चिंतन
श्रीराम,
परमार्थाचा अभ्यास करताना मला मनापासून हा अभ्यास करायचा आहे का? असा विचार आधी करायचा. त्याचे उत्तर जर हो असेल तर मग यासाठी मनाचा अत्यंत दृढ निश्चय करावा लागतो. कारण या निश्चयावरच पुढील सर्व गोष्टी आधारभूत असतात. परमार्थाच्या अभ्यासातून काय मिळते? श्री समर्थ दासबोधात अत्यंत विश्वासाने सांगतात की, या अभ्यासाने निरपेक्ष आनंदाची प्राप्ती होते. मन शांत, तृप्त, निर्भय होते, समाधानी बनते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जो काही पुस्तकी अभ्यास करतो, वाचतो, मनन करतो त्याप्रमाणे जर प्रत्यक्षात आचरण केले तर अंतर्यामी विवेक उत्पन्न होतो. त्याने व्यवहारात चातुर्याने व प्रसंग पाहून कसे वागावे ते समजते. दुसऱ्यांची लबाडी ओळखण्याइतकी धूर्तता अंगी येते. सूक्ष्म विचार करता येतो. वेळ प्रसंग जाणता येतो. कोणतेही चांगले कार्य करण्यास आपले मन तत्पर व उत्साहाने भरलेले रहाते.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रपंचातील कोणतेही कार्य करीत असताना ते मन कशातही गुंतून न राहता निर्लेपपणे राहू शकते. त्यामुळे संसारातील दुःखाचे व निराशेचे अनेक प्रसंग लोप पावतात.. पण हे सगळे तेव्हाच शक्य होते जेव्हा परमार्थाचा अभ्यास करण्यासाठी आपली मानसिकता अत्यंत सकारात्मक आणि संतवचनांवर श्रद्धा ठेवणारी असेल.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment