श्री.समर्थ रामदास स्वामी म्हणतात 'यत्न तो देव जाणावा' पण असे दिसते की दैवात असलेल्या गोष्टी घडणारच त्या अटळ आहे असे आहे तर प्रयत्नाला काही वावच नाही असे दिसते.
अशी शंका एका भक्ताने श्री.गोंदवलेकर महाराजांना विचारली. त्यावर श्री.महाराज म्हणाले "जन्मला आल्यावर माणसाला ऐहिक सुख दुःख कसे आणि किती मिळवायचे हे त्याच्या प्रारब्धानुसार ठरलेले असते हे खरे आहे.
काही प्रयत्न जरी आपल्याला दिसला तरी त्याचे फळ प्रारब्धानुसारच मिळत असते. तरीही यत्न तो देव जाणावा असे म्हटले आहे त्यात दुहेरी हेतू आहे. एक म्हणजे हा प्रयत्न नंतरच्या काळाला किंवा पुढच्या जन्माला प्रारब्ध या सदराकडे जमा होत असतो.
पण प्रयत्न हा जर केवळ कर्तव्यबुध्दीने आणि फळाची आशा न धरता केला तर तो "प्रारब्ध" या सदरात मोडत नाही. म्हणून अशा तऱ्हेने यत्न करण्याची सवय लावून घ्यावी. पण त्यात दुसरा हेतू तो परमार्थाला लागू आहे. मनुष्याला एक खास देणगी दिली आहे ती बुध्दीची व सारासार विवेकाची. तिचा योग्य वापर करून परमार्थाची कास जो धरील तो नराचा नारायण होऊन जाईल. हे विवेकाचे सुप्त सामर्थ्य आहे. ह्या अनुषंगाने भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याचे हे स्वातंत्र्य वापरून त्याने आत्मोन्नतिकडे वाटचाल करावी हे समर्थांना सांगावयाचे आहे.
No comments:
Post a Comment