*हे कर्म निष्काम नाही*
कऱ्हाडला राहणाऱ्या एका तरुण गृहस्थाने, श्रीमहाराजांनी घरी येऊन आपल्याला दर्शन द्यावे म्हणून उपवास सुरू केला. हे त्यांना कळल्यावर नापसंती व्यक्त करून ते म्हणाले, 'हे लोक उगीचच अट्टाहास करतात.' त्या बाजूला गेले असता त्याच्या घरी जाण्याचे आश्वासन देऊन सध्या त्याने उपवास सोडून द्यावा असा निरोप देऊन नीलकंठबाबाला त्यांनी कराडला पाठविले. निरोप पोहोचल्यावर देखील त्या माणसाने उपवास चालूच ठेवला. त्याची पत्रावर पत्रे येऊ लागली. श्रीमहाराजांनी तिकडे फारसे लक्ष दिले नाही. शेवटी त्याचे आईबाप गोंदवल्यास आले.
ते आल्यावर त्यांच्याजवळ मुलाची मोठी स्तुती करून त्यांना ठेवून घेतले. निघण्याबद्दल त्यांनी विचारले म्हणजे श्रीमहाराज म्हणायचे, 'हो, फार दिवस झाले ! आता उद्या आपण नक्की निघायचे.' याप्रमाणे आज-उद्या करता करता एक महिना होऊन गेला आणि श्रीमहाराज एकदाचे त्या माणसाच्या घरी गेले.
त्याने श्रीमहाराजांची मोठी पूजा वगैरे केली आणि त्यांच्या समोर एका ताम्हनामध्ये शंभर रुपये ठेवले व त्यावर पाणी सोडले. हे सर्व झाल्यावर तेथे जमलेल्या स्त्री- पुरुषांसमोर श्रीमहाराज त्याला म्हणाले, "देहाच्या उपचारांना जो बोलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते
त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. असे बोलून श्री महाराजांनी त्याला उपवास करण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, "महाराज, मी देहाला कष्ट दिले की आपण खात्रीने याल या दृष्टीने मी उपवास केला." हे उत्तर ऐकून श्रीमहाराज हसले आणि त्याला म्हणाले, "माझी गोष्ट सोडून द्या, पण देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. असे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता.
भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील; पण भगवंत फसणार नाही. तुम्ही उपवास केला ही गोष्ट मला तितकीशी आवडली नाही. 'उपास घडावा' यात जी मौज आहे ती 'उपवास करावा' यामध्ये नाही.
भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करीत आहोत असे मनाला पटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून काय बिघडले ? पण चित्तात भगवंताचे नाम नसताना देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणा शिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही.
पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा भगवंतापासून माणसाला दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. प्रपंचात वावरत असताना या दोन्ही गोष्टींचा संबंध येणारच, तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे. म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत."
श्रीमहाराजांचे बोलणे संपल्याबरोबर एक गरीब कुणबी त्यांच्या पाया पडला व म्हणाला, "महाराज, चार मुली आहेत. त्यांची लग्ने व्हावीत एवढा आशीर्वाद द्या." श्रीमहाराज बोलले, "तू काळजी करू नकोस !
ज्याने त्यांना जन्माला घातले आहे, तो त्यांच्याकडे लक्ष देतो. तू मुलगा पहाण्याची खटपट तेवढी कर." असे त्याला सांगून आपल्यासमोरचे ताम्हण श्रीमहाराजांनी त्याच्या पदरामध्ये ओतले व म्हणाले, "यामध्ये दोघींची लग्ने करून टाक." तो कुणबी बघतच राहिला आणि अश्रूपूर्ण डोळ्यांनी त्यांना धन्यवाद देत निघून गेला.
*।। श्रीराम ।।*
No comments:
Post a Comment