!!! गोंदवलेकर महाराज !!!
भाग - ३.
एकदा गणू बाळाने रांगत जाऊन देवघरातले सगळे देव खाली घेतले. त्याची आजी राधाबाई म्हणाल्या, अरेऽ गणूऽ! हे काय केलंस? आता याच्याकडे लक्ष ठेवायला हवे. गीताबाई मनात म्हणाल्या, अरेऽ! तू तर देवच हाती घेतलेस. हरिपाठात म्हटल्याप्रमाणे....
" करतळी आपले, तैसा हरी।"
देवाला हातात घेणारा हा मोठा संत होणार की काय? मनोमनी त्या सुखावल्या.
गणू पाच वर्षाचे झाले. त्यांना भजन, कीर्तन फार आवडायचे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात हे अगदी खरे वाटले. गणू आजोबांजवळ झोपत असे. ते त्यांना अभंग म्हणून दाखवत. भजनात त्यांचे बरोबर गणूही बेभान होऊन नाचत असे. एवढ्या लहान वयात गणूची भक्ती पाहून सर्वांना कौतुक वाटायचे.
नेहमीप्रमाणे गणू त्या दिवशी आजोबांसोबत झोपले होते. मध्यरात्री लिंगोपंतांना जाग आली. पाहतातत तो गणू अंथरुणावर नाही. ते फार घाबरले. घरात, बाहेर, सगळीकडे सर्वजण बाळाचा शोध घेऊ लागले. पण बाळाचा पत्ता नाही. सगळेजण चिंतेत पडले. कुठे गेला असेल? नाना तर्हेचे विचार मनात येत होते. " मन चिंती ते वैरी ना चिंती"!, भीतीने सर्वांच्या जीवाचा थरकाप उडाला होता. शोधत शोधत लोक नदी किनारी गेले. तो तिथे स्वारी पद्मासनात मांडी घालून समाधी लावून बसलेली दिसली. बाळाला घेऊन लोक घरी आले. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला.
लिंगोपंत, रावजी आणि गीतामाई मनी उमगल्या, हे काम काही न्यारेच आहे. गणूच्या भविष्याची चुणूक तेव्हाच थोडीशी लागली होती.
एकदा आजोबा लिंगोपंतांनी गणूला विचारले, गणू! तुला जर मोहरांनी भरलेला हंडा मिळाला तर तू काय करशील? गणूने चटकन उत्तर दिले, मी गोरगरीब, आंधळ्या पांगळ्यांना वाटून देईल. बरे, आणि तुला राजा केले तर? गणू म्हणाले, सर्वांना सुखी करेल. राज्यात एकही गरीब, भिकारी राहणार नाही असे करेन.लिंगोपंतांना ऐकून फार आनंद झाला.
गणू शाळेत जाऊ लागले. मौजी बंधन झाले. पवमान, रुद्राचे शिक्षण झाले. शिक्षकांनी सांगितलेला शाळेतला सर्व अभ्यास झाला की, गणू मुलांना घेऊन शाळा बाहेर जाई. तीन दगड मांडे. एका काठीची एकतारी करी. व भजन म्हणे. ते तीन दगड म्हणजे राम , लक्ष्मण, सीता. त्या दगडांसमोर बरोबरची मुलंही भजनात गुंग व्हायची. " श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।।" मुले इतके मग्न व्हायचे की त्यांना वर्गात जायचे भान राहायचे नाही. वर्ग ओसस पडायचे. एकदा शिक्षक रागावले. म्हणाले, अरेऽ! अशाने माझी नोकरी जाईल ना?
शाळेच्या तक्रारी, चिंचा, बोरे पाडण्याच्या तक्रारी गणू विरुद्ध आजोबांकडे येऊ लागल्या. गणूचे लक्ष शाळेत लागत नाहीसे पाहून, त्यांनी गणूला गुरे राखण्याच्या कामावर पाठवले. आता तर काय, गणूला रानच मोकळे झाले. रामनामाला जोर चढला. मनात सतत भगवंताचे विचार चालू असायचे. देव कसा असेल? तो केव्हा व कधी, कसा भेटेल? खरच भेटतो का? कोणाला भेटला आहे का? अशाच विचारांनी गणू दिवसेंदिवस अंतर्मुख होत चालले होते.
आठ नऊ वर्षाचे झालेल्या गणूंना एकच ध्यास लागला होता. जगाचा नियंता देव कसा असेल? कसा भेटेल? भेटलाच तर काय सांगावे? गणू रात्रंदिवस विचार करत होते. भजन केल्याने, यज्ञ याग केल्याने, व्रतवैकल्य केल्याने देव भेटेल का? की भगवे वस्रे घातल्याने देव भेटेल? गणूच्या बालमनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली होती.
आणि एकदा रामदासांचे एक शिष्य रामदासी मारुती मंदिरात उतरले होते. भगवे कपडे, वाढलेली दाढी, केसांच्या जटा, हातात कुबड्या, गळ्यात माळ होती. गणूने मनी विचार केला, यांना देव भेटला असेल का? गणूने त्या रामदासींना विचारले, महाराज! एक प्रश्न विचारु का? बुवांचा होकार आल्यावर, गणूने विचारले, तुम्हाला देव भेटला का? या भगव्या कपड्यांनी देव भेटतो का?
त्या लहानग्या गणूची कळकळ पाहून, बुवा म्हणाले, नाही रे बाळा! या भगव्या कपड्याने, दाढी वाढवल्याने देव नाही रे भेटत. अरेऽ, गुरु शिवाय देवाचे ज्ञान होत नाही. त्यासाठी सद्गुरु करावा लागतो. ऐकून गणूला आनंद झाला. आणि गणू गुरु चिंतनाला लागले.
कुठे शोधावा गुरू? कोणाला विचारावे तर, धड कोणी उत्तर देईना. काय करावे? कसे करावे? गणूचे चुलत भाऊ दामु व मित्र वामन यांचे बरोबर गुरु शोधायची चर्चा झाली. गुरूचा शोध आपण घ्यायचाच. शेवटी ठरले की, कुणालाही न सांगता गुरु शोधार्थ निघायचेच!
क्रमशः
संकलन लेखन,
मिनाक्षी देशमुख.
No comments:
Post a Comment