ईश्वर ऐकला एकच आहे. त्याच्या सारखा तोच आहे . म्हणून ईश्वराची व्याख्या करता येत नाही. त्याचे फक्त वर्णन करता येते. माणूस जी त्या ईश्वराची संकल्पना करतो तिचे मूळ त्याच्या विवेकशीलतेमधे आहे.
माणूस विवेकशीलतेमुळे तर्कशुद्ध विचार करतोच परंतु त्याच्या ठिकाणी नवनिर्मितीची क्षमता देखील प्रत्ययास येते. नवनिर्मितीमधे दिव्यत्वाचा अंश उतरतो. दिव्यत्व म्हणजे काय हे सांगणे सोपे नसते. परंतु असे म्हणता येईल की विश्वाचा विलक्षण विस्तार,
त्यातील प्रचंड शक्तीचा अक्षय व्यवहार, युगानुयगे बिनबोभाट चालणार कार्यकारणसंबंधाचा व्यापार विवेकदृष्टीने पाहिला की माणसाच्या मनात एक परम आश्चर्याची व किंचित भयमिश्रित आदराची पवित्र भावना निर्माण होते.
त्या भावनेला अनंताची जाणीव अथवा संवेदना स्पर्श करते. ही अनंताची संवेदना माणसाच्या व्यक्तिमत्वाला काही काळ तरी दृश्याच्या पलीकडे नेते. तेथे दिव्यत्वाची प्रचिती येते.
त्या प्राचीतीमध्ये ईश्वराच्या संकल्पनेचा उगम आहे. अशा रीतीने अनंताचा स्पर्श होतो तो माणूस क्षणभर का होईना एका अपार्थिव रम्य अस्तित्वाचा अनुभव घेतो. त्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर तो स्वतः च्या व सर्वांच्या जीवनाचा अर्थ लावतो. तो समग्र अर्थ म्हणजे ईश्वराची संकल्पना होय.
No comments:
Post a Comment