!!! गोंदवलेकर महाराज !!!
भाग - ४.
गणू, त्यांचे चुलत भाऊ दामु व मित्र वामन या तिघांनी गुरु शोधार्थ निघायचे ठरवले. त्यावेळी त्या तिघांचे वय दहा वर्षाच्या आसपास होते. घरी न सांगता अंगावरच्या कपड्यांशी तिघे गुरु शोधार्थ निघाले खरे, पण नंतर होणारा त्रास सहन न होऊन, दामू आणि वामन घरी परतले. परंतु गणू मात्र तसेच पुढे गेले. मुखात रामनाम होते.
फिरत फिरत गणू कोल्हापूरच्या देवळात येऊन एके ठिकाणी बसले. त्यांचे तेज पाहून लोक आपोआप त्यांच्यापुढे मिठाई, खाद्यपदार्थ ठेवीत असत. एका जोडप्याने तर गणूला दत्त घ्यायचे ठरवले पण.....
इकडे गोंदवल्यात सगळीकडे शोधा शोध सुरू झाली. गणूचे वागणे पाहून थोडा अंदाज आला होता. पण गणू एवढ्या लवकर पाऊले उचलेल असे वाटले नव्हते. सगळीकडे शोध घेऊनही शोध लागत नव्हता. दिवस काळजीत आणि चिंतेत जात होते. तोच दामू आणि वामन परत आले. त्यांच्याकडून गणूचा पत्ता घेतला. लगेच रावजी आणि इतर मंडळी जाऊन गणूला परत घेऊन आली.
आता घरच्यांना एक धास्तीच बसली, गणू कधी निघून जाईल याचा नेम नाही. त्यांना अडकवून ठेवण्यासाठी सर्वानुमती त्यांचे लग्न करून द्यायचे ठरले. खातवळीच्या सोज्वळ कन्ये बरोबर गणूचे थाट्यात लग्न करून दिले. आता हा घरी रमेल. गुरुचे वेड डोक्यातून जाईल असे सर्वांना वाटत होते.
पण ज्याचे एकदा ध्येय निश्चित झाले, ध्यास लागला की, त्याला दुसरे काही सुचतच नाही. अगदी तसेच गणूचे झाले. गणूंच्या मनी रात्रंदिवस एकच विचार... आता कुणालाही बरोबर न घेता एकटेच जायचे. गणू संधीची वाट बघत होते. घरी मन रमत नव्हते. एकच ध्यास... गुरु शोध...
कित्येकांना वाटते की, आपण मनोभावे पूजाअर्चा करावी. दानधर्म, व्रत, नामस्मरण, स्तोत्र पठण करावे. कोणाचे वाईट चिंतू नये. हाच परमार्थ! मग आणखी गुरु हवा कशाला? परंतु सर्व ग्रंथात, अध्यात्म ग्रंथात " गुरुशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञानाशिवाय मोक्ष, मुक्ती नाही " असे स्पष्ट सांगितले आहे. नाथ भागवतात म्हटले....
" सद्गुरूविण ब्रह्मज्ञान, सर्वथा नव्हे नव्हेचि जाण।"
दासबोधात म्हटले....
" ज्याशी वाटे मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा।"
संत तुकाराम म्हणतात...
" सद्गुरुवाचूनि सापडेना सोय,धरावे ते पाय आधी आधी।"
हरी पाठात ज्ञानोबा म्हणतात....
" द्वैताची झाडणी, गुरुविण ज्ञान।
तया कैसे कीर्तन घडेल नामी।"
शिवाय ज्ञानेश्वरीत सांगतात....
" म्हणोनी जाणतेनी गुरु भजीने।
तेणे कृतकार्या होईजे।" किंवा
" गुरुविण कोण दाखवील वाट।"
हे तर प्रसिद्धच आहे. या सर्वावरून हे सिद्ध होते की, गुरू शिवाय आत्मज्ञान नाही हे निश्चित.
मग दुसरा प्रश्न असा पडतो की, गुरु एकदा केल्यावर बदलता येतो का? तर रामदास स्वामी म्हणतात, नव्हे सर्व संत म्हणतात की, गुरु पारखून करावा. गुरु बदलता येत नाही. संतांनी गुरूंच्या काही कसोट्या सांगितल्या. त्यानुसार पाहिलं तर आपल्यात संत ओळखण्याची ताकद नसते. मग संत सांगतात तो मार्ग अनुसरावा. ज्याच्या सानिध्यात गेल्यावर उगीचच प्रसन्नता वाटते, त्यांचे जवळ बसावेसे वाटते, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होते, पण हे सगळे वरवरचे झाले.
सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो संत देहात नाही त्यांची समाधी अवस्था आहे, त्यांचेतील सामर्थ्य आपल्याला जाणवते. त्यांचा अनुग्रह घ्यावा. असे संत देहात नसते तरी त्यांचे कार्य चालूच असते. त्यांना पुढे जायचे झाल्यास ते देहात नसल्यामुळे कधीही कोठेही कोणाच्याही हृदयात सूक्ष्म रूपाने प्रवेश करू शकतात. असे देहात नसलेले गुरु महान होय. आणि एकदा एका संताला गुरु मानल्यावर दुसऱ्यांना गुरु माणणे योग्य नाही. यासाठी श्रद्धा भक्कम असावी लागते.
अनुग्रह घेणे म्हणजे आपण त्यांचे झालो हे मानणे, समजणे. एकदा अनुग्रह घेतला की आपण दुसरीकडे वळत नाही. अनुग्रह घेण्याचा फायदा हा असतो की, आपण इतर संता मागे लागत नाही. एकावर श्रद्धा राहते. शिवाय आपण अनुग्रह घेतल्यावर सर्व जबाबदारी आपल्या गुरुवर असते.. "मी कर्ता" हा भाव कमी होतो. आणि आपण आपला भार त्याच्यावर सोपवून निवांत होतो.
सद्गुरु फार मोठे असतात. ते शिष्याला मार्गावर आणण्याचे काम करीत असतात. त्याचे रक्षण करत असतात. सर्वतोपरी सांभाळत असतात. अखंड संरक्षण लाभत असते. भोग कुणाला सुटले नाही. शिष्यालाही त्याचे भोग भोगावे लागतातच. पण सवडीने भोग भोगून संपवण्याची सवलत मिळते. हा फार मोठा आधार लाभतो.
"गुरुः ब्रहा गुरुः विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ।।"
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
No comments:
Post a Comment