एकदा निंबाळला काही तरुण साधक पू.श्री.गुरुदेव रानडे यांच्या दर्शनाला आले होते. त्यातील एका साधकाने उत्साहाच्या भरात श्री.गुरुदेवांना विचारले "परमार्थात उत्कट भाव पाहिजे, पद भावपूर्ण म्हटले पाहिजे असे म्हणतात. पण भाव म्हणजे काय असतो ?" गुरुदेव त्या साधकाला म्हणाले "तुमचा मुक्काम येथे आठवडा भर आहे ना ? मग चार दिवस थांबा म्हणजे भाव काय असतो ते दिसून येईल." त्या तरुण साधकास याची उत्कंठा लागली.
चार दिवसांनी एक वयस्कर साधक ज्यांनी नुकतेच नाम (अनुग्रह) घेतले होते ते श्री.गुरुदेवांच्या दर्शनाला आले. त्यांनी आल्यानंतर ज्येष्ठ साधकाकडे हट्ट धरला की " मला गुरुदेवांच्या पायावर डोके ठेऊन नमस्कार करावयाचा आहे. तरी तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन चला व तशी विनंती श्री.गुरुदेवांना करा."
श्री.गुरुदेवांना मुळांत नमस्कार केलेला आवडत नसे त्यातून पायावर डोके ठेऊन नमस्कार दूरच राहिला. हे त्या ज्येष्ठ साधकाने त्या वयस्क साधकाला सांगितले. पण ते साधक काही ऐकेनात. शेवटी ज्येष्ठ साधक त्यांना घेऊन श्री.गुरुदेवांनापाशी गेले व त्यांना सांगितले की "ह्यांना आपल्या पायावर डोके ठेऊन नमस्कार करायचा आहे." त्या वयस्क साधकाच्या चेहेऱ्यावरील भावोत्कटता पाहून श्री.गुरुदेव म्हणाले " अहो, एवढेच ना ! मग करू द्या की नमस्कार!" हे ऐकून वयस्क साधक गहिवरले. त्यांनी श्री.गुरुदेवांच्या पायावर डोके ठेऊन नमस्कार केला व आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
तो प्रश्न विचारणारा साधक पुढे बसला होता. श्री.गुरुदेव त्याच्याकडे पाहून म्हणाले "याला म्हणतात भाव."
No comments:
Post a Comment