एक सद्गृहस्थ प.पु.श्रीप्रल्हाद महाराजांच्या मठात साखरखेरड्याला प्रथम गेले होते. त्याच्या सासुरवाडीच्या मंडळींचे पु.श्रीप्रल्हाद महाराज गुरू होते. ते आले तेव्हा दुपारची वेळ होती. मंदिर बंद होते. त्यांना खूप तहान लागली होती. हे सद्गृहस्थ मंदिराच्या बाहेर ओट्यावर बसून होते. प्रथमच गेल्यामुळे ओळखीचे कोणीही नव्हते.
अचानक आवाज आला " तुम्हाला तहान लागली आहे ना ? पाणी प्या." महाराज मागे स्वतः उभे आणि त्यांनी रामरायाच्या समोर भरून ठेवलेल्या चांदीच्या तांब्यापेल्यातलेच पाणी आणले. महाराज म्हणाले तुम्ही कुलकर्णी यांचे जावई आहात ना, आत या. श्रीमहाराजांनी स्वतः त्यांच्या खाण्या पिण्याची व्यवस्था केली. पुढे त्यांना अनुग्रह दिला व ते शिष्य झाले.
हेच पुढे निवृत्त झाल्यावर एकदा श्रीप्रल्हाद महाराजांकडे आले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले " जमा किती आहे?" ह्याना वाटले बँकेत किती पैसे जमा आहेत. बँकेत पैसे कमी जमा आहेत हे सांगितले. पुढे म्हणाले त्यातून मुलीचे लग्न व्हायचे आहे, मुलगा मार्गी लागायचा आहे. त्या मानाने ही जमा अगदी तुटपुंजी आहे.
हे ऐकल्यावर श्रीमहाराज म्हणाले " ह्या बँकेतील जमा नाही विचारत. तुमचा आत्तापर्यंत जप किती जमा झाला आज?" तेव्हा ते म्हणाले " महाराज माझी पाटी एकदमच कोरी आहे" महाराज म्हणाले " मग आता जास्त जप करावयास हवा. रामराय सर्व सांभाळतील." तिथपासून ह्यांनी मनापासून जप करायला सुरुवात केली व जास्तीतजास्त नामात रहाण्याचा प्रयत्न केला. आहे त्या परिस्थितीत मुलामुलींचे लग्नकार्य सर्व चांगले झाले. कर्ज काढण्याचे काम पडले नाही. श्रीमहाराजांनी सांगितलेले नाम पतीपत्नींने मनापासून घेतले. आमचा प्रपंच श्रीप्रल्हाद महाराजानी सांभाळला अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.
No comments:
Post a Comment