*भाषाशुद्धी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर*
*लेखक - डॉ. सच्चिदानंद शेवडे*
*(पुस्तक - ...आणि सावरकर)*
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला नव्या शब्दांची देणगी दिली. त्याचप्रमाणे जुनेच; पण नव्याने प्रचारात आणलेले काही प्रतिशब्द दिले. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात अस्पृश्योद्धाराच्या कार्यासोबतच सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ जोमाने चालवली.
*पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी,*
*आपुल्या घरीच हाल सोसते मराठी,*
*हे असे असंख्य खेळ पाहते मराठी,*
*शेवटी मदांध तख्त फोडते मराठी...*
असे कै. सुरेश भटांनी आपल्या काव्यात मराठीचे वर्णन केले आहे.
नवे शब्द देताना सावरकरांना बरीच टीका सहन करावी लागली. काहींनी विकृत मराठी विडंबन शब्द सावरकरांच्या नवे खपवण्याचा उपद्व्यापही केला. उदा. रेल्वे सिग्नलला म्हणे सावरकरांनी 'अग्निरथ गमनागमनसूचक ताम्र हरित लोह पट्टिका' हे नाव सुचवले. ही तद्दन थाप आहे. मुळात सावरकरांनी अतिशय समर्पक प्रतिशब्द सुचवले आहेत.
*भाषाशुद्धीची मूलसूत्रे -*
गीर्वाण भाषेतील साराचा सारा संस्कृत शब्दसंभार आणि संस्कृतनिष्ठ अशा तमिळ, तेलुगु ते आसामी, काश्मिरी, गौंड, भिल्ली बोलीपर्यंत ज्या आमच्या प्रांतिक भगिनी आहेत त्या सर्वांतील मूळचे प्रांतिक शब्द हे सर्व आमच्या राष्ट्रभाषेच्या शब्दकोशाचे मूलाधार, स्वकीय शब्दांचे भांडवल होय.
या आपल्या राष्ट्रीय शब्दभांडारात ज्या वस्तूंचे, विचारवाचक शब्द होते वा आहेत वा निर्मिता येतात त्या अर्थाचे उर्दू, इंग्रजी प्रभृती परकीय शब्द वापरू नयेत. जर तसे परकीय शब्द आपल्या पूर्वीच्या ढिलाईमुळे आपल्यात घुसले असतील, तर त्यांना हुडकून, काढून टाकावे. अद्यतन विज्ञानाची परिभाषा नवे-नवे संस्कृत प्राकृतोद्भव शब्द योजून वक्तविली जावी; परंतु ज्या परदेशी वस्तू इत्यादी आपल्याकडे नव्हत्या. त्यामुळे ज्यांना आपले जुने स्वकीय शब्द सापडत नाहीत, आणि ज्यांना त्या परकीय शब्दांसारखे सुटसुटीत स्वकीय शब्द काढणे दुर्घट जाते, असे परकीय शब्द मात्र आपल्या भाषेत जसेच्या तसे घेण्यास प्रत्यवाय नसावा. जसे- बूट, कोट, जाकीट, गुलाब, जिलबी, टेबल, टेनिस, इत्यादी. तथापि अशा नव्या वस्तू आपल्याकडे येताच त्यांना कोणी स्वकीय नावे देऊन ती रुळवून दाखवील तर उत्तमच.
त्याचप्रमाणे जगातील कोणत्याही परकीय भाषेत जर एखादी शैली वा प्रयोग वा मोड ही सरस वा चटकदार वाटली तर तीही आत्मसात करण्यात आडकाठी नसावी. १९३८ मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सावरकरांनी भाषा शुद्धीविषयी आग्रही मत मांडले. आज त्यांनीच रूढ केलेले दूरध्वनी, महापौर, दिनांक, संकलक, चित्रपट आदी अनेक शब्द आपण सर्रास उपयोगात आणतो; पण त्याचे निर्माते सावरकर आहेत हे आपल्या गावी नसते. साहित्य संमेलने प्रतिवर्षी भरत असतात; पण कोणत्याही अध्यक्ष, वा पूर्वाध्यक्षांचे स्मरण करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नामोल्लेख मात्र कुणी करत नाही! (क्वचित अपवाद वगळता...)
*'महापौर' चा जन्म -*
ही हकीकत गणपतराव नलावडे यांच्याविषयीची आहे. सावरकरांना मानणारे नलावडे पुणे शहराचे 'मेयर' झाले. ही वार्ता कळल्यावर दोन दिवसांनी सावरकरांकडून अभिनंदनाचे पत्र त्यांच्याकडे आले. त्यांत म्हटले होते,
"पत्र पाठवण्यास विलंब होत आहे. त्यासाठी क्षमस्व. 'मेयर' या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. तो शब्द मिळाला. 'महापौर' हा शब्द अधिक योग्य वाटतो."
पत्र मिळताच गणपतराव आपल्या कार्यालयाबाहेर धावले. त्यांनी शिपायाला 'मेयर ऑफ पुणे' ची पाटी काढायला लावली. लगोलग 'महापौर' ची पाटी तयार झाली. तेव्हापासून हा शब्द रोजच्या व्यवहारात सहज रुळला.
अशीच कथा 'हंस पिक्चर्स'च्या विनायकराव पेंढारकरांची! सावरकर त्यांच्या स्टुडियोत कोल्हापूरला बसले होते. चित्रपटसृष्टीत नामावलीपासून बहुतेक इंग्रजी शब्द उपयोगात आणले जातात याविषयी नाराजी व्यक्त केली. विनायकरावांनी त्यांना प्रतिशब्द सुचवायला सांगितले. लगेच सावरकरांच्या तोंडातून मूळ इंग्रजी शब्द आणि त्याला मराठी प्रतिशब्द बाहेर पडू लागले. विनायकरावांनी ते भराभर लिहून घेतले आणि पुढे उपयोगात आणले. त्यामुळे स्टुडियो, शूटिंग, सिनेमाहाउस, फोटोग्राफर, डायरेक्टर, एडिटर, रेकॉर्डीस्ट, आदी अनेक शब्दांना कलामंदिर, चित्रण, चित्रपटगृह, छायाचित्रक, दिग्दर्शक, संकलक, ध्वनिलेखक, असे प्रतिशब्द रूढ झाले.
त्यांना भाषाशुद्धीची प्रेरणा शिवरायांच्या चरित्रामुळे मिळाली असावी. शिवरायांच्या काळी फारसी शब्दांचा उपयोग जसा केला जात असे. याला उत्तर म्हणून त्यांनी रघुनाथपंत हणमंते यांना आज्ञा करून राजव्यवहारकोश निर्मिला. या कोशाचे त्या काळी स्वागत झाले नव्हते. उलट रघुनाथपंतांवर काहींनी टीकासुद्धा केली होती. त्यांना उद्देशून रघुनाथपंत म्हणतात-
*किं अस्य अज्ञजन विडंबनैः विर्प्श्चीत समस्यास्य,*
*रोचते कि मधुरंकदली फलम...*
*(हे शब्द वापरताना अज्ञजनांकडून त्यांचे विडंबन होईल तरी पर्वा नाही. कारण उंटा
ला केळे आवडणे शक्य आहे का?)*
सावरकरांच्या या भाषाशुद्धीची टवाळी करणारे त्या काळीसुद्धा होते आणि आजही आहेत. आजच्या मराठी वृत्तपत्रांतून, पुस्तकांतून, व मराठी वाहिन्यांवरील मालिकांमधून अकारण भरमसाठ इंग्रजी, उर्दू शब्द वापरले जातात. कुठल्याही भाषेचा दुस्वास नसावा असे वरकरणी योग्य पटवणारे कारण दिले जाते. अन्य भाषेतले शब्द आपल्या भाषेत आल्यामुळे भाषा अधिक समृद्ध होते असे म्हटले जाते. पण *त्यामुळे मूळ अर्थाचे शब्द मरतात त्याचे काय? याची चिंता कोणालाच वाटत नाही.*
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळी पुस्तके छापण्यासाठी छापखान्यात अक्षरांचे टंक वापरले जात. संपूर्ण लिपीसाठी किमान दोनशे टंक लागत. सावरकर नुसते प्रतिशब्द देऊन थांबले नाहीत; तर त्यांनी नवी लिपीसुद्धा तयार केली. साहजिकपणे टंक कमी लागून वेळ वाचू लागला. प्रतिकार केला, स्वीकार केला, अशा शब्द योजनेऐवजी एकेरी एकच क्रियापद ठेवून प्रतिकारले, स्वीकारले असे स्वतंत्र शब्द तयार केले. आज यातले अनेक नवे शब्द आपण वापरतो, पण त्यांचे जनकत्व सावरकरांकडे जाते हे आपणास ठाऊक नसते.
मराठीवर उर्दू, पर्शियन आणि इंग्रजी भाषेचे प्रचंड आक्रमण झाले आहे. आपली भाषा हा अमोलिक वारसा असतो. तो जपायलाच हवा.
FRANK H. KALAAN हा 'Excellence In English' या आपल्या ग्रंथात म्हणतो, बालपणी जिच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, बागडलो, त्या आपल्या प्रिय जन्मभूमीला इजा करणारे नि भ्रष्टविणारे परकीय आक्रमण झाले; तर आपण क्रुद्ध होतो नि त्या आक्रमणाचा प्रतिकार करतो. आपल्या मातृभूमीची एकता नि नित्यपरिचयाची सुंदरता ही अक्षम्य अबाधित राहिली पाहिजे. या इच्छेइतकी दुसरी कोणतीच प्रबळ इच्छा आपल्या मनामध्ये नसते. हे अगदी स्वाभाविक आहे. न्याय्य आहे. त्याच रीतीने आपल्या मातृभूमीचे शुद्धत्व नि वैशिष्ट्य अबाधित राखण्यासाठी आपण कसोशीची दक्षता ठेवली पाहिजे.
KALLAN म्हणतो की, इंग्रजी वाक्यरचना नि शैली यांच्यावर बसलेली LATIN ची छाप डीफोला साफ नापसंत होती. इंग्रजी गद्याला लागलेले परकीय GALIK वळण मोडून काढण्यासाठी SWIFT ने आपली सारी प्रतिभा खर्च केली होती. गिबनवर फ्रेंच भाषेचा परिपूर्ण पगडा बसला होता. जोन्सनने LATIN ला गैरवाजवी महत्त्व दिले होते. कार्लाईलच्या लिखाणात जर्मन वळणाची वाक्यरचना ओतप्रोत भरलेली असे. KALAAN च्या मते या तिघांनी इंग्रजी भाषाशुद्धीच्या चळवळीला फार मोठा पायबंद घातला होता. आणि द्रायादन, शेक्सपियर नि न्यूटन हे शुद्ध इंग्रजी लिहिणारे लेखक होते. आयरिश लोकांनी आपल्या मातृभाषेचे पुनरुज्जीवन नि शुद्धीकरण यासाठी केवढे आंदोलन केले ते सुप्रसिद्धच आहे.
आज ब्राझीलसारखे LATIN अमेरिकेतील कित्येक देश आपल्या भाषेच्या पुनरुज्जीवनासाठी झगडत आहेत. इस्त्रायलने तर हिब्रूला जणू कबरीतून वर काढले आणि आपली राष्ट्रभाषा बनवले. मराठी भाषा पार मरू घातल्यावर आपल्याला जाग येणार काय?
१९२५ च्या एप्रिल व मे महिन्यात सावरकरांनी 'केसरी'मधून भाषाशुद्धीवर लेखमाला लिहिली. तिचे तीव्र पडसाद उमटले. लगेच त्यांनी विरोधकांच्या आक्षेपांना सणसणीत उत्तरे देणारी लेखमाला सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालखंडात लिहिली. त्यामुळे बऱ्याच जणांचा विरोध मावळू लागला. महाराष्ट्र साहित्य परिषदेने तर जळगावच्या अधिवेशनात भाषाशुद्धीचे तत्त्व मान्य केले. डॉ. माधवराव पटवर्धन अर्थात् माधव ज्यूलियन यांच्या काव्यामध्ये फारसी शब्दांची भरपूर उधळण असे. ते आरंभी भाषाशुद्धीचे टीकाकार होते, पण नंतर निस्सीम उपासक बनले. इतके की त्यांनी आपल्या कविता शुद्ध मराठीत पुन्हा लिहून काढल्या. ते आणि प्रा. ना.सी.फडके यांच्याविषयी एक किस्सा सांगितला जातो.
एका महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी केलेल्या भाषणात प्रा. फडके म्हणाले की; "साहित्य हा एक वृक्ष मानला, तर त्यातील शब्द म्हणजे वृक्षाला फुटलेली पालवी आहे."
याला उत्तर देताना माधव ज्यूलियन म्हणाले, "उपमा अगदी योग्य आहे; पण वृक्षाला फुटणारी पालवी ही त्याच्याच अंतःप्रेरणेने निर्माण होते. आंब्याला आंब्याचीच पाने आणि पेरूला पेरूचीच पाने येणार. एका झाडाची पाने दुसऱ्या झाडाला येणार नाहीत. तसेच भाषेचे आहे. ज्या भाषेत साहित्य निर्माण होते, त्यात त्या भाषेतले शब्दच शोभून दिसतील.
अशा प्रकारे सावरकरांची भाषाशुद्धीची चळवळ लोकांच्या पचनी पडू लागली. पुढे तर हिंदुस्थानी या नावाखाली धुमाकूळ घालणाऱ्या उर्दूला बाजूला सारून घटना समितीने देवनागरी लिपीतील हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून मान्य केली. शुद्धतेच्या बाबतीत सावरकर हे केवळ मराठीपुरतेच आग्रही नव्हते. त्यांना हिंदीसह सर्व भारतीय भाषा शुद्ध रूपात हव्या होत्या हे महत्त्वाचे!
माधव ज्यूलियन यांनी *'भाषाशुद्धी विवेक'* नावाचे पुस्तक १९३८ मध्ये लिहिले. त्याच्या शेवटी 'बहिष्कार्य शब्दांचा कोष' त्यांनी दिला आहे व त्याला सुयोग्य प्रतिशब्दही दिले आहेत.
बडोदानरेश सयाजी महाराजांच्या आज्ञेवरून *'श्री सयाजी शासन शब्दकल्पतरू'* नामक कोष निर्माण झाला. या कोषात राज्यशासन व प्रशासन यात उपयोगात आणल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना स्वकीय प्रतिशब्द दिले आहेत.
१९३७ मध्ये रत्नागिरीच्या भाषा लिपी शुद्धी मंडळाचे अध्यक्ष अ.स.भिडे गुरुजी यांनी शुद्ध शब्दकोश निर्माण केला. यात बहिष्कार्य उर्दू शब्द व त्यांना योजलेले मराठी प्रतिशब्द दिले आहेत. हा कोष सावरकरी लिपीत आहे. याला प्रस्तावना स्वतः सावरकरांचीच आहे.
स्वतः सावरकरांनी १९२६ मध्ये *मराठी भाषेचे शुद्धीकरण* नावाची एक पुस्तिका लिहिली तिच्या शेवटी 'त्याज्य विदेशी शब्दांचे टाचण' असा एक स्वकीय शब्द निर्माण केलेला लघुकोश दिला आहे. त्यातील काही शब्द शिक्षणविषयक, धंदेविषयक, शुद्ध-मुद्रण-टपाल विषयक, सभा निर्बंध विषयक, भौगोलिक व चित्रपट विषयक असलेले पुढे देत आहे. आणखीही अनेक शब्द अकारविल्हे दिलेले आहेत. ते सर्वच विस्तारभयास्तव देत नाही. त्यासाठी जिज्ञासूंनी समग्र सावरकर खंड ९ ( २००० - २००१ प्रकाशन वर्ष ) पहावा म्हणजे याविषयीची भरपूर माहिती मिळेल. सावरकरांच्या बुद्धीची या क्षेत्रातली झेप पाहून कुणालाही आश्चर्य वाटेल.
*भाषाशुद्धी - शब्दकोष*
परकीय शब्दांना स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी स्वतः नवीन पाडलेले आणि जुनेच; पण नव्याने प्रचारात आणलेले काही स्वकीय प्रतिशब्द.
*१. शिक्षणविषयक*
स्कूल - शाळा
हायस्कूल - प्रशाळा
कॉलेज - महाशाला, महाविद्यालय
अकॅडेमी - प्रबोधिका
हेडमास्टर - मुख्याध्यापक
सुप्रीटेन्डेन्ट - आचार्य
प्रिन्सिपॉल - प्राचार्य
प्रोफेसर - प्राध्यापक
लेक्चरर - प्रवाचक
रीडर - प्रपाठक
*२. धंदेविषयक*
वॉचमेकर - घड्याळजी
वॉशिंग कंपनी ( लॉन्ड्री ) - धुलाई केंद्र, धवल केंद्र, निर्मल केंद्र, परीटगृह
हेअरकटिंग सलून - केशकर्तनालय
डीस्पेन्सरी, दवाखाना - औषधालय
कन्सल्टिंग रूम - चिकित्सालय
वकील - विधीज्ञ
वकिली - विधीज्ञकी
स्टेशनरी स्टोअर्स - लेखन साहित्य भांडार
टेलरिंग शॉप - शिवणकला गृह, शिवण गृह
लॉजिंग बोर्डिंग - भोजन निवास गृह
*३. युद्धविषयक*
वॉर - युद्ध
आर्मीस्टी - शस्त्रसंधी
ट्रूस - उपसंधी
पीस : तह - संधी
बफर स्टेट - कीलकराष्ट्र
मोहीम - अभियान
कॅम्पेन - उपयुद्ध
फौज, लष्कर - सेना, सैन्य
पलटन - पुथना
स्करमिश - चकमक
कॅम्प - शिबीर, छावणी
वॉरशिप - रणतरी, युद्धनौका
सबमरीन - पाणबुडी
हवाई दल, एअर फोर्स - वायुदल, आकाशदल, नभोदल
नेव्ही, आरमार - नौदल, सिंधुदल, जलसेना
*४. मुद्रणविषयक*
टाईप फौंड्री - टंक शाळा
पंच - नर
मेट्रेस - मातृका
लेड - शिसपट्टी
कंपोझीटर - जुळारी
प्रुफ - उपमुद्रित
प्रुफ करेक्टर - मुद्रित निरीक्षक
स्टोपप्रेस - छापता छापता, छापबंद
बाईंडिंग - बांधणी
मोनो टाईप - एक टंकक
लीनो टाईप - पंक्ती टंकक
टाईप रायटर - टंकलेखक, टंकयंत्र
डिग्री - पूरण, अंश
*५. टपालविषयक*
पोस्ट - टपाल
बुकपोस्ट - ग्रंथटपाल
मनीऑर्डर - धनटपाल
पार्सल पोस्ट - वस्तूटपाल, गठ्ठाटपाल
रजिस्टर - पटांकण
रजिस्टर्ड - पटांकित
फोन - ध्वनी
ट्रंक टेलिफोन ( ट्रंक कॉल ) - परस्थ ध्वनी
टेलिप्रिंटर - दूरमुद्रक
*६. सभाविषयक*
जाहीर - प्रकट
सर्क्युलर - परिपत्रक
वॉलपोस्टर - भिंतीपत्रक
लाउड स्पीकर - ध्वनी निर्देशक
मेगाफोन - ध्वनीवर्धक
शेम - धिक्कार
रिपोर्ट - अहवाल, प्रतिवृत्त, इतिवृत्त
रिपोर्टर - प्रतिवेदक
मुर्दाबाद - नष्ट होवो, नाश हो
झिंदाबाद - की जय, जय हो, अमर हो
*७. निर्बंधविषयक*
लॉ - निर्बंध, विधी, दंडक
लेजीस्लेटर - विधिमंडळ
उमेदवार - इच्छुक, स्पर्धक
बजेट (अंदाजपत्रक) - अर्थसंकल्प
खाते - विभाग
रेव्हिन्यू महसूल - राजस्व
रेव्हेन्यू मिनिस्टर - राजस्व मंत्री
लॉ मिनिस्टर - निर्बंधमंत्री, विधीमंत्री
लेजिस्लेटीव्ह डिपार्टमेंट - विधीविभाग, निर्बंधविभाग
एक्सिक्युटीव्ह डिपार्टमेंट - निर्वाह विभाग, कार्यवाहन विभाग
ज्युडीशियल - न्यायविभाग
अंमलबजावणी - वर्ताव, कार्यवाही
*८. भौगोलिक विषयक*
अहमदाबाद - कर्णावती
अरबी समुद्र - पश्चिमसमुद्र, सिंधुसागर
हैद्राबाद (द.) - भाग्यनगर
हैद्राबाद (सिंध) - नगरकोट
अलाहाबाद - प्रयाग
*९. चित्रपटविषयक*
सिनेमाहाउस - पटगृह, चित्रगृह, चित्रपटगृह
फिल्म - पट्टी, चित्रावली, चित्रपट्टिका
मुव्ही - मूकपट
टॉकीज - बोलपट
इंटरव्हल - मध्यंतर
स्टुडियो - कलामंदिर, कलागृह
आउटडोर शूटिंग - बाह्यचित्रण
थ्री डायमेनशन - त्रिमितीपट
कॅमेरा - छात्रिक
सिनेरिओ - पटकथा, चित्रकथा
ग्रामोफोन रेकोर्ड - नादांकन
ट्रेलर - परिचयपट
एडिटर - संकलक
*शब्दसंपत्ती भरपूर असलेल्या आपल्या मातृभाषेत आज अनेक परकीय शब्द शिरले आहेत. यू नो, यू सी, सॉरी, प्लीज, थँक यू यासारखे असंख्य इंग्रजी शब्द मराठी बोलताना सर्रास वापरले जातात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेला आपला पाल्य, घरात मराठी बोलत नाही, असे कौतुकाने सांगताना माता-पित्याचा कंठ दाटून येतो. त्यावेळी दहावीच्या गुणवत्ता यादीत पहिली येणारी मुले नेहमी मातृभाषा माध्यमातलीच का असतात, याचा विचारसुद्धा केला जात नाही.*
*आपली संस्कृत भाषा
किती संपन्न आहे! तिला अव्हेरून इंग्रजी, फारसी, उर्दू इत्यादी परकीय भाषांमधून शब्द घेणे, म्हणजे घरात असलेली सोन्याची वाटी फेकून चिनी मातीचे कप हाती घेणे नव्हे का? हे सावरकरांचे अचूक विश्लेषण आहे.* एका सर्वेक्षणानुसार जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा चिनी (मांडारीन) आहे. दुसऱ्या क्रमांकावर हिंदी आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्रजी आहे. कारण भारताची संपूर्ण लोकसंख्या त्यात धरली आहे. ती वजा केली तर इंग्रजीचा क्रमांक कुठल्या कुठे फेकला जाईल! मराठी बोलणारे पंधराव्या क्रमांकावर तर बंगाली बोलणारे तेराव्या क्रमांकावर आहेत. *इंग्रजी ही विश्वभाषा असल्याचे खूळ नेहरूंनी पसरवले. त्यांनीच मिशनरी शाळांना उत्तेजन दिले. घटनेने संस्कृतोद्भव हिंदीचा पुरस्कार केला, पण नेहरूंनी तो पार ठोकरला. आज सर्वच भारतीय भाषांची दयनीय परिस्थिती आहे. अशा वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले भाषाशुद्धीचे महत्त्व अधोरेखित होते.*
*भाषा ही संस्कृतीची वाहक असते. संस्कारातूनच संस्कृती घडत असते आणि म्हणूनच भाषेतून संस्कारही प्रतीत होतात. कॉनव्हेंट आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून शिकणाऱ्या किती मुलांवर आपल्या देव-देश व धर्माचे संस्कार होतात, याचा विचार करायला हवा. आज बव्हंशी हिंदी घरांतून हिंदू नावे असलेली ख्रिस्ती प्रजा निर्माण होते आहे, हे चित्र भयावह नाही काय? कॉनव्हेंटमधील बायबलातील साम्स येत असतात, पण परवचा येत नाही. रामायण, महाभारत, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंह, श्रीशिवराय, शंभूराजे आणि देशकार्यार्थ झुंजलेले क्रांतिवीर यापैकी काहीही माहित नसणे यालाच आधुनिक संस्कार म्हणतात काय? जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर घ्यायचे असते, ही शिकवण स्वातंत्र्यवीर सावरकर भाषाशुद्धीच्या माध्यमातून देतात.*
*संदर्भ टिपा -*
१. समग्र सावरकर - खंड ९ पृ. ४६५
२. स्वा. सावरकर - धनंजय कीर - अनु. द. पां. खांबेटे - पृ. २११-२१२
३. समग्र सावरकर - खंड ९ पृ.४७० ते ४७२
आणि सावरकर या ग्रंथातून
© *लेखक - डॉ. सच्चिदानंद शेवडे*
*(पुस्तक - ...आणि सावरकर)*