TechRepublic Blogs

Thursday, September 25, 2025

वासना

 ‌श्रीराम समर्थ


*आपण जें आणि ज्यांचे अन्न खातो त्याचा आपल्या बुद्धीवर सूक्ष्म परिणाम होतो हे दाखविणारी व घडलेली गोष्ट अशीः*



               सुमारें पन्नास वर्षापूर्वी नांदेड येथे अप्पाराव कुलकर्णी नावाचे एक वारकरी राहत असत. मोंगलाईमधें मामुली नोकरी, प्रपंच मोठा, तरीपण ते मोठ्या साधक वृत्तीने राहात. एका वर्षी पंढरीच्या वारीला पायीं जात असतां नेहमींप्रमाणें कन्नड येथें त्यांचा मुक्काम झाला. त्यां गावात एक सावकार राहात असे. त्याने त्यांना व इतर मंडळींना फार आग्रहाने घरी जेवायला बोलावलें. सर्वा मंडळी नाईलाजानें जेवायला गेली. जेवाणाचा बेत अर्थात् उत्तमच होता. जेवण आटोपल्यावर तेथेंच विश्रांतीकरीतां मंडळी थोडीशी लवंडली. विश्रांती नंतर अप्पाराव जप करीत दिवाणखान्यांत बसले होते. समोरच्या टेबलावर एक चांदीचा पेला होता. तिकडे त्यांचें सहज लक्ष गेले आणि मनात आलें, *'हा पेला आपण घ्यावा'.* 

हा विचार आल्यावर त्यांना स्वतःचेंच आश्चर्य वाटलें आणि *इतका हीन विचार आपल्या मनांत का यावा* असें वाटून त्यांचे कारण ते शोधूं लागलें. ठळक कारण तर कांही दिसेना. म्हणून त्यांनीं चौकशी केली की सावकारानें कशा रीतीनें आपली संपत्ती मिळवली आहे. *तेंव्हा त्यांना कळलें कीं, अनेक गरीब लोकांची घरे अनीतीनें बुडवून तो सावकार सधन झाला आहे. त्याचे पापी अन्न खाल्यामुळेंच आपली वासना भ्रष्ट झाली. हें लक्षांत आल्याबरोबर अप्पारावांनी बोटें घालून अन्न ओकून टाकले, सचैल स्नान केलें आणि प्रायश्चित म्हणून भगवंताच्या नामाचा रात्रभर जप केला.*


                गोष्टीचें तात्पर्य उघड आहे. *प्रपंच्यात राहणाऱ्या माणसानें व्यवहाराच्या मर्यादा सांभाळूनच आपल्या आहाराचे धोरण ठरवावे.*


               या ठिकाणीं एक गोष्ट मुद्दाम सांगायची ती अशी कीं *सध्याच्या काळीं नोकरी किंवा धंदा यांच्या निमित्तानें सामाजातील पुष्कळ लोकांना बाहेरचें खावे लागतें किंवा घरून डबा नेऊन बाहेर खावा लागतो. अशा परिस्थितींत शुद्ध अन्न रोज कसें मिळणार?* म्हणून ज्यांना अशा रीतीनें बाहेंर खावे लागतें त्यांनी *अन्न पुढें आलें असतां क्षणभर डोळे मिटून भगवंताची प्रार्थना करावी कीं, 'भगवंता, हें अन्न मी तुला अर्पण करून तुझा प्रसाद म्हणून खातों. त्यानें माझी वासना बिघडूं देऊं नकोस.' मनापासून अशी प्रार्थना केल्यास त्या अन्नाचा आपल्या बुद्धीवर वाईट परिणाम होणार नाहीं याबद्दल खात्री बाळगावी.* 


               ---------- *प्रा के वि बेलसरे* 


               **********

 

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

No comments:

Post a Comment