*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌷 रामेश्वरचा यात्रेकरी 🌷*
*श्रीमहाराज तेथून निघाले आणि श्रीसमर्थांच्या दर्शनास सज्जनगडावर गेले. तेथे त्रिरात्र राहून ते पुढें रामेश्वराच्या वाटेला लागले. रामेश्वराला जाऊन परत येहळेगांबाला येण्यास त्यांना बरेच दिवस लागले. वाटेंत तिरुपतीला व्यंकोबाचे दर्शन घेऊन श्रीमहाराज जेव्हां खालीं आले तेव्हां रस्त्याच्या कडेला एक रोगी भिकारी पडलेला त्यांना आढळला. त्याच्या जवळ जाऊन श्रीमहाराजांनीं त्याला उठवून बसवलें, आणि खायलाप्यायला घातल्यावर 'तुझी अशी अवस्था कां झाली ?' हा प्रश्न त्याला विचारला, त्यानें आपली हकीकत सांगितली ती अशी :*
*"मी रेड्डी असून माझी मातृभाषा तेलंगी आहे. मी एका मोठ्या जमीनदाराचा मुलगा. मी एकुलता एक होतों म्हणून माझ्या आईबापांचें माझ्यावर अतिशय प्रेम होतें. या प्रेमामुळे माझे लाड फार झाले. पण या लाडांच्या पायीं मला अनेक त-हेच्या वाईट संवयी लागल्या. मी मोठा झाल्यावर त्यांमध्यें व्यसनांची भर पडली. माझी आई होती तोंवर सगळे नीट चाललें; परंतु मी तीस वर्षांचा असतांना ती बारली आणि माझ्या बापानें दुसरें लग्न केलें. माझी नवीन आई घरांत आल्यावर सगळीच परिस्थिती बदलून गेली. ती माझ्या अत्यंत द्वेष करी. मी घराबाहेर पडावें असा तिचा सारखा प्रयत्न सुरू झाला. कर्मधर्मसंयोगानें याच सुमारास मला उपदंश झाला आणि माझें अंग सगळीकडे फुटलें. मी फार आजारी पडलों आणि मला उठण्याचीहि शक्ति राहिली नाहीं. परंतु लहानपणापासून मला सांभाळणारा एक म्हातारा व प्रामाणिक गडी आमच्या घरीं होता. त्यानें अगदीं मनापासून माझी शुश्रूषा केली. औषधपाणी चालू होतें, तरी माझ्या रोगामध्यें कांहीं सुधारणा होईना. उलट, दिवसेंदिवस मी खंगतच चाललों. माझ्या नव्या आईला तर मी म्हणजे नसती पीडाच वाटत होती. म्हणून माझ्या अन्नांत विष कालवून माझा निकाल लावावा असें एक दिवस तिनें ठरवलें, पैशाच्या जोरावर माझ्या वृद्ध गड्याला वश करून घेण्याचा डाव तिनें रचला. ही गोष्ट गड्यानें माझ्या कानावर घातली तेव्हां पहिल्यानें मी अत्यंत घाबरलों, पण कांहीं वेळानें एक विचार माझ्या मनांत आला आणि मी शांत झालों. लहानपणापासून श्रीरामेश्वरावर माझे फार प्रेम आहे. मी असा विचार केला कीं, 'आजपर्यंत या जगांतली सर्व उत्तम सुखें त्याच्या कृपेनें मी भोगलीं. आतां त्याच्याजवळ मागण्याचें असें मला आणखी कांहीं उरलेलें नाहीं. एकच आतां वाटतें, तें हैं कीं, आपलें शरीर अंतकाळीं त्याच्या चरणावर जाऊन पडावें.' म्हणून, 'मला उचल आणि रामेश्वराच्या वाटेवर नेऊन ठेव' असें मी माझ्या गड्याला सांगितलें. त्याप्रमाणें मध्यरात्र झाल्यावर त्यानें मला आपल्या पाठीवर घेतलें आणि रस्त्यावर आणून ठेवलें. मोठ्या कष्टानें त्यानें माझा निरोप घेतला. त्या दिवसापासून मी अखंड नामस्मरण करतों; कुणालाही कांहीं मागत नाहीं, यदृच्छेनें जें मिळेल तें खाऊन मी जगतों; माझ्या शक्तीनें जाववेल तितकी रामेश्वरची वाट रोज चालतों. सध्यां मी येथपर्यंत आलों आहें, पुढें काय होणार आहे तें रामेश्वर जाणें. परंतु या अवस्थेंतदेखील मी आनंदांत आहे."*
*भिकाऱ्यानें सांगितलेली ही हकीकत ऐकून श्रीमहाराजांना आणि त्यांच्या बरोबरच्या चार बैराग्यांना त्याचें फार कौतुक वाटलें, श्रीमहाराज त्याला म्हणाले, "श्रीरामेश्वराच्या दर्शनाची तूं काळजी करूं नकोस. आम्ही तुला रामेश्वरला घेऊन जाऊं. तूं नामस्मरण तेवढे कर." त्याला उचलून नेण्यासाठीं श्रीमहाराजांनी एक झोळी तयार केली, व ती एका मोठ्या बांबूला अडकवली. पाळीपाळीनें दोघेदोघेजण बांबू खांद्यावर घेऊन त्याला नेऊ लागले. अशा रीतीनें कांहीं दिवसांनीं तो भिकारी रामेश्वरला पोंचला. तेथे गेल्यावर श्रीमहाराजांनीं त्याला चांगलें स्नान घातलें आणि देवदर्शनासाठीं मंदिरामध्यें नेलें, श्रीरामेश्वराला आपल्या प्रिय दैवताला - समोर पाहिल्यावर त्याला इतका आनंद झाला कीं, त्यावेळीं त्याच्या तोंडून तेलुगु भाषेत एक सुंदर पद बाहेर पडलें, आणि त्यानें देवाच्या पायावर डोके टेकलें तें पुन्हां वर उचललेंच नाहीं. श्रीमहाराजांनीं त्याला वाळवंटावर नेलें आणि स्वतः आपल्या हातानें यथाविधि अग्नि दिला.*
- *चरित्र*
No comments:
Post a Comment