TechRepublic Blogs

Wednesday, May 14, 2025

शबरी

 *प्रभु येणार....*

*शबरीकडून आपण काय बरे शिकू शकतो?*



रामायणातील *शबरीची* व्यक्तिरेखा म्हणजे अमर्याद आणि विनम्र भक्तीचे मूर्त रूपच. 


*शबरी* ही भिल्ल समाजातील एक सामान्य स्त्री. धर्माच्या प्राप्तीसाठी ती अरण्यात गेली, जिथे मातंग ऋषींनी तिचा शिष्या म्हणून स्वीकार केला. ऋषींनी तिला मंत्र दिला. प्रभू श्रीरामांचे दर्शन होईल म्हणून आशीर्वादही दिला. मातंग ऋषींचे शबरी व्यतिरिक्त अन्य शिष्यही होते. परंतु शिष्य म्हणून आपल्याला शबरीचेच नाव माहित आहे! तिच्या गुणवैशिष्ट्यांनी ती इतर सर्वांहून श्रेष्ठ ठरली.


*शबरीकडे* होती अमर्याद चिकाटी आणि गुरूंच्या शब्दांवर अढळ श्रद्धा. शबरीची चिकाटी इतकी अमर्याद होती की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी केलेल्या अखंड प्रतीक्षेला शबरीचे रूपक म्हणून वापरले जाते. 


*शबरीचे आयुष्य पाहा,* 

दिवसांमागून दिवस आणि वर्षामागून वर्षे अशी तब्बल ४० वर्षे तिने प्रभू रामचंद्रांची चिकाटीने प्रतीक्षा केली. हे खरोखरच विस्मयजनक आहे. प्रत्येक दिवशी शबरी श्रीरामांचा येण्याचा मार्ग स्वच्छ करून फुलांनी सुशोभित करीत असे. श्रीरामांसाठी मधुर बोरे गोळा करून दिवसभर त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत असे. हे तिने जवळजवळ ४० वर्षे केले आणि प्रत्येक दिवशी तेवढ्याच उत्साहाने !


'सहसा जेव्हा आपण आध्यात्मिक साधनेची सुरुवात करतो,तेव्हा काही महिन्यानंतरच किंवा फार फार तर काही वर्षांनंतर आपली सहनशीलता संपते. साधना करूनही अजून काही प्रचिती येत नाही अशी तक्रार आपण गुरूंकडे करतो. क्वचित प्रसंगी किंवा बहुतांशी आपण साधना करणेच सोडून देतो अथवा आपल्या साधनेतील उत्साह संपुष्टात येतो. ज्या जोमाने आपण साधनेला सुरुवात केलेली असते तो काही काळातच ओसरतो. याचे मुख्य कारण म्हणजे चिकाटीची कमतरता आणि गुरुंवरील श्रद्धेचा अभाव.'



शबरीची गुरुवरील श्रद्धा आयुष्यभर अविचल राहिली आणि त्याचबरोबर तिची अमर्याद चिकाटी सुद्धा! त्यामुळेच ती तिचे ध्येय अर्थात प्रभू दर्शन प्राप्त करून घेऊ शकली. अखेरीस ४०वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीराम लक्ष्मणासोबत तिच्याझोपडीत आले. तिची मनोकामना पूर्ण झाली. तिच्या गुरूंच्या शब्दांची पूर्तता झाली. तिची साधना सफल झाली!


*आपण तिच्याकडून काय बरे शिकू शकतो?*


ध्येयप्राप्तीसाठी आपल्याकडे सहनशीलता आणि चिकाटी हे गुण असणे आवश्यक आहे. निराश न होता हाती घेतलेल्या कार्याची पूर्ती आपण या गुणांमुळे करू शकतो. म्हणूनच जेव्हा आपले गुरु अथवा शिक्षक काही कामगिरी आपल्यावर सोपवितात, तेव्हा ती आपल्या आवडीची असो अथवा नसो, त्याचा परिणाम आपल्याला लगेच मिळो अथवा न मिळो, आपण ते कार्य पूर्ण श्रद्धेने व चिकाटीने करणे आवश्यक आहे.

भविष्यात आपल्याला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही.

No comments:

Post a Comment