*"पहिल्या दालनापर्यंत..."*
आपल्या भारतवर्षात *महर्षी शांडिल्य* एक थोर ऋषी म्हणुन मानले गेले. त्यांचा *"शांडिल्यभक्तिसूत्राणि"* हा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे.
*सर्वज्ञान* मिळवण्याच्या आशेने त्यांच्या आश्रयी आलेले त्यांचे अनेक शिष्य होते. सर्वज्ञान मिळवून देण्यासाठी ते नेहमी महषींना विनंती करीत असत.
पण महर्षि शांडिल्यांच्या मते ती वेळ अजुनी आलेली नव्हती. सर्वज्ञानाचा साक्षात्कारी अनुभव मिळविण्यासाठी बरीच तपश्चर्या करण्याची तयारी लागते, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे ते आपल्या शिष्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून तो दिवस लांबणीवर टाकत असत.
त्यामुळे शिष्यगणात नाराजी पसरू लागली होती आणि सारे आतुर होऊ लागले होते. उतावळे होऊनच मग त्यांनी शेवटी महर्षींना विचारले की ते तो अनुभव लवकर का घडवून आणत नाहीत ?
“वत्स हो, सर्वज्ञानाची अनुभूती ही काही साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी माणसाला खूप पूर्वतयारी करावी लागते. त्यापूर्वीच जर तुम्ही तो अनुभव घेतला तर तो तुम्हाला झेपणारच नाही. तुम्हाला त्यापूर्वी बरीच साधना करावी लागणार आहे, गुरुदेवांनी उत्तर दिले."
“पण आजवर आम्ही काय कमी साधना केली ? शिवाय तुम्ही आम्हांला सांगितलं होतं की ज्ञानाच्या मार्गाने गेलात की दिव्य सर्वज्ञानाचा साक्षात्कार होईलच.आजवर तुमच्याकडून आम्ही इतके ज्ञान मिळविले. आम्ही तयार झालो आहोत. मग तो दिव्य साक्षात्कार का घडवून आणत नाही?”
एका धीट शिष्याने विचारले.
“असे? तुम्ही तयार आहात का? अंतिम सत्याचा साक्षात्कार घेण्याएवढे ज्ञान तुम्ही प्राप्त केलेत का इतक्यात?” गंभीरपणे मंद हास्य करीत महर्षी उद्गारले. मग थोडा काळ मूक राहून ते पुढे म्हणाले,
“तुमच्या मागणीतून अहंभाव आणि
उतावीळपणाचा गंध येतो आहे. आणि तुमच्या आविर्भावात प्रेम आणि श्रद्धा यांचा अभावच दिसून येतो."
“पण मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो. तेव्हा तुमच्या मागणीला नकार देणे मला कठीण वाटते. मी असे करेन. तुम्हा सर्वांना तुमच्या लायकीनुसार त्या अंतिम सत्याची एक झलक दाखवू शकेन. चला, सर्वजण डोळे मिटून घ्या.”
डोळे मिटताच गुरुदेवांच्या कृपेने काही क्षणातच सर्व शिष्यांना आपण अवकाशात तरंगत गेल्याचा अनुभव आला.तसेच अलगद तरंगत ते एका थोरल्या भव्य कमानीपर्यंत पोहोचले. कमानीचा दरवाजा त्यांच्या स्वागतासाठी हळुवार उघडला आणि गुरुदेवांचा आवाज आकाशवाणीसारखा आला,
"वत्स हो! अंतिम प्रकाशमान सर्वज्ञानाच्या आवारात तुमचे स्वागत असो. तुम्ही आत या आणि तुमचा प्रवास चालू राहू द्या.”
कमानीच्या आत शिरताच एका अनाकलनीय अद्भुत विश्वात शिरल्याचा भास सर्वांना झाला. त्या विश्वातून तरंगत ते सर्व एका नव्या भव्य कमानीच्या बंद दरवाजासमोर पोहोचले. त्यांच्या नजरेसमोर हा दरवाजादेखील उघडला, पण त्यातून आत शिरल्यावर एका काळ्याकभिन्न अंधाराने त्यांचे स्वागत केले. चोहोबाजूंना पाहावे तर काहीच दिसू शकत नव्हते! त्यातून वाट चुकून ते सर्व धडपडू, अडखळू लागले. त्यांचा सर्व आत्मविश्वास आणि त्यांचे धैर्य त्या अंधारात वितळून जाऊ लागले. त्या विस्तीर्ण अंधकाराचा जोर सहन न झाल्याने शेवटी सारे शिष्य एक सुरात ओरडले,
“गुरुदेव, आम्हाला वाचवा. आम्ही कुठे आहोत, आम्हाला कुठे जायचे आहे, काही कळत नाही. हा अंधार आम्हाला असह्य वाटतो.”
त्याचक्षणी त्यांचे डोळे उघडले तेव्हा समोर महर्षी शांडिल्य आपले नेहमीचे स्मितहास्य चेहऱ्यावर ठेवून त्यांच्याकडेच पाहत होते.
“गुरुदेव, हे काय झाले?”
शिष्यांनी एक सुरात विचारले,
“आम्ही असे कुठे अडकलो? आम्ही ज्यात पूर्ण फसलो तो अंधार काय होता? आम्हांला काहीच कसे काय दिसू शकत नव्हते?”
*“कारण तुमची आजवरची तयारी ही त्या प्रासादाच्या पहिल्या दालनात पोहोचण्याचीच झाली आहे. पुढे जाण्याची शक्ती अजून तुम्ही मिळवलेली नाहीच आहे.”*
*गुरुजी पुढे म्हणाले,*
“तुम्ही ज्या दालनात प्रथम प्रवेश केलात ते ज्ञानाचे दालन होते. तुम्ही दुसऱ्या दालनात प्रवेश तर केलात, तो प्रेमाच्या दरवाजातून तो तर सर्व प्राणिमात्रांसाठी उघडतो. पण प्रेमाच्या दालनात शिरताच तुम्ही आंधळे झालात. *अहंभाव* आणि *उतावळेपणा* या दोन दोषांनी तुम्हाला अंध बनविले आणि त्यामुळे तुम्हाला प्रेमाच्या दालनाचे दर्शन होऊ शकले नाही. या दृष्टिदोषांमुळे तुम्ही भरकटलात.
"एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सर्वज्ञानाच्या अंतिम आनंदापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ प्रचंड ज्ञान पुरेसे नाही. ते तुम्हांला अंतिम आनंदाच्या जवळपास प्रथम दालनात पोचवू शकते. *केवळ प्रेम आणि श्रद्धा यांची शक्तीच तुम्हांला त्यापुढे नेऊन सर्वज्ञानी बनवू शकते.* ज्ञान आणि प्रेम यांच्या सुयोग संगमावरच सर्वज्ञानाचा साक्षात्कार होऊ शकतो.
“म्हणून माझे म्हणणे नीट ऐका. ज्ञान संपादन करणे आणि त्याची जोपासना करणे आवश्यक आहे. पण त्याचवेळी अहंभाव आणि उतावीळपणा यांचा त्यागदेखील करायला हवा.पूर्ण श्रद्धेने दिव्यत्वाला सामोरे जा आणि त्या ईश्वराच्या निर्मितीची अत्यंत प्रेमाने सेवा करा. आत्यंतिक ज्ञान आणि आत्यंतिक प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्या दोन्ही बाळगल्या तरच आत्यंतिक साक्षात्कारी प्रकाश दिसू शकतो.
"जा,ईश्वराने निर्मिलेल्या या प्रचंड जगात फिरून तेथील लोकांची मनोभावे आणि प्रेमभावनेने सेवा करा. त्यानंतर त्या दुसऱ्या दिव्य दालनात प्रवेश करण्यासाठी माझ्याकडे या!”
या कथेतून बोध काय बोध घेता येईल?
*"अहंभावाव्यतिरिक्त मिळवलेले ज्ञान आणि प्रेमभाव आणि श्रद्धा यांच्या सहाय्याने केलेली सेवा यामुळेच आयुष्याचा अर्थ कळतो आणि परमात्म्याचे दर्शन होते. तसेच मानवी आयुष्यात शारीरिक आणि अशारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवरून केवळ प्रेमाच्या शक्तीमुळेच तग धरता येतो आणि या दोन्ही पातळ्यांना जोडणारा निश्चित दुवा हा मार्गदर्शक गुरूचाच असतो!"*
*- आचार्य रत्नानंद*
No comments:
Post a Comment