*॥श्रीहरिः॥*
शुक्ल आणि कृष्ण असे हे दोन प्रकाशमय आणि अंधकारमय मार्ग भगवंतांनी सांगितले आता त्यापुढे जाऊन एक महत्त्वाची बाब भगवंतांनी सर्व साधकांना सांगितली आहे.
*-----------------------------*
॥ॐ श्री परमात्मने नमः॥
अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः
*नैते सृती पार्थ*
*जानन्योगी मुहाति कश्चन ।*
*तस्मात्सर्वेषु कालेषु*
*योगयुक्तो भवार्जुन ॥*
*॥८.२७॥*
(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा
अक्षरब्रह्मयोग ८.२७)
*भावार्थ:- हे पार्था, दोन्ही मार्गांचं ज्ञान असल्यामुळे कोणताही योगी मोह पावत नाही. (त्याची स्मृती नष्ट होत नाही.) म्हणून अर्जुना, तू सर्व काळी योगयुक्त रहा.*
हे पार्था! भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले, तरी ते कधीच मोहित होत नाहीत. म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो.
*-----------------------------*
शरीराचा त्याग करताना दैवयोगाने मार्ग मिळत असेल तर योग्य मार्ग निवडून अक्षरब्रह्म स्वरूपाला प्राप्त करणं कसं शक्य आहे? अशी शंका मागील श्लोक वाचल्यानंतर निर्माण होऊ शकते.यासाठी मनुष्याला या गोष्टीची दृढता हवी, की देह असो अथवा नसो पण *'मी ब्रह्मस्वरूपच आहे'.*
*जसं,*
अंधारात दोरी पाहून साप असल्याचा भास होतो, याचं मूळ कारण दोरी हेच आहे.अशाच प्रकारे ज्या शरीराच्या मृत्यूबाबत मनुष्य नेहमी भयभीत राहतो, तो मृत्यू तर केवळ भ्रमच आहे. दोरी म्हणजे हे शरीर देखील भ्रम आहे. मृत्यूच्या भीतीचं मुख्य कारण म्हणजे आपल्या खऱ्या
स्वरूपाचं विस्मरण होऊन स्वतःला शरीर मानणं हेच आहे.
या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देताना सांगतात,
*"जे योगी या दोन्ही मार्गांना तत्त्वाने जाणतात, ते कधीही मोहित होत नाहीत."*
आपण एखादी गोष्ट जेव्हा शब्दांमध्ये समजून घेतो, त्यानंतर त्याच्यावर मनन-मंथन करतो, तेव्हा *'समज'* आपलं जीवन बनते. अर्थात ती बाब आपण तत्त्वाने जाणतो. मग आपण म्हणतो, 'अच्छा, हे सांगितलं जात होतं तर...' एखाद्याने आपल्याला शिवी दिली आणि आपला राग अनावर झाला तर हा राग सर्वप्रथम आपलंच अहित घडवतो. मनामध्ये एखाद्या विषयी तक्रारीचा तरंग उठला पहिल्यांदा आपल्यावरच कडवटपणाचा परिणाम होतो. अर्थात आपण आपलंच नुकसान करून घेतो.
सुरुवातीला साधक हे मानायला तयार नसतो. परंतु तो जेव्हा अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने स्वतःला पाहतो, तेव्हा त्याला या गोष्टीतील सत्य, वास्तव जाणवतं. मग हा उपदेश तो तत्त्वाने जाणू लागतो.तेव्हा तक्रार, क्रोध,तिरस्कार, मत्सर यांसारख्या त्याच्या सवयीतून तो सहजतेने मुक्त होतो आणि 'समज'च त्याचं जीवन बनतं..
*अशाच प्रकारे*
जिथे असाधारण *समर्पण* घडलं आहे, तिथे ते कोणत्या मार्गाने जाणार या गोष्टीची काळजी राहत नाही. ते निष्काम भावाने आपली कर्मं करत राहतात. मग जिथे कर्म हेच फळ आहे, तिथे अन्य कोणत्याही फळाची अपेक्षा ती काय असणार? अशी समबुद्धी ठेवणारे योगी
कोणत्याही प्रयत्नाशिवाय अक्षर ब्रह्माला प्राप्त होतात. त्यांचे प्रयत्न हे प्रयासरहित प्रयास असतात.
शरीराचं अस्तित्व असूनही स्वतःला अशरीरी पातळीवर जाणणारा, ज्याच्यासाठी शरीर केवळ एक साधन आहे, तिथे मृत्यू शक्य आहे का? वास्तविक असे लोक कधीही मरत नाहीत. मग त्यांना मार्ग शोधण्याची आवश्यकताच काय? ते कुठून कुठे जाणार? त्यांच्यासाठी तर संपूर्ण विश्वच आत्मस्वरूप आहे. घड्याचा आकार नष्ट झाल्यानंतरही त्याच्या आतील रिक्त जागा (स्पेस) ही पूर्वी आकार असताना जशी होती तशीच राहते.
सांगण्याचा अर्थ असा आहे की,
आकार राहो अथवा न राहो, रिक्त स्थान कायम उपलब्ध असतंच.या योगाने भारलेल्या योग्यांसाठी कोणत्या मार्गाने जावं हा संभ्रमच शिल्लक राहत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,
*तू नेहमी योगयुक्त राहा. त्यामुळे तुला आपसूकच ब्रह्मस्वरूपाचा बोध होईल.*
ते ब्रह्मस्वरूप विश्वरचनेच्या वेळी जन्माच्या बंधनात पडत नाही, प्रलयकाळी मरणाच्या बंधनातही अडकत नाही. स्वर्ग, संसार अशा कोणत्याही मोहात फसत नाही. ते प्रत्येक प्रकारच्या आकर्षणांपलीकडे परम मौनामध्ये असतं... केवळ उपलब्ध असतं...
*-----------------------------*
*जेव्हा* जीव देह सोडतो तेव्हा अत्यंत वेगानं पितृलोकात म्हणजेच चंद्रपरिवेष्टित मंडलापर्यंत जातो. तिथे त्या जीवाच्या अंतर्मनाला त्याच्या कर्माचा ताळेबंद चिकटलेला (stored) असतो.
चांगल्या-वाईट कर्मांचं तिथे क्षणात विश्लेषण होतं आणि त्यानुसार जीव पुन्हा पृथ्वीवर (विकासमार्गावर असणारा आणखी विकास करू इच्छिणारा पृथ्तीवरच परततो) तरी येतो, नरकाच्या कोणत्या तरी स्तरावर जातो किंवा स्वर्गात जातो.
ज्यावेळी जीव नरक स्तरावर जातो तेव्हा त्या जीवाला त्याचा पृथ्वीवरचाच सूक्ष्म देह चिकटलेला (attached) असतो. त्याला *'भूतसूक्ष्म देह'* म्हणतात. तळलेला वडा पाण्यात कितीही धुतला तरी त्यात तेलाचा अंश शिल्लक राहतोच. त्याचप्रमाणे पृथ्वीवरचा भौतिक देह सोडल्यानंतरही त्या देहाचा थोडासा अंश जीवात्म्याला चिकटलेलाच रहातो.
*पापकर्मांमुळे* जीव जर नरक स्तरावर गेला तर तो भूतसूक्ष्म देह जीवात्म्याबरोबर तसाच रहातो आणि त्यामुळेच जीवात्म्याला नरक - यातनांचा अनुभव मिळत रहातो. पण जीव जर स्वर्ग-स्तरावर गेला तर मात्र भूतसूक्ष्म देह गळून पडतो आणि जीवाला दिव्य स्वर्गीय देह प्राप्त होतो.
*पण*
जे ब्रह्मोपासक हे दोन्ही स्तर उल्लंघून शुक्लगतीनं जातात ते ब्रह्मलोकी जातात आणि ब्रह्मलोकाचा क्षय झाला की, तिथल्या प्रजापतीबरोबर मुक्त होतात. या मुक्तीला क्रममुक्ती म्हणतात. म्हणजे ही मुक्ती क्रमाक्रमानं होते. ज्यांना आत्मसाक्षात्कार होतो ते इथल्या इथेच ब्रह्माला मिळतात. त्यांना
कोणताच मार्ग लागत नाही.
*म्हणून पार्था,*
या दोन गती जाणणारा योगी मोह न पावता कर्म करतो. तूही असा कर्मयोगयुक्त हो.म्हणजे पुनर्जन्माच्या फेऱ्यातून तू मुक्त होशील;आणि मोक्षदेणाऱ्या उत्तरमार्गी ध्यानयोगाचा तू आश्रय करशील,असं भगवंत सांगतात.
*सारांशः*
*देवयानमार्ग आणि पितृयाण मार्ग जाणणारा योगी मोह न पावता खऱ्या अर्थानं कर्मयोगी बनतो. म्हणजे कोणत्या मार्गानं गेलं तर काय परिणाम होईल हे तो जाणत असतो. त्या अनुषंगानं पृथ्वीवर शास्त्रशुद्ध कर्मं करून तो योगी पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त होतो.*
*-----------------------------*
संदर्भ ग्रंथ :-
श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य.
संपूर्ण भगवद्गीता.
*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*
No comments:
Post a Comment