्री. देशपांडे यांना पुजारीबाबांनी फोन लावून दिला. अतिशय अगत्याने ते बोलले. एक दिवस आधी कळवलं असतं तर मी स्वत: आलो असतो आणि माहिती दिली असती असे आवर्जून बोलले. खरी मोठी माणसं. मोठ्या मनाची.

परत येतांना लक्षात आले की फलटण गिरवी असा आतून एक मार्ग आहे आणि ते अंतर खूप कमी आहे.

आवर्जून भेट द्यावी असे ठिकाण नक्की आहे हे.

-मेघा कुलकर्णी संकलन -प्रशांत शिंदे

Wednesday, December 25, 2024

द्वेष

 *संग्रहित*

संकलन आनंद पाटील 

*काही लोक अंत:करणात विनाकारण द्वेष करतात. ईर्ष्या व द्वेष या दोन गोष्टी अंत:करणातून द्वेष करणे ह्यामुळे आपले हृदय कमकुवत होते. मनुष्याला फार अल्प आयुष्य दिले आहे. ह्या वेळेत त्याला पुष्कळ चांगली व* *विधायक कामे विचारपूर्वक करता आली पाहिजेत. ह्या देहाला केव्हा कीड लागेल, रोग होईल, कॅन्सर होईल किंवा हृदयविकार होईल हे सांगता येत नाही. विज्ञान जरी पुढे* 

*गेलेले असले तरी ह्या कोणत्याही रोगावर ते मात करू शकलेले नाही. ही सत्ता ईश्वराच्या हातात* *आहे, आपल्या हातात नाही. आपल्या हातात सत्ता आहे ती ही की, रोज काय काय व कसे घडते* *हे डोळ्यांनी पाहणे,* 

*जेवणे व निवांत झोपणे. झोपण्याअगोदर नामजप* *करावा, नंतर देवाला प्रार्थना करावी की, देवा आपल्या* *कृपेमुळे आजचा दिवस चांगला गेला, उद्याचा दिवसही* *असाच चांगला जाऊ दे. तुम्ही सत्पुरूषांची संगत ठेवा, त्यांचे* *उपदेश ऐका. त्यावर विश्वास ठेवा. तुमचे कल्याण होईल. काही लोकांच्या मनात  . 

  इतके असंबद्ध प्रश्न असतात की* *त्याला काही अर्थ नसतो.  सद्गुरुंचे सांगणे असे की, सर्व भार ईश्वरावर ठेवा.* *सर्व चिंता सोडून द्या. जितके नामस्मरण करता येईल तितके करा व आनंदात राहता येईल तेवढे रहा. ईश्वर ही एकच अशी प्रभावी शक्ती आहे. तिचेशी सतत*

 *अनुसंधान ठेवा. असे वागल्याने तुम्हाला जीवनात सुख व शांती मिळेल. कारण ती महान प्रभावी शक्ती आहे आणि त्या दिव्य शक्तीचा संतांनी अनुभव घेतलेला आहे. शक्यतो  रोज पहाटे बाह्य मुहूर्तावर  भगवंत स्मरण केल्यास पारमार्थिक प्रगती लवकर गाठते. सद्गुरुंचा  उपदेश आठवा व चिंतन-मनन करा. 

Tuesday, December 24, 2024

स्वास्थ्य

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*स्वतःला  सुधारण्याचा  प्रयत्‍न  करावा .*


वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ. देहाने, मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण, आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे; पण ते मिळविण्याकरता साधन, म्हणजे प्रयत्‍न करणे जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे तीन, एक आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे; दोन, मागच्या बर्‍यावाईट कर्मांची आठवण होणे; आणि तीन, उद्याची काळजी लागणे. आता, जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील ? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी, आपली इच्छाच नाहीशी करावी; अमुक गोष्ट मिळावी ही बुद्धीच नाही ठेवू; हाव सोडावी, लोकांची आस सोडावी; जे काही होते ते 'रामाच्या इच्छेने झाले' म्हणावे. प्रत्येक गोष्ट 'रामाने केली' म्हणणे, म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात रहणे.


आपला अहंपणा किती खोल गेला आहे पाहा ! समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालून डोळेझाक करून, आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसर्‍यावर फोडायला तयार होतो. अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो, कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही ! ते म्हणण्याची लाज वाटते, म्हणून दुसर्‍याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो. आपला मुलगा आपल्या डोळ्यादेखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो, तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे ! संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे, तर संतसंगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये ? संतसंगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे ! पण तसे तर दिसत नाही; मग नडते कुठे ? याचे मुख्य कारण म्हणजे, आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्‍नच करीत नाही. आपल्याला सर्व समजते, परंतु प्रयत्‍न करायला नको ! वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्‍न करीत नाही. त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो, आणि वासनेतच आपला अंत होतो. याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे, आणि तो म्हणजे भगवंताला अनन्यभावाने शरण जाणे. "रामा, तुझ्यावाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानीन. तुझे प्रेम मला लागू दे," असे कळकळीने रामाला सांगावे, आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री बाळगा.


*१३४ .   वासना  मारायला  भगवंताचे  अधिष्ठान  हा  एकच  उपाय  आहे .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

पंचामृत

 

             श्रीराम,

  पंचविषयांचे पंचामृत अर्पण करण्याचा विचार करण्यापूर्वी आपण भगवंताला पंचामृताचा अभिषेक का करतो ते आधी थोडक्यात बघू. आपल्या कोणत्याही पूजेत पंचामृत हा महत्त्वाचा घटक मानला जातो, याशिवाय पूजा अपूर्ण समजली जाते. कारण आपल्या पूर्वजांना दही, दूध तूप शर्करा आणि मध हे पाच घटक योग्य प्रमाणात मिसळले असता आणि ते तीर्थ म्हणून प्राशन केले असता, त्याचा शरीराला होणारा फायदा माहीत होता.. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या सर्व पूजेत या अमृताचा समावेश केला आहे.

                आपल्याकडे असलेल्या सर्वोत्तम गोष्टी मग त्या अन्नातील का असेना, देवाला अर्पण करायच्या, ही भावना समर्पण शिकवते. त्याचबरोबर देव म्हणजे फक्त मूर्तीतील नव्हे तर आपले आईबाबा, गुरू इतकेच नव्हे तर घरी येणारा अतिथी देखील देवच आहे ही शिकवण आपल्याला दिली जाते. स्वतःसकट सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने, सर्वांनी तंदुरुस्त राहण्यासाठी या पंचामृताचे प्राशन करावे ही त्यामागची भावना आहे. 

       आपण प्रार्थना करतो, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. आणि प्रार्थनेबरोबर पंचामृताचे तीर्थ देतो.. त्यामुळे मनातील सकारात्मक भाव त्यात उतरतात आणि त्याचा सगळ्यांनाच शारीरिक व मानसिक दृष्ट्या खूप फायदा होतो. 

                  ||श्रीराम ||

Monday, December 23, 2024

पंचमहाभूतांची सूक्ष्म रूप

 साधुंना, सत्पुरुष यांना देहाचे धर्म रहात नाहीत. त्याचं एक लक्षण असं आहे की ते  कधीही सावकाश चालायचे नाही. त्यांचे कारण असं आहे की त्याच्या शरीरात पंचमहाभूतांची सूक्ष्म रूप जास्त प्रमाणात असतात. त्यातल्या त्यात जे आकाश तत्व आहे ते अधिक सूक्ष्म असत. त्याच्या खालोखाल वायू तत्व असत.

 त्यामुळे त्यांचा देह हलका असतो, म्हणून ते भरभर चालतात. दुसर असं लक्षण आहे की ते जेव्हा आपल्याकडे पाहतात  ना तर त्यांच्या डोळ्यात त्याच्या आतमध्ये काय आहे ते कळायचे नाही. ते कुठेतरी पाहत असतात. कारण त्यांचे दृष्याकडे लक्षच नसत. ते आतमध्ये गुंतलेले असतात. तिसरे लक्षण अस की त्यांच्या शरिराकडून वाईट कर्म कधी होणारच नाही. त्यांचा देह अत्यंत पवित्र असतो. त्यांना प्रारब्धाचे भोग कधीही चुकत नाही.

 त्यांचे तिकडे लक्षच नसते. अशा महात्म्यांना इंजक्शने वगैरे औषधे चालत नाहीत. होमीओपाथीची औषधे चालतात. ती औषधे सूक्ष्म असतात. बारामतीला एक साधू होते.ते एकशे वीस वर्षे जगले.

 त्यांना एकदा विचारले की तुम्ही इतकी वर्षे कसे जगलात. तेव्हा ते म्हणाले "मृत्यू म्हणजे काय? तर आपल्या   शरीरातले पंचमहाभूतांचे महत्व आहे ते बिघडते.

 मग जे तत्व शरीरात कमी असतं ते आम्ही विश्वातून  घेतो. म्हणजे पुनः आपलं शरीर उत्तम. म्हणजे पंचमहाभूतांचे महत्व येते. " असा सत्पुरुषांचा देह सुक्ष्म असतो त्यामुळे ते   जडान्न फार घेत नाहीत. ते फार बेतानेच खातात.

Sunday, December 22, 2024

परमानंदाची प्राप्ती

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


  *या विश्वातील सर्वच संतांनी, भक्तांनी भगवंतावर निस्सीम प्रेम करुन परमानंदाची प्राप्ती करून घेतली आहे. जो जगाचा जनिता, विश्वाचा जनिता, आहे ना तो फक्त आणि फक्त एका प्रेमाचा भुकेला आहे, प्रेमानेच आळवला जातो. ज्ञान - अज्ञानाच्या, सुख -दुःखाच्या पलीकडील तीरावर असलेले परमानंद स्वरुप असलेले परब्रह्म म्हणजे भगवंत हे प्रेम भक्तीने भुलले आहेत. ज्या भगवंताची व्यापकता इतकी व्यापक आहे की, त्या व्यापकतेला सुद्धा आदिही नाही व अंतही नाही.

 त्या भगवंताला फक्त एका आईच्या प्रेमाने बांधले गेलेले आपण पाहिले आहे. अशाच निरुपम प्रेमाने भगवंताला गौळणींनी, गोपीकांनी, भक्तांनी, संतांनी, सद्गुरुंनी बांधले आहे. त्या प्रमाणेच प्रेम भक्तीने भगवंताला बांधले असता, सर्व सुखाचे सुख त्या भगवंताच्या श्रीमुखकमळावर शोभून दिसते.

 आपल्या अज्ञानी जीवाला सुद्धा त्या जगाचा स्वामी असलेल्या परब्रह्माला प्रेमाने बांधायचे, आपलेसे करायचे असेल,

 तर त्यांना मनोभावे शरण जाऊन त्यांचे सतत स्मरण करून त्यांची काया, वाचा, मनाने प्रेमपुर्वक सेवा करावी म्हणजेच त्यांना तनु मनाची कुरवंडी करुन ओवाळणे होय.*


 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Saturday, December 21, 2024

आपली मठी ती मठीच

 *एका चेंज ची गोष्ट .....*

              बघा पटतय का   ...



अडीच तीन वर्षा पूर्वीच्या 

ह्या दोन्ही गोष्टी बरं कां ....

 

लेक इरा आणि मी गोखले रोडवर एका साडीसाठी फिरत होतो. ठराविक शेडची च साडी आणि त्यावर हटके ब्लाउज आणि हटके अक्सेसरीजसाठी अक्ख ठाण फिरलो मिळाली एकदाची .. 


ज्या लग्नासाठी हा अट्टाहास केला होता. अगदी शारीरिक. मानसिक आर्थिक उलाढाली केल्या होत्या.


त्या लग्नात सगळं घालून लेक मिरव मिरव मिरवली. फोटो फोटो कित्ती कित्ती .. दिवसभर सगळं गोषवारा मिरवून घरी आल्यावर.


सर्वात आधी रूममध्ये गेली ,

सगळा फरारा सोडून घरच्या टी शर्ट आणि थ्री फोर्थ मध्ये आली आणि 

*हुश्श  आई आत्ता कुठे बरं वाटल गं.*

*कसल घट्ट घट्ट गं*

*आता रिलॅक्स एकदम .....*


मी मात्र  ...   😳😳 


अग बयो तुला ह्याच्यातच रिलॅक्स वाटणार होत तर मग तो गोखले रोड, तो जांभळीनाका, ते उन्हा तान्हातून फिरण, हेच नको तेच नको, त्या सगळ्या उलाढाली .....


हाय रे रामा ....

अर्थात मी हे सगळ मनातल्या मनातच  म्हणाले बरं कां.


काही वर्षा पूर्वी आम्ही सगळया ग्रुप नी 

नैनिताल ,दिल्ली  अशी ट्रिप अरेंज केली. अगदी आम्हाला आता सगळ्या बायकांना कसा खूप कंटाळा आला आहे 

आणि कित्ती ब्रेकची गरज आहे हे मृणालच पालुपद चघळून चघळून अखेर त्या ट्रिपच बुकिंग झालंच


मग हा मोठा ब्रेक साजरा करण्यासाठी ,खरेद्या, 

नवीन कपडे,चपला, लिपस्टिक्स, मॅचिंग्ज सगळं सगळं काही आलंच की ओघाने, 


ती सगळी प्रथा व्यवस्थित आर्थिक उलाढाल करून पार पाडून आम्ही ट्रिप ला निघालो, 


निघताना पुन्हा एकदा गजर ... 

*फारच गरज होती बैई ह्या ब्रेक ची*


आठ दिवस नुसत फिर फिर फिरण,

नटण,खाणं, पुन्हा खरेदी ,गप्पा टप्पा,

फोटो फोटो किती फोटो आणि व्हिडीओज ऐंशी जीबी स्टाॅक साठला

हे सगळं काही करून दहाव्या दिवशी 

मृणालने घराचा दरवाजा उघडला , 

     

तिथल्या थ्री स्टार हाॅटेलातल्या 

बाथरूम मधून घरातल्या न्हाणीघरात 

थंडगार पाण्याने सचैल स्नान करून,

देवाला नमस्कार  केला, 

*हुश्श काय बरं वाटलं घरी आल्यावर*

*घर ते घर च  बैई  शेवटी   .....*


आता मी आणि लेक ..... 😳😳


मग हा एवढा विमानाचा खर्च , 

ट्रिप, फिरण, खरेदी ..... 


यू नो मोठा ब्रेक साठी केलेला आटापिटा 

एवढं करून घरी आल्यावरच बरं वाटलं 🤔


🤔 अर्थात तो ही हे मनातल्या मनात च


एकूण काय 

चेंज हा फक्त चेंज च असतो 


जगातल *अंतिम सत्य* हे फक्त 

*घर, वरणभात तूप,आणि आपले रोजचे ढगळ पगळ कपडे ...*

😇


पटतंय कां ? 

तुमचं ही असंच होत ना ?

*आपली मठी ती मठीच*

*बाकी सब कुछ झूठ है रे बाबाऽऽऽऽ....*

Thursday, December 19, 2024

इंग्रजीचं फॅड

 आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतं 

ABCD .......XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !

आणि आता 

ABP माझा , CID , MRI , X-ray , Z-TV विचारूच नका .

आमच्या लहानपणी , 

This is Gopal . अन That is Seeta .हे दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायचे तरी जबरदस्त कौतुक व्हायचं !

आई लाडानं जवळ घ्यायची आणि मायेनं मुका घ्यायची आई लेकराकडे इतक्या कौतुकाने पहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्या सारखंच वाटायचं !


अहो कंडक्टर याच्यामुळे की .....आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने , 

हं sss काय रे बाळ मोठेपणी तू काय होणार ?

असा प्रश्न विचारला की ते पोट्ट हमखास म्हणायचं .....

मी मोठेपणी कंडक्टर होणार किंवा पोलीस होणार !

तुम्हाला खोटं वाटेल मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळालं असा प्रश्न कोणीही कुणाला विचारत नव्हतं 

फक्त एवढंच विचारायचे ....

*पहिल्या झटक्यात पास झालास न ?*

आणि आपण हो म्हणताच अख्ख्या गावाला आनंद व्हायचा !

म्हणजे पहा सुखाच्या , आनंदाच्या , मोठं होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या !

*लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टीचा विस्तार होतो , त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं .*

तुम्ही बघा पूर्वी ....

गाव छोटं , घर छोटं , घरात वस्तू कमी , पगार कमी , त्याच्यामुळे शेवटचा आठवडा हमखास तंगी 

उसनपासन केल्या शिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता , *तरीही मजा खूप होती!*

https://chat.whatsapp.com/JiiqqeV7MlULXEitCDXmS5

*तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं !*

उसनपासन करावंच लागायचं ......

साखऱ्या , पत्ती , गोडेतेल , कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसन्या मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता 

त्यामुळे कोणाकडे " हात पसरणे " म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही .

उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा " कमीपणा " वाटत नव्हता !

डोकं दुखल्यावर *शेजाऱ्याकडे अमृत अंजनच एक बोटं उसन मागायला सुद्धा* अजिबात लाज वाटली नाही .

घरातल्या वडील माणसासाठी 10 पैश्याच्या तीन मजूर बिड्या किंवा 15 पैशाचा सूरज छाप तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताठ असायची !


कोणतीच गोष्ट कोणापासून लपून रहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कुणी करत नव्हतं !

गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पहायला येणार ही बातमी लपून राहूच शकत नव्हती , कारण शेजाऱ्या-पाजाऱ्या कडून पोह्याच्या प्लेट , चमचे , बेडशीट ,

 तक्के , उषा , दांडी असलेले कपं आदी साहित्य मागून आणल्या शिवाय " पोरगी दाखवायचा  कार्यक्रम " होऊच शकत नव्हता !

*आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती , ते आत्ता कळतंय !*

आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही !

जेंव्हा *Status वर* डान्सचा व्हिडीओ येतो तेंव्हा कळतं , अरे लग्न झालं वाटतं !


हे सगळं लिहिण्या मागचा एकच उद्देश आहे

भेटत रहा , बोलत रहा , जाणे-येणे ठेवा , विचारपूस करा .....

जेवलास का ?

झोपलास का ?

सुकलास का ?

काही दुखतंय का ? असे प्रश्न विचारतांना लागलेला मायेचा , काळजीचा , आपुलकीचा कोमल     स्वरच जगण्याचं बळ देत असतो !


*माणसाशिवाय ,गाठीभेटीशिवाय , संवादाशिवाय काssssही खरं नाही !*



_संकलन_

*_प्रा. माधव सावळे_*



ॲाक्सिजन

 *ॲाक्सिजन* 🌸 🌞


मृण्मयी ॲाफिस मधून खूप दमून घरी आली होती. चार वर्षाच्या तन्वीला व पाच वर्षाच्या सोहमला डे केअर मधून आणल्यापासून तन्वीचं रडणं थांबत नव्हतं. तेवढ्यात बाबा घरी आला. कार्तिक, बघ रे हिचं काय बिनसलय! मृण्मयी म्हणाली. कार्तिक म्हणाला,”वेळ नाही ग मला आत्ता. पटकन जेवायला वाढ. मला एक कामाचा रिपोर्ट पाठवायचा आहे.”


मृण्मयी म्हणाली, “कार्तिक, मी आत्ताच घरी आलेय. मुलांचं बघू का तुझं बघू? स्वयंपाक झालेला नाही. बाईंनी आजारी आहे असं तासापूर्वी कळवलं. बाहेरून काहीतरी घेऊन ये.” कार्तिक भडकला. ताडताड खोलीत निघून गेला. तेवढ्यात तिच्या बॅासने तिला “अर्जंट” म्हणून पाठवलेली ईमेल तिच्या फोनवर झळकली. आईचा पण मेसेज आला होता, “बोलायचंय तुझ्याशी”


ही रोजचीच कथा होती. कामाच्या डेडलाईन्स, घरकामाच्या बायकांच्या सुट्ट्या, मुलांची आजारपणं, कमी झोप यात ती पिचून गेली होती. भरपूर पैसा घरी येत होता पण घराला घरपण नव्हतं. तन्वी अनेकदा विचारायची, “आई आपण आज घरी राहूया? आपण चित्र काढूया?” ती म्हणायची, “राणी, आज तू शाळेत जा. आपण रविवारी नक्की चित्र काढू. सोहमला लेगोचं ॲनिमल फार्म बनवायचं होतं. रविवारी करू म्हणत तो रविवार संपून सोमवार उजाडत असे आणि परत पुढच्या रविवारची आश्वासनं दिली जात.


काम सोडून द्यावेसे वाटायचे पण हे मोठ्ठालं घर दोन नोकऱ्यांशिवाय कसं उभं राहिल? खर्च कसे भागतील? तिची एकही मैत्रीण आता हाऊस वाईफ नव्हती. चालतच नाही नोकरी शिवाय हल्ली! मुली शिकायला लागल्या व भरपूर पैसा मिळवू लागल्या पण घर ही संस्था पार बदलून गेली.


मृण्मयीने रविवारी ॲाफिसला दोन दिवसाची सुट्टी टाकली. सोमवारी सकाळी तिनं कांदेपोहे केले. दही, लिंबाचं लोणचं घेऊन शांतपणे पोहे खाल्ले. ती फिरायला बाहेर पडली. आज काही न ठरवता जे मनात येईल ते करायचं होतं. मिनिट आणि सेकंदाचा हिशोब ठेवायचा नव्हता. टेक्स्ट, ई-मेल कडे बघायचे नव्हते. कॅाल्स घ्यायचे नव्हते. 


कमी गर्दीच्या आतल्या रस्त्यावर ती चालायला गेली. वसंत ऋतुमुळे झाडांना पालवी फुटत होती. कोवळ्या पानाचा मोहक पोपटी रंग बघत ती शांत उभी होती. आकाशात निळे, सोनेरी, केशरी रंग चमकत होते. पक्षी उडत होते. काळ काहीवेळ थांबला आहे असं तिला वाटलं.


ती चालत पुढच्या गल्लीत गेली. अगबाई! डोंबाऱ्याचा खेळ का? खेळ सुरू झाला होता. जमिनीपासून सात आठ फुटांवर बांधलेली जाड दोरी, हातात बांबूची जाड काठी, डोक्यावर पितळी कलश घेतलेली ती आठ वर्षाची मुलगी जपून पाऊल टाकत होती. या जीवाला इतक्या लहान वयात तारेवरची कसरत करावी लागते?


ती मुलगी तोल सांभाळत फक्त पुढचं पाऊल कसं टाकायचं एवढाच विचार करत होती. दोराच्या दुसऱ्या टोकाला जाणं एवढच ध्येय होतं. बाकी काही नाही. मल्टीटास्किंग नाही. एक काम एका वेळी. दोर हलत होता पण पाय स्थिर होते कारण मन स्थिर होतं. श्वासाची गती लयबध्द होती कारण मन स्थिर होतं. ती मुलगी दोरीच्या दुसऱ्या टोकाशी पोचून आता खाली उतरली होती. मृण्मयीने तिच्या आईच्या पदरात पाचशे रुपयाची नोट टाकली.


समोर खानावळ होती. डोंबाऱ्याच्या कुटुंबाला तिथे जेवण करण्यासाठी तिने पैसे दिले. "आज पुढचे खेळ करू नका. व्यवस्थित जेवा आणि या मुलीला आज जे करायचं ते करू द्या" असं सांगून तिनं त्यांची नावं, माहिती विचारली. जेऊन तृप्त झालेले त्यांचे चेहरे बघून तिचं पोट भरलं होतं.


आता तिला काहीतरी उमगलं होतं. छप्पन गोष्टी बॅलन्स करताना आपला तोल ढळला आहे म्हणून आपण चिडचिड करतो. जीवनातील तारेवरची कसरत करताना ना पाऊल धड पडतंय ना श्वास सुखाने घेतला जातोय हे समजत होतं. ती घरी आली. तिनं कंपनीला ईमेल पाठवली. “मला आठवड्यात तीन दिवस काम करायचे आहे. उरलेले चार दिवस मला माझ्यासाठी हवे आहेत. मी एकाच वेळी कामावर मॅनेजर, घरी आई, पत्नी, सासरी सून, माहेरी मुलगी या सर्व भूमिका करू शकत नाही. या मल्टिटास्किंग मधे मी होरपळून गेले आहे. हे तुम्हाला मान्य नसेल तर मी नोकरी करू शकणार नाही. कृपा करून समजून घ्यावे.”परत विचार करून सेंड वर क्लिक केलं.


तिने मुलांच्या आवडीचा आंब्याचा शिरा बनवला. तन्वी बरोबर चित्र काढायची तयारी केली. सोहमचा ॲनिमल फार्म लेगो सेट बाहेर काढला. कार्तिकच्या आवडीची एग करी व पुलाव बनवला. आईला फोन केला. आणि मुलांना वेळेच्या आधी दोन तास आणायला पोचली. आई लवकर आलेली बघून मुलांचे चेहरे उजळले होते. ते बघून ती भरून पावली.


डोंबाऱ्याच्या मुलीला शाळेत घालण्यासाठी तिने तिच्या प्रिन्सिपॅाल मैत्रीणीला फोन केला. निदान आज पासून ती डोंबाऱ्याच्या मुलीची व स्व:तची तारेवरची कसरत थांबवणार होती. काम, घर, गाडी, फोन, फर्निचर या  मृगजळाच्या मागे धावताना आपल्या जवळ काय आहे याचा विसर पडला होता.


तन्वी मजेत चित्र काढत होती. सोहम लेगो घेऊन ॲनिमल फार्म बनवण्यात गुंग झाला होता. कार्तिक हाताची बोटं चाटून एग करी आणि पुलाव खात होता. मुलांशी गप्पा मारत होता.

विमानातलं केबिन प्रेशर बदललं तर प्रथम मोठ्यांनी स्वत:ला ॲाक्सिजन मास्क लावायचा असतो अन् नंतर आपल्या मुलांना लावायचा असतो. आई बाबाच श्वास घेऊ शकत नसतील तर ते मुलांना काय मदत करणार?


आज तिनं स्वत:ला ॲाक्सिजन मास्क लावला होता. आज तिला सुखाने श्वास घेता येत होता. शांत, लयबध्द, दीर्घ! त्यामुळे पुढचं पाऊल स्थिर राहणार होतं. मन शांत होऊ लागलं होतं. आता बाकीचांची काळजी घेणं तसं सोपं होतं.


आज ती जगायला शिकली होती.


©®ज्योती रानडे


Wednesday, December 18, 2024

उतराई

 एक गृहस्थ लहानपणी अतिशय गरीब होते.पुढे जीवनात ते अतिशय यशस्वी झाले.ते श्री.गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला आले असता ते म्हणाले " महाराज माझ्या अपेक्षेबाहेर माझी जी भरभराट झाली ती माझी कर्तबगारी नाही. भगवंताच्या कृपेनेच ती झाली यात शंका नाही. आता काय केल्याने मी त्याचा उतराई होईन?" हा प्रश्न ऐकून श्रीमहाराज प्रसन्न झाले व त्यांना म्हणाले, "आपल्यावर ज्याने उपकार केले त्याच्याजवळ जी वस्तू नाही ती त्याला देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने उतराई होणे होय. जी वस्तू त्याच्यापाशी आहे तीच त्याला देण्यात फारसे स्वारस्य नाही. सर्व दृश्य वस्तूंची मालकी मूळ भगवंताचीच असल्याने दृश्य वस्तू  त्याला देणे म्हणजेच त्याचेच त्याला दिल्यासारखे आहे. त्याच्यापाशी नाही अशी एकच वस्तू आहे, ती म्हणजे त्याला स्वतःचे स्वतःवर प्रेम करता येत नाही. आपण त्याच्यावर मनापासून प्रेम केले म्हणजे त्याच्यापाशी नसलेली वस्तू त्याला दिल्यासारखे होते. भगवंतावर मनापासून प्रेम करणे शक्य होण्यासाठी त्याला शरण जावे. शरणांगती साधण्यास मी कोणीही नाही ही भावना निर्माण झाली पाहिजे. ती नामस्मरणाने निर्माण होते. म्हणून मनापासून नाम घेण्याचा अभ्यास करावा".

Tuesday, December 17, 2024

मोठ्ठा चरा

 'आबा, फेकून द्या तो शर्ट आता'. 'अगं याला काय झालंय, उसवला नाहीये, फाटला नाहीये कुठे, अजून चार वर्ष सहज काढेल, उगाच काय टाकून द्यायचा आणि, घरात घालायला बराय अजून. पावसाळ्यात कपडे वाळत नाहीत तेंव्हा असे कपडे असावेत चार राखणीतले'. 'आबा, डिसेंबर आहे हा चालू, सहा महिने आहेत किमान अजून कपडे न वाळायला'. 'शब्दश:अर्थ काढू नकोस ग कार्टे, सांगण्याचा अर्थ लक्षात घे'. 'आबा, एक काम करूयात का, तुमच्या सगळ्या शर्ट प्यांटना आतून खरेदी वर्ष लिहून ठेऊ धोब्याच्या शाईनी, ते पुसलं जाईल पण कपडा सापडेल जसाच्या तसा कपाटात, शेवटचा शर्ट प्यांट जोड ख्रिस्तपूर्व काळात घेतला असेल तुमचा, ते काही नाही, मी हे सगळे कपडे काढून टाकणारे जुने आणि नवीन घेणारे'.


'अगं पण कशाकरता? फाटल्याशिवाय, विटल्याशिवाय उगीच कपडा टाकू नये, मस्ती आल्यासारखा. द्यावा नाहीतर कुणा गरजूला'. 'आबा, हल्ली कुणी गरजू बिरजू नसतं बरं का, कमीपणा वाटतो लोकांना, लोक घेतात आणि विकतात बाहेर'. 'हे बघ, उगाच मला भरीला पाडू नकोस, मी टाकून देणार नाही कुठलाही कपडा कारण नसताना, फार तर कुणाला तरी देऊ मगच नविन आणूयात, चालेल?' 'बरं, पण काढून ठेवा सगळे, रविवारी तुमचं नव्यानी पासिंग करून घेऊ'.


मी सतीश वाघ, आडनाव वाघ असलं तरी आता म्हातारा झालोय. आत्ता बोलत होती ती माझी नात. मोठी गोड आहे. कथा कादंब-यात असतात तशी म्हातारपणाची दु:खं मला अजिबात नाही, सगळं कसं छान आहे. तसा मी काही चिकट नाहीये पण कपड्यांवरून मला हे सगळे सतत बोलत असतात. पण यांचं फ्रांसच्या राणीसारखं झालंय, अनुभवलं नाहीये त्यामुळे एखाद्या गोष्टीची तीव्रता यांना कळत नाही, अडचण पोचत नाही. आपल्याला सोसावं लागलं, मिळालं नाही ते पुढच्या पिढीला मिळावं यासाठी मधली पिढी धडपड करतीये पण त्यांना सगळं कष्टाविना देऊन आपण घाबरट प्रजा तयार करतोय असं माझं मत आहे. म्हणून कुठलीही अडचण आली की हे लगेच सैरभैर होतात. असो? म्हातारपणी कुणाला मागितल्याशिवाय सल्ला देऊ नये, किंमत रहात नाही, लोक टाळतात मग आपल्याला. पथ्य पाळलं की आजार जवळ येत नाही हे इथेही लागू आहे.


लहान असताना मोठ्या असलेल्या चुलत, मामे भावंडांचे त्यांना लहान झालेले पण चांगले असलेले कपडे घालताना कधीही कमीपणा वाटला नाही कारण वडिलांनी तशी सवय लावली होती. त्यामुळे आम्ही हक्कानी घ्यायचो, द्यायचो. वह्या, पुस्तकं इकडून तिकडे जायची पण त्यात दान, भीक अशी भावना नव्हती कधीच. हे सगळं आठवायचं कारण मात्रं वेगळंच आहे. एखादी घटना घडून जाते पण तिचा प्रभाव इतका जबरदस्त असतो की ती कायम लक्षात रहाते. मी बहुराष्ट्रीय कंपनीत होतो तेंव्हा. कंपनी आणि कामगार मिळून काही निधी गोळा व्हायचा चांगल्या उद्दिष्टांसाठी, आमचीच एक अंतर्गत संस्था होती. आदिवासी, गरजू लोकांना मदत करणारी. एकदा एका आदिवासी पाड्यावर आम्ही गेलो होतो. त्यांना त्यांच्या वस्तीकडे जाण्यासाठी मुरुमाचा रस्ता श्रमदान करून बांधायचा होता. मशिनरी आणि आम्ही तीसेक लोक होतो पण मशिनपेक्षा जास्ती काम त्याच लोकांनी केलं खरंतर. काय कृतकृत्य भावना असते त्या लोकांची चेह-यावर. कुठलाही नाटकीपणा, खोटेपणा नाही. आपल्यासाठी कुणीतरी चांगलं करतंय हे त्यांच्या चेह-यावर दिसतं. त्यांना शब्द सापडत नाहीत, पण आशीर्वाद त्यांच्या चेह-यावरून, बोलण्यातून निथळत असतात.


त्यांचा एक म्होरक्या होता. त्याला मान होता. सगळे कसे लंगोटी लावलेले, शिसवीच्या लाकडासारखे काळे कुळकुळीत पण तुकतुकीत, अंगावर चरबीचा कण नाही, काटक सगळे, चपळ आणि झटून काम करणारे. तेल लावलेला कडप्पा चमकावा तसे सगळे ग्लॉसी ब्ल्याक दिसायचे. काम संपलं, बाकी सगळे परत आले. मी हौसेने थांबलो रात्री तिथे. ज्यानी आम्हाला हे काम सुचवलं तो कार्यकर्ता पण थांबणार होता म्हणून. काय मस्तं संध्याकाळ असते माळरानावरची, आपल्याला सवय नसते शुद्ध हवेची. कुठलीही इस्टेट नसलेली ती माणसं काय आनंदी दिसतात, हेवा वाटतो. आम्ही त्या म्होरक्याच्या घरी गेलो. अंधार झाला म्हणजे रात्रंच त्यांच्यासाठी. त्याचं घर जरा मोठं होतं म्हणजे मधे कुडाचं पार्टिशन एवढाच फरक इतर घरांपेक्षा. तो, बायको आणि त्याचा भाऊ. मोठा रॉकेलचा टेंभा त्यानी मधे आणून ठेवला. शहरातला माणूस घरी आल्याचा आनंद आणि न्यूनगंड पण होता त्याच्या हालचालीत. त्याची बायको काही कामावर आली नव्हती. लाल गावठी तांदुळाचा भात, मुगाची आमटी आणि चुलीत भाजलेली कसली तरी कंदमूळं. आम्ही दोघे जेवायला बसलो. काही लागलं की तों आत जायचा आणि मग बायको बाहेर यायची. ती आत गेली की तो किंवा त्याचा भाऊ बाहेर यायचा.


जेवणं झाली आम्ही गप्पा मारत बसलो बाहेर. त्याची भाऊ आणि बायको दाराचा आडोसा करून बसले होते. भावाला हाक मारली की तो आत जायचा मग भाऊ बाहेर यायचा. मला काहीतरी खटकल्यासारखं झालं. सकाळी आम्ही निघालो लवकरच. म्होरक्या आला होता सोडायला मेन रोड पर्यंत. 'चक्रावलात ना काल? नविन माणसाला असंच वाटतं की हे एकावेळी एकंच का बाहेर येतात म्हणून. तुम्ही शहरातून आलात त्यामुळे आधीच त्यांची फार कुचंबणा झालेली असते. ते असे एकेक का येत होते समोर असंच विचारणार आहात ना?' होय'. 'तुमच्या लक्षात आलं नाही, तुमच्यापुढे येताना सगळे जे कापड गुंडाळत होते तेवढं एकच आहे त्यांच्याकडे. अतिशय जपून वापरतात ते, ते फाटलं तर? हा त्यांच्या दृष्टीने मोठा प्रश्नं आहे. त्यामुळे एकजण आत गेला की दुसरा तेच गुंडाळून बाहेर येतो. एरवी ते लंगोटीवर असतात पण घरी आलेल्या शहरी पाहुण्यासमोर ते वाईट दिसतं म्हणून ते त्यांचं हे ठेवणीतलं कापड वापरतात समोर येण्यासाठी. आपल्याला आपले प्रॉब्लेम किती मोठे वाटतात ना? आत्ता जेवताना डोक्यात संध्याकाळी? हा प्रश्नं ज्याला आहे त्याला भेटा एकदा, माणूस अन्न टाकणार नाही. खूप दरी आहे या दोन जगात. मधे पूल बांधायला कुणाला वेळ नाहीये. फोटो काढून वार्षिक दान करणारे खूप आहेत, कायमस्वरूपी उपाय करणारे कमी आहेत'.


एक प्रचंड मोठ्ठा चरा उमटलाय तेंव्हापासून. कपडा टाकवत नाही त्याला काय करू.


जयंत विद्वांस


(कुणाच्या आठवत नाही पण एका मोठ्या माणसाच्या लेखात वारली आदिवासी आणि एक कपडा उल्लेख वाचलेला खूप वर्षामागे, तो डोक्यात खिळा मारल्यासारखा रुतलाय)

Monday, December 16, 2024

भाव

 

     श्रीराम,

   भाव उदकाने करू प्रक्षालन, पतित पावन चरण तुझे||४

           भाव या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक भाव म्हणजे भक्तिभावाने तर दुसरा अर्थ म्हणजे ज्याचा अभाव नाही असा! भाव म्हणजे अस्तित्व, स्थिर झालेली भावना. भाव म्हणजे प्रेम, आसक्ती. तसेच भाव म्हणजे ईश्वर व ब्रह्मरुप श्रीहरीच्या अस्तित्वाविषयी अटळ श्रद्धा. जे असत् असते त्याला कधीही भाव नसतो. आणि जे सत् असते त्याचा भाव कधीही जात नाही किंवा त्याचे अस्तित्व कधीही पुसले जात नाही. शरीरामध्ये आत्मा सत् आहे आणि शरीर असत् अनात्म आहे. सत् व असत् ह्यांचे बेमालूम मिश्रण झालेले हे शरीर आहे. थोडक्यात अचेतन जड शरीर आत्म्याने सक्रीय केले की मग ते काम करते आणि चेतन असल्यासारखा भास होतो.

             दिसणारे नामरुपात्मक शरीर सगुण आहे, तर जीव चैतन्य आत्मा निर्गुण निराकार आहे. भक्तिभावाने मानसपूजा करत असताना विवेकाची दृष्टी जागृत ठेवून पूजा करणे अपेक्षित आहे. या नरदेहातून सगुण मूर्तीची पूजा करणे,. म्हणजे कोण कोणाची पूजा करत आहे? हा विचार जागरूक ठेवणे म्हणजे विवेक.म्हणजे जड अचेतन शरीराच्या आत व्यापून असलेल्या जीवात्म्याने चौरंगावर विराजमान असलेल्या सगुण मूर्तीची पूजा करत मूर्तीचे अधिष्ठान असलेल्या निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाची उपासना करायची आहे. ते करून त्या शुद्ध तत्त्वात आपले अस्तित्व विसर्जित करण्यासाठी ही पूजा आहे, असा भाव ठेवून, आत्मसमर्पण करण्यासाठीची ही पूर्वतयारी आहे, असे समजून, उमजून श्रद्धेने भक्तिभावाने मानसपूजा करायची असते.. 

                    ||श्रीराम ||

रहस्य

 *अक्षय्य तृतीयेचे रहस्य:*


१) याच दिवशी सत्ययुग संपून त्रेतायुग चालू झाले. साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त ! नवीन वस्त्र, शस्त्र, सोने इत्यादी खरेदीस प्रमुख योग !


२) याच दिवशी व्यासांनी महाभारत रचण्यास व गणपतीने ते लिहिण्यास सुरुवात केली.


३) अक्षय्य तृतीयेस अन्नपूर्णा माता प्रकट झाली, विष्णूचा सहावा अवतार परशुरामाचा जन्म रेणुकेच्या उदरी झाला, तसेच विष्णूचे अन्य अवतार नर - नारायण व ह्याग्रिव प्रकटले


४) याच दिवशी हिमालयातील बद्रीनारायण, आणि केदारनाथ मंदिराची कपाटे दर्शनास उघडतात, ती बरेचदा दिवाळी पर्यंत उघडी राहतात. 


५) याच दिवशी पृथ्वीवर गंगावतरण झाले, अशी एक कथा आहे


६) जैन पंथाचे तीर्थंकर ऋषभदेव यांनी मोक्षप्राप्ती साठी एक वर्षभर उपवास केल्यावर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उसाचा रस हस्तीनापुर येथील राजाकडून ग्रहण केला


७) या दिवशी आपले पितर, पूर्वज आणि कुलदेवता यांना स्मरून केलेले दान अक्षय्य स्वरूपाचे होते, त्याचा कधीच क्षय होत नाही, असे भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरास सांगतात (इति महाभारत). नवीन कार्यप्रारंभाला शुभ दिवस आहे.


८) या दिवशी गंगा नदीत किंवा समुद्रात स्नान पुण्याचे आहे.


९) तृतीय / तीज उत्सव: कैरीची डाळ, पन्हे, भिजवलेले चणे इत्यादी देवीस नैवेद्य म्हणून दाखवून हळदी कुंकू समारंभाची प्रथा ! आंबा, आमरस, आंब्याचे पदार्थ बनवणे, देवी देवता यांना आंब्याची सजावट इत्यादी करण्याची प्रथा !

-------------------- 🕉️ --------------------


      🚩 "हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व"  🚩

Sunday, December 15, 2024

अंतर्मुख

 अंतर्मुख याचे दोन अर्थ आहेत. मुख म्हणजे तोंड आपलं तोंड आत मध्ये वळविणे हा खरा अर्थ. पण परमार्थात अर्थ असा आहे की आपली इंद्रिये जी बाहेर धावतात त्या इंद्रियांचे तोंडं आत मध्ये वळवणे म्हणजे अंतर्मुख होणे. ते झाल्याशिवाय परमार्थ नाही. श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले " साधक कसा पाहिजे , तर नाम घेणारा पाहिजे. नाम घेणारा कसा पहिजे तर डोळे उघडले की हे जग दिसते, डोळे झाकले की ते जग नाहीसं होणं हे साधकाचे लक्षण आहे."  आपण आपली एक प्रतिमा बनवलेली असते.ही प्रतिमा जशी असेल तसं बाहेरचे जग  दिसतं. मग अंतर्मुख होताना ही प्रतिमा आपणच भंग करायची असते. यालाच "मी पणा नाहीसा होणे " म्हणतात. त्यासाठी नम्रता आवश्यक आहे. श्री.कृष्णमूर्ती म्हणाले परमार्थात  "नम्रता ही अत्यंत जरूर आहे." अध्यात्माचा प्राण असेल तर नम्रता आहे. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात " अती लीनता सर्व भावे स्वभावे." श्री.गोंदवलेकर महाराज म्हणाले " खरा लीन माणूस लोण्यासारखा असतो." कुठूनही स्पर्श करा मऊ आणि गोडच असणार. परमार्थाला लागणारी साधक वृत्ती बाणलेला मनुष्य सहज लीन होईल. आपली लीनता ही बाहेरची असते. आतून ती लीनता आली पाहिजे. ह्या साठी अंतर्मुखता हवी.

अक्षय्यतृतीया

 *महत्वाचे*

*अक्षय्यतृतीयेचे महत्व*


आज अक्षय्यतृतीया आहे. अक्षय्यतृतीया हा साडेतीन  मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला युगादी असेही म्हणतात. 

श्रीविष्णूंच्या २४ अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षय्यतृतीयेच्या दिवशी प्रकट झाले.

 याच दिवशी श्रीवेदव्यासांनी महाभारत लेखनास प्रारंभ केला. याच दिवशी पवित्र अशी गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली‌. अक्षय्यतृतीयेचा हा दिवस पितृपूजनासाठीही प्रसिद्ध आहे. 

याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली आणि मित्रप्रेम - मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णांनीसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. 

अक्षय्यतृतीयेलाच अन्नपूर्णेचा जन्म झाला आहे. एका अक्षय्यतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपात्र दिले होते, तर एका अक्षय्यतृतीयेलाच श्रीकृष्णाने चीरहरणप्रसंगी द्रौपदीला अक्षयवस्त्र पुरवले होते. 

श्रीबद्रीनारायण मंदिराचे दरवाजे अक्षय्यतृतीयेच्या दिवशीच उघडले जातात. अक्षय्यतृतीया ही अक्षय सुखाची कारक आहे. या दिवशी केलेल्या जप, तप, दान पुण्याचा क्षय होत नाही‌. यादिवशी पंचांगशुद्धी, दिनशुद्धी पाहण्याची आवश्यकता नाही.


*सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्रीविष्णूपूजनाचा, श्रीविष्णू नामस्मरणाचा आणि श्रीविष्णू कृपेचा दिवस आहे. या दिवशी विष्णुसहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत.*


अक्षय्यतृतीयेला पूर्वजांचे स्मरण, व त्यानिमित्त तर्पण, हवन, दान करावे असे म्हटले आहे. *प.पू. श्रीवासुदेवानंद टेंब्ये स्वामींनी सांगून ठेवले आहे - विष्णुसहस्रनाम पठणाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि यासाठी अक्षय्यतृतीयेइतका योग्य दिवस अन्य कोणताही नाही.*


*म्हणून दर वर्षीप्रमाणे यंदाही गटातल्या सर्वांना नम्र विनंती कि आज दिवसभर आपल्याला जमेल तितक्या जास्तीत जास्त वेळा श्री विष्णुसहस्रनामाचे पठण करायचे आहे.*


🙏🏻🙏🏻

Saturday, December 14, 2024

काटकसर

 *काटकस  `

मंजिरी आणि राघव, नुकतच लग्न झालेलं एक नवं कोरं जोडपं. लग्नाला नुकताच महिना होत आला होता. अश्याच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणुन फुटपाथच्या कडेने मस्त  एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडी कडे जात होते. मंजिरीने त्याच्या कानात हळुच विचारलं, "राघव, तु टीप का नाही दिली त्या वेटरला."  

"का त्याने तुला मागितली होती का?" राघवने तिला मिश्कीलपणे प्रतिप्रश्न केला. 

"तसं नाही रे, मी दोनतीन वेळा आॅब्जर्व केलं की तु कोणाला टीप देत नाही, कंजूस कुठला?."

राघव हलकसं गालातल्या गालात हसत काही न बोलता तसाच पुढे चालत राहिला. मंजिरी त्याला विचारतच होती तितक्यात फुटपाथच्या कडेलाच एका गरीब बाईने आपला संसार थाटला होता. शिडशिडीत बांधा,अंगावर जीर्ण झालेली साडी, काळवंडलेला चेहरा फुटपाथवरच्या खांबाला पाठमोरी करून चुलीजवळ बसलेली होती.

 तीने चुलीवर पातेलं ठेऊन त्यात दूध ओतलं आणि दूध ओतल्या ओतल्याच ती दुधाची बॅग झटकन बाजुला टाकली. मंजिरी हे सगळं पहात होती आणि राघवचं पण लक्ष त्या बाईकडे गेलं. 


तिथून थोडंसं पुढे येत नाही की मंजिरी राघवला बोललीच, "बघ, भिकारी पण दूध ओतल्यावर दूध बॅग फेकून देतात आणि इकडे आपली मम्मा त्या दूध बॅग मध्ये थोडंसं पाणी विसळुन ते पण काढून घ्यायचे सांगते, किती हा कंजूसपणा." मंजिरीचा लग्नापासून ते आतापर्यंत मनात साठून राहिलेला सासरकडचा कंजूसपणाचा राग, शेवटी असा नकळत बाहेर पडलाच. 


राघवने ते ऐकलं पण त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही दिली. फक्त पुन्हा जरासा हसला. राघवचे ते असले हसणे आणि त्यावरचा त्याचा अबोला मंजिरीला अजून खिजवून गेला. आता मंजिरीला काही राहवेना आणि शेवटी तिने त्याला बोलतं करण्यासाठी परत खनकावून बोललीच, "अरे, बघतोस काय शुंभा सारखा, बोल काहीतरी, किती कंजूसपणा हा तुम्हा लोकांचा."


राघव चेहऱ्यावर तेच मिश्किल हसू ठेवत शांत राहिला. इतक्यात ते दोघे कारजवळ पोहचले होते. राघवने कार अनलॉक करत मंजिरीला मान डोलकावत गाडीत बसण्याचा इशारा केला. मंजिरीचा पारा जाम चढला होता. ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खाssडकन जोरात लावला. "अगं, इतक्या जोरात दरवाजा लावायची काय गरज, माझा राग त्या दरवाज्यावर कशाला काढतेस." शेवटी राघव हलक्या आवाजात बोललाच. 


"अरे हो, सॉरी हं. मला तर लक्षातच नाही आलं की, एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तुटेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील." चढ्या आवाजात मंजिरी बोलली. 

"पण तू का चिडचिड करतेय एवढी, उगाच स्वतःला त्रास, शांत हो जरा." राघव तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला.


"चिडू नाहीतर काय करू, जाऊदे.....तूझ्या सारख्या दगडाशी बोलण्यात काही अर्थच नाही. निव्वळ कंजूस आहात तुम्ही सगळे" एवढं बोलून मंजिरी गप्प झाली. 


"अग,हो... हो....हो... रागाच्या भरात, तू किती सहज कसल्या निष्कर्षावर पोहचलीस मंजू. शांत हो बघू तू पहिले." हे राघवचं बोलणं ऐकून मंजिरी थोडीका होईना शांत झाली, पण आतून आग पेटलेलीच होती. राघवने गाडी सुरू केली आणि अखेर बोलता झाला. 


"मंजू मलाही प्रचंड चिड आहे मम्मी पप्पांच्या ह्या अश्या वागण्यावर. तुला म्हणून सांगतो, मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असंच चालत आलंय सगळं. टूथब्रशवर टूथपेस्ट आर्धीच घ्यायची. काय तर म्हणे एवढ्याश्या लहानग्या तोंडाला एवढीच पुरेशी असते. आंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधी नवा करकरीत साबण वापरला नाही,  नव्या साबनाला कायम विरघळलेल्या साबनाचा तुकडा चिपकलेलाच असायचा.

दादाचे जुने युनिफॉर्म ढगळ स्वरूपातून आखूड स्वरूपात परिवर्तित होईस्तोवर घालायचेच, त्यात कपडा चुकून झिजलाच तर नशीब. 

नवीन कपडे सणालाच घेतले जायचे. सणाला काय म्हणतोय मी पण..... दिवाळी.... फक्त दिवाळीलाच घेतले जायचे, त्यातपण भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ सगळ्यांना एकाच ताग्यातून कपडे शिवले जायचे. आम्ही सगळे जर कोण्या लग्नात गेलो की लागलेच ओळखायचं 'अरे ही तर दामल्यांची बँजोपार्टी दिसते.'

बाजारात पप्पांसोबत कधी गेलोच आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर हातात लिम्लेटच्या गोळ्या पडायच्या. आम्हीपण शहाणे होतो. आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास पहिले काहीतरी मोठं खेळणं मागायचो त्यावेळी आपसूकच फुगा भेटायचा.

कॅडबरीचं चॉकलेट म्हणजे 'ना पोटला ना ओठाला, फक्त पैश्याचा वाटोळा' ह्या पप्पांच्या नेहमी कानावर पडणाऱ्या म्हणीमुळे ते कधी पोटात गेलंच नाही, हा पण त्यामुळे दात शाबुत राहिले तेवढं मात्र खरं. 

एकदा कलर टिव्ही घ्यायचं ठरलं होतं. घरून दुकानात आणि दुकानातून घरी येई पर्यंत कलरच ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मध्ये रूपांतर झालं होतं. बारावीत लुना मागितली होती तर अॅटलसची काळी सायकल घेऊन दिली होती. उफ्फsss काय काय सांगू आणि किती सांगू तुला. फार फार कंजूस आहेत हे मम्मी पप्पा ."  आतापर्यंत थट्टा मस्करीच्या स्वरात धडाधडा बोलणारा राघव, एवढं बोलून दीर्घ श्वास सोडत एकदम गप्प झाला. 

मंजिरी त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे विस्फारून बघतच राहिली. त्याला बोलतांना लागलेली धाप बघून तिने पाण्याची बाटली राघवच्या पुढे केली. 


"चला आता पासून तु पण या दामले घराण्यात सामील झालीस. पण तुला खरं सांगू मंजू, त्यांच्या ह्या कंजूसपणामुळे जमवलेल्या पैश्याची खरी किंमत आम्हाला नवीन मोठा बंगला घेता वेळी आली. कधी देव्हाराच्या मागे तर कधी साखरेच्या डब्ब्यात गुपचूप लपवलेल्या पैश्याची किंमत आत्तेच्या लग्नाच्या वेळी आली. आईने पापड, लोणची विकून साठवलेल्या पैश्याची किंमत आजीच्या आजारपणाच्या वेळी आली आणि पप्पांच्या फाटक्या बनियानची आणि झिजलेल्या चपलांची किंमत दादाच्या मेडिकलच्या आणि माझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळी पहायला मिळाली. एवढं सर्व साम्राज्य उभारत असतांना मम्मी पप्पांना चुकूनही कधी कोणाच्या पैश्याची मदत पडली नाही किंवा पडली असेलही पण त्यांनी ती कधी घेतली नाही. थोडे थांबले, परत मरमर करत पाहिजे तितके जमवले आणि मगच पुढे गेले. असं करत करत एक सर्वसामान्य मिडल क्लास कुटुंब कधी गर्भश्रीमंत झालं ते कळलंच नाही. 

ते काटकसरीने राहिले नसते तर कदाचित आज आम्ही दोघे भाऊ हे दिवस पाहू ही शकलो नसतो. कधीकधी फार वाटतं की या दोघांमुळे बऱ्याच गोष्टी आमच्या मनासारख्या घडल्या नाही, पण आज कळतं, त्या मनासारख्या घडल्या असत्या तर बऱ्याच गोष्टींचं मोल कळलं नसतं, आणि मोलच कळले नसते तर आज मिळणारं सुखही आळणी वाटलं असतं." हे सांगतांना राघवचे डोळे पाण्याने डबडबले होते.

 

हे सगळं ऐकून मंजिरीही जराशी हळवी झाली. तितक्यात त्यांची कार घराच्या समोर येऊन थांबली. दोघे कारमधेच बसून राहिले. मंजिरी हलकीशी राघवच्या जवळ सरकली आणि त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवत म्हणाली  "सॉरी राघव, मला कळलं..... मम्मी पप्पांनीं जे सगळं केलं ते खरचं बरोबरच होतं, पण आता तुम्ही दोघे एवढं कमावता झालात, आता तरी साठवलेल्या पैश्याचा एन्जॉय घ्यावा आणि आता नाही तर कधी करणार ते एन्जॉय? एवढीच माझी अपेक्षा आहे."


राघव आपल्या उजव्या हाताने मंजिरीचं डोकं थोपटत बोलला, "असं नाही गं.... त्यांनी हवी तेवढीच आणि हवी तितकीच एन्जॉयमेंटही ह्या काटकसरीत टप्प्या-टप्प्याला करून घेतली, फक्त त्या एन्जॉयमेंटच्या डेफिनेशन फार छोट्या आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद भेटतो. मम्मीला कधी साड्यांच्या सेलमधे तर कधी सोन्यापेक्षा स्वस्त असलेल्या बेनटेक्सच्या बंगड्यांमधे. पप्पांना कधी जुन्या टूव्हीलरच्या खरेदीमधे तर मंडई मधल्या स्वस्तातल्या भाजीपाल्यामधे. ते दोघेही त्यांच्या काटकसरीत वाचलेल्या  पैश्याचा आनंद रोज घ्यायचे आणि अजूनही घेतच आहेत." राघव एवढं बोलतो न बोलतो तेवढ्यात त्याचा मोबाईल खणखणला. राघवने स्पिकर ऑन केला.


राघव : "हा मम्मी बोल, पोहोचलात का?

राघवची मम्मी : "हो राघू आम्ही पोहचलो पंढरपुरात."

राघव: "बरा झालाना तुमचा प्रवास"

मम्मी: "अगदी व्यवस्थित. बघ फक्त दोनशे रुपयात पोहचलो."  फक्त दोनशे रुपये सांगताच राघव आवक झाला.

राघव: "दोनशे!!!! अगं मी तर तुम्हाला ट्रॅव्हल्सच्या बसमधे बसवलं होतं, मग सातशेचे दोनशे कसं काय?"

मम्मी: "अरे राघू, तुला माहितेय ना तुझ्या म्हाताऱ्याला ए.सी.चा त्रास होतो, म्हणून आम्ही ती गाडी सोडून एस.टी.च्या बसमध्ये येऊन बसलो बघ. एकदम मस्त प्रवास झाला. तोही फक्त दोनशेत." राघव हसला आणि डोक्याला हाथ लावत बोलला." कशे गं तुम्ही"


मंजिरीचे डोळे मम्मीचे बोलणं ऐकून पाणावले आणि चेहऱ्यावर हलकसं हसू फुटलं. भारावलेल्या अवस्थेत नकळत ती ही बोलती झाली, "लव यु सो मच मम्मी-पप्पा, काळजी घ्या आणि लवकर या, मिस यु बोथ, मला तुम्हाला आता एक घट्ट मिठी मारावीशी वाटतेय."


मम्मी: "अरे मंजू, थँक् यु बेटा, तुम्ही दोघे पण काळजी घ्या आणि मिठी मारायला राघू आहे सध्या, आणि हो तुला सांगायचं विसरलेच."

मंजिरी: "काय मम्मी?"

मम्मी: "अग घरात तुम्ही दोघंच म्हणून...."   

'म्हणून' नंतरच्या पॉजला मंजिरी आणि राघव दोघेही बावरली. 

मंजिरी: "म्हणून काय मम्मी?" 

मम्मी:" म्हणून.... म्हणून काही नाही गं.... दुधावाल्याला एकच बॅग टाकायला सांगितली मी." राघव आणि मंजिरी दोघं खदखदून हसु लागले. 

मंजिरी: "ओके मम्मी, तुम्ही इकडची काळजी नका करू, एन्जॉय करा."

मम्मी:  "दोघेही अशेंच हसत रहा, चल आत्ता गजानन महाराजांच्या भक्तनिवासात पोहोचलो, मग करते नंतर कॉल"

मंजिरी : "ओके बाय"

राघव: "ओके बाय, काळजी घे तुझी आणि माझ्या म्हाताऱ्याची"

मम्मी: "हो आणि तू दामलेंच्या सुनेची काळजी घे."


"पाहिलंस ना मंजू, कसे पोहचले त्यापेक्षा पैशे वाचण्याचा आनंदच त्यांना जास्त, एकंदरीत काय तर इतकी वर्ष काटकसर करूनकरून ती काटकसर इतकी अंगवळणी पडली की छोट्याछोट्या गोष्टीतही वाचलेल्या पैश्यांचाच आनंद घेतात. त्यांनी झटकन फेकुन न देता विसळुन घेत एकएक थेंब थेंब करून सगळं साठवलं म्हणून सुखाचं एवढं मोठं तळं साचलंय. छोट्यातल्या छोट्या गोष्टींचीही कदर केली म्हणून आज ते इथवर पोहोचले. नाहीतर दारिद्र्य तर वाट पहातच होतं."


मंजिरीचा मम्मी-पप्पां विषयी आदर वाढला होता. संसाराचा सारांश तिला थोडक्यात भेटला होता. मंजिरीच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याने राघवचा खांदा केव्हाच भिजला होता. 

मंजिरी: "खरंच रे, ते दोघे फारच ग्रेट आहेत, मी त्यांच्या अंगवळणी पडलेल्या काटकसरीला त्यांचा कंजूसपणा समजण्यात चुकलेच."

जिते रहो , सदा दिल से अमीर रहो.


*©✒मंगेश उषाकिरण अंबेकर.*


*धन्यवाद ☞*

पाणिनी


        

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️

        *मराठी भाषेतील 'पाणिनी'*

    *व्याकरणकाराच्या जन्मदिनाची*

            ⚜️⚜️💐⚜️⚜️


🌹⚜️🌸🔆📚🔆🌸⚜️🌹


        *अठरावे शतक. १८१८ ला पेशवाईचा अंत होत मराठा साम्राज्य लयास गेले. इंग्रजी सत्तेने देशभर पक्के पाय रोवले होते. देशभरात राजकीय आणि सामाजिक सुधारणांची नितांत गरज होती. अशा वेळी अशा एका थोर व्यक्तीचा जन्म झाला ज्यांनी ज्ञानमार्ग अवलंबून समाजात शाश्वत परिवर्तन घडवले. त्या आमुलाग्र सुधारणांची मधूर फळे आज समाज चाखतोय.*

        *हे समाज सुधारक म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषेचे 'दादा' अर्थात दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४-१८८२). जन्म खेतवाडी मुंबई. वसईजवळ तर्खड इथे आजही त्यांचे घर.. स्मारक आहे.*           

        *इंग्रजी ही सत्ताधारी इंग्रजांची भाषा. त्यांची सत्ता  जगभरात होती. विष्णूशास्त्री चिपळूणकर 'इंग्रजी' ला वाघिणीचे दुध म्हणत. ही भाषा देशभरातील तळागाळातील लोकांना येणे अत्यंत गरजेचे होते. पण इंग्रजांच्या व्देषाने आणि एक परकीय अवघड भाषा समाजाला शिकवणे फारच दिव्य होते. इंग्रजीच काय व्याकरण शुद्ध मराठीही लोकांना येत नव्हती.* 

        *दादोबांचे प्राथमिक शिक्षण पंतोंजीकडे झाले. तरीही शिक्षक म्हणून त्याकाळात पहिलाच पगार दिडशे रुपये होता. पूढे ते कलेक्टरही झाले.*

        *आज मराठी भाषेला व्याकरणशुद्ध वळण लावण्याचे.. इंग्रजीचे मराठीत भाषांतर करण्यात त्यांचे योगदान क्रांतिकारक ठरलेय. त्यांना मराठी.. इंग्रजी.. संस्कृतसह गुजराथी आणि फार्सी भाषाही अवगत होत्या. त्यांनी शिक्षण सुरु असतानाच 'महाराष्ट्र भाषेचे व्याकरण' हे पुस्तक १८३६ मध्ये लिहले आणि प्रथम आवृत्ती प्रकाशित केली. याचे महत्त्व जाणून शिक्षण विभागाने त्यांचे व्याकरण पुस्तक समाविष्ट करण्याचे ठरवले अन् दुसरी आवृत्ती अमेरिकेत छपाई करुन हे पुस्तक आले. यामुळे शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली.*

        *१८६५ साली त्यांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती 'मराठी लघु व्याकरण' ह्या नावाने प्रकाशित केली. हे पण पुस्तक पुढे शालेय शिक्षणात प्रदीर्घ काळ प्रचलीत होते. त्यांच्या लघु व्याकरणाच्या १२ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. याच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. महाराष्ट्रात तळागाळातील मुलांना दिडशे वर वर्षे सुलभतेने त्यामुळेच इंग्रजी शिकता आले. इंग्रजी ही शेवटी तत्कालीन शासनाची आणि जगाची भाषा. इंग्रजी शिकणे म्हणजे तर्खडकर हे समीकरणच घरोघरी झाले होते. आज महाराष्ट्रात लोकांना इंग्रजी येते याचे श्रेय दादोबांना आहे.*

        *त्यांनी प्रार्थना समाज.. मानवधर्म सभा.. परमहंस सभा या धर्म सुधारणा संस्थांच्या उभारणीत सहभाग घेतला. विधवा पुनर्विवाह चळवळीतही त्यांचा मोठा सहभाग होता. सरकारी उच्चपदावर नोकरी करुनही ते समाज सुधारणेत अग्रणी होते. इंग्रजांनी त्यांना 'रावबहादूर' पदवी दिली होती.*

        *१८३६ ते १८८१ पर्यत त्यांनी लिहलेले सात महाराष्ट्र भाषा व्याकरण ग्रंथ हे फारच मोठे कार्य ठरलेय. त्यांचे अतिशय सुलभ भाषेतील प्रांजळ निवेदनाचे १८४६ पर्यंतचे चरित्र हे अव्वल इंग्रजीतील पहिले आत्मचरित्र आहे. ज्यामध्ये तत्कालीन समाजव्यवस्थेचे वर्णनही आहे. 'मराठी नकाशांचे पुस्तक'.. 'धर्मविवेचन', 'पारमहंसिक ब्राह्मधर्म', मोरोपंतांच्या केकावलीवर 'यशोदापांडुरंगी' असे विविधांगी लिखाण केले. स्विडिश तत्वज्ञाच्या ग्रंथावर उत्तर देताना त्यांनी लिहलेल्या ग्रंथाची युरोपात प्रशंसा झाली.*

        *संस्कृत.. मराठी भाषाप्रेमी या थोर समाजसेवक.. व्याकरणकाराला जन्मदिनी विनम्र अभिवादन. मराठी भाषेचे सौंदर्य सांगणारे हे गीत.*


🌹⚜️🌸📚🌺📚🌸⚜️🌹


  *शृंगार मराठीचा नववधू परी*

  *अनुस्वाराचं कुंकू भाळावरी*


  *प्रश्नचिन्हांचे डूल डुलती कानी*

  *स्वल्पविरामाची नथ भर घाली*


  *काना काना जोडून राणी हार केला*

  *वेलांटीचा पदर शोभे तिला*


  *मात्र्यात गुंफिले चाफ्याचे फूल*

  *वेणीत माळता पडे भूल*


  *उद्गारवाचक छल्ला असे कमरेला*

  *अवतरणाची लट*

  *खुलवी मुखड्याला*


  *उकाराची पैंजण छुमछुम करी*

  *पूर्णविरामाची तीट गालावरी*


🌹📚🌸📚🌺📚🌸📚🌹


  *कवी आणि गायक अनामिक*


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *०९.०५.२०२४*


🌻☘📚🌻🌸🌻📚☘🌻

Friday, December 13, 2024

मित्रमैत्रिणी

 छान पोस्ट आहे । वाच नक्की👇🏼


🤝🤝🤝


*नात्यापेक्षाही मैत्रीत खूप दम असतो*. 


जेव्हां मित्रमैत्रिणी खूप वर्षांनी भेटतात तेव्हां खूप आनंद होतो.


 *तारुण्यातील मैत्री व साठीतली मैत्री यात बराच फरक असतो*. 


तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण तेव्हां मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो.... मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हां साठीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळत सुध्दा नाही...


 *जेव्हा साठीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हां सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते कि, ती मैत्री खूपखूप हवी हवीशी वाटत असते*.


 *नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्या आड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा - गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादु:खात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे 'नवरत्ना' तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटंल तर वावगे ठरणार नाही*.


आपण कोणाचे कोणीच नसतो पण आपलं मात्र काहीतरी *ऋणानुबंध* असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रुपात ही नक्कीच होते.


आत्ता आयुष्याची साठी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हां या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया.... 

कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठे पर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे... 


ते आले की उतरावेच लागते... 

म्हणून *जो पर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे मनातल्या तक्रारींना काढून टाकूया*. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू? म्हणून मैत्रिची हि साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!! 


पण अशी मैत्री समजुन घेणारे फार कमी असतात.ज्याला खरे निस्वार्थी मित्र लाभले ते भाग्यवान...


Friends Forever... 🌿

Thursday, December 12, 2024

विरह

 *मला गेल्या चार वर्षात वाॅटसअपवरुन आलेला सर्वात अप्रतिम आणि मनाला भावनारा आणि अगदी रोज  वाचावा असा मेसज. प्लीज वेळ काढून वाचा*


विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना? पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं, तर हळहळणं आणि उरलेलं आयुष्य मनस्तापात, दु:खात घालवणं याशिवाय पर्यायच राहणार नाही, नाही का? 


माझ्या अगदी परिचयातला एक जण असाच हळहळत असतो. कुठल्याही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर त्याला वडिलांची आठवण होते. ते म्हणाले होते, ' मला एकदा हॉटेलमध्ये डोसा खायचा आहे रे ...' 


' जाऊया की मग ... त्यात काय? उद्याच नेतो तुम्हाला.. ' असं आश्वासन देऊन तो बाहेर गेला आणि तो ' उद्या ' आयुष्यात कधी उगवलाच नाही. कारण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्याच रात्री वडिलांना हार्ट अॅटॅक! आणि जगाचा निरोप!


 मुंबईत ताज-ओबेरॉयचा अतिरेकी हल्ला काय किंवा रेल्वेमध्ये झालेले बॉम्बस्फोट काय ... कितीतरी जणांचे 'उद्या' गिळंकृत करून गेले आणि वेदनांचे डंख जगणाऱ्यांसाठी ठेवून गेले. 


पेपरमध्ये त्यांच्या करुण कहाण्या छापून आल्या, तेव्हा कुणी आई म्हणत होती 'अभ्यास करत नाही चांगला, म्हणून रागवायचे मी त्याला ... आता ...?' ' नेहमी भांडायचो आम्ही ... माहेरी जाईन ... घटस्फोट देईन इतक्या थरपर्यंत जायची भांडणं, आता? ' कुणी एक विधवा साश्रूनयनांनी विचारत होती ... नाती, माणसं असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो नं आपण? जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत. *पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि ... आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असत*ं. 


म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा! 


सकाळी उठताना कंटाळा येतो? मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य उगवतो? कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो ... मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल ... 


नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग ...


 स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं ...


 अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत ... त्यांच्या हातात कुठून येणार पाटी? मिळत असून नाकारणारी, कंटाळणारी आपलीच कपाळकरंटी ... 


भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.


 सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं. एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घरं तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की, वाईट वाटतं. 


आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही?

 अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात... आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं. सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं. जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं. श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो. 


अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा *ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर ...?*

 

 शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात. *म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर ...?*💐💐💐

Wednesday, December 11, 2024

नित्यप्राप्त

 *श्रीराम समर्थ*


*नाम हे कर्म नव्हे.*

[पू बाबा बेलसरे यांनी सांगितलेली एक जूनी हकिगत.]



         एकदा मी श्रीमहाराजांबरोबर जालन्याला गेलो होतो. तेथे प्रल्हादमहाराज होते. त्यांनी शास्त्रपठण केलेले होते. भागवत छान सांगत. त्यांच्याकडे त्यावेळी वऱ्हाडातले एक शास्त्री आले होते. त्यांनी श्रीमहाराजांना विचारले की आपण नाम घेतो तेही कर्मच नाही का?

 परमात्मा तर सर्व कार्यकारणभावाच्या पलीकडे आहे. तो कर्माने कसा प्राप्त होणार? श्रीमहाराजांनी माझ्याकडे बोट करून ते यांना विचारा म्हणून सांगितले. तथापि मी गप्प बसलो. नाम हे कर्म नव्हे हे समजावून सांगण्यासाठी श्रीमहाराजांनी दिलेले उदाहरण अप्रतिम होते. श्रीमहाराज म्हणाले, परमात्मा हा नित्यप्राप्तच आहे तेव्हां त्याची प्राप्ती करून घ्यायला आणखी काही कर्म नकोच.

 पण आज आपण त्याला विसरलो आहोत म्हणून त्याचे स्मरण केले की पुरे. तुम्हांला भुक लागते किंवा झोप येते यात कर्म कोणते घडते? ही भूक किंवा झोप जशी तुमच्यातून आपोआप येते तसे नामही आतूनच येते. आज तुम्ही बाहेरून नाम घेता म्हणून ते कर्म आहे. ते आतून येऊ लागले की कर्म रहात नाही. आज आपण बाहेरचे जग आत घेतो आहोत;

 त्याऐवजी आत जाता आले पाहिजे. प्रल्हाद महाराज म्हणाले की झऱ्यातून पाणी येते तसे नाम आतून आले पाहिजे. झऱ्यात पाणी असतेच पण त्यावरचे दडपण - प्रतिबंध दूर झाल्याखेरीज पाणी येत नाही. तसेच नित्यप्राप्त आहे ते प्राप्त व्हावे लागते.


               *********


संदर्भः अध्यात्म संवाद [भाग-३] पान २३४


*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*

Tuesday, December 10, 2024

शक्ती

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                  

                कर्नाटकचे ब्रह्मानंद महाराजांचे पट्ट शिष्य होते. त्यांचा संस्कृतचा गाढा अभ्यास असून देखील महाराजांच्या सांगण्यानुसार ते फक्त नामच जपत असत. तसेच आनंद सागर हे जालन्याचे महाराजांचे शिष्य. त्यांनी तर नामालाच वाहून घेतले होते .

असे महाराजांचे कितीतरी भक्त होते. अनेकांच्या शंकाचे निरसन त्यांनी केले. वैदिक ब्राह्मणांना नामाचे महत्त्व पटवून दिले. मनुष्याने रोजच्या लौकिक जीवनात कसे वागावे हे ही सांगितले. म्हातारपणी थोडे पैसे ठेवावे. पण पैशाचा आधार न वाटू देता नामाचा वाटावा.

 अन्नदान करताना मागे पुढे पाहू नये. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. दत्त मंदिराचे पुजारी रामभट जोशी होते. त्यांचा बाळंभट नावाचा मुलगा, वेद पठण केलेला. पण त्याला गांजाचे व्यसन लागले. महाराज त्याला समजावत म्हणाले, बाळंभट, आपण वैदिक ब्राह्मण आहात. नामस्मरण करावे. कल्याण होईल. बाळंभट म्हणाले, मला गांजा पुरवला तर आपले म्हणणे ऐकेन. महाराजांनी त्यांना रोज एक आण्याचा गांजा पुरवण्याची सोय केली.

        एक दिवस त्यांना गांजा मिळाला नाही म्हणून ते तरातरा महाराजांकडे आले. त्यावेळी महाराज मंदिरात काही लोकांचे समाधान करीत होते. काही वेळ बाळंभट ऐकत राहिले. व गांजा विसरले. तेवढ्यात महाराजांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. म्हणाले, अरे आज गडबडीत विसरलो. मी आता जाऊन घेऊन येतो. म्हणून ते बाजारात जायला निघाले. इतक्या रात्री महाराज स्वतः जात असलेले पाहून बाळंभटाला वाईट वाटले. त्यांनी महाराजांचे पाय घट्ट धरून म्हणाले, महाराज, मला या व्यसनातून मुक्त करा. खरंच व्यसन सोडायचे आहे का? होय महाराज! मग रामाच्या चरणावर हात ठेवून शपथ घ्या की, पुन्हा गांजाला शिवणार नाही. तुमच्या आजपर्यंतच्या पापाची जबाबदारी माझी. बाळंभटाने महाराजांचे ऐकले. त्यांचे व्यसन सुटले.

       गोदूबाईंच्या मुलाची आज मुंज होती. महाराजांना आमंत्रण होते. पण त्यांना जाणे शक्य झाले नाही. मुंजीची पंगत बसली. पण अद्याप गावावरून तुप आले नव्हते.ती मोठ्या काळजीत पडली.महाराजांच्या तसबीरी समोर बसली. तिला त्यांचे शब्द आठवले, गोदुमाय, मी इथून जातो म्हणून दुःख करू नकोस. तू जेव्हाही आठवण काढशील, मी तुझ्यासमोर हजर असेन. मात्र सतत नामस्मरण कर. तिने कळवळून महाराजांना हाक मारली. महाराज तसबीरीतून बाहेर येऊन म्हणाले, गोदे, तुपाचे भांडे दे. ते भांडे त्यांनी तुपाने भरून दिले. जवळ जवळ ३०० लोकांना पुरूनही तूप शिल्लक उरले होते. महाराज म्हणाले, गोदे, राम नामात फार मोठी शक्ती आहे. " जो नामात स्वतःला विसरला त्याचे मागे मागे राम फिरला।"  असे म्हणून ते अदृश्य झाले.

             एकदा महाराजांकडे कुबेर नावाचे गृहस्थ आले व म्हणाले, महाराज, मला काहीतरी नियम सांगा. महाराज म्हणाले, रोज नाम घेणेच सर्वोत्तम नियम आहे. तो म्हणाला, तुम्ही सांगाल तो नियम मी काटेकोरपणे पाळीन. महाराज म्हणाले, रोज जेवण्या पूर्वी पानावर बसल्यावर तीन वेळा श्रीराम म्हणावे. नक्की राम दर्शन होईल. कुबेराला हा नियम फारच सोपा वाटला. ते निघून गेले.

         काही दिवसांनी पुन्हा कुबेर गोंदवल्याला आले. म्हणाले, महाराज मला नियमाचा स्वप्नात देखील विसर पडणार नाही. दुसऱ्या दिवशी महाराजांनी  रामाला लवकरच नैवेद्य दाखवला. सर्वजण पानावर बसले. कुबेरही बसले.महाराजांनी काही तरी बोलणे काढून सर्वांचे लक्ष विचलित केले. ऐकत असतानाच महाराजांनी एकदम जेवण्याची घाई केली. सगळ्यांनी जेवण्यास सुरुवात केली. महाराज कुबेरासमोर येऊन हळूच म्हणाले, आता श्रीराम नाव रात्री घेणार का? 

शब्द ऐकले मात्र, नियमाच्या आठवणीने कुबेराच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाले, महाराज, माझा गर्व हरण झाला. आपले म्हणणे खरे आहे. नियम पूर्ण होण्यास, त्याचे नाव घेण्यास सुद्धा रामाची कृपा लागते.

          एक दिवस एक मनुष्य ब्रह्मदर्शन व्हावे म्हणून पुष्कळ तीर्थयात्रा करून पंढरपूरच्या तपकिरी बुवांच्या सांगण्यावरून  गोंदवल्याला आला. म्हणाला, महाराज, मला ब्रह्म दाखवा. म्हणाला, मला भोगवासना नाही. पैशाचा मोह नाही. स्त्री पुरुष भेदही राहिलेला नाही. महाराज म्हणाले, ठीक आहे. उद्या ब्रह्म दाखवतो. दुसऱ्या दिवशी तो मनुष्य ओढ्यावरून स्नान करून येत होता. महाराज पटाईत मावशीला म्हणाले, मावशी, त्याचे धोतर फेड. तिने पुढे जाऊन त्याचे अर्ध अधिक धोतर फेडले. एक विधवा बाई आपले धोतर फेडतसे पाहून त्यांना अतिशय राग आला. तसाच मंदिरात येऊन महाराजांना म्हणाला, ही बाई आहे की कोण? अहोऽ या सटवीने माझे धोतर फेडले की हो!

         महाराज शांतपणे म्हणाले, म्हणजे ती बाई बाईच दिसली. तुम्हाला धोतर फेडण्याची लाज वाटली. म्हणजे तुम्ही काल जे बोललात ते सर्व खोटे होते. तुम्हाला देह, वस्त्र, मानापमानाची शुद्ध आहे तर! तुम्हाला ब्रह्म कसा दाखवू? महाराजांनी त्याला नामस्मरण करायला सांगितले.

        एकदा एक हरदास बायकोसह वाईच्या शास्त्री मंडळीच्या सांगण्यावरून महाराजांकडे आला. म्हणाला, मी हरदास आहे. उद्या सकाळी कीर्तन करीन. महाराजांनी त्याचा खूप आदर सत्कार केला सगळ्यांना उद्या कीर्तनाला यायला स्वतः सांगितले.

             क्रमशः

 संकलन व लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

ज्ञानेश्वर

 *ज्ञानेश्वर माऊलीचे हे १० विचार अतिशय सुंदर वाटलेत  आपण सुद्धा अवश्य वाचा ही विनंती*🙏🏻🙏🏻 


*संत ज्ञानेश्वर महाराजांना समाजाबाहेर काढले तेव्हा त्यांनी लिहलेले काही विचार :-*


*१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.* 

              -  *संत ज्ञानेश्वर*


*२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.*

                -  *संत ज्ञानेश्वर*


*३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.* 

                 - *संत ज्ञानेश्वर*


*४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.*

                 - *संत ज्ञानेश्वर*


*५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.*

                - *संत ज्ञानेश्वर*


*६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.*

                 - *संत ज्ञानेश्वर*


*७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !*

                 - *संत ज्ञानेश्वर*


*८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.* 

                - *संत ज्ञानेश्वर*


*९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.*

                - *संत ज्ञानेश्वर*


*१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.*

                 - *संत ज्ञानेश्वर*u

Monday, December 9, 2024

शिकवण

 *शिकवण.*


*मी लहान असल्यापासून लक्ष्मीबाई आमच्याकडे स्वयंपाकाला होत्या. त्यांचं वय किती होतं मला आठवत नाही, पण आम्ही त्यांना आजी म्हणायचो. आजींच्या हाताला चव होती. तलम रेशमासारख्या गरम पोळ्या आणि दाणे, लसूण घालून त्यांनी केलेली आंबाडीची भाजी अमृतासारखी लागायची. शिरा, खीर, लाडू, वड्या, चिवडा, मसालेभात, रस्सा वगैरे करण्यात त्यांचा कोणी हात धरत नसे.*


*छोटा आंबाडा आणि नऊवारी लुगडं नेसणाऱ्या आजीना कधी हसताना बघितल्याचे आठवत नाही.  हसणं तर जाऊदेच... पण त्या कायम चिडलेल्या असत.  काही बोलायला गेलं, की अंगावर खेकसल्यासारख्या बोलत. आईशी त्यातल्या त्यात बऱ्या बोलत.*


*आई त्यांना रोज सकाळी काय स्वयंपाक करायचा सांगत असे पण आजीनी कधी नीट हो म्हटल्याचे आठवत नाही.  न बोलता त्या कामाला लागत.  मला त्याच्याशी बोलायची भीतीच वाटत असे.*


*मी थोडी मोठी झाले तेव्हा आजींची एक गोष्ट मला खटकू लागली. आईने दहा पोळ्या करा म्हटलं की आजी १५ पोळ्या करायच्या. १५ लाडू करा म्डटलं की २०-२२ लाडू करायचे आणि जास्तीचे केलेले पदार्थ त्या गुपचुप घेऊन जायच्या. एकदा मी त्यांना पाच पोळ्या त्यांच्या नऊवारी लुगड्याच्या ओच्यात लपवताना बघितलं आणि आईला जाऊन सांगितलं.*


*मला वाटलं, की आईला धक्का बसेल पण आईला यात नवीन काहीच नव्हतं.  ती म्हणाली, “ हो त्या जे करतील त्यातलं थोडं घरी नेतात हे मला माहित आहे."*


*“अग ही चोरी नाही का? तू विचार ना त्यांना! त्यांनी मागितलं तर अन्न तू देशीलच ना? मग चोरी का करायची?” मी तडकून विचारलं.*


*आई म्हणाली,” नको विचारायला. त्यांना फार वाईट वाटेल. ६५ वर्ष वय आहे त्यांचे. आणि माणूस जेव्हा अन्नाची चोरी करतो ना तेव्हा ती त्याची गरज असते.”*


*एरवी राजा हरीश्चंद्र अंगात येणारी माझी आई अशी कशी बोलू शकते हे मला कळेना. मी लहानपणी माझ्या मैत्रीणीकडून दोन गोट्या तिला न सांगता घरी आणल्या होत्या. आईने रात्री दहा वाजता तिच्या लक्षात येताच गाढ झोपलेल्या मला उठवून त्या गोट्या परत देऊन ये म्हणून मैत्रीणीच्या घरी पाठवलं होतं. तिच आई आजींचं चोरी करणं काही न झाल्यासारखी बघत होती.  मला काही उलगडत नव्हतं.*


*मी दहावी पास झाल्यावर काही ठिकाणी पेढे द्यायला गेले होते.  मनात आलं आजींकडे डोकवावं. म्हणून मी त्यांचे घर शोधत तिथे गेले. आजी मला बघून चमकल्या. “ये की ग आत!” म्हणाल्या.  मी पेढे दिले. आमच्या घरातील न सापडणारा गड्डू तिथे टेबलावर ठेवलेला दिसला.*


*आजींच्या चेहऱ्यावरचा राग त्या दिवशी शरमेत बदलला होता.*


*आजीनी लहानसं घर छान ठेवलं होतं.  मला रव्याचा लाडू दिला व माझं कौतुक केलं. नंतर माझ्या नजरेला नजर न देता आजी म्हणाल्या, “तुझ्या आईचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. माझे लहानपणी खाण्याचे फार हाल झाले. तेव्हापासून अन्न दिसलं की थोडं घरी घेऊन यायची सवय लागली. वाटायचं... घरात काहीच नसेल तर लेकरांना काय खाऊ घालायचं? म्हणून मी तुमच्याकडून काहीतरी जिन्नस घरी घेऊन येऊ लागले. आधीच्या नोकऱ्या केल्या तिथे हा माझा "गुण" त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. तुझ्या आईने मात्र बघितलं पण मला कधीही एका शब्दानं विचारलं नाही. रात्र रात्र ज्यांनी अन्नाशिवाय तळमळत काढली ना... ते हाल परत नशिबी नकोत असं वाटायचं. पण हातून पाप घडलं हे कबूल करते.*


*त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून माझ्या गळ्यात घातली. ही माझी भेट तुझ्या दहावीच्या निकालाची. नाही म्हणू नको." "आई तुझी भारी हूशार बघ....  मला त्या मानसोपचार करणाऱ्या तुझ्या बाबांच्या डॅाक्टर मित्राकडे, डॅा. रॅाय कडे तिनं नोकरी लावून दिली. ते डाक्टर आता माझ्यावर उपचार करतात. मला उपचाराची जरूर आहे. ” आजीने डोळे पुसले.*


*मला सोन्याची साखळी घ्यायची नव्हती... पण आजी ऐकेनात. त्या म्हणाल्या,”क्लेप्टोमॅनिया का त्याच्यासारखे कायतरी आहे हे असं म्हणतात. ते डाक्टर पण पैसे घेत नाहीत. कसे फेडू मी तुझ्या आईचे उपकार? कधी एका शब्दाने वहिनी बोलल्या नाहीत मला.”*


*मी घरी आले व आईला साखळी दाखवली. आई म्हणाली, “आण ती इकडे. मी जपून ठेवते. आजींना कशी परत करायची बघेन मी.”*


*मी कौतुकाने आईकडे बघितलं. चोरी करणाऱ्या नोकरमाणसाला काढून टाकणारे बरेच असतात. पण आईने आजींचा संसार उध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना डॅा. रॅाय कडे त्यांना नोकरी लावून दिली व डॅाक्टरना आजीबद्दल काय करता येईल ते विचारलं. कुठेही वाच्यता न करता! आजी आमच्या घरचं काम झालं की डॉ. रॉय कडे जात असत.*


*आई, तू किती चांगली आहेस ग!  म्हणत मी आईला मिठी मारली. आई माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली,” तुला त्या दिवशी वाटलं ना की आई कडे डबल स्टँडर्ड कसं… कुणाला आवडतं का चोरी करायला? ती सुध्दा अन्नाची! मी त्यांना सरळ विचारू शकले असते पण मला वाटून गेलं की आधी एकदा डॅा. रॅाय ना विचारावं. बाबांचंही हेच मत होतं.*


*"अपराध्याला काही न बोलता माफी करणं ही पण एका प्रकारची शिक्षा च आहे बघ." मी चमकून आईकडे बघितले.*


*"आजी सतत चिडचिड का करायच्या?  कदाचित आपण जे करतो त्याचा त्यांना राग येत असेल असं मला वाटतय. एखादी सवय अशी असते की आपले चुकतंय माहित असूनही ते बदलता येत नाही.. अगदी दारू पिणाऱ्या माणसासारखे! म्हणून तर त्याला व्यसन म्हणायचं. " आई म्हणाली.*


*“मग आई या चेनचं काय करणार आहेस?” मी कुतूहलाने विचारलं.*


*आईने क्षणभर विचार केला व ती म्हणाली, “ त्यांना त्यांच्या चुकीची भरपाई करण्याची एक संधी तुला चेन देऊन मिळाली. त्याचा त्यांना आनंद  मिळू दे.  डॅाक्टर म्हणाले आहेत की, behavior therapy चा आजींना खूप उपयोग होत आहे.  एकदा त्याची ट्रीटमेंट संपली व ही सवय मोडली की त्याचे कौतुक म्हणून आपण हीच चेन त्यांच्या गळ्यात घालू.”*


*मी आईकडे अभिमानाने बघितलं.  १० वर्षाच्या मला गोट्या परत करण्यासाठी झोपलेली उठवणं जेवढे महत्वाचं होतं, तेवढंच आजींना माफ करणं महत्वाचं होतं.  त्यामुळे चोर हा शिक्का बसून एक व्यक्ती आयुष्यातून उठली नाही.  माफी मध्ये पण शिक्षा असते कारण त्या व्यक्तीला आपल्या चुकीसाठी माणसे ओरडणार ही अपेक्षा असते. ते घडले नाही तर अजूनच अपराधी वाटत असावे हे मला हळूहळू कळू लागलं.*


*मी आईला घट्ट मिठी मारली! “आई ग तू डॅाक्टरांएवढीच उत्तम मानसोपचार तज्ञ आहेस ग!”*


*आईने दिलेले ही शिकवण मला आयुष्यभर उपयोगी पडत आहे. एखाद्या व्यक्तीला नावं ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा आजवरचा प्रवास कसा आहे हे बघायला मी शिकले आहे.  बाहेरून दिसणारे एखादे आयुष्य हिमनगाच्या टोकासारखं असते. आत लपलेले बरच काही आपल्याला सहजी दिसत नाही..*


*Before you judge someone, at least walk a mile in his shoes म्हणतात ते उगीच नाही!*


*©️®️ ज्योती रानडे...*

🌸🌸🌸

भेट

 *भेट* (बक्षीस)


एका उद्योगपतीचा मुलगा कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करत होता. जेंव्हा त्याचे वडील त्याला परीक्षेविषयी विचारत असत,तेंव्हा तो उत्तर देताना वडिलांना म्हणत असे की, "पिताजी असं होऊ शकतं, की मी कॉलेजमध्ये प्रथम येईन, जर मी प्रथम आलो तर तुम्ही मला माझ्या आवडीची, ती महाग कार भेट म्हणून द्याल का?"


वडील आनंदाने म्हणाले, "का नाही, अवश्य आणून देईन बेटा." हे त्यांच्यासाठी सहज शक्य होतं. कारण त्यांना पैशाची काहीच कमतरता नव्हती.


हे ऐकल्यानंतर मुलगा दुप्पट उत्साहाने अभ्यासाला लागला. रोज कॉलेजमध्ये येता- जाता, तो शोरूम मध्ये ठेवलेल्या कारकडे निरखून बघत असे आणि मनातल्या मनात कल्पना करत असे की तो आपली आवडती कार चालवत आहे.


दिवस सरले आणि परीक्षा संपली. रिझल्ट आला, तो कॉलेजमध्ये प्रथम आला होता. त्याने कॉलेजमधूनच वडिलांना फोन करून सांगितलं की, " पिताश्री, माझं बक्षीस तयार ठेवा. मी घरी येत आहे."


घरी येता येता, तो मनातल्या मनात  घराच्या अंगणात गाडी उभी असल्याचं स्वप्न रंगवत होता. ज्यावेळी तो घरी पोहोचला, त्याला तिथे कोणतीही कार दिसली नाही. तो नाराज मनानेच वडिलांच्या खोलीमध्ये गेला.


त्याला बघताच वडिलांनी त्याला मिठी मारून त्याच अभिनंदन केलं आणि त्याच्या हातात कागदामध्ये गुंडाळलेली एक वस्तू दिली आणि म्हणाले, "हे घे, तुझं बक्षीस."


मुलाने नाराजीनेच,ती भेटवस्तू आपल्या हातामध्ये घेतली आणि आपल्या खोलीमध्ये गेला. मनातल्या मनात कार न मिळाल्यामुळे,तो क्रोधाच्या अग्नीमध्ये जळू लागला. नाराज मनाने त्याने वडिलांनी दिलेल्या भेटवस्तूचा कागद उघडून बघितला,तर त्यामध्ये सोनेरी कव्हर मध्ये त्याला ' रामायण' दिसलं. ते पाहून त्याला आपल्या वडिलांचा खूप राग आला.


रागाने त्याच्या बुद्धीला भ्रमित केलं. त्याने एक चिठ्ठी आपल्या वडिलांच्या नावे लिहिली की, "पिताजी, तुम्हीं मला कार भेट न देता, हे रामायण दिलत. तुम्हीं वचन देऊनही माझ्याबरोबर असं का केलंत, मला माहित नाही... म्हणून मी हे घर सोडून जात आहे आणि तोपर्यंत परत येणार नाही जोपर्यंत मी खूप पैसा कमावणार नाही." आणि ती चिट्ठी, रामायण बरोबर तिथेच टेबलावर ठेवून,तो घर सोडून निघून गेला.


काळ सरत होता...


मुलगा हुशार होता, सद्गुणी होता. लवकरच तो श्रीमंत बनला. कधी- कधी त्याला आपल्या वडिलांची आठवण येत असे, परंतु त्याच्या वडिलांकडून त्याला भेट न मिळाल्यामुळे असलेला राग, डोकं वर काढत असे.तो विचार करत असे,की आई गेल्यानंतर माझ्याशिवाय त्यांना कोण होतं. इतका पैसा असूनही माझी छोटीशी इच्छा देखील माझ्या वडिलांनी पूर्ण केली नाही. हा विचार करून तो वडिलांना भेटण्यासाठी कचरत असे.


एक दिवस त्याला आपल्या वडिलांची खूप आठवण येऊ लागली. त्याने मनातल्या मनात विचार केला 'इतक्या छोटया गोष्टीसाठी मी आपल्या वडिलांवर नाराज झालो. हे चांगलं झालं नाही.' हा विचार करून त्याने आपल्या वडिलांना फोन लावला. खूप दिवसानंतर,तो आपल्या वडिलांशी बोलणार असल्या कारणाने, धडधडत्या अंतकरणाने रिसीवर हातात घेऊन उभा राहिला.


घरातील नोकराने फोन उचलला आणि सांगितले की," मालकांचा दहा दिवसां पूर्वीच स्वर्गवास झाला आहे.ते शेवटपर्यंत तुमची आठवण काढत होते आणि रडत- रडत निधन पावले. जाता जाता म्हणाले, की माझ्या मुलाचा फोन आला तर त्याला सांगा, की येऊन आपला व्यवसाय सांभाळ. तुमचा काहीही पत्ता नसल्यामुळे, आम्ही तुम्हांला कळवू शकलो नाही."


हे ऐकल्यानंतर मुलाला खूप मोठा धक्का बसला आणि जड अंतःकरणाने तो वडिलांच्या घरी जायला निघाला.


घरी पोचल्यावर वडिलांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांच्या फोटो समोर, रडत- रडत दुःखी मनाने त्याने वडिलांनी दिलेली भेटवस्तू, 'रामायण' उचलून आपल्या कपाळाला लावली आणि ते उघडून पाहिले.


पहिल्या पानावर वडिलांनी  लिहिलेलं वाक्य वाचलं ज्यामध्ये लिहिलं होतं, "माझ्या लाडक्या मुला, तुझी काळानुसार खूप भरभराट होऊ दे...आणि त्याचबरोबर मी तुला चांगले संस्कार ही देऊ इच्छितो.... हा विचार करून हे ' रामायण ' देत आहे. “


हे वाचत असतानाच, त्या रामायणा मधून एक लिफाफा घसरून खाली पडला, ज्यामध्ये त्याच्या आवडत्या गाडीची किल्ली आणि रोख रकमेचे बिल ठेवलेले होते.


हे बघून त्याला इतकं दुःख आणि आत्मग्लानी झाली, की तो स्वतःला सांभाळू शकला नाही, आणि जमिनीवर पडून धायमोकलून रडू लागला.


आपण ही आपले आवडते बक्षीस,आपल्याला आवडत्या पॅकिंग मध्ये न मिळाल्यामुळे, अनवधानाने त्याला हरवून बसतो.आपण आपल्या आई-वडिलांनी, आपल्याला प्रेमाने दिलेल्या अशा अगणित भेट वस्तूंचे मोजमापच करू शकत नाही किंवा त्याला समजूच शकत नाही.


*ईश्वर देखील आपल्याला प्रत्येक क्षणी कितीतरी भेटवस्तू देत असतो.परंतु आपण आपल्या नादानपणामुळे,त्या आवडत्या पॅकिंग मध्ये न  मिळाल्याने, त्यांना हरवून बसतो.*

*आपलं आयुष्य देखील एक भेटच आहे, सर्वात मोठी भेट!*


*एक असंतुलित मन,हे आपली अंतर्दृष्टी आणि आपली दिशा हरवून बसते.”*.