TechRepublic Blogs

Tuesday, September 23, 2025

नामपण

 परमार्थामध्ये काय आहे? परमार्थामध्ये साध्य आणि साधन यात भेद नाहीये. प्रपंचात साधन आणि साध्य हे निराळे असतात. उदा.एखादा रोग झाला तर त्या रोगामध्ये औषध नसते. औषध वेगळे असते. जेव्हा एखादी घटना घडवायची असते तेव्हा त्या घटनेत साधन नसते. परमार्थामधे असे नाही. 

परमार्थमध्ये अभेदता असल्यामुळे जे साध्य असते त्याच्यामध्येच साधन असले पाहिजे. जे साधन आहे त्यामध्ये जर साध्य नसेल तर ते साधन होऊ शकत नाही. उदा. एखाद्या माणसाला ईश्वर दर्शन पाहिजे आहे. कोणतेही ज्ञान कर्म जे असेल ते, ते साधन त्याच्या अंतरंगात असल्याशिवाय ते शक्य नाही. कारण त्याच्या अंतरामध्ये जे परमात्मास्वरूप आहे , त्या परमातमास्वरूपलाच अनुसरून त्याचे साधन पाहिजे. जे साधन करतो त्याच्या मध्ये काहीतरी रूपाने साध्य हे असलेच पाहिजे. त्याशिवाय ते साधन होणार नाही. 

म्हणून नामामध्ये परमात्मा असल्याशिवाय नामाला नामपण येणारच नाही. उदा.आंब्याची कोय घेतलीत त्या आंब्याच्या कोयीमध्ये आंब्याचे झाड असल्याशिवाय त्या आंब्याच्या कोयीला कोयपण येत नाही, त्याप्रमाणे भगवंताचे नाम घेतांना त्यामध्ये परमात्मास्वरूप गुप्तरुपाने असल्याशिवाय त्या नामाला नामपण येणार नाही. साधन करताना त्यातील गुप्त परमात्मास्वरूप अधिकाअधिक वर येत जाणे म्हणजे साधन आहे. जेव्हा सत्पुरुष आपल्याला नाम देतो त्यावेळेला आपले परमात्मास्वरूप शब्दरूपाने त्यामध्ये घालतो आणि तुम्हाला नाम देतो. त्या शक्तीची जाणीव होणे म्हणजे साधन होणे आहे.

No comments:

Post a Comment