असमाधान मनामधे कंपन निर्माण करते. त्यामुळे मनाचे संतुलन बिघडते. अस्थिर मनावर कालाचे स्वामित्व चालते. वास्तविक काळ अखंडपणे वाहात असतो. वासना त्याचे त्रिकाळामधे विभाजन करते.
वासनेची तृप्ती व्हावी म्हणून कर्म करताना भूतकाळाचा संदर्भ सुटत नाही. कर्माचं फळ पुढे मिळणार म्हणून भविष्याचा संदर्भ सुटत नाही. भूतकाळाची पार्श्वभूमी आणि भविष्याची चिंता याच्या जोडीला वर्तमानकाळाच्या मर्यादा असतात. वासना तृप्त करण्यासाठी कर्म करताना स्वतःच्या मर्यादा, परिस्थितीच्या मर्यादा असतात.
त्यामुळे मन वर्तमानात कसेतरी कर्माकडे लक्ष देते. त्यामुळे सुखाचे क्षण भोगण्यासाठी अल्प प्रमाणात येतात. त्यात तृप्ती होत नाही. सुखाच्या अतृप्तीमुळे माणसाच्या कर्म करण्याला कधीच खंड पडत नाही. उद्या मी सुखी होईन या फसव्या आशेवर माणूस अखेरपर्यंत कर्म करीत राहतो. कर्म करून मनाचे समाधान होईल आणि ईश्वराचे दर्शन घडेल हा भ्रम मन निर्माण करते.
No comments:
Post a Comment