*💫 श्रद्धा*
*एका जुन्या इमारतीमध्ये एका वैद्यांचे घर होते. ते मागच्या भागात राहात असत आणि पुढच्या भागात त्यांनी दवाखाना उघडला होता.*
*दररोज, दवाखाना उघडायच्या आधी त्यांची पत्नी त्यादिवशीसाठी आवश्यक असलेल्या सामानाची यादी लिहून देत असे. वैद्य महाराज गादीवर बसून प्रथम देवाचे नाव घेत आणि ती यादी उघडू बघत. पत्नीने लिहिलेल्या वस्तूंच्या किमती बघून हिशेब करीत असत. नंतर परमेश्वराला प्रार्थना करीत की "हे परमेश्वरा, मी केवळ तुझ्या आदेशानुसार तुझी भक्ती सोडून येथे प्रपंचात येऊन पडलो आहे."*
*वैद्य महाराज आपल्या मुखाने कधीही कोणा रुग्णाकडून पैसे मागत नसत. कोणी देत, तर कोणी देत नसत, परंतु एक गोष्ट मात्र नक्की होती की त्या दिवशीच्या गरजेच्या सामानापुरते पैसे जमा झाल्यावर ते कोणाकडूनही पैसे घेत नसत. मग भले रुग्ण कितीही धनवान असला तरी काही फरक पडत नसे.*
*एके दिवशी वैद्य महाराजांनी दवाखाना उघड़ला. गादीवर बसून परमेश्वराचे स्मरण करुन पैशाचा हिशेब करण्यासाठी यादी उघडली आणि एकटक बघतच राहिले. क्षणभर त्याचे मन विचलित झाले. त्यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले. पण लगेच त्यांनी आपल्या मनावर ताबा मिळवला. रोजच्या वाणसामानाच्या यादी नंतर त्यांच्या पत्नीने लिहिले होते : *”20 तारखेला आपल्या मुलीचे लग्न आहे तिच्या लग्नाला लागणारा आहेर."*
*ते काही वेळ विचार करीत राहिले, नंतर बाकीच्या वस्तूसाठी लागणाऱ्या पैशाचा हिशेब केला आणि आहेराच्या सामानापुढे लिहिले, हे काम परमेश्वराचे आहे. परमेश्वरच स्वतः त्याची व्यवस्था करेल.*
*एक दोन रुग्ण आले होते. वैद्य महाराज औषध देत होते. त्याचवेळी, एक मोठी गाडी त्यांच्या दवाखान्याच्या समोर येऊन थांबली. वैद्यजीनी फारसे लक्ष दिले नाही, कारण त्यात नविन काहीच नव्हते. दोन्ही रुग्ण औषध घेऊन निघून गेले. कारमधून एक सूट-बूट घातलेले साहेब गाडीतून उतरले आणि नमस्कार करून बाकावर बसले. वैद्यजी म्हणाले की, “तुम्हाला स्वतःसाठी औषध हवे असेल तर या स्टूलावर येऊन बसा म्हणजे तुमची नाडी तपासता येईल आणि जर कोणा रुग्णाचे औषध घेऊन जायचे असेल तर रोग्याची अवस्था सविस्तर सांगा.”*
*ते साहेब सांगू लागले, "वैद्यजी! आपण मला ओळखले नाही. मी कृष्णलाल, परंतु आपण मला ओळखणार तरी कसे, कारण मी १५-१६ वर्षांनंतर या दवाखान्यात येत आहे. तुम्हाला मी आपल्या मागच्या भेटीची आठवण करून देतो म्हणजे तुमच्या लक्षात सर्व गोष्टी येतील.*
*जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो होतो, तेव्हा परमेश्वरच मला तुमच्याकडे घेऊन आला होता कारण ईश्वराने माझ्यावर कृपा केली होती. त्याला आमचा संसार फुलवायचा होता. त्याचे असे झाले होते की, मी गाडी घेऊन गावी आमच्या वडिलोपार्जित घरी जात होतो.
बरोब्बर आपल्या दवाखान्याच्या समोरच आमची गाडी पंक्चर झाली. ड्रायव्हरने गाडीचे टायर काढले व पंक्चर दुरूस्त करायला घेऊन गेला. तुम्ही पाहिले की मी कारजवळ उन्हात उभा आहे, तेव्हा तुम्ही माझ्या जवळ आलात आणि दवाखान्याकडे बघून म्हणालात की आत येऊन खुर्चीवर बसा. मला हायसे वाटले आणि मी खुर्चीवर येऊन बसलो. ड्रायव्हरला जरा जास्तच वेळ झाला होता.*
*एक लहान मुलगी इथे तुमच्या टेबलाजवळ उभी होती आणि तुम्हाला सारखी म्हणत होती, “बाबा चला ना, मला भूक लागली आहे."*
*तुम्ही तिला म्हणत होतात, "बाळ, जरा धीर धर, जाऊ या." मी विचार करत होतो की मघापासून मी इथे बसून आहे, म्हणून तुम्ही जेवायला जात नव्हता. माझे येथे बसणे तुम्हाला जड जाऊ नये म्हणून मी काही तरी औषध घ्यायल हवे असे ठरवले.
मी म्हणालो, "वैद्य महाराज मी मागील ५-६ वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहत असून तिथूनच कारभार चालवतो. तेथे जाण्याआधी माझे लग्न झाले होते परंतु आजपर्यंत मी अपत्य-सुखापासून वंचित आहे. येथे ही उपाय केला आणि इंग्लंडमध्ये सुद्धा उपाय केला, पण नशिबाने माझी निराशाच केली.”*
*आपण म्हणाला होता, "हे बंधू, ईश्वरावर नाराज होऊ नये. लक्षात ठेवा, त्याच्या जवळ कोणत्याही गोष्टीची कमी नाही. आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, धन-दौलत, सुख-दुःख, जीवन-मृत्यू, सगळं काही त्याच्या हातात आहे. जे काही घडायचे असते ते परमेश्वराच्या आदेशानुसार होत असते. अपत्य द्यायचे असेल तर ते तोच देईल.*
*मला आठवते, तुम्ही बोलता बोलता पुड्याही बनवत होतात. सर्व औषधे आपण दोन भागात विभागून दोन वेगवेगळ्या पाकिटात भरून ठेवली आणि मला विचारुन एका पाकिटावर माझे नाव लिहिले आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे नाव लिहून ते औषध कसे घ्यायचे याची माहिती दिली होती.*
*मनात नसतानाही त्यावेळी मी ते औषध घेतले ,कारण मला तुम्हाला थोडेफार पैसे द्यायचे होते. परंतु औषधे घेऊन जेव्हा मी पैसे विचारले तेव्हा तुम्ही म्हणालात, "ठीक आहे.” मी आग्रह केला तर म्हणालात, “आजचे खाते बंद झाले आहे." मी म्हणालो, "तुमचे म्हणणे माझ्या लक्षात आले नाही."
त्याच वेळी तिथे एक माणूस आला आणि आपली चर्चा ऐकून मला म्हणाला की आजचे ‘खाते बंद होणे ' याचा अर्थ असा की, "आज घरच्या सामानासाठी लागणारी जितकी रक्कम वैद्यमहाराजांनी ईश्वराजवळ मागितली होती, ती ईश्वराने देऊन झाली आहे. जास्तीचे पैसे ते घेत नाहीत."*
*मला जरा आश्चर्यच वाटले आणि मनात लाजही वाटू लागली, की माझे विचार किती खालच्या दर्जाचे होते आणि हे साधे-सरळ वैद्य महाराज किती महान आहेत. मी घरी जाऊन पत्नीला औषधे दाखवली आणि सारे काही सांगितले ती म्हणाली, "वैद्यजी माणूस नसून, देवता आहेत. त्यांनी दिलेल्या औषधनेच आपले मनोरथ पूर्ण होइल."*
*आज माझ्या घरी दोन फुले उमलली आहेत. आम्ही दोघं पती-पत्नी नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करीत असतो. इतकी वर्षे काम-धंद्यातून वेळच मिळत नव्हता की मी इथे येऊन आभाराचे दोन शब्द तुम्हाला सांगावेत. इतक्या वर्षांनी आज भारतात आलो आणि गाडी थेट तुमच्या दारात येऊन थांबली.*
*वैद्यजी, आमचे सारे कुटुंब इंग्लंडला स्थायिक झाले. भारतात फक्त माझी एक विधवा बहीण तिच्या मुलीबरोबर रहाते. माझ्या भाचीचे लग्न या महिन्याच्या २१ तारखेला आहे. कुणास ठाऊक जेव्हा-जेव्हा मी तिच्या आहेराचे सामान खरेदी करीत असे, तेव्हा-तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तुमची लहान मुलगी येत असे आणि मग मी प्रत्येक वस्तू दोन-दोन खरेदी करीत असे. मी तुमचे विचार जाणून आहे, त्यामुळे तुम्ही हे सामान कदाचित घेणार नाही. पण मला वाटत होते, की माझ्या सख्या भाचीकडे पाहिल्यावर मला जो चेहरा सारखा दिसत असे, तीसुद्धा माझी भाचीच आहे. मला वाटत असे की तिच्या आहेराची जबाबदारी सुद्धा देवाने माझ्यावर सोपवली आहे.*
*वैद्यजी आश्चर्याने अवाक झाले. ते हळुवार आवाजात म्हणाले, “कृष्णलालजी, परमेश्वराची अगाध लिला माझ्या लक्षात येत नाहीए! तुम्ही माझ्या पत्नीची ही आजची यादी पहा."*
*आणि वैद्य महाराजांनी यादी उघडून कृष्णलालजींच्या हाती दिली. तिथे हजर असलेला प्रत्येक जण हे पाहून हैराण होत होता की ‘आहेराचे सामान’ च्या पुढे वैद्यजींनी लिहिले होते, *‘हे काम परमेश्वराचे आहे, परमेश्वर जाणे.*’
*वैद्यजी गहिवरलेल्या आवाजात म्हणाले, "कृष्णलालजी, विश्वास ठेवा की आजपर्यंत असे कधीच घडले नाही की माझ्या पत्नीने यादीत त्या दिवशीची गरज लिहिली आणि त्याची परमेश्वराने त्या दिवशी व्यवस्था केली नाही. तुमचे म्हणणे ऐकून तर मला असे वाटते की माझी पत्नी कोणत्या दिवशी काय लिहिणार आहे, हे परमेश्वराला माहित असते. नाहीतर त्याने तुम्हाला एवढ्या दिवस आधीच सामानाची खरेदी करायला लावले नसते. वा! परमेश्वरा वा! तू महान आहेस, तू दयाळू आहेस. मी अगदी अवाक आहे की कशाप्रकारे तो त्याचे चमत्कार दाखवीत असतो."*
*वैद्य महाराज पुढे बोलू लागले, "आजपर्यंत त्याने नेहमीच माझी काळजी घेतली आहे. मी एव्हढेच शिकलो आहे की , *रोज सकाळी प्रथम परमेश्वराचे आभार माना, सायंकाळी दिवस चांगला गेल्याबद्दल आभार माना, जेवताना त्याचे आभार माना, झोपताना त्याचे आभार माना. प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहा.”*
_संकलन_
*_प्रा. माधव सावळे_*
No comments:
Post a Comment