*॥श्रीहरिः॥*
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः
*शुक्लकृष्णे गती होते*
*जगतः शाश्वते मते।*
*एकया यात्यनावृत्तिम्-*
*-अन्ययावर्तते पुनः॥*
(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा
अक्षरब्रह्मयोग ८.२६)
*भावार्थ:-वैदिक मतानुसार, प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत.जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो,तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो.*
*-----------------------------*
प्रस्तुत श्लोकामध्ये आतापर्यंत सांगितलेल्या दोन मार्गांना वेगवेगळी नावं दिली आहेत.
*पहिला आहे - देवयान*
*आणि दुसरा आहे - पितृयान.*
अपुनरावृत्तीच्या, नॉन रिटर्न तिकीटाच्या मार्गाला देवयान म्हणतात आणि पुनरावृत्ती (रिटर्न तिकीटाच्या) मार्गाला पितृयान म्हणतात.
*पहिला मार्ग* साधकाला सर्वोच्च स्तरावर पोहोचवतो..
तर *दुसरा मार्ग* पतनाच्या दिशेने नेतो. या दोन मार्गांना क्रमशः मोक्षमार्ग आणि संसाराचा मार्ग मानता येईल.
*पृथ्वी-जीवन* जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक भौतिक आणि दुसरा आध्यात्मिक.भौतिक मार्गाचा उद्देश आहे विषय उपभोगांद्वारे शारीरिक इंद्रिय आणि मनाला संतुष्ट करणे. या मार्गावर वाटचाल करणाऱ्यांचा यापेक्षा अधिक चांगला कोणताही आदर्श नसतो. तिथे वारंवार अहंकाराचा जन्म होतो.
*मात्र*
अध्यात्म मार्गावर वाटचाल करणाऱ्यांसमोर कितीही आकर्षक प्रलोभनं आली तरी ती पाहून मोहित होत नाहीत. त्यांची बुद्धी ऊर्ध्वगामी असते, जी उच्च लक्ष्याच्या शोधामध्ये रममाण असते. इथे साधनेमुळे अहंकार हळूहळू लयाला जातो म्हणून पूर्ण योग्याच्या अवस्थेमध्ये तो पुन्हा जन्म घेत नाही.
*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,*
दोन्हीही मार्ग सनातन असून त्यांचा अंगीकार करणारे लोक दोन भिन्न प्रकृतीचे असतात. थोडक्यात सांगायचं तर जगातून जाण्याचे दोन मार्ग आहेत -
एक प्रकाशाचा आणि दुसरा अंधाराचा. मनुष्य जेव्हा प्रकाश मार्गाने जातो, तेव्हा तो परत येत नाही. परंतु अंधाराच्या मार्गाने जाणाऱ्याला पुन्हा परतून यावं लागतं.
*पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला अत्यंत महत्त्वाची बाब सांगतात,*
यांपैकी पहिला मार्ग सरळ, सोपा आहे तर दुसरा वक्र, कठीण. तेव्हा तू सुमार्ग आणि कुमार्ग दोन्ही मार्गांचं अवलोकन कर. चांगल्या-वाइटाचा निर्णय घे आणि त्यानंतर आपला मार्ग निवड. एखाद्याला राजमार्ग ठाऊक असेल तर तो जंगलातल्या वाकड्यातिकड्या, काट्या-कुट्यांनी भरलेल्या, खडकाळ मार्गावर पाऊल ठेवेल का? नाही ना!
'ज्याला चांगल्या-वाइटाची पारख आहे, त्याच्यासमोर कितीही कठीण प्रसंग आले तरी तो योग्य ती निवडच करेल. अन्यथा देहत्यागाच्या वेळी दोन मार्गांमध्ये संभ्रमित झाल्याने कित्येकदा चुकीच्या मार्गाची निवड केली जाते. शेवटच्या घटकेला मनुष्याने प्रकाशाचा मार्ग सोडून धुक्याचा मार्ग निवडला तर त्याला पुन्हा जन्म - मृत्यूच्या बंधनात अडकावं लागतं. त्यामुळे मी तुला अगोदरच सतर्क करत आहे, ज्यामुळे तू योग्य मार्ग निवडू शकशील. तुला या सर्व गोष्टी ऐकायला मिळत आहेत ही निश्चितच कृपा आहे. अन्यथा ज्याला जो मार्ग दैवयोगाने प्राप्त होतो, तोच त्याचा अंतिम मार्ग असतो.'
इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की भगवान श्रीकृष्णाची उत्तरं समोर कोण आहे त्या अवस्थेनुसार बदलतात. समोरचा जेव्हा स्वतःला शरीर मानतो तेव्हा दैवयोगासारखे शब्द येतात. अन्यथा जे शरीर असूनदेखील स्वतःला शरीरापासून वेगळे समजतात, त्याच्यासाठी कोणत्याही योगाची आवश्यकता नाही. त्याचा योग तर आधीपासूनच परमचेतनेबरोबर घडलेला आहे..
केव्हा प्राण सोडला तर तो कुठे जातो, हे भगवंतांनी श्लोकांमधून सांगितलं आहे. शुक्लगती-कृष्णगती अर्थात देवयान मार्ग-पितृयाण मार्ग याविषयीच्या कथनात फार मोठं गूढ दडलेलं आहे असं वाटतं. उपासनेबरोबरच काही भौतिक - खगोलशास्त्रीय सिद्धान्तही भगवान सांगत असावेत. स्वत:च रचलेल्या या चक्रात किंवा जाळ्यात न अडकता पुढे जाण्याचा उपाय भगवान यापुढील सांगत आहेत.
अर्जुना, शुक्ल मार्ग मोक्षाला नेतो आणि कृष्णमार्ग पुन्हा संसारात आणतो.ह्या दोन्ही मार्गांना जाणणारा योगी मोहित होत नाही.
*-----------------------------*
संदर्भ ग्रंथ :-
श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य.
संपूर्ण भगवद्गीता.
*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*
No comments:
Post a Comment