संत ब्रदर लॉरेन्स पुढे म्हणतो " देवावरील श्रद्धेतून जन्मलेली उदात्त कल्पना आणि जाणीव ही माझ्या पारमार्थिक जीवनाची आधारशीला आहे. एकदा ही कल्पना आत्मसात झाली की तिला निश्चयपूर्वक चिकटून राहणे येवढेच आपले काम. अधूनमधून देवाचे चिंतन केल्याशिवाय जर बराच काळ गेला तर त्यामुळे अस्वस्थ न होता मी आपल्या चुकीची सरळ कबुली देई व पुनः नव्या विश्वासाने देवाकडे आपले मन वळवीत असे.
आता माझी अशी अवस्था झाली आहे की ईश्वरापलीकडे कुठलाही विचार माझ्या मनाला शिवत नाही. कुठलेही काम प्रत्यक्ष करण्याची वेळ आली म्हणजे देव माझा मार्गदर्शक होतो आणि ते काम कसे करायचे ही गोष्ट मला आरशाप्रमाणे लक्ख दिसू लागते. अगदी सरळ मनाने मी कुठलेही काम करतो. माझ्या कामात अडचणींची कल्पना केली तर त्या खात्रीने येतात असा माझा अनुभव आहे.
देवापुढे पूर्ण शरणांगती पत्करणे हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे. पूर्ण निष्ठा आणि आपल्या स्वतःच्या इछा यांचा त्याग ही पारमार्थिक जीवनाची प्राथमिक गरज आहे. अंतःकरण प्रभूच्या प्रेमाने तुडुंब भरलेले असावे."
No comments:
Post a Comment