जगामधील जीवप्राण्यांच्या अंतर्यामी जी चेतना वास करते तोच खरा ईश्वर आहे या भावनेने वागणे ही तत्वदृष्टी होय. तत्वदृष्टीच्या दोन पायऱ्या आढळतात. एक मानव देहधारी सगुण ईश्वर आणि दुसरा निर्गुण ईश्वर.
सगुणामध्ये विष्णू राम, कृष्ण, शंकर इ. देवता मानव रूपधारी असतात. पण त्या माणूस नसून ईश्वरी चितशक्तीची रूपे मानली जातात.
या देवतांपैकी कोणती तरी एक देवता आपल्या मनोरचने प्रमाणे माणसाला आवडते. तोच त्याचा ईश्वर होतो. मग तो आहे व सर्वांगाने पूर्ण आहे, तो अनंत रूपे घेऊन जगात वावरतो तो आपला स्वामी व रक्षणकर्ता आहे, त्याला आवडते ते करणे, त्याच्या स्मरणात राहणे हीच त्यांची सगुण भक्ती, या भावनेने जगणे हीच त्यांची सगुण उपासना. ईश्वराच्या निर्गुण स्वरूपाची उपासना सगुणाच्या उपासनेतूनच उदय पावते. खरे म्हणजे ईश्वराला देह नाही .
पण एकीकडे तो विश्वनिर्माण करतो ,पाळतो व संहार ही करतो. तोच विश्वाचे स्वयंभू आदीकारण असून सर्वोत्तम आहे. तोच जगाचा अंतरात्मा असून त्याच्याच इच्छेने जग चालते. हे विश्व आणि सारी विश्वे त्याच्या ठिकाणी आहेत. तेवढ्याने तो संपत नाही. त्याच्या पालिकडे तो किती आहे ते कोणालाच कळले नाही व कळणारही नाही.
No comments:
Post a Comment