TechRepublic Blogs

Sunday, May 4, 2025

प्रेमगीत

 *पृथ्वीचे प्रेमगीत...*


*- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष*


लहानपणात वाचलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या कांही गोष्टी आपल्या मनात कायमचे घर करून असतात. आपल्या भावना हेलावून सोडतात. जेंव्हा जेव्हां त्या गोष्टी मनात आठवतांत, तेंव्हा त्यावेळचे प्रसंग चक्क डोळ्यासमोर उभे राहतात. 

शाळेत असताना अभ्यासाच्या क्रमिक पुस्तकात अशीच एक कविता माझ्या वाचनात आली, अन मी त्या काव्यांत पूर्ण गुरफ़टूनगेलों. ती कविता होती " पृथ्वीचे प्रेमगीत " आणि तिचे कवि होते महाराष्ट्राला भूषणावह असलेले वि. वा. शिरवाडकर अर्थात आपले सर्वांचे लाडके ' कुसुमाग्रज. 


वास्तविक कुसुमाग्रजांचे काव्य हे कधी क्रांतीच्या ज्वाला प्रज्वलीत करणार असतं,  कधी ' पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हण ' असे धीराचे प्रोत्साहन देणार असतं, तर कधी प्रेमाचे तरल असे मुलायम तरंग हळुवारपणे उलगडणारे प्रेमकाव्य असतं. 

महान प्रतिभेच्या या महाकवीला जेंव्हा काव्य सुचत असेल तेव्हां त्याला आपल्या दैवी काव्य लेण्याचे पंख लावून अवकाशात विहार करायला लावणारा एक सर्जनशील कवी.

 त्यांच्या हृदयातून निघालेले शब्द मनाच्या कोंदणात नटवून त्यांना मखमली वस्त्रे चढवून जेव्हां लेखणीतून उतरतात तेंव्हा ते शब्द केवळ आपल्या हृदयांत जपून सांभाळावेत  अशीच भावना होते. आणि हेच नेमके त्यांनी त्यांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' या अमर काव्यात गुंफलेले आहेत. अर्थात त्या काळचे आमचे शिक्षक तसेच विद्वान असायचे. भाषेवर त्यांचे प्रभुत्व असायचे. 

एखादा विषय शिकवायचा म्हणजे त्या संदर्भात अनेक उदाहरणे देत असत. कवितेचे जेव्हां ते रसग्रहण करीत तेव्हां आम्हाला चक्क त्या वातावरणात मिसळून टाकत असत. त्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या एकेक शब्दाला आम्ही साठवून ठेवत असू . आणि ह्या कवितेचे रसग्रहण असले की  मग बघायलाच नको. आणि मला तर मोहवूनच टाकलं होतं या अवीट काव्यानं.

                   

" युगामागुनी चालली रे युगे ही, 

 करावी किती भास्करा वंचना,

किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी,

कितींदा करू प्रीतीची याचना...”


पृथ्वी स्वतः भोवती फिरताना सूर्याभोवती फिरत असते, हे एक भौगोलिक सत्य. तिच्या समवेत अनेक ग्रह तारे या अवकाशात आहेत. त्यांचाच आधार घेऊन कवीची प्रतिभा बहरुन येते, आणि तिच्या त्या सूर्याभोवतीच्या भ्रमंतीला मिळाले  एक प्रेममय असे शाश्वत रूपक. आणि निर्माण झाले एक अमर काव्य. 

सूर्यदेव आपले दिव्य तेज पसरवीत चाललेले असता, तिच्यावर मूक प्रेम करणारी पृथ्वी अथकपणे त्याच्या मागोमाग चालत असते, केवळ त्याने आपल्या प्रेमाचा स्वीकार करावा या हेतूने. युगायुगांचा चाललेला हा खडतर प्रवास असतो. त्यातही तिला जाणीव होत असते की सूर्यदेव आपली वंचना करीत आहे  याची. ती प्रश्न विचारते अजून किती काळ मला तू तुझ्या मागे  भटकवणार आहेस? 


आज माझ्या मनातील तारुण्याची आग ही विझून चालली आहे. केवळ तेथे उरले आहे काजळी कोपरे. आजूबाजूला असलेले अनेक तारे, ग्रह तिच्या प्रेमाची याचना करीत आहेत. कोणी आपल्या शिरावर दिव्य उल्काफुले नटवून, तूच अंतःराळात सांडलेले दीव्य तेज:कण वेचून  मला मोहवायला बघणारा चंद्र, 

कधी लाजून लाल होऊन मागणी घालणारा मंगळ तर कधी पिसाटापरी केस पिंजारून आर्जव करणारा धूमकेतू. आता सूर्यदेवा, तूच मला सांग, तुझे भव्य दीव्य तेज मी सतत पाहीले, पुजले असता या काजव्यांना मी कशी गळ्याशी घेऊ? ध्रुव तर  निराशेने संन्यस्त होऊन बसला आहे. कधी प्रेमळ शुक्र पहाटेच दारी येऊन उभा राहतो. पण या दुर्बळांचा क्षूद्र शृंगार मला नकोसा वाटतो. त्यापेक्षा तुझी दूरताही सोसण्यास मी तयार आहे. 

               

आपण या ओळी वाचताना आपले अंग थरारून उठते. पृथीच्या पोटात असलेल्या ज्वालामुखीला तिच्या मनातील उफाळून येणाऱ्या निखार्यांची  उपमा जेव्हा कवी देतो, तेव्हां तिच्या सोबत आपणही शहारून उठतो. तिला सूर्याची थोरवी माहित असते, किंबहुना तिला हीहि जाणीव असते की त्याच्यापुढे आपण एक क्षुल्लक धुळीचा कण आहे, तरीही त्याच्या पद्स्पर्शाला अलंकारुन त्या धुळीचेच तिला भूषण आहे.

 कवी जेव्हा त्यापृथ्वीची मिलनोत्सुक अवस्था वर्णनं करतात तेव्हां त्यांनी आपल्या कल्पना शक्तीची परिसीमा गाठलेली असते. जेव्हां पृथ्वी सूर्याला आपल्या  प्रेमाच्या विरहाचे वर्णन करते , तेव्हा कवीच्या दैवी प्रतिभेला एक अलंकारीक लेणं लाभतं, आणि पृथ्वी सूर्याला सांगते,

                 

" गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे ,

मिळोनी गळा घालुनियां गळा,

तुझ्या लाल ओठातली आग प्यावी,

मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा ...."


हे वाचल्यावर कालिदासाच्या मेघदूताची आठवण कां नाही होणार ? आपल्या या प्रेमप्रवासात पृथ्वी आपल्या असफल प्रेमाची एकेक समिधा सूर्यदेवाच्या यज्ञकुंडात समर्पीत करीत आहे याची जाणीव प्रकर्षाने होते. जणू त्या तप्त प्रियकराच्या मिठीत शिरून त्या मध्ये स्वतः विरघळून जावे, त्यामध्ये सामावून जावं ही एकच पवीत्र भावना तिने बाळगली होती.

एक काव्य ! पृथ्वी अन सूर्याची भ्रमंती अशीच चालू रहाणार आहे. अंतापर्यंत हा वीरह प्रवास चालू रहाणार आहे. यामध्ये खंड न पडता. 

                        

यामध्ये कौतूक कोणाचे करू ? ज्या निसर्गाने अवकाशात हा अनोखा खेळ मांडला होता त्याचा, की आपल्या शब्द श्रीमंतीने त्याच गोष्टींवर अनोखा साज चढवून त्याला प्रेमाचा  साजशृंगार देणाऱ्या कविवर्याचा !


*- प्रा. मं. गो. राजाध्यक्ष*

No comments:

Post a Comment