TechRepublic Blogs

Tuesday, September 30, 2025

उपास घडावा

 *हे कर्म  निष्काम नाही*


              कऱ्हाडला राहणाऱ्या एका तरुण गृहस्थाने, श्रीमहाराजांनी घरी येऊन आपल्याला दर्शन द्यावे म्हणून उपवास सुरू केला. हे त्यांना कळल्यावर नापसंती व्यक्त करून ते म्हणाले, 'हे लोक उगीचच अट्टाहास करतात.' त्या बाजूला गेले असता त्याच्या घरी जाण्याचे आश्वासन देऊन सध्या त्याने उपवास सोडून द्यावा असा निरोप देऊन नीलकंठबाबाला त्यांनी कराडला पाठविले. निरोप पोहोचल्यावर देखील त्या माणसाने उपवास चालूच ठेवला. त्याची पत्रावर पत्रे येऊ लागली. श्रीमहाराजांनी तिकडे फारसे लक्ष दिले नाही. शेवटी त्याचे आईबाप गोंदवल्यास आले. 

ते आल्यावर त्यांच्याजवळ मुलाची मोठी स्तुती करून त्यांना ठेवून घेतले. निघण्याबद्दल त्यांनी विचारले म्हणजे श्रीमहाराज म्हणायचे, 'हो,  फार दिवस झाले ! आता उद्या आपण नक्की निघायचे.' याप्रमाणे आज-उद्या करता करता एक महिना होऊन गेला आणि श्रीमहाराज एकदाचे त्या माणसाच्या घरी गेले.

 त्याने श्रीमहाराजांची मोठी पूजा वगैरे केली आणि त्यांच्या समोर एका ताम्हनामध्ये शंभर रुपये ठेवले व त्यावर पाणी सोडले. हे सर्व झाल्यावर तेथे जमलेल्या स्त्री- पुरुषांसमोर श्रीमहाराज त्याला म्हणाले, "देहाच्या उपचारांना जो बोलतो तो भगवंताला अगदी विसरलेला असतो. पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते 

त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. असे बोलून श्री महाराजांनी त्याला उपवास करण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला, "महाराज, मी देहाला कष्ट दिले की आपण खात्रीने याल या दृष्टीने मी उपवास केला." हे उत्तर ऐकून श्रीमहाराज हसले आणि त्याला म्हणाले, "माझी गोष्ट सोडून द्या, पण देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. असे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता. 

भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील; पण भगवंत फसणार नाही. तुम्ही उपवास केला ही गोष्ट मला तितकीशी आवडली नाही. 'उपास घडावा' यात जी मौज आहे ती 'उपवास करावा' यामध्ये नाही.

 भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करीत आहोत असे मनाला पटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून काय बिघडले ? पण चित्तात भगवंताचे नाम नसताना देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणा शिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. 

पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा भगवंतापासून माणसाला दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. प्रपंचात वावरत असताना या दोन्ही गोष्टींचा संबंध येणारच, तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे. म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत." 

              

           श्रीमहाराजांचे बोलणे संपल्याबरोबर एक गरीब कुणबी त्यांच्या पाया पडला व म्हणाला, "महाराज,  चार मुली आहेत. त्यांची लग्ने व्हावीत एवढा आशीर्वाद द्या."  श्रीमहाराज बोलले, "तू काळजी करू नकोस ! 

ज्याने त्यांना जन्माला घातले आहे, तो त्यांच्याकडे लक्ष देतो. तू मुलगा पहाण्याची खटपट तेवढी कर." असे त्याला सांगून आपल्यासमोरचे ताम्हण श्रीमहाराजांनी त्याच्या पदरामध्ये ओतले व म्हणाले,  "यामध्ये दोघींची लग्ने करून टाक."  तो कुणबी बघतच राहिला आणि अश्रूपूर्ण डोळ्यांनी त्यांना धन्यवाद देत निघून गेला.


*।। श्रीराम ।।*

कचरा संवर्धन

 *काडी काडीचे घरटे ....*


मधुचंद्रहून ठाण्याला घरी आल्यावरची पहिली रात्र

नाही नाही. ती वाली रात्र नव्हे. त्या रात्रीचा पहिला स्वयंपाक, शेजारच्या शेगडीवर कुकर फुसफुसत होता.(कोकणस्थ.) गोड-आमटी करायची गोड जबाबदारी माझ्यावर होती.


मी गॅस लावायला काडेपेटी हातात घेतली मात्र. माझ्या पाठीवर एक स्पर्श झाला. मी लाजून चूर. मनाने कायशिशी मोहरून गेले. अजूनही आमचा *माफक रोमान्स* चालू होता ना.


माझे गाल लाल व्हायला लागले, सॉरी मी गोरी नाही. सबब माझे गाल चॉकलेटी व्हायला लागले.

तिरपा कटाक्ष टाकून मागे बघते तो *साक्षात सासु माँ.. शेजारी गॅस चालू आहे ना मग नवीन काडी कशाला पेटवली ?* त्या काडीने माझ्या रोमान्सची झिंग क्षणात काडीमोल होऊन मी भानावर आले. सासूमाँनी मला दुसरी काडेपेटी दाखवली,


*ज्यात जळलेल्या काड्या होत्या* एक शेगडी पेटलेली असेल तर नवीन काडी लावायची नाही. जळलेल्या जुन्याकाडीनेच पेटलेल्या शेगडीवरून विस्तव उचलायचा. आता कुकरचा *अती प्रशस्त-ओबेस* देह शेगडीवर तापलेला असताना, त्याखालून जुन्याकाडीने विस्तव कसा पळवावा ? 


मग सांडशीच्या तोंडात जुनी काडी.. *आणि तो पलीता कुकरच्या कुल्ल्या खाली* अशी कसरत झाली. अखेर आमटीखाली गॅस लागला.*तो पर्यंत मी गॅसवर होते* कारण कर-कटेवरी घेऊन सासु माँ माझ्या प्रत्येक कृतीकडे डोळे बारीक करून बघत होत्या. 


दुसऱ्या दिवशी फुरसतीत सासुमांनी मला उभे उभे तुकडे केलेली जुनी पिवळी-पोस्टकार्ड दाखवली. त्या लांब लांब - तुकड्यांनी ह्या शेगडीवरून त्या शेगडीवरचा अग्नी प्रज्वलित करायला सोप्पा कसा पडतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवल.


हे बघ प्रत्येकवेळी नवीन काडी लावायची नाही. आम्ही काडी-काडी जोडून वाचवलेल आहे, तेव्हा कुठे हे आजचे दिवस दिसतायत. आज मनात येत, नवीन पिढीची सून असती तर *त्या एका न पेटवलेल्या काडीने तिने एव्हाना काडीमोड सुद्धा घेतला असता.*


सासूमांची काडी-काडी कॉन्सेप्ट स्वयंपाकघरातच नव्हे तर घरभर वावरत असे. प्रत्येक वस्तू वापरताना आणि जुनी होऊन टाकताना त्यांची परमिशन लागे. अगदी अंतर्वस्त्रसुद्धा त्यातून सुटली नव्हती.*चिंधीवाली कडे अंतर्वस्त्र विकली जातात* हा *ज्ञान साक्षात्कार* मला त्यांनीच घडवला.


जुने परकर, ब्लाऊझ, साड्या वगैरे मंडळींची रवानगी, कपाटातून स्वयंपाकघरात होत असे. घासलेली भांडी पुसून जागच्या जागी ठेवायला,हात पुसायला आणि स्वयंपाकघरातला कार्यभाग संपला की त्यांचे *deputation* पाय पुसणे म्हणून होत असे.


आंघोळीच्या गरम पाण्यात रवी व ताकाचं भांडं धुणे. दुधाच्या पिशव्या धुवून वाळवून विकणे.*दुधाच्या कोरड्या पिशव्यांनी तर आमच्या घरात इतिहास घडवला होता.* त्या पिशवीने काय काय पाहिलं नव्हतं ? त्यात सासु माँ च्या प्रभातफेरीतील *पुष्पचौर्य - रहस्यमयी कथा* लपलेल्या असत.


जास्वंदीच्या अन मोग-याच्या टप्पोऱ्या कळीचा उमलण्यापूर्वीचा *कळीदार प्रवास* त्या पिशवीतून होत असे. त्यातच देवळातल्या मैत्रिणींना वाटण्यासाठी तिळगुळ असत.दशभुजा गणपतीच्या देवळातून संकष्टीच्या प्रसादाचे मोदक त्या *दूध पिशवीच्या पालखीतूनच* घरी येत. हनुमान जन्मोत्सवाचा सुंठवडा त्यातूनच येई आणि *रामा- शिवा- गोविंदा* ह्या मानक-यांचे प्रसाद सुद्धा कधी चैत्र तर कधी श्रावण महिना साधून, त्या पिशवीतून आमच्या घरी येत.


त्यात कधी सुट्टी नाणी विराजमान होत तर एखादी *फाटलेली पण खपावयची असलेली* दहा रुपयांची नोट ही असे. कहर म्हणजे एकदा तर बँकेच्या लॉकरमधले किडुक-मिडुक सासु मां नी त्या पिशवीतून घरी आणल्यावर मात्र मी त्यांना कोपऱ्यापासून हात जोडले होते.

जी गत दुधाच्या पिशवीची तीच इतर वस्तूंची.


आणि केवळ सासु माँ च नव्हे तर तिच्या पिढीने हाच *पुनर्वापरमंत्र* जपला. दिवाळीच्या वेळी वापरलेल्या मातीच्या पणत्या स्वच्छ पुसून माळ्यावरती चढत. तीच कथा कंदील किंवा चांदणीची असे.तीच कथा मोती साबणाची असे एक मोतीसाबण सलग सहा वर्ष वापरलाय आहात कूठे दिवाळी भाऊबीज झाली की मोतीसाबण सूकवून परत खोक्यात भरून ठेवणीच्या कपाटात. इस्त्रीची एकदा वापरलेली साडी त्याच घडिवर घडी पाडून कपाटात जायची आणि अर्थातच पुन्हा नेसली जायची. अश्या कित्येक गोष्टी.


 चहाच्या *कानतुटक्या-अँटिक-कपमध्ये* वाटलेली हिरवी चटणी ठेवणे, क्वचित तो कप विरजणासाठी वापरणे त्याच *क्रोकरी सेटच्या* (?) विजोड झालेल्या बश्या झाकण म्हणून वापरणे. तुटक्या प्लास्टिक बादल्यामध्ये झाडे लावणे. *रिकाम्या डालडा-डब्यात तुळस लावण्याचे सत्कार्य ज्या कुणी सर्वप्रथम केले असेल त्याला काटकसर आणि पर्यावरण प्रेमाचे एकत्र नोबेल कां बर देऊ नये ?*


पूर्ण वापर झाल्याशिवाय फेकणे ह्या गुन्ह्याला त्या सर्वांच्याच राज्यात क्षमा नव्हती. फ्रीजमधे हौसेने आणून ठेवलेल्या आणि न वापरून *एक्सपायरी डेटलेल्या* सरबताच्या, व्हिनेगरच्या बाटल्या टाकायला काढल्या की सासु मां चा तिळपापड होत असे. वापरायची नव्हती तर आणली कशाला इतकी महागातली बाटली ? आम्ही नाही बाई अश्या वस्तू कधी टाकल्या.


एक्सपायरी डेट नसलेले *अमर आयुर्वेदिक काढे* त्यांना भारी प्रिय. वस्तूंचा पुनर्वापर हा शब्द कधीही न ऐकता सासू मां नी त्या कल्पनेची अम्मल बजावणी किती तरी वर्षे आधीच केलेली होती. साधे इस्त्रीचे कपडे घरी आले तरी त्या कागदाचा बोळा न होता तो रद्दीच्या गठ्ठ्यात जाई आणि त्याला बांधलेला पांढरा दोरा गुंडाळून एका विशिष्ठ ठिकाणी ठेवलेला असे.


भेटवस्तुचे चकचकीत रंगीत कागद निगुतीने घडी करून ठेवलेले असत. त्यांच्या पिढीने अश्या अनेक प्रकारे *कचरा संवर्धन* केले. लाकूड, प्लास्टिक, काच आणि कपड्यांचेच नव्हे तर तव्यावरच्या उष्णतेचे सुद्धा रीसायकलिंग केले.पोळ्या झाल्यावर त्या तापलेल्या तव्यावरच फोडणी करणे. फोडणीचे  नसेल तर क्वचित त्या तव्याचाशेक दुधाच्या पातेल्याला देणे.


वरणभात शिजल्यावर कुकर गरम असतानाचे तळातले पाणी फोडणीची-वाटी, किंवा दह्याची - वाटी वगैरे ओशट भांडी धुवायला वापरणे हे सर्वमान्य होते. *भांड्याच्या बिळात लपलेले तूप* गरम कुकरात ठेवून पातळ करून ते पोळीला लावणे आणि शेवटी ते भांड घासायला टाकण्यापूर्वी त्यातून हात फिरवून तो ओशटपणा हाता किंवा पायाला चोळणे हे करणारी सासु मां ची पिढी आता राहिली नाही.


*काय ती जुनी बोचकी सांभाळून ठेवता तुम्ही ? सगळ फेकून द्या* हे वाक्य त्या पिढीला आमच्या पिढीकडून अनेकदा ऐकायला लागलं असेल आणि त्या मंडळींनी ही नव्या संसारात आमच्या वस्तूंची अडगळ नको म्हणून गपचुप ऐकलेही असेल.


आम्हीही शोर्य दाखवून अशी अनेक प्लास्टिकची, कपड्यांची, भांड्यांची, काचेची, कागदाची बोचकी बेमुर्वतखोर पणाने फेकली आहेत. जुन्या वस्तू फेकून देऊन नव्या आणणे ह्याला मुळीच डोकं नाही लागत, लागते ती फक्त मस्ती आणि बेफिकिरी पण वस्तू, तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत वापरायला बुध्दी आणि मन ह्या पलीकडेही जाऊन एक पर्यावरण प्रेम लागत ज्याचा उल्लेख त्या पिढीने कधी केला नसेल पण त्या विचाराचं आचरण आवर्जून केलं.


ती पिढी जगलीही तशीच आणि गेलीही तशीच *शरीराच्या प्रत्येक अवयवाचा पूर्ण वापर करून ते जीर्ण शिर्ण झाल्या शिवाय त्या पिढीतल्या कुणी मरण ही पाहिले नाही.* सासु मां सुद्धा अठ्याईंशी वर्षे परिपूर्ण जगून मग गेल्या.


आज निसर्गाचा, सृष्टीचा पोएटिक जस्टिस लावायला बसल तर आमच्या पिढीला आणि आमच्या पुढच्या पिढीला निसर्ग पूर्ण जगून नाहीं देणार. आम्ही न वापरता फेकलेल्या आणि अकाली टाकलेल्या वस्तुंसारखाच आमच्या ही शरीराचा आणि आयुष्याचा ही  शेवट होईल आणि *आम्हीच ह्या पृथ्वीतलावर तयार केलेल्या, टाकलेल्या वस्तूंच्या कचऱ्यात विलीन होईल* अस वाटत राहात.    


                                    - *लेखिका अनामिक*

Monday, September 29, 2025

संजीवक कृपा

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


    *श्रीमहाराजांनी खास गोपाळकाल्यावर एक सुरेख प्रवचन केले आहे. त्यात ते म्हणतात की , " दहा वस्तू जिथे एकत्र येतात तिथे काला होतो. पण त्यात गोपाळ असेल तर गोपाळकाला होतो , त्यामध्ये गोडवा म्हणजे आनंद येतो. " त्याचप्रमाणे प्रपंचाच्या या काल्यात सर्व गोष्टी एकत्र आल्या तरी त्यात आनंदस्वरूप गोपाळ नसेल तर तो काला गोड कसां होईल ? सारे भेदाभेद विसरून विविध व्यवसायातील श्रीमंत , गरीब , स्त्री , पुरुष अशी असंख्य माणसे श्रीमहाराजांकडे आजही येतात , तेव्हा हा जो माणसांचा काला होतो त्यांना श्रीमहाराजांची संजीवक कृपा लाभते आणि भगवंताच्या वा सद्गुरूंच्या मंगल अस्तित्वाने त्यांच्या प्रपंचाचा गोपाळकाला होऊन खऱ्या समाधानाचा गोडवा प्रत्येकाच्या जीवनात उतरावा यासाठीच श्रीमहाराजांच्या समाधीस्थानावर श्रीकृष्ण मूर्ती विराजमान आहे असे नि: संदिग्धपणे म्हणता येईल.*

*संदर्भ - चैतन्यस्मरण २०२४*

*चराचर मोहिले,*

          *तुझी मूर्ती पहावया !*

Sunday, September 28, 2025

कर्मबंध

 *॥श्रीहरिः॥*


आठव्या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, 


*-----------------------------*


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः 


*वेदेषु यज्ञेषु तप:सु चैव*

*दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् ।*

*अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा*

*योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥*

*॥८.२८॥*


(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा 

अक्षरब्रह्मयोग ८.२८)


*भावार्थ:- दोन्ही मार्गांचं (मागे सांगिलेलं) ज्ञान असणारा योगी, वेदाध्ययन, यज्ञ, तपश्चर्या अथवा दान यांमध्ये जे जे पुण्यकारक फल सांगितलेलं आहे, त्या सर्व फलांहून अधिक फल हे (जीव, ब्रह्म यांचं ऐक्यरूपी) ज्ञान आहे, हे जाणून त्यांस (वरील वेदाध्ययनादिकांच्या मार्गानं प्राप्त होणारी स्वर्गसुखासारखी फलं) मागे टाकून अत्यंत श्रेष्ठ अशा स्थानाप्रत जातो.*


*-----------------------------*


आठव्या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सरळ सत्य सांगताना म्हणतात, 


*जे योगी चेतनेला उच्च अवस्थेमध्ये ठेवून,या परमज्ञानाला तत्त्वाने जाणतात, ते यज्ञ, तप आणि दान कर्माने प्राप्त होणार्‍या पुण्यफळाचंदेखील अतिक्रमण करतात,त्यांना बायपास करतात.* 


*हे एका उदाहरणावरून समजून घेता येईल.*


एक असा मुलगा असतो, जो कधी शाळेत गेलेलाच नसतो. शाळेत काय शिकवलं जातं हे जाणून घेऊन तो घरीच अभ्यास करतो. काही वर्षांनंतर तो बहिःस्थ( External)विद्यार्थ्याच्या रूपात एस.एस.सी.ची (दहावीची) परीक्षा देतो आणि उत्तीर्णदेखील होतो.


सुरुवातीच्या वर्गांमध्ये तो बसलेलाच नसतो. तो सरळ दहावीची परीक्षा देतो आणि उत्तीर्ण होतो. अर्थात मधल्या सगळ्या इयत्तांना तो बायपास करतो. म्हणून त्याला कुणी असं विचारेल का, तुला सातवी किंवा आठवीचं गणित येतं की नाही? कारण त्याने दहावीची परीक्षा दिलेली असते. त्यामुळे तो नववीपर्यंतच्या अभ्यासक्रमापलिकडे गेलेला असतो. 


*अशाच प्रकारे,*

योगी जेव्हा मनुष्य जन्म, मृत्यू, मृत्यूनंतरचं जीवन, पुनरावर्ती व अपुनरावर्ती मार्ग तत्त्वतः समजून घेतो, तेव्हा तो निष्काम कर्म, जप, तप, या सगळ्यांपलिकडे जातो. कारण ज्याच्या प्राप्तीसाठी हे सर्व तो करणार असतो, तो अगोदरच उपलब्ध आहे. 


एक आहे, ईश्वरप्राप्तीसाठी भजनं गायली जाणं आणि दुसरं आहे, ईश्वर प्राप्त झाला म्हणून भजन स्फुरणं. इथे योग्य-अयोग्य, चूक-बरोबर अशी कोणतीही बाब नाही. केवळ आपली अवस्था ओळखून आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं आहे. 


*त्यामुळे* मनुष्याने आपल्या साधनाकाळात श्रवण, पठण, जप, तप, कर्म, यज्ञ अवश्य करावेत. आपलं अज्ञान दूर करण्यासाठी ज्या ग्रंथांचं पठण करण्याची गरज आहे, ते वाचावेत. नामस्मरण, ध्यान, प्राणायाम, योगासन यांद्वारे आपल्या चित्ताला स्थिर करण्याचा प्रयत्नही करावा. जे लोक सातत्याने असे प्रयत्नशील राहतात, ते हळूहळू त्याच्या पुण्यफळाने साधनेमध्ये पक्व होत जातात. परिपक्व होता होता एके दिवशी पूर्णतेने योगयुक्त बनतात. 


योगी बनल्यानंतर ते पाप आणि पुण्य यांच्यापलिकडे जातात. त्यानंतर त्यांना पाप किंवा पुण्य स्पर्शही करू शकत नाही. अशा प्रकारे द्वैताचा खेळ समाप्त होतो. संपूर्ण जग त्यांच्यासाठी लीला बनतं. अशा तर्‍हेने मग ते ध्यानाच्या, नामस्मरणाच्या मदतीने योग्याची स्थिती प्राप्त करून असे साधक उच्च चेतनेच्या दिशेने प्रयाण करतात. शेवटी अक्षर परम ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होऊन पुन्हा पृथ्वीवर जन्म घेत नाही. 



*२७व्या श्लोकात केलेल्या विवेचनाला या श्लोकातून जणू पुष्टीच मिळते.*


योगी वेदाध्ययन, यज्ञानुष्ठान, तप, सत्पात्री दान यांचं जे फळ सांगितलं आहे, ते फळ उल्लंघून त्याच्या पलीकडे असलेल्या परमस्थानी (ब्रह्ममार्गानं) प्राप्त होतो.


*थोडक्यात,* 

कर्मयोग्यानं देवयान आणि पितृयाण

मार्गांतील तत्त्व ओळखलं पाहिजे. पितृयाण मार्ग स्वर्गप्रद असला तरी तो मोक्षप्रद नाही. 


वेदाध्ययन, यज्ञ, तप, दान यांपासून उत्तम फळ माणसाला मिळतं. अर्थात याही गोष्टी शास्त्रशुद्ध केल्या तरच फळ मिळतं. नुसतं शुष्क कर्मकांड करून कोणतंच फळ मिळत नाही. या गोष्टींमधून मिळणारं फळ मात्र स्वर्गप्राप्ती करून देतं.पण स्वर्गप्राप्ती म्हणजे मोक्षप्राप्ती नव्हे. 


मनुष्यजन्मात केलेल्या सत्कर्मांची फळं स्वर्गात उपभोगायला मिळतात. स्वर्ग म्हणजे भूतलापेक्षा उन्नत जीवांचा लोक. तो लोक केवळ उपभोगाचा लोक आहे.त्याचं नेमकं स्वरूप आज ज्ञात नाही.परंतु प्राचीन ऋषींना, तपस्वींना स्वर्गाचं ज्ञान असावं. तो स्वर्गलोक अतिमानवांचा किंवा त्याही पलीकडील उन्नत लोकांचा (देवांचा) लोक असतो. तिथे कर्मबंध नाही. 



*पृथ्वीवर* केलेल्या सत्कर्मांचं फल तिथे उपभोगून झालं की त्या जीवाला विकासार्थ पुन्हा पृथ्वीवर जन्म घेऊन यावं लागतं. म्हणजे सत्कर्म करावं, स्वर्गात जावं आणि उपभोग घेतल्यावर पुन्हा पृथ्वीवर यावं अशाप्रकारे जीवांच्या येरझाऱ्या चाललेल्या असतात. तिथली आयुर्मर्यादाही पुष्कळ असते. 


पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर कुकर्म केलं तर स्वर्गही नाही आणि पृथ्वीही नाही; त्यापेक्षाही हीन अवस्थेला जावं लागतं. या चक्रात अडकायचं का हे चक्र भेदून त्या पलीकडे असलेल्या शाश्वत सुखाकडे जायचं ते ज्याचं त्यानं ठरवायचं असतं.


देवयान आणि पितृयाण या दोन वाटा नेमक्या कुठे जातात, हे कर्मयोग्याला मात्र ज्ञात असत. त्यातली योग्य तीच वाट तो स्वभावत: स्वीकारून स्वर्गाच्या येरझाऱ्या टाळतो आणि त्या पलीकडच्या मोक्षपदाची प्राप्ती करून घेतो. हे सागून आठवा अध्याय इथेच संपला.


*सारांश:-* 

*वेदाध्ययनादी ज्या ज्या म्हणून कर्मकांडात्मक गोष्टी आहेत,त्यांचं पुण्यकारक फल मिळतं. ते फल स्वर्गाला कारण ठरत; मोक्षाला नाही.कर्मयोगी देवयान- पितृयाण मार्ग समजून घेऊन त्यापलीकडे असलेलं श्रेष्ठ स्थान मिळवितो.*


*याप्रमाणे,* 


ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगोनाम अष्टमोऽध्यायः 

।। ८ ।।


याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषद् व ब्रह्मविद्या तसेच योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादांतील ‘अक्षरब्रह्मयोग' नावाचा हा आठवा अध्याय संपूर्ण झाला.


'हरिः ॐ तत्सत् 

हरिः ॐ तत्सत् 

हरिः ॐ तत्सत् ।'


*-----------------------------*


संदर्भ ग्रंथ :-

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता. 



*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*P

Saturday, September 27, 2025

मनन-मंथन

 *॥श्रीहरिः॥*


शुक्ल आणि कृष्ण असे हे दोन प्रकाशमय आणि अंधकारमय मार्ग भगवंतांनी सांगितले आता त्यापुढे जाऊन एक महत्त्वाची बाब भगवंतांनी सर्व साधकांना सांगितली आहे. 


*-----------------------------*


॥ॐ श्री परमात्मने नमः॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः 


*नैते सृती पार्थ* 

*जानन्योगी मुहाति कश्चन ।*

*तस्मात्सर्वेषु कालेषु* 

*योगयुक्तो भवार्जुन ॥*

*॥८.२७॥*


(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा 

अक्षरब्रह्मयोग ८.२७) 


*भावार्थ:- हे पार्था, दोन्ही मार्गांचं ज्ञान असल्यामुळे कोणताही योगी मोह पावत नाही. (त्याची स्मृती नष्ट होत नाही.) म्हणून अर्जुना, तू सर्व काळी योगयुक्त रहा.*


हे पार्था! भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले, तरी ते कधीच मोहित होत नाहीत. म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो.


*-----------------------------*


शरीराचा त्याग करताना दैवयोगाने मार्ग मिळत असेल तर योग्य मार्ग निवडून अक्षरब्रह्म स्वरूपाला प्राप्त करणं कसं शक्य आहे? अशी शंका मागील श्लोक वाचल्यानंतर निर्माण होऊ शकते.यासाठी मनुष्याला या गोष्टीची दृढता हवी, की देह असो अथवा नसो पण *'मी ब्रह्मस्वरूपच आहे'.* 


*जसं,* 

अंधारात दोरी पाहून साप असल्याचा भास होतो, याचं मूळ कारण दोरी हेच आहे.अशाच प्रकारे ज्या शरीराच्या मृत्यूबाबत मनुष्य नेहमी भयभीत राहतो, तो मृत्यू तर केवळ भ्रमच आहे. दोरी म्हणजे हे शरीर देखील भ्रम आहे. मृत्यूच्या भीतीचं मुख्य कारण म्हणजे आपल्या खऱ्या 

स्वरूपाचं विस्मरण होऊन स्वतःला शरीर मानणं हेच आहे.


या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देताना सांगतात, 


*"जे योगी या दोन्ही मार्गांना तत्त्वाने जाणतात, ते कधीही मोहित होत नाहीत."* 


आपण एखादी गोष्ट जेव्हा शब्दांमध्ये समजून घेतो, त्यानंतर त्याच्यावर मनन-मंथन करतो, तेव्हा *'समज'* आपलं जीवन बनते. अर्थात ती बाब आपण तत्त्वाने जाणतो. मग आपण म्हणतो, 'अच्छा, हे सांगितलं जात होतं तर...' एखाद्याने आपल्याला शिवी दिली आणि आपला राग अनावर झाला तर हा राग सर्वप्रथम आपलंच अहित घडवतो. मनामध्ये एखाद्या विषयी तक्रारीचा तरंग उठला पहिल्यांदा आपल्यावरच कडवटपणाचा परिणाम होतो. अर्थात आपण आपलंच नुकसान करून घेतो. 


सुरुवातीला साधक हे मानायला तयार नसतो. परंतु तो जेव्हा अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने स्वतःला पाहतो, तेव्हा त्याला या गोष्टीतील सत्य, वास्तव जाणवतं. मग हा उपदेश तो तत्त्वाने जाणू लागतो.तेव्हा तक्रार, क्रोध,तिरस्कार, मत्सर यांसारख्या त्याच्या सवयीतून तो सहजतेने मुक्त होतो आणि 'समज'च त्याचं जीवन बनतं..


*अशाच प्रकारे*

जिथे असाधारण *समर्पण* घडलं आहे, तिथे ते कोणत्या मार्गाने जाणार या गोष्टीची काळजी राहत नाही. ते निष्काम भावाने आपली कर्मं करत राहतात. मग जिथे कर्म हेच फळ आहे, तिथे अन्य कोणत्याही फळाची अपेक्षा ती काय असणार? अशी समबुद्धी ठेवणारे योगी

कोणत्याही प्रयत्नाशिवाय अक्षर ब्रह्माला प्राप्त होतात. त्यांचे प्रयत्न हे प्रयासरहित प्रयास असतात.



शरीराचं अस्तित्व असूनही स्वतःला अशरीरी पातळीवर जाणणारा, ज्याच्यासाठी शरीर केवळ एक साधन आहे, तिथे मृत्यू शक्य आहे का? वास्तविक असे लोक कधीही मरत नाहीत. मग त्यांना मार्ग शोधण्याची आवश्यकताच काय? ते कुठून कुठे जाणार? त्यांच्यासाठी तर संपूर्ण विश्वच आत्मस्वरूप आहे. घड्याचा आकार नष्ट झाल्यानंतरही त्याच्या आतील रिक्त जागा (स्पेस) ही पूर्वी आकार असताना जशी होती तशीच राहते. 


सांगण्याचा अर्थ असा आहे की, 

आकार राहो अथवा न राहो, रिक्त स्थान कायम उपलब्ध असतंच.या योगाने भारलेल्या योग्यांसाठी कोणत्या मार्गाने जावं हा संभ्रमच शिल्लक राहत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, 


*तू नेहमी योगयुक्त राहा. त्यामुळे तुला आपसूकच ब्रह्मस्वरूपाचा बोध होईल.* 


ते ब्रह्मस्वरूप विश्वरचनेच्या वेळी जन्माच्या बंधनात पडत नाही, प्रलयकाळी मरणाच्या बंधनातही अडकत नाही. स्वर्ग, संसार अशा कोणत्याही मोहात फसत नाही. ते प्रत्येक प्रकारच्या आकर्षणांपलीकडे परम मौनामध्ये असतं... केवळ उपलब्ध असतं...


*-----------------------------*


*जेव्हा* जीव देह सोडतो तेव्हा अत्यंत वेगानं पितृलोकात म्हणजेच चंद्रपरिवेष्टित मंडलापर्यंत जातो. तिथे त्या जीवाच्या अंतर्मनाला त्याच्या कर्माचा ताळेबंद चिकटलेला (stored) असतो. 


चांगल्या-वाईट कर्मांचं तिथे क्षणात विश्लेषण होतं आणि त्यानुसार जीव पुन्हा पृथ्वीवर (विकासमार्गावर असणारा आणखी विकास करू इच्छिणारा पृथ्तीवरच परततो) तरी येतो, नरकाच्या कोणत्या तरी स्तरावर जातो किंवा स्वर्गात जातो. 


ज्यावेळी जीव नरक स्तरावर जातो तेव्हा त्या जीवाला त्याचा पृथ्वीवरचाच सूक्ष्म देह चिकटलेला (attached) असतो. त्याला *'भूतसूक्ष्म देह'* म्हणतात. तळलेला वडा पाण्यात कितीही धुतला तरी त्यात तेलाचा अंश शिल्लक राहतोच. त्याचप्रमाणे पृथ्वीवरचा भौतिक देह सोडल्यानंतरही त्या देहाचा थोडासा अंश जीवात्म्याला चिकटलेलाच रहातो. 


*पापकर्मांमुळे* जीव जर नरक स्तरावर गेला तर तो भूतसूक्ष्म देह जीवात्म्याबरोबर तसाच रहातो आणि त्यामुळेच जीवात्म्याला नरक - यातनांचा अनुभव मिळत रहातो. पण जीव जर स्वर्ग-स्तरावर गेला तर मात्र भूतसूक्ष्म देह गळून पडतो आणि जीवाला दिव्य स्वर्गीय देह प्राप्त होतो.


*पण* 

जे ब्रह्मोपासक हे दोन्ही स्तर उल्लंघून शुक्लगतीनं जातात ते ब्रह्मलोकी जातात आणि ब्रह्मलोकाचा क्षय झाला की, तिथल्या प्रजापतीबरोबर मुक्त होतात. या मुक्तीला क्रममुक्ती म्हणतात. म्हणजे ही मुक्ती क्रमाक्रमानं होते. ज्यांना आत्मसाक्षात्कार होतो ते इथल्या इथेच ब्रह्माला मिळतात. त्यांना

कोणताच मार्ग लागत नाही.


*म्हणून पार्था,* 

या दोन गती जाणणारा योगी मोह न पावता कर्म करतो. तूही असा कर्मयोगयुक्त हो.म्हणजे पुनर्जन्माच्या फेऱ्यातून तू मुक्त होशील;आणि मोक्षदेणाऱ्या उत्तरमार्गी ध्यानयोगाचा तू आश्रय करशील,असं भगवंत सांगतात.



*सारांशः* 

*देवयानमार्ग आणि पितृयाण मार्ग जाणणारा योगी मोह न पावता खऱ्या अर्थानं कर्मयोगी बनतो. म्हणजे कोणत्या मार्गानं गेलं तर काय परिणाम होईल हे तो जाणत असतो. त्या अनुषंगानं पृथ्वीवर शास्त्रशुद्ध कर्मं करून तो योगी पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त होतो.*


*-----------------------------*


संदर्भ ग्रंथ :-

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता. 



*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*

Friday, September 26, 2025

प्रपंची लोक

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*नाम  घेण्याचा  निश्चय  करावा .*


जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते. भगवंताच्या अधीन असते. म्हणून, जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह दृश्यच आहे, आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे; त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्‍न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते, म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. 

ही युक्ति ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख होत नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये.

 आपल्या प्रयत्‍नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून, जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्‍न केल्यावाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे हे न समजता, त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरूरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये, आणि अनीति-अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून, मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर, हे सर्व हिंग-जिऱ्याचेच गिऱ्हाईक आहेत; देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही.


जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांनासुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसते 'मी शरण आलो आहे' असे म्हटले तरी पुरे होते. हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही; पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत, अलिकडे ते जास्त संकुचित झाले आहेत. 

पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटला आहे. तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की, मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा.


*१९१ .   भगवंताच्या  नामाचा  नाद  लागला  तर  दुःखाची  जाणीव  कमी  होईल .  दुःखाची  जाणीव  नसल्यावर ,  दुःख  असले  म्हणून  बिघडले  कुठे  ?*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Thursday, September 25, 2025

वासना

 ‌श्रीराम समर्थ


*आपण जें आणि ज्यांचे अन्न खातो त्याचा आपल्या बुद्धीवर सूक्ष्म परिणाम होतो हे दाखविणारी व घडलेली गोष्ट अशीः*



               सुमारें पन्नास वर्षापूर्वी नांदेड येथे अप्पाराव कुलकर्णी नावाचे एक वारकरी राहत असत. मोंगलाईमधें मामुली नोकरी, प्रपंच मोठा, तरीपण ते मोठ्या साधक वृत्तीने राहात. एका वर्षी पंढरीच्या वारीला पायीं जात असतां नेहमींप्रमाणें कन्नड येथें त्यांचा मुक्काम झाला. त्यां गावात एक सावकार राहात असे. त्याने त्यांना व इतर मंडळींना फार आग्रहाने घरी जेवायला बोलावलें. सर्वा मंडळी नाईलाजानें जेवायला गेली. जेवाणाचा बेत अर्थात् उत्तमच होता. जेवण आटोपल्यावर तेथेंच विश्रांतीकरीतां मंडळी थोडीशी लवंडली. विश्रांती नंतर अप्पाराव जप करीत दिवाणखान्यांत बसले होते. समोरच्या टेबलावर एक चांदीचा पेला होता. तिकडे त्यांचें सहज लक्ष गेले आणि मनात आलें, *'हा पेला आपण घ्यावा'.* 

हा विचार आल्यावर त्यांना स्वतःचेंच आश्चर्य वाटलें आणि *इतका हीन विचार आपल्या मनांत का यावा* असें वाटून त्यांचे कारण ते शोधूं लागलें. ठळक कारण तर कांही दिसेना. म्हणून त्यांनीं चौकशी केली की सावकारानें कशा रीतीनें आपली संपत्ती मिळवली आहे. *तेंव्हा त्यांना कळलें कीं, अनेक गरीब लोकांची घरे अनीतीनें बुडवून तो सावकार सधन झाला आहे. त्याचे पापी अन्न खाल्यामुळेंच आपली वासना भ्रष्ट झाली. हें लक्षांत आल्याबरोबर अप्पारावांनी बोटें घालून अन्न ओकून टाकले, सचैल स्नान केलें आणि प्रायश्चित म्हणून भगवंताच्या नामाचा रात्रभर जप केला.*


                गोष्टीचें तात्पर्य उघड आहे. *प्रपंच्यात राहणाऱ्या माणसानें व्यवहाराच्या मर्यादा सांभाळूनच आपल्या आहाराचे धोरण ठरवावे.*


               या ठिकाणीं एक गोष्ट मुद्दाम सांगायची ती अशी कीं *सध्याच्या काळीं नोकरी किंवा धंदा यांच्या निमित्तानें सामाजातील पुष्कळ लोकांना बाहेरचें खावे लागतें किंवा घरून डबा नेऊन बाहेर खावा लागतो. अशा परिस्थितींत शुद्ध अन्न रोज कसें मिळणार?* म्हणून ज्यांना अशा रीतीनें बाहेंर खावे लागतें त्यांनी *अन्न पुढें आलें असतां क्षणभर डोळे मिटून भगवंताची प्रार्थना करावी कीं, 'भगवंता, हें अन्न मी तुला अर्पण करून तुझा प्रसाद म्हणून खातों. त्यानें माझी वासना बिघडूं देऊं नकोस.' मनापासून अशी प्रार्थना केल्यास त्या अन्नाचा आपल्या बुद्धीवर वाईट परिणाम होणार नाहीं याबद्दल खात्री बाळगावी.* 


               ---------- *प्रा के वि बेलसरे* 


               **********

 

संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन

Wednesday, September 24, 2025

नामाची तार

 *श्रीराम समर्थ*


         एकादशीच्या दिवशी देहाला कमी खायला घालून उपासना करायची असते. हे एकादशीचे महत्व आहे. आपल्याकडे म्हण अशी आहे की, एकादशी अन् दुप्पट खाशी. अरे, उपास करण्यामागचा हेतू काय आहे ? 

         धारवाडला भालचंद्रशास्त्री म्हणून आहेत. कृष्णशास्त्रींचे हे नातू आहेत. दोन-तीन वर्षापूर्वी मी वेंकटापूरला गेलो होतो. तेंव्हा ते बंगलोरहून आले तर कृश झालेले दिसले, म्हणून म्हटले 'शास्त्री बुवा, आपण अशक्त दिसता !' तर ते म्हणाले 'मी कृश झालेलो आहे-अशक्त नाही'.  कारण काय? तर म्हणाले 'आठ दिवस बनारसला conference होती. त्यात राजेशशास्री प्रमूख होते. राजेशशास्री म्हणजे प्रचंड विद्वता. तेव्हा भालचंद्रशास्त्री म्हणाले 'आठ दिवस राजेशशास्त्री दूधाशिवाय कांही पीत नव्हते. मी ही तसाच राहिलो. कारण काय? तर म्हणाले, बूद्धि तीक्ष्ण रहाते'. बुद्धीला सूक्ष्मता यायला खाणे असे बेताचेच पाहिजे.

         एकादशीला पोट हलके ठेऊन जर नामस्मरण केले तर नामाची तार अशी लागते की बोलायची सोय नाही. 

         तरी तुम्ही एकादशीला पोटभर खात जा हां ! तुम्ही काय करावे हे सांगणारा मी कोण?तुम्ही काही माझे विद्यार्थी नव्हेत, माझे मित्रही नव्हेत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात. तेंव्हा एकादशीला मन सुक्ष्म असते, ते आत्म्याशी संलग्न व्हायला उत्सुक असते. महाराज म्हणाले काय करावे ? आपल्या लोकांना विपरीत करावयाची सवय असते.  

एकादशीला हलके अन्न खावे व शक्य तितके नामस्मरणात असावे आणि मी बोलणे बरे नाही लोक त्याचा विपरीत अर्थ करतील, फराळाचे पोटभर खाऊन सुस्त होण्यापेक्षा थोडा दुध-भात खाऊन पोट हलके ठेऊन नाम घेतले तरी एकादशी फळेल.' मी पुन्हा सांगतो की महाराजांच्या शब्दांचा अर्थ असा नाही की, तुम्ही एकादशीला दुध-भात खा!  तसे नाही ते. त्यांच्या सांगण्याचा हेतू असा कीं पोट जितके हलके ठेवता येईल तेवढे हलके ठेवा.


               *********



*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*

Tuesday, September 23, 2025

नामपण

 परमार्थामध्ये काय आहे? परमार्थामध्ये साध्य आणि साधन यात भेद नाहीये. प्रपंचात साधन आणि साध्य हे निराळे असतात. उदा.एखादा रोग झाला तर त्या रोगामध्ये औषध नसते. औषध वेगळे असते. जेव्हा एखादी घटना घडवायची असते तेव्हा त्या घटनेत साधन नसते. परमार्थामधे असे नाही. 

परमार्थमध्ये अभेदता असल्यामुळे जे साध्य असते त्याच्यामध्येच साधन असले पाहिजे. जे साधन आहे त्यामध्ये जर साध्य नसेल तर ते साधन होऊ शकत नाही. उदा. एखाद्या माणसाला ईश्वर दर्शन पाहिजे आहे. कोणतेही ज्ञान कर्म जे असेल ते, ते साधन त्याच्या अंतरंगात असल्याशिवाय ते शक्य नाही. कारण त्याच्या अंतरामध्ये जे परमात्मास्वरूप आहे , त्या परमातमास्वरूपलाच अनुसरून त्याचे साधन पाहिजे. जे साधन करतो त्याच्या मध्ये काहीतरी रूपाने साध्य हे असलेच पाहिजे. त्याशिवाय ते साधन होणार नाही. 

म्हणून नामामध्ये परमात्मा असल्याशिवाय नामाला नामपण येणारच नाही. उदा.आंब्याची कोय घेतलीत त्या आंब्याच्या कोयीमध्ये आंब्याचे झाड असल्याशिवाय त्या आंब्याच्या कोयीला कोयपण येत नाही, त्याप्रमाणे भगवंताचे नाम घेतांना त्यामध्ये परमात्मास्वरूप गुप्तरुपाने असल्याशिवाय त्या नामाला नामपण येणार नाही. साधन करताना त्यातील गुप्त परमात्मास्वरूप अधिकाअधिक वर येत जाणे म्हणजे साधन आहे. जेव्हा सत्पुरुष आपल्याला नाम देतो त्यावेळेला आपले परमात्मास्वरूप शब्दरूपाने त्यामध्ये घालतो आणि तुम्हाला नाम देतो. त्या शक्तीची जाणीव होणे म्हणजे साधन होणे आहे.

Monday, September 22, 2025

छोटी उद्दिष्टे

 चिंतन 

              श्रीराम,

         अमृतबिंदू उपनिषदात म्हटले आहे की, हे मनच आहे की जे दुःख भोगायला लावते. बंधनात टाकते आणि मनच आपल्याला निरपेक्ष आनंदाचा अनुभव घ्यायला मदत करते. बंधनातून मुक्त करते. मुक्तीच्या आनंदाची अनुभूती घेण्यासाठी आपल्या मनाला नेमके समजावून सांगावे लागते. जे समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितले आहे.

                  मनाने कायम सकारात्मक विचार करण्यासाठी त्याच्या समोर एखादे ध्येय असावे लागते. कारण ध्येय नसलेली व्यक्ती ही पंख नसलेल्या पक्ष्यासारखी असते. जर पक्षाला पंख नसेल तर तो त्याच्या जीवनात कधीही उडू शकणार नाही. तसंच आपलं पण आहे.

 आयुष्याला दिशा देण्यासाठी एक लक्ष्य असावे लागते. या ध्येयाकडे वाटचाल करताना छोट्या छोट्या उद्दिष्टांची पूर्तता करावी लागते. छोटी छोटी उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करता आली की, मन आनंदित होते व सकारात्मक विचाराने भरून जाते. मग पुढील पावले जास्त आत्मविश्वासाने टाकता येतात. त्यासाठी मनाची मात्र पूर्ण तयारी करावी लागते.

                        ||श्रीराम ||

Sunday, September 21, 2025

गुरूंच्या सान्निध्यात

 पु.श्री.गोंदवलेकर महाराजांचे शिष्य श्री.कोठेकर साधनेला बसले होते. त्या अवस्थेत त्यांनी प्राण सहस्रद्ल कमलापर्यंत आणून ठेविले होते व त्यांची इच्छा होती आपला प्राण बाहेर काढून शरीर तटस्थ पणाने बघावे. (पु.दत्ताभैयाच्या म्हणण्या प्रमाणे हे गेल्या जन्मी योगी होते ) परंतु त्यांना शब्द ऐकू आले बेटा सद्गुरू जवळ असल्या शिवाय हे करू नकोस तू तेथेच थांब.

 ते थांबले, पुढे काही दिवसांनी त्यांच्या मुलाला अपघात होऊन हात खूब खराब स्थितीत झाला व डॉक्टरांचे सांगण्याप्रमाणे हात कदाचित कापावा लागेल. ममत्वा मुळे त्यांना खूप दुःख झाले. ते श्री गोंदवलेकर महाराजांना म्हणाले त्याचे अजून पूर्ण आयुष्य जायचे आहे. त्याच्या ऐवजी माझा हात कापण्याची वेळ आली तरी चालेल. त्याच रात्री श्री महाराज त्यांच्या स्वप्नात आले. श्रीमहाराजांनी त्यांचा आत्मा बाहेर काढला व त्यांना विचारले सांग यातला तू कोण ? तुझे काय आहे ? त्या दिवसा पासून मुलाच्या दुखण्याचा विचार सोडून दिला.

 गुरूंच्या सान्निध्यात प्राण बाहेर काढून पुनः काढून पुनः आत ठेवण्याची इच्छाही पूर्ण झाली. श्री कोठेकर यांचा जपाचा वेग तासाला ५००० पडतो त्यांनी एका दिवसात एक लाख जप पूर्ण केला त्याला त्यांना २१.५ तास लागले. श्री.कोठेकर कविताही करीत. एकदा ते झोपेत कविता करत होते. ती त्यांच्या मुलाने लिहून काढली. त्यामध्ये नामसाधनेतील प्रगतीचे टप्पे दाखविले आहेत.

Saturday, September 20, 2025

आत्मशक्ती

 सदर हकिंगत ही निंबर्गी संप्रदायातील संत श्री. शारक्का यांच्या स्वानंदाचा गाभा या पुस्तकातील आहे. त्या संप्रदायातील एक जेष्ठ साधक डोक्यावरून पांघरूण घेऊन नेमास ध्यानास बसत. त्याचे कारण त्यांनी आपल्याला अंधारात वस्तू चांगली दिसते असे सांगितले. या गोष्टी बद्धल पु.शारक्का यांना विचारले तर त्यांनी अगदी सहज आपली स्थिती सांगितली, त्या म्हणाल्या " हो का ? कोण जाणे ! मला तर अनेकदा रूप पाहतांना डोळे उघडे आहेत का मिटलेले आहेत हेच कळत नाही. कित्येकदा मी डोळ्यांना हात लावून पाहते." 

त्यांना डोळे उघडून व मिटून दोन्ही अवस्थेत रूप स्वच्छ दिसत असे. त्याच संप्रदायातील पु.श्री.भाऊसाहेब महाराजांची आठवण त्यांचे प्रवचन संपल्यावर एका साधकाने नमस्कार केला त्यांच्या पाठोपाठ एकेक नमस्कारासाठी उठले हे पाहून श्रीमहाराज म्हणाले "मी म्हातारा आहे.मला इतक्या वेळ उभे रहावे लागेल. तुम्ही येथे येण्याची गरज नाही.मनातल्या मनात नमस्कार करा. परीक्षा करायची असेल तर माझ्या डोळ्यावर दगड बांधा आणि या भिंतीपलीकडे जाऊन नमस्कार करा. कुणी नमस्कार केला कुणी नाही ते मी सांगू शकतो." श्रीमहाराजांनी आपली आत्मशक्ती स्पष्टपणे सांगितली. डोळ्यांची आवश्यकता साक्षात्कारी संतांना वाटत नाही.

Friday, September 19, 2025

शुक्लगती-कृष्णगती

 *॥श्रीहरिः॥*


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः 


*शुक्लकृष्णे गती होते* 

*जगतः शाश्वते मते।*

*एकया यात्यनावृत्तिम्-*

*-अन्ययावर्तते पुनः॥*


(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा 

अक्षरब्रह्मयोग ८.२६) 


*भावार्थ:-वैदिक मतानुसार, प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत.जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो,तेव्हा तो परत येत नाही, परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो.*


*-----------------------------*


प्रस्तुत श्लोकामध्ये आतापर्यंत सांगितलेल्या दोन मार्गांना वेगवेगळी नावं दिली आहेत. 


*पहिला आहे - देवयान* 

*आणि दुसरा आहे - पितृयान.* 


अपुनरावृत्तीच्या, नॉन रिटर्न तिकीटाच्या मार्गाला देवयान म्हणतात आणि पुनरावृत्ती (रिटर्न तिकीटाच्या) मार्गाला पितृयान म्हणतात. 


*पहिला मार्ग* साधकाला सर्वोच्च स्तरावर पोहोचवतो.. 

तर *दुसरा मार्ग* पतनाच्या दिशेने नेतो. या दोन मार्गांना क्रमशः मोक्षमार्ग आणि संसाराचा मार्ग मानता येईल.


*पृथ्वी-जीवन* जगण्याचे दोन मार्ग आहेत. एक भौतिक आणि दुसरा आध्यात्मिक.भौतिक मार्गाचा उद्देश आहे विषय उपभोगांद्वारे शारीरिक इंद्रिय आणि मनाला संतुष्ट करणे. या मार्गावर वाटचाल करणाऱ्यांचा यापेक्षा अधिक चांगला कोणताही आदर्श नसतो. तिथे वारंवार अहंकाराचा जन्म होतो. 


*मात्र* 

अध्यात्म मार्गावर वाटचाल करणाऱ्यांसमोर कितीही आकर्षक प्रलोभनं आली तरी ती पाहून मोहित होत नाहीत. त्यांची बुद्धी ऊर्ध्वगामी असते, जी उच्च लक्ष्याच्या शोधामध्ये रममाण असते. इथे साधनेमुळे अहंकार हळूहळू लयाला जातो म्हणून पूर्ण योग्याच्या अवस्थेमध्ये तो पुन्हा जन्म घेत नाही. 


*भगवान श्रीकृष्ण म्हणतात,*

दोन्हीही मार्ग सनातन असून त्यांचा अंगीकार करणारे लोक दोन भिन्न प्रकृतीचे असतात. थोडक्यात सांगायचं तर जगातून जाण्याचे दोन मार्ग आहेत -


एक प्रकाशाचा आणि दुसरा अंधाराचा. मनुष्य जेव्हा प्रकाश मार्गाने जातो, तेव्हा तो परत येत नाही. परंतु अंधाराच्या मार्गाने जाणाऱ्याला पुन्हा परतून यावं लागतं.


*पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला अत्यंत महत्त्वाची बाब सांगतात,*


यांपैकी पहिला मार्ग सरळ, सोपा आहे तर दुसरा वक्र, कठीण. तेव्हा तू सुमार्ग आणि कुमार्ग दोन्ही मार्गांचं अवलोकन कर. चांगल्या-वाइटाचा निर्णय घे आणि त्यानंतर आपला मार्ग निवड. एखाद्याला राजमार्ग ठाऊक असेल तर तो जंगलातल्या वाकड्यातिकड्या, काट्या-कुट्यांनी भरलेल्या, खडकाळ मार्गावर पाऊल ठेवेल का? नाही ना! 


'ज्याला चांगल्या-वाइटाची पारख आहे, त्याच्यासमोर कितीही कठीण प्रसंग आले तरी तो योग्य ती निवडच करेल. अन्यथा देहत्यागाच्या वेळी दोन मार्गांमध्ये संभ्रमित झाल्याने कित्येकदा चुकीच्या मार्गाची निवड केली जाते. शेवटच्या घटकेला मनुष्याने प्रकाशाचा मार्ग सोडून धुक्याचा मार्ग निवडला तर त्याला पुन्हा जन्म - मृत्यूच्या बंधनात अडकावं लागतं. त्यामुळे मी तुला अगोदरच सतर्क करत आहे, ज्यामुळे तू योग्य मार्ग निवडू शकशील. तुला या सर्व गोष्टी ऐकायला मिळत आहेत ही निश्चितच कृपा आहे. अन्यथा ज्याला जो मार्ग दैवयोगाने प्राप्त होतो, तोच त्याचा अंतिम मार्ग असतो.' 


इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की भगवान श्रीकृष्णाची उत्तरं समोर कोण आहे त्या अवस्थेनुसार बदलतात. समोरचा जेव्हा स्वतःला शरीर मानतो तेव्हा दैवयोगासारखे शब्द येतात. अन्यथा जे शरीर असूनदेखील स्वतःला शरीरापासून वेगळे समजतात, त्याच्यासाठी कोणत्याही योगाची आवश्यकता नाही. त्याचा योग तर आधीपासूनच परमचेतनेबरोबर घडलेला आहे.. 


केव्हा प्राण सोडला तर तो कुठे जातो, हे भगवंतांनी श्लोकांमधून सांगितलं आहे. शुक्लगती-कृष्णगती अर्थात देवयान मार्ग-पितृयाण मार्ग याविषयीच्या कथनात फार मोठं गूढ दडलेलं आहे असं वाटतं. उपासनेबरोबरच काही भौतिक - खगोलशास्त्रीय सिद्धान्तही भगवान सांगत असावेत. स्वत:च रचलेल्या या चक्रात किंवा जाळ्यात न अडकता पुढे जाण्याचा उपाय भगवान यापुढील सांगत आहेत. 


अर्जुना, शुक्ल मार्ग मोक्षाला नेतो आणि कृष्णमार्ग पुन्हा संसारात आणतो.ह्या दोन्ही मार्गांना जाणणारा योगी मोहित होत नाही.

*-----------------------------*


संदर्भ ग्रंथ :-

श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य. 

संपूर्ण भगवद्गीता. 



*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*

Thursday, September 18, 2025

नामावतार

 कलियुगात सगुण अवतार नसला तरी 'नामावतार' आहे,

श्रीराम जय राम जय जय राम 

नदी जशी समुद्राकडे वाहतच असते, तशी जिवंतपणी कर्मवृत्ती ईश्वराकडे लागल्या की, बाह्यत: जरी तो भक्त शरीरधारी म्हणून वेगळा दिसत असला, तरी आतल्या आत त्या चैतन्याशी वृत्तिरूपाने जोडलेलाच असतो. त्यामुळे सर्व बंधरहित अंतिम चैतन्याशी एकरूप होण्याची अवस्था म्हणजे सायुज्य मुक्ती हा जिवंतपणीच अनुभवीत असतो.  जो नाम घेतो तोच खरा स्मरणात राहतो आणि त्यालाच खरे दर्शन होते' आणि ते रोज सतेज होत असते. देहाचे दर्शन हे विसरणारे असते. 

म्हणून नाम घेत राहा, म्हणजे खऱ्या दर्शनात राहाल. सगुणमूर्ति नेहमीच आपल्याजवळ राहणे शक्य नसते. पण तिची खूण भगवंताच्या नामात आहे. म्हणून आपण नाम घेतल्यावर, भगवंत आपल्याजवळ आल्यासारखा आहे. भगवंत सगुणामध्ये असताना रावणाची किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटू शकले नाहीत. सगुण अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही. सद्‌बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. 

व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेले तरी नाम शिल्लक राहते. म्हणूनच राम, कृष्ण, इत्यादि सर्वजण शेवटी नाहीसे होऊन, केवळ नाम तेवढे शिल्लक राहिले. नाम हे स्थिर आहे, रूप हे सारखे बदलणारे आहे. कलियुगात सगुण अवतार नसला तरी 'नामावतार' आहे, आणि तोच खरा तारक आहे. नामाकरिता नाम घ्या कीं त्यात राम आहे हे कळेल.

!! श्री महाराज !!

!!श्रीराम जय राम जय जय राम!!

Wednesday, September 17, 2025

वृत्तीत बिघाड

 *🌹🌹!!श्रीराम समर्थ!!🌹🌹*


*🍁पैशामुळे बहुदा वृत्तीत बिघाड होतो🍁* 


*श्रीमहाराज पैसा शब्द न वापरता पैका असा शब्द वापरीत. एकाने प्रश्न केला की, "आपण पैशाला  पैसा न म्हणता पैका असे का म्हणता?" श्रीमहाराजांनी उत्तर दिले, ज्यास तुच्छतेने लेखायचे असेल त्याला "क" प्रत्यय लावतात असे मी ऐकले आहे." त्याने पुन्हा प्रश्न केला, "भगवंतानेच पैसा निर्माण केला आहे ना? मग आपण तो तुच्छ कसा म्हणता?" श्रीमहाराज म्हणाले, "पैसा या वस्तू बद्दल मी तुच्छ पणा दाखवीत नाही. पैशामुळे वृत्तीमध्ये बिघाड होतो. आपला योगक्षेम भगवंताच्या कृपेने चालत असून देखील पैशामुळे तो चालतो असा भ्रम पैसा उत्पन्न करतो. पैशाच्या मोहाने भगवंताचा विसर पडतो ते मला पसंत नाही. पैसा कितीही मिळाला तरी तो भगवंताच्या कृपेने आला आहे याची सतत जाणीव जो माणूस ठेवेल तो मोठ्या भाग्याचा समजावा. दुसरे म्हणजे इतर व्यसनांना शारीरिक मर्यादा असतात पैशाला त्या नसतात. माणसाला पैशाचे अजीर्ण कधीच होत नाही."*


*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*


 *प पू सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*

Monday, September 15, 2025

खाजगीकरन

 श्रीमंत डब्यातील गरीब माणसे........

कुणी लिहील ते ठाऊक नाही पण वेदनादायी आहे हे सगळ...

AC च्या डब्यातील भाजणारे वास्तव............

आयुष्यात पहिल्यांदा AC ने प्रवास केला. डब्यात सेवेसाठी नेमलेला पोरगा आला. त्याने पाणी आणून दिले. उशी आणून दिली.. रेल्वेने AC डब्याच्या दिमतीला नेमलेला हा पोरगा मनापासून कामे करीत होता. डब्यात गर्दी नसल्याने जेवणवाला आला नाही. त्याने खाली उतरून खाद्यपदार्थ ही आणून दिले. त्याला खायला बोलावलं तरी येईना, बळेच बसवले.. एकत्र खाताना सहज त्याची चौकशी केली. तेव्हा त्या थंड वातावरणात ही उकडू लागले.


तो भोपाळचा. दर सोमवारी या रेल्वेसोबत येणार आणि आठवडा संपला की एक दिवसासाठी घरी जाणार. पुन्हा दुसऱ्या दिवशी आठवड्यासाठी रेल्वेत पुन्हा दाखल. रेल्वे हेच त्याचे घर होते. इथपर्यंत ठीक होते पण पुढे त्याने जे सांगितले ते फारच वेदनादायक होते. मी त्याला विचारले की आठवडाभर या २४ तास duty चा पगार किती? त्याचा चेहरा उदास झाला. तो म्हणाला “कोणता सांगू l?” मी विचारले “म्हणजे?”. तो म्हणाला “कागदावर आमची २०,००० रुपयेवर सही घेतात आणि प्रत्यक्षात फक्त ५००० रुपये देतात“ प्रवासात असताना फक्त २०० रुपये रोज मिळतो. त्या २०० रुपयात दिवसाचा चहा, नाश्ता आणि जेवण भागवायचे. काहीच परवडत नाही. पैसे वाचवायचे म्हणून घरून पोळ्या घेवून येतो. त्याच दोन दिवस खातो. आणि उरलेले दिवस वडा पाव खाऊन राहतो. मला त्याच्या नजरेला नजरच देता येईना.


तो वेदनेने म्हणाला “साहेब, अहो या रेल्वेत फक्त driver नोकरीत कायम आहे आणि सगळे सगळे आता तात्पुरते आहेत. overtime मिळतो पण ते आम्हाला नेमणारा आमचा मुकादम घेतो. त्यामुळे आम्हाला फक्त २०० रुपये रोजच मिळतो. मी सुन्न झालो. तो म्हणाला भोपालमध्ये आम्ही असे २००० लोक आहोत. पण संघटना केली की ते कामावरून काढून टाकतात." 


मी उतरताना तो हसला. दिलेले पैसे घेत म्हणाला साहेब अजून सगळ्यात climax तर सांगायचाच राहिला. मी विचारले कोणता? तो म्हणाला “प्रवासी उतरताना चोरी करतात. जेव्हा प्रवासी छोटा टॉवेल घेवून जातात तेव्हा आमचे ५० रुपये, बेडशीट नेतात तेव्हा २०० रुपये आणि पांघरूण चोरी जाते तेव्हा १००० रुपये कापून घेतात. आठवड्यातून एक दोन घटना होत्तातच. डोळ्यासमोर दिसते पण या शरीफ लोकांना बोलू शकत नाही ते शिव्या देतात... मी सुन्न झालो. त्याचा फोटो काढला म्हटले लिहितो तुझ्यावर . तो हात जोडून म्हणाला “नका टाकू माझा फोटो, मालकाने बघितले तर काढून टाकील.“ मी म्हणालो “अरे मी मराठीत लिहीन तुझा मालक हिंदी वाचतो. तो म्हणाला “ वो कुछ भी कर सकता है." मालकाविषयीची ही तीव्र भीती असेल तर हा कधी संघर्ष करणार होता ? कंत्राटीकरणाचा भेसूर चेहरा त्याच्या चेहऱ्यात मी बघत होतो.. श्रीमन्त डब्यातील ही गरीब माणसे... कोणाच्याच खिजगणतीत नाहीत.


खाजगीकरन पाहिजे ना हे एकदा नक्की वाचा. असेच सगळ्याच आफिसचे आहे. हा काही बोटावर मोजन्या इतके कर्मचारी खूप शिकले असल्याने साहेब झाले पण ते एकदम कमी प्रमाणात आहेत. पण करोडो शिकलेल्या विद्यार्थ्यांना खाजगीकरणाचा चांगलाच फटका बसला आहे व पुढे ही फटका बसणार आहे.😢😞

Sunday, September 14, 2025

चातुर्मास

 संपूर्ण चातुर्मास विवेचन

     🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

यंदा महाराष्ट्रीय पंचांगानुसार आज १७जुलै २०२४ पासून चातुर्मास सुरू होत आहे . 

आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात. या काळात अनेक व्रतं-उपासना या करण्यात येतात. या काळातच ही विविध व्रते उपासना का करावीत, यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणेही आहेत.

चातुर्मास्याचा काळ आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वपूर्ण आहे. 

या दिवसांमध्ये  मुळा, वांगे, कांदा, लसूण खाण्यापासून व अतिप्रमाणात जेवणापासून दूर राहावे. 


*चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नयेत...*


**शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य (गायीचे दुध, दही, तूप, गोमुत्र,दर्भजल) सेवन करावे.

**पापांचा नाश आणि पुण्य प्राप्तीसाठी 

*एक भुक्त (एकदाच जेवण), 

*अयाचित (न मागितलेले) जेवण  

*चातुर्मास्य उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे.

* देव, तुळसी,पूजनीय योग्यब्राह्मण यांना रोज विशिष्ट संख्या ठरवून चातुर्मास्यात लक्षप्रदक्षिणा व्रत. 

*शंकराला लक्ष बिल्वार्चन.

*विष्णूला लक्ष तुलसीअर्चन.

*गणेशाला लक्ष दूर्वार्चन.

*सूर्याची पूजा व सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तापूर्वी अर्घ्य दान

*देवीला रोज कुंकुमार्चन. 

*श्रीकृष्णाला पारिजातकाच्या फुलांचे लक्षार्चन .

असे विविध अर्चन प्रकार करता येतात.

*रोज नैवेद्यासाठी विविध प्रकार. 

*नित्यअभिषेक.

** तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये असे काही ठिकाणी सांगितले आहे.

** चातुर्मासात कोणतेही मंगलकार्य करू नये काही अडचणीच्या प्रसंगात कालसुसंगत शास्त्रानुसार विचार करुन कार्य करावे.

*पलंगावर झोपू नये, 

*मत्स्य, मांस तसे कधीच खाऊ नये पण किमान चातुर्मासात तरी खाऊ नये

*कांदा, मुळा, वांगे,लसूण हे पदार्थही खाऊ नयेत.

*चातुर्मासात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात*

   *आषाढ महिन्याच्या उत्तरार्धा आधिचे चारदिवस म्हणजे आषाढशुध्द एकादशी पासून चातुर्मासास प्रारंभ होतो. या एकादशी पासून एकादशी व्रत सुरु करावे. कायम एकादशी करणे अशक्य असल्यास किमान चातुर्मास्य एकादशी व्रत करावे.

    **यानंतरच्या पुढील चार महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्य मास नावाने ओळखले जाते. चतुर लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकण्यासाठीचा उत्तम काळ असा याचा शब्दश:अर्थ काहींच्या मते निघतो आणि याच कारणांमुळे या चार महिन्यांत भारतभर संत, महात्मे, ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करतात. *काहीजण या चार महिन्यांमध्ये कडक उपवास करतात. 

*काही जण जप-तप करतात, *काही जण या चार महिन्यांमध्ये मनन, चिंतन, वाचन करत हे चार महिने सत्कारणी लावतात.

**या चार महिन्यांमध्ये आपल्या जीवनातील लपलेल्या रहस्यांचा चुकांचा स्वाध्याय करणे गरजेचे आहे. त्या चुका सुधारुन यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल.यंदा पंच मास आहे. कारण *अधिकअश्विनमास* आहे. म्हणजे जास्त पुण्य मिळवता येऊ शकेल.

*आषाढ शुक्ल एकादशी* 

हिला देवशयनी एकादशी सुध्दा म्हणतात या एकादशीला देव झोपतात ही श्रध्दा आहे.

विठूमाऊलीच्या ओढीने लाखो वारकऱ्यांसह ज्ञानोबा तुकाराम आदि सकल संतांच्या पालख्यांचे आगमन पंढरीत होते आणि सुरु होतो चातुर्मास्य प्रवचन कीर्तन भजनाचा जागर. 

*गुरुपौर्णिमा* . 

आपले सर्व धर्मकार्य सद्गुरुच्या सान्निध्यात, त्यांच्या चरणाशी लीन होऊन, त्यांच्याकडून विद्येची प्राप्ती करत करायची असते. 

म्हणून सद्गुरुंची पूजा अर्चना करतात. या दिवशी गुरुदक्षिणा देणे शिष्याचे परमकर्तव्य आहे.


चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे *श्रावण*. या संपूर्ण महिन्यात श्रवण, मनन, चिंतन, पठण यावर भर द्या. नियमांचे पालन करा. 

श्रावण महिन्याच्या प्रत्येक वारानुसार सुध्दा उपासना आहे.

*रविवार* 

आदित्य राणूबाईचे व्रत  

सवितृसूर्यनारायणाचे पूजन श्रावणातील प्रत्येक रविवारी सूर्योदयाच्या समयी केले जाते.

*सोमवार* 

भगवानशंकराच्या पूजनाचे महत्त्व आहे .

*मंगळवार* 

विवाहानंतर श्रावणातल्या पहिल्या मंगळवारापासून पुढील पाचवर्षे श्रावणात प्रत्येक मंगळवारी शिवमंगलागौरीचे पूजन प्रत्येक नवविवाहितेने केले पाहिजे.

*बुधवार*, *गुरुवार*

बुध-ब्रहस्पतीचे पूजन 

द्वार, धन-धान्यभंडार, या ठिकाणी चंदनाने बाहुल्या काढून करावे.

*शुक्रवार*

षष्ठिदेवी-जराजीवंतिका पूजन गूळ-फुटाणे दूध याचा नैवेद्य अर्पण करुन केले जाते.

*शनिवार* 

अश्वत्थनारायण, भगवाननृसिंह, श्री हनुमान यांचे पूजन करावे . या दिवशी बटूभोजनाचे महत्त्व सांगितले आहे. 

*नागपंचमी* 

नवनागांचे पूजन पूर्वी नागाच्या वारुळा जवळ करीत .

मात्र असे न करता घरीच नागांचे चित्र काढून त्याचीच पूजा करावी .

*कुलाचार* 

*आपल्या कुलदेवतेची आरधना पूजा,नैवेद्यासाठी पुरणपोळी इ.त्यात्या कुलातील रितीरिवाजानुसार शुद्धअष्टमी , शुद्धचतुर्दशी, किंवा पौर्णिमा या दिवशी करतात.

*खानदेश विदर्भ या भागात नागपंचमी नंतरच्या रविवारी किंवा कुलाचाराप्रमाणे शुक्ल पक्षातील रविवारी *रोट* या नावाने "रण्णा-सण्णा" देवी यांची विशिष्ट पध्दतीने पूजा व नैवेद्य करतात. यात परंपरागत आलेल्या एका श्रीफळाची देवीचीमूर्ती म्हणून पूजा करतात.

*श्रावणी*

आपापल्या वेदशाखे प्रमाणे नागपंचमी किंवा पौर्णिमा या दिवशी वेदोच्चारण करतांना जे  दोष निर्माण होतात ते दोष विसर्जन करुन पुन्हा नव्याने वेदारंभ करावा याला उपाकर्म, श्रवणकर्म म्हणतात. या वेळी अरुंधती याज्ञवल्क्य सहित सप्तर्षींची पूजा करुन, जानवे बदलले जाते.

 *रक्षाबंधन-नारळीपौर्णिमा*

ही येते. या दिवशी सद्गुरूंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी. या महिन्यात ते तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव करून देतील.

 तुम्हाला पुढील आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा आहे? कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या याविषयीचे ज्ञान तुम्हाला तुमचे गुरु करुन देतात. तुलसीदास यांनी म्हटले आहे, *‘एहि कलिकाल न साधनदूजा | योग, यज्ञ, जप, तप, व्रत पूजा’*  तुमची योग्यता तपासल्यावरच तुम्ही जप, तप, यज्ञ करण्यास योग्य आहात का याविषयी तुमचे गुरूजी तुम्हाला मार्गदर्शन करतील.

*श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षात श्रीकृष्णजन्माष्टमी येते. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव अत्यंत भक्तीरसपूर्ण साजरा करण्याची आपली परंपरा आहे.

*गोपाळकाला*

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी  गोपाळकाला अर्थात दहिहंडी संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या धामधूमीत संपन्न होतो. 

'कृ’ धातू क्रियाशीलता स्पष्ट करणारा आहे.म्हणून या महिन्यात साधकाने आपली क्रियाशीलता वाढवत स्वत:ला सिद्ध करावे.श्रीमद्भगवतगीतेचे वाचन आणि श्रवण मनन याच महिन्यात केले जाते.

*भाद्रपदातील श्रेष्ठ कर्म -*

श्रावणातील तुमचे कार्य निर्विघ्न पार पडले की पुढचा महिना येतो भाद्रपद. 

भाद्रपद (‘भद्र’ म्हणजे श्रेष्ठ आणि ‘पद’ म्हणजे पुढील वाटचाल) याचाच अर्थ या महिन्यात तुम्हाला श्रेष्ठ कार्य करायचे आहे.

शुक्ल पक्षात 

*हरतालिका* 

हे व्रत, माता पार्वतीने आपल्या सख्यांसह करुन अत्यंत कठीण व्रत कठोरपणे आचरण केले. आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुमारिका सुवासिनी या व्रताचे आजही परिपालन करतात.

*श्री गणेशचतुर्थी*. पार्थिवगणेश पूजन माता पार्वतीने आपल्या मलापासून निर्माण केलेल्या श्रीगणेशाचे पूजन, पृथ्वीपासून अर्थातच मातीपासून निर्माण केलेल्या श्री गणेशाचेपूजन .

  ********************

***पार्थिव अर्थात माती पासून निर्माण केलेल्या मूर्तीची पूजा **श्रावणात *पार्थिव शिवलिंगार्चन*

**भाद्रपदात पार्थिवगणेश पूजन

**अश्विनात प्रत्यक्ष भूमीत नवधान्य पेरून आदिमायेची पूजा . तसेच सप्तशतीच्या तेराव्या अध्यायात सुरथराजाने मातीपासूनच मूर्ती करुन पूजा केल्याचे वर्णन केले आहे.*कृत्वा मूर्तिं महीमयीम्*

 तेव्हा या तीनही देवता पृथ्वीचे,भूमीचे महत्त्व वाढवणाऱ्या आहेत. आणि या तीनच देवतांचे पार्थिवमूर्ती स्वरुपात पूजन केले जाते.

  ********************

पार्थिव गणेश पूजनातच नव्हे तर श्रीगणेश पूजनातच दूर्वा महत्त्वाच्या मानल्या जातात. त्या, त्यांच्यातील औषधी गुणांमुळे दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा मंत्र देतात.

हा पार्थिव गणेशोत्सव आता जगभरात साजरा होत असतो.

*ऋषीपंचमी* 

या विरक्ती व भक्ती प्रदान करणाऱ्या या व्रतात सप्तर्षींसहअरुंधतीचे पूजन ज्येष्ठमाता करतात . 

*ज्येष्ठागौरी/महालक्ष्मी* 

*अनुराधा नक्षत्रावर आवाहन *ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि *मूळ नक्षत्रावर विसर्जन .असे तीन दिवसांचे हे व्रत आहे. मोठ्या प्रमाणात सण म्हणून साजरा करतात. दक्षिण महाराष्ट्रात गौरी (पार्वती) स्वरुपात . मराठवाडा,विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, या भागात ज्येष्ठा(अलक्ष्मी) कनिष्ठा(लक्ष्मी) या स्वरुपात पूजन केले जाते.

*अनंत चतुर्दशी* 

भगवान श्रीकृष्णांची अनंत स्वरुपात पूजा केली जाते. दानाचे महत्त्व सांगणारे हे व्रत आहे.

याच महिन्यात सर्वश्रेष्ठ ग्रंथराज *श्रीमत् भागवत सप्ताह* याला प्रौष्ठपदी म्हणतात अनन्यसाधारण महत्व असलेला काल आहे.

याची समाप्ती पौर्णिमेला होत असते.

*पितृपक्ष*

या महिन्याचा वद्य पक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जाते. समस्त पूर्वजांना पिंडप्रदान तर होतेच पण ज्यांचा आपला काहीही संबंध नाही त्यांना सुध्दा धर्मपिंड याच काळात देता येतो.

आपली श्रद्धा कायम राखत आपल्या पूर्वजांच्या गुणांचे अनुकरण करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळआहे. 

*अश्विन महिना निरोगी जीवनाचे सार -*

चातुर्मासातील तिसरा महिना                      *अश्विन*    

यात येते नवरात्र वर निर्देशित केल्याप्रमाणे त्रैलोक्य जननी माता भगवतीची नवधान्य पेरुन पूजा बांधली जाते. काहींच्या कुलाचारांनुसार पापड्या, कडकण्या, सांजोऱ्या यांचा फुलोरा देवीच्या डोक्यावर बांधला जातो. रोज किंवा पंचमी,अष्टमी या दिवशी सप्तशतीपाठ, अष्टमी किंवा नवमीला पाठाचे हवन करुन नवमी किंवा दशमीला नवरात्रोत्थापन हे ज्याच्या त्याच्या कुलपरंपरेने करतात.

*ललितापंचमी*

नवरात्रातील पंचमीला *उपांगललिताव्रत* अत्यंत भक्तीभावाने आणि कुलपरंपरेनुसार केले जाते.

संयम अणि नियम पाळण्याचा हा कालावधी आहे. या कालावधित मातृशक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो.

जर आपण याचे तंतोतंत पालन केले तर विवेक शक्ती, ज्ञान-शक्ती आणि पराशक्ती जागृत होते. हाच खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करण्याचा क्षण आहे. या दसऱ्याच्या दिवशी शमी व अश्मंतक(आपटा)यांची पूजा करुन सिमोल्लंघन करतात. नंतर आपट्याची पाने  एकमेकांना देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा देतात.यात आपल्या आसुरी विचारांवर विजय प्राप्त करत प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादेचे पालन करु शकू हा निर्धार आहे.

*कोजागरी पौर्णिमा*

या पौर्णिमेला चंद्राकडून अमृत स्त्रवले जाते म्हणून मध्यरात्री इंद्र आणि चंद्र यांचे पूजन करुन आटिव दूधाचा नैवेद्य समर्पित करतात. व रात्री नाना प्रकारचे खेळ, नृत्य द्यूतक्रीडा, करुन जागरण केले जाते. 

या महिन्यात पौर्णिमेला अश्विनी नक्षत्र असते. 

याची देवता अश्विनीकुमार आहे. त्यांनी महर्षी च्यवन यांना महान औषधांचा उपदेश करत त्यांना चिरायू आणि कायम तारुण्य प्रदान केले. महर्षी च्यवन यांच्याप्रमाणेच चिरायू आणि तारुण्य मिळवायचे असेल तर या महिन्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत निरोगी आरोग्य जगण्याचा प्रयत्न करावा. 

*गुरुद्वादशी*

दत्तप्रभूंनी या दिवशी श्रीनृसिंहसरस्वती स्वरुपात मोठी लीला केली. आजही नृसिंहवाडी, गाणगापूर, किंवा प्रत्येक श्रीदत्त देवस्थानी हा उत्सव संपन्न होतो.

समुद्र मंथनादरम्यान याच महिन्यात धन्वंतरीअमृत घेऊन अनेकानेक रत्न आणि लक्ष्मी प्रगट झाली होती

*धनत्रयोदशी*

देवांचे वैद्य ,आयुर्वेदाचे उद्गाते भगवानधन्वंतरींचा अवतार दिन. सर्वत्र उत्साहात संपन्न होतो. याच दिवशी सायंकाळी आपल्या धनसंपदेची पूजा करुन. अक्षयधनाची कामना करावी.

*नरक चतुर्दशी*

नरकासुराचा संहार करुन त्याने बंदी बनवलेल्या एकहजार राजकन्यांची मुक्तता करुन त्या राजकन्यां बरोबर स्वतः विवाह करुन समाजात सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था केली. तोच हा नरकचतुर्दशीचा दिवस अभ्यंगस्नान करुन दीपावलीचा पहिला दिवस मानला आहे.

*लक्ष्मीपूजन*

येणा-या पिकांचे संवर्धन करण्याची तयारी कृषिराजा याच महिन्यात करत असतो. . 

नवीन पीक आणि लक्ष्मीचे पूजन करत याच महिन्यात करतात. याच दिवशी सायंकाळी चित्र-लेखनी-सहित-लक्ष्मी- कुबेराचे पूजन करतात. व्यापारी आपल्या वह्या(चित्र) (लेखनी)पेन,लक्ष्मी, (कुबेर)तिजोरी, याची पूजा करुन आनंद साजरा करतात. मध्यरात्री कचरा काढून बाहेर टाकतात याला अलक्ष्मी निःसारण असे शास्त्रात म्हटले आहे. इतर दिवशी मात्र मध्यरात्री कचरा काढणे अशुभ मानले आहे.

*क्रियाशील कार्तिक महिना*

चार्तुमासातील चौथा आणि अखेरचा महिना म्हणजे कार्तिक.

*बलीप्रतिपदा*

भक्त प्रल्हादाचा नातू बली याच्या कडे भगवंतांनी तीनपाऊले भूमी मागितली दोन पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापल्यानंतर तिसरे पाऊल बलीने स्वतःच्या डोक्यावर ठेवायला सांगितले. 

या दिवशी पतीला आणि मोठ्या वडीलधाऱ्यांना स्त्रिया आणि भाऊ सोडून सर्व मोठ्यांना कुमारिका औक्षण करतात .त्यांना ओवाळणी मात्र दिलीच पाहिजे हं. 

*भाऊबीज*

बहिणभावाच्या प्रेमाचा हा दिवस. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. प्रत्यक्ष यमराज बहिणीकडे जातात म्हणून त्या दिवशी मृत्यू सुद्धा होत नाही अशी श्रद्धा आहे. बहिणीने भावाला ओवाळून झाल्यावर भावाने हक्काने ओवाळणी दिलीच पाहिजे असा हा दीपावलीचाआनंद लुटला जातो. 

*कार्तिकी एकादशी*

चातुर्मास्याचा काळ संपलेला. ग्रीष्मा ऋतूचे ऊन वर्षा ऋतूतील पाऊस संपून शरदाचं चांदणं अनुभवताना वारकऱ्यांना आपल्या काळ्या आईच्या पोटी आलेल्या धान्यलक्ष्मीची ओढ लागते विठूमाऊली आणि काळीआई मनातली घालमेल हळूहळू दूर होते. एकादशीचा उपवास आणि महाद्वार काला करुन जड पावलाने वारकरी घरी परततो.घरी येतो पण पंढरीची आठवण जात नाही. मग अंगणातल्या तुळशीचा आणि  दामोदर स्वरुपातील भगवान श्रीकृष्णाचा विवाह सोहळा संपन्न करुन नित्याच्या कामाला सगळ्यांची सुरुवात होते.

*वैकुंठ चतुर्दशी*

चातुर्मास्यनिद्राकाल संपवून नव्या निसर्गचक्राला चालना देतांना भगवान शंकराची आतुरतेने झालेली आठवण आणि शंभुमहादेव महाविष्णूंच्या भेटीच्या ओढीने वैकुंठाला निघाले दोघेही एकमेकांना भेटतात तो हा दिवस धार्मिक श्रद्धेने आजही शिवमंदिरात व विष्णूमंदिरात संपन्न होतो.  

*त्रिपुरी पौर्णिमा*

भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला सर्वत्र आनंदीआनंद झाला आजही सर्व शंकराच्या देवस्थानी मोठी रोषणाई करुन दीपमाळा उजळून त्यावर त्रिपुरासुराचे प्रतीक म्हणून एक मोठा काकडा जाळला जातो त्या प्रकाशाने आसमंत उजळून निघतो. 

कार्तिक शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा या कालावधीत चातुर्मास्यात अंगिकारलेल्या व्रतांचे उद्यापन करावे असे शास्त्र आहे.

अशा प्रकारे गुरुकृपा, श्रेष्ठ आचरण, मनन, चिंतन, संयमी व्यवहार, उत्तम क्रियाशीलतेचा यात आपण वापर करू शकतो. यामुळे मानवातही देवत्वाचा अंश आपल्याला दिसून येईल.  


@प्रदीप जोशी,गुरुजी©


अनुग्रह

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                  भाग - ४.

                  गणू, त्यांचे चुलत भाऊ दामु व मित्र वामन या तिघांनी गुरु शोधार्थ निघायचे ठरवले. त्यावेळी त्या तिघांचे वय दहा वर्षाच्या आसपास होते. घरी न सांगता अंगावरच्या कपड्यांशी तिघे गुरु शोधार्थ निघाले खरे,  पण नंतर होणारा त्रास सहन न होऊन, दामू आणि वामन घरी परतले. परंतु गणू मात्र तसेच पुढे गेले. मुखात रामनाम होते.

             फिरत फिरत गणू कोल्हापूरच्या देवळात येऊन एके ठिकाणी बसले. त्यांचे तेज पाहून लोक आपोआप त्यांच्यापुढे मिठाई, खाद्यपदार्थ ठेवीत असत. एका जोडप्याने तर गणूला दत्त घ्यायचे ठरवले पण..... 

            इकडे गोंदवल्यात सगळीकडे शोधा शोध सुरू झाली. गणूचे वागणे पाहून थोडा अंदाज आला होता. पण गणू एवढ्या लवकर पाऊले उचलेल असे वाटले नव्हते. सगळीकडे शोध घेऊनही शोध लागत नव्हता. दिवस काळजीत आणि चिंतेत जात होते. तोच दामू आणि वामन परत आले. त्यांच्याकडून गणूचा पत्ता घेतला. लगेच रावजी आणि इतर मंडळी जाऊन गणूला परत घेऊन आली.

        आता घरच्यांना एक धास्तीच बसली, गणू कधी निघून जाईल याचा नेम नाही. त्यांना अडकवून ठेवण्यासाठी सर्वानुमती त्यांचे लग्न करून द्यायचे ठरले. खातवळीच्या सोज्वळ कन्ये बरोबर गणूचे थाट्यात लग्न करून दिले. आता हा घरी रमेल. गुरुचे वेड डोक्यातून जाईल असे सर्वांना वाटत होते.

            पण ज्याचे एकदा ध्येय निश्चित झाले, ध्यास लागला की, त्याला दुसरे काही सुचतच नाही. अगदी तसेच गणूचे झाले. गणूंच्या मनी रात्रंदिवस एकच विचार... आता कुणालाही बरोबर न घेता एकटेच जायचे. गणू संधीची वाट बघत होते. घरी मन रमत नव्हते. एकच ध्यास... गुरु शोध...

        कित्येकांना वाटते की, आपण मनोभावे पूजाअर्चा करावी. दानधर्म, व्रत, नामस्मरण, स्तोत्र पठण करावे. कोणाचे वाईट चिंतू नये. हाच परमार्थ! मग आणखी गुरु हवा कशाला? परंतु सर्व ग्रंथात, अध्यात्म ग्रंथात  " गुरुशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञानाशिवाय मोक्ष, मुक्ती नाही "  असे स्पष्ट सांगितले आहे. नाथ भागवतात म्हटले....

" सद्गुरूविण ब्रह्मज्ञान, सर्वथा नव्हे नव्हेचि जाण।"     

         दासबोधात म्हटले....

" ज्याशी वाटे मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा।"

          संत तुकाराम म्हणतात...

" सद्गुरुवाचूनि सापडेना सोय,धरावे ते पाय आधी आधी।"

          हरी पाठात ज्ञानोबा म्हणतात....

" द्वैताची झाडणी, गुरुविण ज्ञान।

  तया कैसे कीर्तन घडेल नामी।"

       शिवाय ज्ञानेश्वरीत सांगतात....

" म्हणोनी जाणतेनी गुरु भजीने।

  तेणे कृतकार्या होईजे।"  किंवा 

 " गुरुविण कोण दाखवील वाट।"

         हे तर प्रसिद्धच आहे. या सर्वावरून हे सिद्ध होते की, गुरू शिवाय आत्मज्ञान नाही हे निश्चित.

            मग दुसरा प्रश्न असा पडतो की, गुरु एकदा केल्यावर बदलता येतो का? तर रामदास स्वामी म्हणतात, नव्हे सर्व संत म्हणतात की, गुरु पारखून करावा. गुरु बदलता येत नाही. संतांनी गुरूंच्या काही कसोट्या सांगितल्या. त्यानुसार पाहिलं तर आपल्यात  संत ओळखण्याची ताकद नसते. मग संत सांगतात तो मार्ग अनुसरावा. ज्याच्या सानिध्यात गेल्यावर उगीचच प्रसन्नता वाटते, त्यांचे जवळ बसावेसे वाटते, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होते, पण हे सगळे वरवरचे झाले.

         सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो संत देहात नाही त्यांची समाधी अवस्था आहे, त्यांचेतील सामर्थ्य आपल्याला जाणवते. त्यांचा अनुग्रह घ्यावा. असे संत देहात नसते तरी त्यांचे कार्य चालूच असते. त्यांना पुढे जायचे झाल्यास ते देहात नसल्यामुळे कधीही कोठेही कोणाच्याही हृदयात सूक्ष्म रूपाने प्रवेश करू शकतात. असे देहात नसलेले गुरु महान होय. आणि  एकदा एका संताला गुरु मानल्यावर दुसऱ्यांना गुरु माणणे योग्य नाही. यासाठी श्रद्धा भक्कम असावी लागते.

               अनुग्रह घेणे म्हणजे आपण त्यांचे झालो हे मानणे, समजणे. एकदा अनुग्रह घेतला की आपण दुसरीकडे वळत नाही. अनुग्रह घेण्याचा फायदा हा असतो की, आपण इतर संता मागे लागत नाही. एकावर श्रद्धा राहते. शिवाय आपण अनुग्रह घेतल्यावर सर्व जबाबदारी आपल्या गुरुवर असते..  "मी कर्ता" हा भाव कमी होतो. आणि आपण आपला भार त्याच्यावर सोपवून निवांत होतो.

        सद्गुरु फार मोठे असतात. ते शिष्याला मार्गावर आणण्याचे काम करीत असतात. त्याचे रक्षण करत असतात. सर्वतोपरी सांभाळत असतात. अखंड संरक्षण लाभत असते. भोग कुणाला सुटले नाही. शिष्यालाही त्याचे भोग भोगावे लागतातच. पण सवडीने भोग भोगून संपवण्याची सवलत मिळते. हा फार मोठा आधार लाभतो.

 "गुरुः ब्रहा गुरुः विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।

 गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ।।" 

       क्रमशः

 संकलन व लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

Saturday, September 13, 2025

जन्माचे सार्थक

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*🌺🙏नामप्रभात 🙏🌺*


     *योगसाधन करणारा एक मद्रासी माणूस होता. सुक्ष्मदेहाने तो मंगळावर जाऊ शके. परत येत असता पृथ्वीच्या वातावरणात शिरताना त्यास कष्ट होत. ते कष्ट दूर व्हावेत म्हणून तो अनेकांना भेटला पण त्याचे समाधान झाले नाही. अखेर तो श्रीमहाराजांना भेटला. प्रथम श्रीमहाराजांनी पृथ्वीवरून मंगळापर्यंत जाताना लागणाऱ्या टप्प्यांचे वर्णन केले. नंतर ते त्यास म्हणाले की , " परत येताना तुमच्या कुंभकात दोष निर्माण होतो म्हणून तुम्हाला देहात परत शिरण्यास कष्ट होतात. तुम्ही जर ' केवल कुंभका ' चा अभ्यास वाढवलात तर हे कष्ट होणार नाहीत. " हे सांगून श्रीमहाराज पुढे म्हणाले , योगाभ्यासाने मंगळावर जाऊन येता आले म्हणजे आपल्या हातात फारसे काही लाभले असे मानू नये. मंगळावर जाऊन येण्याचा नाद सोडून ती शक्ती जर नामस्मरणात खर्च केली तर शाश्वत समाधान मिळण्यास त्याचा फार उपयोग होईल. तरी तुम्ही आवर्जून नामस्मरणास लागावे. राम तुमच्यावर जरूर कृपा करील. नाहीतर हा एक प्रकारचा नुसता गारुड्याचा खेळ होऊन त्याने जन्माचे सार्थक होणार नाही. "*

*||श्रीराम जय राम जय जय राम ||*

Friday, September 12, 2025

नामावरील प्रेम

 एक सत्य घटना


पुण्यात वारजे च्या रस्त्याच्या कडेला बसून एक आजी भाजी विकत असत , दुपारी बाजूला उभ्या असलेल्या रिक्षातच बसून घरून आणलेला डबा खायचा आणि सतत एका वहीत काहीतरी लिहीत असत .


एकदा एका मुलाने मोठ्या कुतुहलाने त्या आजींना विचारले , 

आजी तू इतके काय लिहीत असतेस त्या वहीत ?

. आजी म्हणाली .... 

"मला लिहिता वाचता काही येत नाही रे बाळा.  एकदा एक माणूस आला होता त्याने मला एका कागदावर एक वाक्य लिहून दिले. आधी मी त्याच्यावरच खूप वेळा  गिरवत असे ... असे करता करता मला ते वाक्य पूर्ण तसेच लिहिता येऊ लागले म्हणून मी ते वहीत लिहायला सुरुवात केली. वेळ मिळाला की मी ते वाक्य लिहीत बसते.


मुलाने आजीला विचारले - बघू - ते वाक्य मला दाखवू शकशील का ? विचारले तर तिने लगेच वही समोर केली ,  वाक्य होते .... *श्री राम जय राम जय जय राम* . 

मुलगा तिला म्हणाला -"आजी मी इथे जवळच - रहातो

जवळच माझा मोठा 

बंगला आहे ,तिथेच मी राहतो ,रोज असे रिक्षेत बसून जेवणापेक्षा दुपारी थोडा वेळ माझ्या घरी येत जा.

 त्यावर ती आजी म्हणाली , नको रे बाळा. माझ्या दिराचा पण इथेच खूप मोठा फ्लॅट आहे , मी तिथे पण जाऊ शकते पण तसे केले तर परत संसाराच्या गोष्टीत अडकणार आणि माझे हे लिहिणे तितका वेळ थांबणार. मी इथेच मजेत आहे.


मुलगा आजीला म्हणाला -

"आजी अग हा मंत्र माझा गुरू मंत्र आहे ,

 गोंदवलेकर महाराजांचा जपमंत्र आहे हा!! 

आजीने त्याला विचारले की -

"तू भेटला आहेस का रे ह्या महाराजांना ? 

मला जाशील का रे त्यांच्याकडे घेऊन ? मुलाने सांगितले की आजी - अग आता महाराजांची समाधी आहे , तिथे मी दर महिन्यास जातो पुढच्या वेळी जाईल तेव्हा तुला पण नक्की घेऊन जाईल. !

 आजी म्हणाली - पण हे बघ तू माझा खर्च मला करू देणार असशील तरच मी तुझ्या बरोबर येईल ! मुलगा हो म्हणाला आणि आजीला घेऊन गोंदवल्याला गेला. तेथे समाधी मंदिरात

 गेल्यावर लगेच

आजींनी अगदी आनंदोत्साहाने  त्या मुलाला मठात भिंतीवर लावलेला एक फोटो दाखवला आणि म्हणाल्या - , "  अरे ह्यांनीच तर मला हा मंत्र लिहून दिला आहे ..... 

तो फोटो होता -

परमपूज्य

श्रीगोंदवलेकर महाराजांचा. !!

हेच तर खरे नामावरील प्रेम व नामावरील भक्ती !

Thursday, September 11, 2025

परमात्माच सर्व करतो

 जय श्रीराम!


स्थळ: गोंदवले 

वेळ- रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराची सुरुवात! 


आदल्या रात्री गोंदवले इथे मुक्कामी आपण गेलो आहोत.. शेजारती होऊन सगळे आपापल्या रूमवर परतले असावे. आता एकेक जण निद्राधीन होण्याच्या मार्गावर आहेत. 

रात्रीचे साडे बारा वाजून गेले आहेत. आपली अजून चुळबुळ सुरु आहे. काही केल्या झोप येत नाहीये. मनातल्या मनात जप सुरु आहे. रात्रीचा तिसरा प्रहर सुरु झाला आहे. आपण हळूच उठून खिडकीत येऊन उभे राहतो. संपूर्ण गोंदवले गाव, झाडे झुडपे, पशु पक्षी गाढ निद्रेत आहेत . नाही म्हणायला दूरवर कुठेतरी एखादी भुंकणारे कुत्रे आणि एखाद दुसरा टिवटिवत जाणारा एखादा चुकार पक्षी.. याशिवाय कुणाचाही आवाज नाही. एकदम निरव शांतता. आकाशात चंद्र आणि चांदण्या तेवढ्या जाग्या आहेत... आणि जागे आहे ते समाधी मंदिरातील परब्रम्ह. श्रीमहाराज ही योगनिद्रेत आहेत. 


आपण हळूच दरवाजा उघडून बाल्कनीत येऊन उभे राहतो. चिंतामणी बिल्डिंग, चौथा मजला.. आल्याबरोबर पहाटेच्या प्रसन्न गारव्यामुळे अंगावर शिरशिरी येतेय. वर बघावं तर निरभ्र आकाश, चमचमणाऱ्या चांदण्या.. नुकताच रात्री पाऊस पडून गेल्याने स्वच्छ स्वच्छ झालेला परिसर.. सुस्नात झाडे, वेली. समोरचे झाड चांदणे पांघरून बसले आहे. समाधी मंदिराच्या शिखरावर चमचमणारी चांदणी. चंद्र ऐन भरात आलाय आता.. आणि अगदी समाधी मंदिराच्या शिखरावर. चंद्राभोवती खळे पडले आहे.

 एवढे सुंदर, प्रसन्न दृश्य पाहून आपल्याला राहवत नाही. आपण अलगद रूमचा दरवाजा ओढून घेतो. अंगावर बारीक स्टोल घेऊन पायाचा आवाज न करता तसेच अनवाणी जिना उतरून खाली जातो. मंदिरासमोरच्या कट्टयावर बसतो. सगळे जग साखरझोपेत आहे. रस्त्यावर चिटपाखरू नाही.  नाही म्हणायला एखादी मांजर तेवढ्यात दबकत जाताना दिसते. महाराजांच्या मंदिराचे दरवाजे बंद आहेत. पण आत समाधीपाशी एक मिणमिणता दिवा आहे. आता तुळशी वृंदावन, आईसाहेब मंदिरापर्यंत एक फेरी मारून यावी म्हणून आपण  उठतो. आणि एवढ्यात आपल्याला एक ओझरती आकृती गोशाळेकडे निघालेली दिसते  ... पाठमोरी ! अंगात कफनी , डोक्याला फेटा.. ! चक्क इतक्या भल्या पहाटे फिरणारे हे गृहस्थ कोण हे पाहण्यासाठी आपण झपझप जातो. आता जवळ गेल्यावर दिसते.. हातात चक्क माळ ही आहे.  बाजूने त्यांच्यासोबत चालणारे कुत्रेही दिसते. अरेच्चा... आता तर इथे आवारात सगळं निर्मनुष्य होते. लगेच कुत्रे कुठून आले? असा विचार आपण मनाशी करतोय तोच घोड्याच्या खिंकाळण्याचा ही आवाज येतोय. अरेच्चा.. एवढ्या रात्री घोडा कुठून आला? थोडं कानोसा घेऊन मागे वळून पाहिले तर बत्ताशा स्मारकाकडून आवाज येतोय. समोरील  व्यक्ती, त्याकडे पाहून  म्हणतेय, " हो रे, येतो रे बाबा.. तुला रपेट मारून आणल्याशिवाय तू शांत होणार नाहीस, माहित आहे मला! 

मी चमकले, हा आवाज कुणाचा?

"एवढ्या पहाटे कुठे निघाले? तुम्हालाही झोप येत नाहीये वाटते.. " आपले वाक्य पूर्ण होण्याच्या आत ते गृहस्थ मागे वळून बघतात. आणि काय सांगू! 

प्रत्यक्ष महाराज उभे समोर. आपण तोंडाचा वासलेला आ लवकर बंद होत नाहीये. भानावर येऊन आपण चटकन लोटांगण घालतो. 

"महाsssराज, तुम्ही? "

"जानकी जीवन स्मरण जय जय राम!, आशीर्वाद!  होय बाळ

न राहवून आपण विचारतो, " महाराज , कुठे निघालात?"

"बाळ, तुला माहित आहेच.  एकदा एक जीव हाताशी धरला कि त्याला मोक्षप्राप्ती होईपर्यंत मला त्याला सांभाळावे लागते. 

रात्रीच्या वेळी मला तुम्हा सर्वांचे सूक्ष्म देह तपासावे लागतात.  तुमच्या सूक्ष्म देहातील वासना कुठे अडकल्या आहेत याचे ज्ञान मला होते. . रोज रात्री इथे मुक्कामी आलेल्या समस्त जीवांसाठी मला या सगळ्या इमारती फिरून तपासणी करावी लागते. अगदी किडा मुंगी, पक्षी का असेना.. पण त्यांच्या पोटात दोन घास गेलेत की नाही, हे बघावं लागतं. इति महाराज! 

"बाळ मी आता गोशाळेकडे निघालो आहे. त्या गोमाता केव्हापासून माझी वाट बघत आहेत. तू तोवर ब्रम्हानंद मंडपात जप करत बस. नाहीतर चल माझ्यासोबत! दमदार पावले टाकीत महाराज पुढे निघतात. आपण ही संधी सोडतोय होय. आपणही श्रींच्या मागे मागे झपाझप निघालोय. त्यांच्या बरोबरीने पावले टाकण्याच्या नादात मागे पडतोय. आपण त्यांच्या मागे धावू लागतो. 


जसजसे गोशाळेच्या जवळ जातोय.. तसतसे गोशाळेत सुरु झालेली चलबिचल आपल्या कानावर येतेय. गायिंनी गोशाळेच्या दरवाजाकडे पाहून हंबरायला सुरुवात केली आहे. आपण पोहोचतो ना पोहोचतो तोच.. समोरच आपल्याला दिसते कि, सगळ्या गायी, खोंड महाराजांजवळ जाण्यास.. त्यांची एक कृपादृष्टी आपल्यावर पडावी म्हणून धडपडत आहेत. दावणीला बांधलेल्या गायीची हिसकाहिसकी सुरु आहे. महाराज प्रत्येकीजवळ जाऊन तिच्या अंगावरून हात फिरवतात. प्रत्येकीशी बोलतात. तिच्या गळ्याला खाजवतात. प्रत्येकीला वाटतेय.. आपल्या अंगावरून श्रींचा हात फिरावा.

कशी आहेस नंदिनी? बाळ झालं ना तुला? मला दाखवणार नाहीस? हसत हसत श्रीमहाराज एका गायीला विचारतात. 

ती डोळ्यात प्राण आणून तिच्याशी महाराजांनी बोलावं म्हणून वाट बघत असते तिला असे विचारताच.. अपार आनंदाने आणि आत्यंतिक प्रेमाने गळ्यातील घंटा वाजवत ती मानेने उजवीकडे दाखवते. महाराज तिच्या अंगावर थाप टाकतात.. तोच तिचे शरीर थरथरते. महाराज तिला नमन करून तिचे कौतुक करतात. 'गोंडस आहे हो तुझी पाडी! नाव काय ठेवायचे तुझ्या या छान छान लेकीचे? तिच्या कपाळावर हा गोल चांदवा आहे ना.. आपण तिचे नाव चांदणी ठेवूया का? नंदिनी होकारार्थी मान हलवते. 


पलीकडे गंगी मान फिरवून उभी होती.,.. जणू काही श्रीमहाराजांवर रुसली आहे.  "चारा खाल्ला की नाही गंगे आज?" काल मी नाही आलो म्हणून काय असं उपाशी राहायच का? " गंगीने एकदम त्यांच्याकडे बघून हंबरायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यात पाणी पाहून महाराजांची गहिवरून येतेय. "बाळ,असा फार काळ रुसवा धरू नये. असं म्हणत महाराजांनी तिला कुरवाळले" तिने डोके खाली घालून नकारार्थी मान हलवते आणि महाराजांच्या कुशीत डोके घालते.


असं एकूणएक गायीची चौकशी करून आता महाराज परत निघायला वळतात. पण गायी पुन्हा हंबरायला सुरुवात करतात. " अगं हो हो बायांनो. मी रोज येतोच इथे तुमची खबरबात घ्यायला. एखादे दिवशी परगावी जावे लागले तर उशीर होतो इतकेच! " महाराज त्यांना आश्वस्त करतात. 


आता महाराज आपल्याला म्हणतात, चल बाळ, निघूया! आपण त्यांच्यासोबत निघतो पण थोडे अंतर ठेवून. जाता जाता महाराज, कोठीघरामध्ये डोकावतात. सगळे काही धान्य, वाणसामान व्यवस्थित आहे हे बघून  'माझा बुवा इथे असल्यावर चिंता करण्याची गरज नाही." असे पुटपुटत समाधानाने मान हलवतात. 

आता समाधी मंदिरासमोरच्या कट्ट्यावर महाराज बसले आहेत. आपण महाराजांच्या पायाशी बसून त्यांच्या पायावर डोके ठेवत म्हणतो, "महाराज, आम्हाला काही उपदेश द्या. नामाबद्दल काहीतरी सांगा."

श्रींना गहिवरून येते. आवंढा गिळत ते आपल्या डोक्यावर हात ठेवत म्हणतात, "बाळ, मी आजवर नामाशिवाय काही बोललो नाही.माझी सेवा तुम्ही जी करता, ती आपल्या देहबुद्धीची करता. तुम्हाला जे पसंत पडेल, तसे तुम्ही करता. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे,सर्वांभूती भगवद्भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे,परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे. नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे." खरं सांगतो, एका नामाशिवाय तुमच्याकडून माझी काहीच अपेक्षा नाही, बरं बाळ! आनंदात राहावे .. मनापासून नाम घेत जावे व अंत:करण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा ; त्यानेच जगाचे कल्याण होईल ही माझी खात्री आहे! आता म्हण बरं माझ्यासोबत, " श्रीराsम जयराsम जय जय राsम" , श्रीराम जय राम जय जय राम " आपण त्यांच्यामागोमाग डोळे मिटून महाराजांचा आपल्या मस्तकाला झालेला स्पर्श आठवत म्हणतोय, " श्रीराम जयराम जय जय राम " डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. श्रीमहाराज आपल्या डोक्यावरून हात फिरवत बसून आहेत. किती वेळ झाला कुणास ठाऊक!

कानावर श्रींचा हळुवार आवाज येतो. "... आता प्रक्षाळ पूजेसाठी गुरुजी येतीलच.. वर्दळ सुरु होईल. मला निघायला हवं, बाळ !" एवढं बोलून महाराज प्रक्षाळपूजेसाठी समाधी मंदिराकडे निघतात. "जी महाराज ,जी महाराज ! " नकळत आपण चरणस्पर्श करतो. 

आपण भारावल्यासारखे तिथेच बसून आहोत. समोरून गुरुजी हातात ताम्हण घेऊन लगबगीने समाधी मंदिराकडे जातांना दिसतात. 

आपण भानावर येतो अन् वेड्यासारखे " महाराज... महाराज" म्हणत ते गेले त्या दिशेला धावतोय. महाराज संथपणे समाधीमध्ये विलीन होतांना दिसत आहेत. पाठोपाठ धीरगंभीर आवाज " श्रीराम जयराम, जय जय राम, श्रीराम जयराम जय जय राम !' 

आवाज टिपेला...  संपूर्ण समाधी मंदिर भरून.. मंदिराच्या कळसातून प्रक्षेपित होतोय. अन आता संपूर्ण आसमंत.. सगळे सजीव निर्जीव म्हणत आहेत, श्रीराम जयराम जय जय राम ! 

 

जय श्रीराम! 


` महाराज कन्या नयना

Wednesday, September 10, 2025

चिकाटी

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


   *तपस्या , योग , ध्यान हे केल्याने भगवंत प्राप्ती होईल पण नाम घेत घेत सेवा केल्यानं भगवंत लवकर भक्तांच्या अधीन होतो. आपला अहंकार आपल्याच नकळतपणे कमी होतो व श्रीमहाराजांवर आपोआप प्रेम जडते. अपरिमित आनंद मिळतो , असिम आत्मशांती मिळते व अंत:करण स्वच्छ होते. पूर्वी गुरुकुलामध्ये आश्रमात असताना भगवान श्रीराम वशिष्ठ मुनींच्या व भगवान श्रीकृष्ण स्वतः जंगलात जाऊन लाकडे तोडून त्याची मोळी करून सांदिपनी ऋषींच्या आश्रमात घेऊन येत. राजसूय यज्ञात तर भगवंतांनी सर्व साधू संतांची उष्टी खरकटी काढली याहून सेवेचे दुसरे अनन्य साधारण महत्व ते काय असणार ?*

     *सेवा तीन प्रकारची असू शकते. मानसिक , शारीरिक व वित्त सेवा. सेवेच्या व्यतिरिक्त जेवढे मार्ग आहेत ते सर्व लौकिक मार्ग आहेत. झाडांच्या मुळांना पाणी घातले की ते जसे पाने फुले इ. पर्यंत पोहचते तसे एक गुरुची सेवा केली की सर्व चराचराची सेवा केल्यासारखे होते.‌सेवेमध्ये सातत्य , प्रयत्न आणि चिकाटी असणे अत्यंत जरुरी आहे.*


*लेख - गुरूगृही सेवा - आनंदाचा ठेवा*

*श्रीमहाराजांचा सेवेकरी*

Tuesday, September 9, 2025

अंत:करण

 गोंदवले येथे श्री. गोपाळ स्वामी नावाचे एक शिक्षक होते. त्यांना झोप फार येत असे. त्यांनी तसे श्रीगोंदवलेकर महाराजांना सांगितले. श्रीमहाराज त्यांना म्हणाले ही रामरायाची कृपाच आहे. जागेपणी काहीतरी करण्याने अनेक प्रश्न उभे राहतात  त्यापेक्षा स्वस्थ झोपलेले बरे नाही का ? पुढे हेच गोपाळ स्वामी गोंदवले आश्रमात कोठीचे काम पाहात असत. त्यांचा हात आखडता होता. 

श्रीमहाराज त्यांना म्हणाले गुरुजी रामराय एवढे देतोय, आपण हात आखडता का घेता? त्यावर गोपाळ स्वामी त्यांना म्हणाले येथे लोक इंद्रियदमन करण्यासाठी येतात. थोडे कमी खाल्लेले बरे. त्यावर श्रीमहाराज म्हणाले गुरुजी आईला लेकराला अजीर्ण झालेले चालते पण लेकरू उपाशी राहिलेले पहावत नाही. तशी माझी स्थिती होते. रामनवमी उत्सव गोकुळाष्टमी उत्सव झाला की मंडळी घरी जायला निघायची. 

 ते निघाले की महाराजांचे अंत:करणं जड होई. त्यावर एकाने विचारले महाराज आपले एवढे अंत:करणं जड का होते? त्यावर ते म्हणाले मुलीचे लग्न करून द्यावेव त्या मुलीचा नवरा बदफैली निघावा. चार दिवस मुलगी माहेरी येते. आनंदात असते.

 घरी जायला निघते त्यावेळी तिच्या आईला ज्या वेदना होतात ना तसेच मला होते. प्रपंच म्हणजे त्या बदफैली नवऱ्यासारखा आहे. म्हणून ते प्रपंचात पुन्हा जातात म्हणूनच माझे अंत:करण त्या मातेप्रमाणे जड होते.

Monday, September 8, 2025

परमार्थ

 वस्तूत: आपण आत्मरुप आहोत. पूर्ण आहोत. हा पूर्णतेचा मार्ग फक्त परमार्थ दाखवतो पण सहसा हा मार्ग कोणी चोखाळत नाही. जगाकडे उदासीन वृत्तीने पाहणारा आणि आत्मदर्शन देणारा हा मार्ग फार थोड्या लोकांना भावतो. या मार्गाचे अधिकारीही थोडेच असतात. त्यामुळे परमार्थ मार्गावरून वाटचाल करणारा साधक एकटा पडण्याची शक्यता असते. त्याच्या घरातील, सभोवतालचे लोक जर त्याच्या मताशी सहमत नसतील तर तो खरोखरच खूप एकटा पडतो. त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या संबंधी काळजी वाटते. 

परमार्थ मुळे संसार करण्यात हा कमी पडणार तर नाही ना , अशी चिंता त्यांना वाटते. त्यामुळे परमार्थाच्या विरोधाला सुरुवात होते म्हणून परमार्थी होणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे होय. वास्तविक परमार्थी माणूस इतर संसारी लोकांसारखे जीवन जगत असतो. प्रारब्धानुसार प्राप्त होणारे सुखदुःख भोगत असतो. फरक इतकाच त्याची जीवनाकडे बघण्याची  दृष्टी बदललेली असते.

Sunday, September 7, 2025

संतवचनांवर श्रद्धा

 चिंतन 

             श्रीराम,

                परमार्थाचा अभ्यास करताना मला मनापासून हा अभ्यास करायचा आहे का? असा विचार आधी करायचा. त्याचे उत्तर जर हो असेल तर मग यासाठी मनाचा अत्यंत दृढ निश्चय करावा लागतो. कारण या निश्चयावरच पुढील सर्व गोष्टी आधारभूत असतात. परमार्थाच्या अभ्यासातून काय मिळते? श्री समर्थ दासबोधात अत्यंत विश्वासाने सांगतात की, या अभ्यासाने निरपेक्ष आनंदाची प्राप्ती होते. मन शांत, तृप्त, निर्भय होते, समाधानी बनते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जो काही पुस्तकी अभ्यास करतो, वाचतो, मनन करतो त्याप्रमाणे जर प्रत्यक्षात आचरण केले तर अंतर्यामी विवेक उत्पन्न होतो. त्याने व्यवहारात चातुर्याने व प्रसंग पाहून कसे वागावे ते समजते. दुसऱ्यांची लबाडी ओळखण्याइतकी धूर्तता अंगी येते. सूक्ष्म विचार करता येतो. वेळ प्रसंग जाणता येतो. कोणतेही चांगले कार्य करण्यास आपले मन तत्पर व उत्साहाने भरलेले रहाते.

                   अत्यंत महत्त्वाचे म्हणजे प्रपंचातील कोणतेही कार्य करीत असताना ते मन कशातही गुंतून न राहता निर्लेपपणे राहू शकते. त्यामुळे संसारातील दुःखाचे व निराशेचे अनेक प्रसंग लोप पावतात.. पण हे सगळे तेव्हाच शक्य होते जेव्हा परमार्थाचा अभ्यास करण्यासाठी आपली मानसिकता अत्यंत सकारात्मक आणि संतवचनांवर श्रद्धा ठेवणारी असेल.

                          ||श्रीराम ||

Saturday, September 6, 2025

एक व्याख्या

 संन्यासाची एक व्याख्या आहे ' शरण्यास ' म्हणजे सहा विकार आहेत विकार सोडून देणे. त्यांना नाहीसे करणे हा संन्यास आहे. काही लोक " हम संन्यासी है" म्हणून मिरवतात पण ते संन्यासी नव्हेत. त्यांनी फक्त संन्यासाची वस्त्रे घातलेली असतात. तर हा वृत्तीचा संन्यास आहे. संन्यास म्हणजे सोडणे. तर जे भगवंताच्या आड येतं ते निश्चयाने सोडण हा संन्यास आहे.

 आपले म्हणावे तसे नामस्मरण जमत नाही कारण आपण संन्यासी नाही. आपली वृत्ती सर्व ठिकाणी चिकटलेली आहे. इथे योग आणि संन्यास या मध्ये फरक नाही. योग म्हणजे जोडणे. ज्याचा जीव भगवंताशी कायमचा जोडला आहे तो योगी. योग काय शिकवतो. तर " जीव परमात्म्याशी ऐक्य करी." योग गुरू शिकवितो ना मग तो काय करतो तर भगवंताला आणि शिष्याला जोडून देतो. या संदर्भात पू.श्री.रामकृष्ण यांनी सुंदर दृष्टांत दिला. " गंगेमध्ये एखाद खूप मोठं जहाज असतं , त्या जहाजाला लहान लहान होड्या बांधलेल्या  असतात. 

ते जहाज जस जातं तशा त्या होड्या त्याच्या बरोबर जातात. तसं मग गुरू हा मोठं जहाज आहे. त्याला तुम्ही आपली लहान होडी बांधलीत की तो आपल्याला आपोआप घेऊन जातो. हा योग खरा. तेव्हा योगामध्ये परमेश्वराला चित्त जोडणं हा जर प्रमुख अर्थ असेल तर संन्यास आणि योग यात फरक नाही.

प्रपंच

 गोंदवले येथे श्री. गोपाळ स्वामी नावाचे एक शिक्षक होते. त्यांना झोप फार येत असे. त्यांनी तसे श्रीगोंदवलेकर महाराजांना सांगितले. श्रीमहाराज त्यांना म्हणाले ही रामरायाची कृपाच आहे. जागेपणी काहीतरी करण्याने अनेक प्रश्न उभे राहतात  त्यापेक्षा स्वस्थ झोपलेले बरे नाही का ? पुढे हेच गोपाळ स्वामी गोंदवले आश्रमात कोठीचे काम पाहात असत. 

त्यांचा हात आखडता होता. श्रीमहाराज त्यांना म्हणाले गुरुजी रामराय एवढे देतोय, आपण हात आखडता का घेता? त्यावर गोपाळ स्वामी त्यांना म्हणाले येथे लोक इंद्रियदमन करण्यासाठी येतात. थोडे कमी खाल्लेले बरे. त्यावर श्रीमहाराज म्हणाले गुरुजी आईला लेकराला अजीर्ण झालेले चालते पण लेकरू उपाशी राहिलेले पहावत नाही. तशी माझी स्थिती होते. रामनवमी उत्सव गोकुळाष्टमी उत्सव झाला की मंडळी घरी जायला निघायची.  ते निघाले की महाराजांचे अंत:करणं जड होई. 

त्यावर एकाने विचारले महाराज आपले एवढे अंत:करणं जड का होते? त्यावर ते म्हणाले मुलीचे लग्न करून द्यावेव त्या मुलीचा नवरा बदफैली निघावा. चार दिवस मुलगी माहेरी येते. आनंदात असते. घरी जायला निघते त्यावेळी तिच्या आईला ज्या वेदना होतात ना तसेच मला होते. प्रपंच म्हणजे त्या बदफैली नवऱ्यासारखा आहे. म्हणून ते प्रपंचात पुन्हा जातात म्हणूनच माझे अंत:करण त्या मातेप्रमाणे जड होते.

Friday, September 5, 2025

अंतःकरण

 संत ब्रदर लॉरेन्स पुढे म्हणतो " देवावरील श्रद्धेतून जन्मलेली उदात्त कल्पना आणि जाणीव ही माझ्या पारमार्थिक जीवनाची आधारशीला आहे. एकदा ही कल्पना आत्मसात झाली की तिला निश्चयपूर्वक चिकटून राहणे येवढेच आपले काम. अधूनमधून देवाचे चिंतन केल्याशिवाय जर बराच काळ गेला तर त्यामुळे अस्वस्थ न होता मी आपल्या चुकीची सरळ कबुली देई व पुनः नव्या विश्वासाने देवाकडे आपले मन वळवीत असे. 

आता माझी अशी अवस्था झाली आहे की ईश्वरापलीकडे कुठलाही विचार माझ्या मनाला शिवत नाही. कुठलेही काम प्रत्यक्ष करण्याची वेळ आली म्हणजे देव माझा मार्गदर्शक होतो आणि ते काम कसे करायचे ही गोष्ट मला आरशाप्रमाणे लक्ख दिसू लागते. अगदी सरळ मनाने मी कुठलेही काम करतो. माझ्या कामात अडचणींची कल्पना केली तर त्या खात्रीने येतात असा माझा अनुभव आहे. 

देवापुढे पूर्ण शरणांगती पत्करणे हा सर्वात खात्रीचा मार्ग आहे. पूर्ण निष्ठा आणि आपल्या स्वतःच्या इछा यांचा त्याग ही पारमार्थिक जीवनाची प्राथमिक गरज आहे. अंतःकरण प्रभूच्या प्रेमाने तुडुंब भरलेले असावे."

Thursday, September 4, 2025

सात्विक जीवन

 *श्रीराम समर्थ*


         गीतेमध्यें भगवंतांनी नामाला यज्ञ म्हटलें आहे. त्यास यज्ञ म्हणण्यात फारच मोठा अर्थ भरला आहे. यज्ञामधें फारच मोठें दान करावे लागतें. त्याच प्रमाणे अतिशय व्रतस्थ राहावें लागते. माझे म्हणणे असे कीं आपण आपल्या नामस्मरणासाठीं आपल्या फालतू आशा आकांक्षांचे भगवंताला दान करुन टाकावें. आणि यज्ञकर्ता जसा व्रतस्थ राहतो तसें आपण अतिशय पवित्र व सात्विक जीवन जगावें. एकच सांगावेसे वाटते की आपल्याला ज्या गोष्टींची अत्यंत हौस असते व जिच्यामध्यें आपले मन सहज रमते आणि जिच्यामुळें जगांत आपल्याला महत्व येते - ती भगवंताला देऊन टाकणे याचे नांव दान होय. असे दान दिल्यावर भगवंताच्या नामाचे प्रेम मागे लागेल.

          ---------प.पू. बाबा बेलसरे


               *********


संदर्भः पत्रांद्वारे सत्संग हे त्यांचेच पुस्तक


*संकलनःश्रीप्रसाद वामन महाजन*

Wednesday, September 3, 2025

अनुभव

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


              *गाढ झोपेतही आपल्या हृदयाचे स्पंदन चालू रहाणे, श्वासोछ्वास चालू रहाणे, पचनक्रिया चालू रहाणे, खाल्लेल्या अन्नाचे रक्त निर्माण होणे, पृथ्वीतलावर पाणी निर्माण होणे, शरीरांतर्गत सर्व इंद्रियांनी शिस्तपूर्वक कामे करणे, अंतराळांतील प्रत्येक ग्रहगोलांनी भ्रमणकक्षा सांभाळणे, फुलांमध्ये सौरभ निर्माण होणे, बीजातून वृक्ष निर्माण होणे, पिलासाठी आधीच चाऱ्याची सोय निर्माण होणे, एवढ्याशा स्वरयंत्रातून अब्जावधी वेगवेगळे ध्वनी निर्माण होणे, दोन डोळे,दोन कान, एक नाक, दोन ओठ यातून निर्माण होणाऱ्या अवयवांतून एवढ्या विविधता निर्माण होणे, मेंदूत लक्षावधी आठवणी मुद्रित होणे, एकदा चालू झालेले हृदय शंभर वर्षे सुध्दा दिवसरात्र अविश्रांत स्पंदत रहाणे, बोललेल्या स्वरांचे ऐकणाऱ्याच्या मेंदूत बरोबर अर्थ उमजणे, सर्वत्र परमेश्वराची सत्ता जाणवते. परमेश्वर पहायचा नाही, ऐकायचा नाही, फक्त असा अनुभवायचा. अहंकार सोडून, निगर्वी होऊन आणि निःशंकपणे. म्हणजे मग आपला खरा स्व सदैव प्रगतिपथवार राहतो. "जयाच्या बळे चालतो हा पसारा। नमस्कार त्या ब्रह्मतत्वा अपारा ।।"*


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Tuesday, September 2, 2025

गुरु शोधार्थ

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

               भाग - ३.

              एकदा गणू बाळाने रांगत जाऊन देवघरातले सगळे देव खाली घेतले. त्याची आजी राधाबाई म्हणाल्या, अरेऽ गणूऽ!  हे काय केलंस? आता याच्याकडे लक्ष ठेवायला हवे. गीताबाई मनात म्हणाल्या, अरेऽ! तू तर देवच हाती घेतलेस. हरिपाठात म्हटल्याप्रमाणे....

 " करतळी आपले, तैसा हरी।"

        देवाला हातात घेणारा हा मोठा संत होणार की काय? मनोमनी त्या सुखावल्या.

           गणू  पाच वर्षाचे झाले. त्यांना भजन, कीर्तन फार आवडायचे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात हे अगदी खरे वाटले. गणू आजोबांजवळ झोपत असे. ते त्यांना अभंग म्हणून दाखवत. भजनात त्यांचे बरोबर गणूही बेभान होऊन नाचत असे. एवढ्या लहान वयात गणूची भक्ती पाहून सर्वांना कौतुक वाटायचे.

           नेहमीप्रमाणे गणू त्या दिवशी आजोबांसोबत झोपले होते. मध्यरात्री लिंगोपंतांना जाग आली. पाहतातत तो गणू अंथरुणावर नाही. ते फार घाबरले. घरात, बाहेर, सगळीकडे सर्वजण बाळाचा शोध घेऊ लागले. पण बाळाचा पत्ता नाही. सगळेजण चिंतेत पडले. कुठे गेला असेल?  नाना तर्‍हेचे विचार मनात येत होते. " मन चिंती ते वैरी ना चिंती"!, भीतीने सर्वांच्या जीवाचा थरकाप उडाला होता. शोधत शोधत लोक नदी किनारी गेले. तो तिथे स्वारी पद्मासनात मांडी घालून समाधी लावून बसलेली दिसली. बाळाला घेऊन लोक घरी आले. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला.

       लिंगोपंत, रावजी आणि गीतामाई मनी उमगल्या, हे काम काही न्यारेच आहे. गणूच्या भविष्याची चुणूक तेव्हाच थोडीशी लागली होती.

          एकदा आजोबा लिंगोपंतांनी गणूला विचारले, गणू! तुला जर मोहरांनी भरलेला हंडा मिळाला तर तू काय करशील? गणूने चटकन उत्तर दिले, मी गोरगरीब, आंधळ्या पांगळ्यांना वाटून देईल. बरे, आणि तुला राजा केले तर? गणू म्हणाले, सर्वांना सुखी करेल. राज्यात एकही गरीब, भिकारी राहणार नाही असे करेन.लिंगोपंतांना ऐकून फार आनंद झाला.

            गणू शाळेत जाऊ लागले. मौजी बंधन झाले. पवमान, रुद्राचे शिक्षण झाले. शिक्षकांनी सांगितलेला शाळेतला सर्व अभ्यास झाला की, गणू मुलांना घेऊन शाळा बाहेर जाई. तीन दगड मांडे. एका काठीची एकतारी करी. व  भजन म्हणे. ते तीन दगड म्हणजे राम , लक्ष्मण, सीता. त्या दगडांसमोर बरोबरची मुलंही भजनात गुंग व्हायची. " श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।।" मुले इतके मग्न व्हायचे की त्यांना वर्गात जायचे भान राहायचे नाही. वर्ग ओसस पडायचे. एकदा शिक्षक रागावले. म्हणाले, अरेऽ! अशाने माझी नोकरी जाईल ना?

         शाळेच्या तक्रारी, चिंचा, बोरे पाडण्याच्या तक्रारी गणू विरुद्ध आजोबांकडे येऊ लागल्या. गणूचे लक्ष शाळेत लागत नाहीसे पाहून, त्यांनी गणूला गुरे राखण्याच्या कामावर पाठवले. आता तर काय, गणूला रानच मोकळे झाले. रामनामाला जोर चढला. मनात सतत भगवंताचे विचार चालू असायचे. देव कसा असेल? तो केव्हा व कधी, कसा भेटेल? खरच भेटतो का? कोणाला भेटला आहे का? अशाच विचारांनी गणू दिवसेंदिवस अंतर्मुख होत चालले होते.

          आठ नऊ वर्षाचे झालेल्या गणूंना एकच ध्यास लागला होता. जगाचा नियंता देव कसा असेल? कसा भेटेल? भेटलाच तर काय सांगावे? गणू रात्रंदिवस विचार करत होते. भजन केल्याने, यज्ञ याग केल्याने, व्रतवैकल्य केल्याने देव भेटेल का? की भगवे वस्रे घातल्याने देव भेटेल? गणूच्या बालमनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली होती.

           आणि एकदा रामदासांचे एक शिष्य रामदासी मारुती मंदिरात उतरले होते. भगवे कपडे, वाढलेली दाढी, केसांच्या जटा, हातात कुबड्या, गळ्यात माळ होती. गणूने मनी विचार केला, यांना देव भेटला असेल का? गणूने त्या रामदासींना विचारले, महाराज! एक प्रश्न विचारु का? बुवांचा होकार आल्यावर, गणूने विचारले, तुम्हाला देव भेटला का? या भगव्या कपड्यांनी देव भेटतो का?

          त्या लहानग्या गणूची कळकळ पाहून, बुवा म्हणाले, नाही रे बाळा! या भगव्या कपड्याने, दाढी वाढवल्याने देव नाही रे भेटत. अरेऽ, गुरु शिवाय देवाचे ज्ञान होत नाही.  त्यासाठी सद्गुरु करावा लागतो. ऐकून गणूला आनंद झाला. आणि गणू गुरु चिंतनाला लागले.

          कुठे शोधावा गुरू? कोणाला विचारावे तर, धड कोणी उत्तर देईना. काय करावे? कसे करावे? गणूचे चुलत भाऊ दामु व मित्र वामन यांचे बरोबर गुरु शोधायची चर्चा झाली. गुरूचा शोध आपण घ्यायचाच. शेवटी ठरले की, कुणालाही न सांगता गुरु शोधार्थ निघायचेच!

          क्रमशः

संकलन लेखन,

 मिनाक्षी देशमुख.