TechRepublic Blogs

Sunday, September 28, 2025

कर्मबंध

 *॥श्रीहरिः॥*


आठव्या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, 


*-----------------------------*


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः 


*वेदेषु यज्ञेषु तप:सु चैव*

*दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।*

*अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा*

*योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥*

*॥८.२८॥*


(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा 

अक्षरब्रह्मयोग ८.२८)


*भावार्थ:- दोन्ही मार्गांचं (मागे सांगिलेलं) ज्ञान असणारा योगी, वेदाध्ययन, यज्ञ, तपश्चर्या अथवा दान यांमध्ये जे जे पुण्यकारक फल सांगितलेलं आहे, त्या सर्व फलांहून अधिक फल हे (जीव, ब्रह्म यांचं ऐक्यरूपी) ज्ञान आहे, हे जाणून त्यांस (वरील वेदाध्ययनादिकांच्या मार्गानं प्राप्त होणारी स्वर्गसुखासारखी फलं) मागे टाकून अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानाप्रत जातो.*


*-----------------------------*


आठव्या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सरळ सत्य सांगताना म्हणतात, 


*जे योगी चेतनेला उच्च अवस्थेमध्ये ठेवून,या परमज्ञानाला तत्त्वाने जाणतात, ते यज्ञ, तप आणि दान कर्माने प्राप्त होणार्‍या पुण्यफळाचंदेखील अतिक्रमण करतात,त्यांना बायपास करतात.* 


*हे एका उदाहरणावरून समजून घेता येईल.*


एक असा मुलगा असतो, जो कधी शाळेत गेलेलाच नसतो. शाळेत काय शिकवलं जातं हे जाणून घेऊन तो घरीच अभ्यास करतो. काही वर्षांनंतर तो बहिःस्थ( External)विद्यार्थ्याच्या रूपात एस.एस.सी.ची (दहावीची) परीक्षा देतो आणि उत्तीर्णदेखील होतो.


सुरुवातीच्या वर्गांमध्ये तो बसलेलाच नसतो. तो सरळ दहावीची परीक्षा देतो आणि उत्तीर्ण होतो. अर्थात मधल्या सगळ्या इयत्तांना तो बायपास करतो. म्हणून त्याला कुणी असं विचारेल का, तुला सातवी किंवा आठवीचं गणित येतं की नाही? कारण त्याने दहावीची परीक्षा दिलेली असते. त्यामुळे तो नववीपर्यंतच्या अभ्यासक्रमापलिकडे गेलेला असतो. 


*अशाच प्रकारे,*

योगी जेव्हा मनुष्य जन्म, मृत्यू, मृत्यूनंतरचं जीवन, पुनरावर्ती व अपुनरावर्ती मार्ग तत्त्वतः समजून घेतो, तेव्हा तो निष्काम कर्म, जप, तप, या सगळ्यांपलिकडे जातो. कारण ज्याच्या प्राप्तीसाठी हे सर्व तो करणार असतो, तो अगोदरच उपलब्ध आहे. 


एक आहे, ईश्वरप्राप्तीसाठी भजनं गायली जाणं आणि दुसरं आहे, ईश्वर प्राप्त झाला म्हणून भजन स्फुरणं. इथे योग्य-अयोग्य, चूक-बरोबर अशी कोणतीही बाब नाही. केवळ आपली अवस्था ओळखून आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं आहे. 


*त्यामुळे* मनुष्याने आपल्या साधनाकाळात श्रवण, पठण, जप, तप, कर्म, यज्ञ अवश्य करावेत. आपलं अज्ञान दूर करण्यासाठी ज्या ग्रंथांचं पठण करण्याची गरज आहे, ते वाचावेत. नामस्मरण, ध्यान, प्राणायाम, योगासन यांद्वारे आपल्या चित्ताला स्थिर करण्याचा प्रयत्नही करावा. जे लोक सातत्याने असे प्रयत्नशील राहतात, ते हळूहळू त्याच्या पुण्यफळाने साधनेमध्ये पक्व होत जातात. परिपक्व होता होता एके दिवशी पूर्णतेने योगयुक्त बनतात. 


योगी बनल्यानंतर ते पाप आणि पुण्य यांच्यापलिकडे जातात. त्यानंतर त्यांना पाप किंवा पुण्य स्पर्शही करू शकत नाही. अशा प्रकारे द्वैताचा खेळ समाप्त होतो. संपूर्ण जग त्यांच्यासाठी लीला बनतं. अशा तर्‍हेने मग ते ध्यानाच्या, नामस्मरणाच्या मदतीने योग्याची स्थिती प्राप्त करून असे साधक उच्च चेतनेच्या दिशेने प्रयाण करतात. शेवटी अक्षर परम ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होऊन पुन्हा पृथ्वीवर जन्म घेत नाही. 



*२७व्या श्लोकात केलेल्या विवेचनाला या श्लोकातून जणू पुष्टीच मिळते.*


योगी वेदाध्ययन, यज्ञानुष्ठान, तप, सत्पात्री दान यांचं जे फळ सांगितलं आहे, ते फळ उल्लंघून त्याच्या पलीकडे असलेल्या परमस्थानी (ब्रह्ममार्गानं) प्राप्त होतो.


*थोडक्यात,* 

कर्मयोग्यानं देवयान आणि पितृयाण

मार्गांतील तत्त्व ओळखलं पाहिजे. पितृयाण मार्ग स्वर्गप्रद असला तरी तो मोक्षप्रद नाही. 


वेदाध्ययन, यज्ञ, तप, दान यांपासून उत्तम फळ माणसाला मिळतं. अर्थात याही गोष्टी शास्त्रशुद्ध केल्या तरच फळ मिळतं. नुसतं शुष्क कर्मकांड करून कोणतंच फळ मिळत नाही. या गोष्टींमधून मिळणारं फळ मात्र स्वर्गप्राप्ती करून देतं.पण स्वर्गप्राप्ती म्हणजे मोक्षप्राप्ती नव्हे. 


मनुष्यजन्मात केलेल्या सत्कर्मांची फळं स्वर्गात उपभोगायला मिळतात. स्वर्ग म्हणजे भूतलापेक्षा उन्नत जीवांचा लोक. तो लोक केवळ उपभोगाचा लोक आहे.त्याचं नेमकं स्वरूप आज ज्ञात नाही.परंतु प्राचीन ऋषींना, तपस्वींना स्वर्गाचं ज्ञान असावं. तो स्वर्गलोक अतिमानवांचा किंवा त्याही पलीकडील उन्नत लोकांचा (देवांचा) लोक असतो. तिथे कर्मबंध नाही. 



*पृथ्वीवर* केलेल्या सत्कर्मांचं फल तिथे उपभोगून झालं की त्या जीवाला विकासार्थ पुन्हा पृथ्वीवर जन्म घेऊन यावं लागतं. म्हणजे सत्कर्म करावं, स्वर्गात जावं आणि उपभोग घेतल्यावर पुन्हा पृथ्वीवर यावं अशाप्रकारे जीवांच्या येरझाऱ्या चाललेल्या असतात. तिथली आयुर्मर्यादाही पुष्कळ असते. 


पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर कुकर्म केलं तर स्वर्गही नाही आणि पृथ्वीही नाही; त्यापेक्षाही हीन अवस्थेला जावं लागतं. या चक्रात अडकायचं का हे चक्र भेदून त्या पलीकडे असलेल्या शाश्वत सुखाकडे जायचं ते ज्याचं त्यानं ठरवायचं असतं.


देवयान आणि पितृयाण या दोन वाटा नेमक्या कुठे जातात, हे कर्मयोग्याला मात्र ज्ञात असत. त्यातली योग्य तीच वाट तो स्वभावत: स्वीकारून स्वर्गाच्या येरझाऱ्या टाळतो आणि त्या पलीकडच्या मोक्षपदाची प्राप्ती करून घेतो. हे सागून आठवा अध्याय इथेच संपला.


*सारांश:-* 

*वेदाध्ययनादी ज्या ज्या म्हणून कर्मकांडात्मक गोष्टी आहेत,त्यांचं पुण्यकारक फल मिळतं. ते फल स्वर्गाला कारण ठरत; मोक्षाला नाही.कर्मयोगी देवयान- पितृयाण मार्ग समजून घेऊन त्यापलीकडे असलेलं श्रेष्ठ स्थान मिळवितो.*


*याप्रमाणे,* 


ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगोनाम अष्टमोऽध्यायः 

।। ८ ।।


याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद् व ब्रह्मविद्या तसेच योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील ‘अक्षरब्रह्मयोग' नावाचा हा आठवा अध्याय संपूर्ण झाला.


'हरिः ॐ तत्सत् 

हरिः ॐ तत्सत् 

हरिः ॐ तत्सत् ।'


*-----------------------------*


संदर्भ ग्रंथ :-

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता. 



*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*P

No comments:

Post a Comment