*विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले..*
विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले ।
अवघेचि जालें देह ब्रह्म ॥१॥
आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥
बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला।हृदयीं नीटावला ब्रह्माकारें ॥३॥
*विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।*
*अवघे चि जालें देह ब्रह्म ।*
असे माऊलींनी म्हटले आहे. त्यांची माणसाबद्दलची आस्था, जीवनदृष्टी आणि जगण्याचे प्रयोजन हे सारे यातून स्पष्ट होते. माऊली माणसाला त्याच्या संपूर्ण गुण-दोषांसह स्वीकारतात. एकदा आपले म्हटले, की ते करावे लागते; पण जिथे सांगणे गरजेचे आहे तिथे ते सांगण्यास ते संकोच करत नाहीत; पण सांगणे कसे असावे याचा ते आदर्श वस्तुपाठ घालून देतात.
*भावार्थ -*
"सर्वांच्या हृदयातील आर्तता, सर्वांचे दुःख, माझ्या हृदयात उमटत असते. हे सर्व विश्व माझेच शरीर आहे आणि तेहि पुन्हा ब्रह्ममय आहे, असे मी अनुभवतो. सर्वांना आवडणारे प्रेम मीच होऊन बसलो आहे. आपला प्रीतिभंग होऊ नये, आपले मनोरथ सुफलित व्हावे, याविषयी त्या त्या प्राण्याला जी जी तळमळ वाटते, ती ती सर्व मलाच वाटते."
" मला क्षुद्र म्हणून काही भेटतच नाही. जे भेटते ते आकाशासारखे विशाल आणि महान भेटते- मग तो क्षुद्र मानलेला जंतु का असेना ! असंख्य आकाशें एकमेकांना भेटत आहेत, असे माझे हे अद्भुत दर्शन आहे ! माझ्यासाठी जणू आकाशांची खाणच उघडली आहे !"
"ऋजु - कुटिल नाना वेष घेऊन परमेश्वर लीला करतो, असे म्हणतात. पण माझ्यासाठी कुटिल किंवा वाकडे कुठेच नाही. जे आहे ते ऋजू - नीटच आहे. वरूनवरून काम-क्रोधादिकांनी किंवा द्वेष - ईर्षा असूयादिकांनी प्रेरित होऊन वागताना कुणी दिसले तरी त्यांच्या त्या विकारांच्या मुळाशी शुभाकांक्षाच भरलेली आहे, असे मी त्यांच्या हृदयात प्रवेश करून पाहून घेतले आहे. विकारांच्या मुळाशी असलेली ब्रह्म-प्रेरणा, विकारांची ब्रह्माकारता ओळखल्यामुळे मला सहजच सर्वांविषयी सहानुभूति
वाटते."
*- आचार्य विनोबा भावे*
(ज्ञानेश्वरांची भजनें)
No comments:
Post a Comment