श्रीराम समर्थ
*संतांची वाणी
आपलें समाधान सर्वांच्या वाट्यांस यावें म्हणून संत लोकांत मिसळतो. *त्याच्या वागण्याची अशी खुबी असते की बाहेरून तो साध्या माणसासारखा दिसतो व वागतो. पण आंतून मात्र तो अहंकारविमुक्त असा आत्मनिष्ठ विश्वमानव असतो.* सर्व घडामोडीमधें तो ईश्वराची सत्ता पाहातो. सर्व प्राणिमात्रांना तो ईश्वराचें व्यक्त रूप मानतो. म्हणून विश्वाच्या व्यवहारामधें त्याला पदोपदी अनंताचे अनंतांगी दर्शन घडते. हें दर्शन वस्तुतः वाणीच्या पलीकडे असणारा अतींद्रिय अनुभव आहे. पण तो अनुभव अतिशय रसरशीत असल्यानेच वाणीमधें व्यक्त झाल्यावांचून राहात नाही. वाणीमधें आकार घेतांना बहुतेक तो काव्याचें रूप घेतो. *संत वक्तपणानें आपला अनुभव निवेदन करीत नाही कारण त्याला कर्तेपणाचा स्पर्श होत नाही.* संतांचा अनुभव म्हणजे तें चिन्मयाचें स्फुरण असतें. *म्हणून संताच्या एकेक वचनामधें वेदान्ताचें मर्म सांपडतें.*. अक्षर अशा अनंत ईश्वरानें भरलेली संतांची वाणी कधी शिळी होत नाही. ती सदैव ताजी व सतेज राहते. याच कारणामुळें ती प्रतेक युगांतील माणसांना समाधान तर देतेच पण ज्याला ईश्ववराची जिज्ञासा आहे त्याला अगदी अचूक मार्गदर्शन करते.
---------- *प्रा के वि बेलसरे*
**********
संदर्भ: *संतांचें आत्मचरित्र हें त्यांचेच पुस्तक मलपृष्ठ.*
संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन
No comments:
Post a Comment