*॥श्रीहरिः॥*
परमात्म्याचा आश्रय केल्यावर माया तरून जाता येते, हे भगवंताचे अभिवचन असूनही सर्व प्राणिमात्र या मार्गाचा आश्रय का करत नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे स्पष्टीकरण भगवंत देतात,
*-----------------------------*
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः
*दैवी ह्येषा गुणमयी*
*मम माया दुरत्यया ।*
*मामेव ये प्रपद्यन्ते*
*मायामेतां तरन्ति ते ॥*
*॥७.१४॥*
*न मां दुष्कृतिनो मूढाः*
*प्रपद्यन्ते नराधमाः ।*
*माययापहृतज्ञाना*
*आसुरं भावमाश्रिताः ॥*
*॥७.१५॥*
(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१४ ७.१५)
*भावार्थ: कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणमयी माझी माया अत्यंत कठीण आहे; परंतु जे पुरुष केवळ मलाच अखंडपणे पूजतात, मला शरण येतात, ते या मायेला सहजपणे उल्लंघून जातात, तरतात.*
*जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत.*
*-----------------------------*
*मायेमुळे, प्रकृतीमुळे* किंवा *स्वभावामुळे* ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे. त्या सृष्टीमध्ये, मायेच्या या वैश्विक पसाऱ्यामध्ये अज्ञानी लोक गढून जातात. म्हणजे illusion मध्ये अडकून जातात. मायेमध्ये गुरफटून गेल्यामुळे ते परमेश्वराला विसरतात आणि नाश पावतात. स्वत:च्या नाशाला ते स्वत:च कारण ठरतात.
*आयुष्यातले* भोग यथेच्छ भोगणं हेच खरं जीवन आहे असं या असुरी वृत्तीच्या लोकांना वाटतं. मनुष्य जन्मामध्ये जितका उपभोग घेता येईल तितका घ्यावा, आलेल्या क्षणाचा आनंद लुटावा, भरपूर खावं-प्यावं, मजा करावी;उद्याचं कुणी बघितलंय् अशी त्यांची वृत्ती असते.
बहुतेक तथाकथित बुद्धिवादी हे चार्वाकवादी असतात.
*'भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः'*
हे चार्वाकाचं तत्त्वज्ञान!
'खा-प्या-मजा करा; ऋण काढून सण साजरे करा! या वृत्तीचे लोक परमेश्वराला शरण जात नाहीत. जे उपभोग त्यांना मिळत असतात ते स्वकर्तृत्वानं मिळतात, असा या लोकांचा समज असतो. मेंदूच तसा आभास निर्माण करत असतो. त्यामुळे या विश्वाचा जो नियंता आहे त्याला ते मानत नाहीत.'
'इंद्रियांना जे जाणवतं ते दृश्य जगत् हे अनित्य आहे आणि परमात्मा नित्य आहे, या ज्ञानाची जाणीव मोहामुळे त्यांना होत नाही. या भ्रांतीमुळे अनित्य असं दृश्य जगतच अशा लोकांना सत्य आणि नित्य वाटू लागतं.'
*‘मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना'* लिहिणारे इक्बाल लाहोरमध्ये वास्तव्याला होते.
*एक परस्थ निरीश्वरवादी गृहस्थ* त्यांना भेटायला म्हणून लाहोरमधे गेला. जो पत्ता दिला होता तिथे तो इक्बाल यांची चौकशी करू लागला. एकानं सांगितलं, 'ते त्या गल्लीत उजवीकडून पाचव्या घरात रहातात. '
तो गृहस्थ त्या घरापाशी गेला, दार ठोठावू लागला. इक्बालनी दार उघडलं. त्या गृहस्थानं विचारलं,
'आपणच इक्बाल ना?'
'नाही, मी इक्बाल नाही...'
त्यांनी दार लावून घेतलं. पुन्हा त्या गृहस्थानं आजूबाजूला चौकशी केली; आणि पुन्हा येऊन दार ठोठावू लागला. पुन्हा इक्बालनी दार उघडलं.
‘आपणच इक्बाल ना?' त्यानं विचारलं.
'नाही...' दार लावलं गेलं.
तो गृहस्थ त्या संपूर्ण भागातून फिरला, प्रत्येकाला इक्बालांचा पत्ता विचार लागला. पुन्हा पुन्हा त्याच घराकडे निर्देश होऊ लागला. चार-पाच वेळा तसं घडल्यानंतर तो पुन्हा इक्बालांकडे आणि म्हणाला,
'मी दहा ठिकाणी चौकशी केली, आपणच इक्बाल आहात हे आता मला कळून चुकलंय् !'
तेव्हा इक्बाल त्या निरीश्वरवाद्याला म्हणाला,
*'केवळ दहा लोकांवर विश्वास ठेवून मीच इक्बाल आहे यावर तुमची श्रद्धा बसली; मग हजारो तत्त्वज्ञ-दार्शनिक सांगतात की, ईश्वर निश्चित आहे, तेव्हा मात्र तुमचा विश्वास बसत नाही!'*
त्या निरीश्वरवाद्याला चोख उत्तर मिळालं होतं. जोपर्यंत ईश्वरानुभूती आपल्याला मिळत नाही तोपर्यंत अशा तत्त्वज्ञ - दार्शनिकांवर एकवेळ विश्वास ठेवला नाही तरी चालेल; पण म्हणून ईश्वर नाहीच या निर्णयापर्यंत येणं योग्य ठरणार नाही.
बुद्धीसारखाच मनुष्याचा आत्मा हा देखील सृष्टीतल्या अन्य वस्तूंप्रमाणे नामरूपात्मक देहेंद्रियांनी आच्छादित झालेला असतो. जो मूढ मनुष्य असतो तो देहालाच सर्वस्व मानतो आणि आत्म्याला विसरून जातो. दिसत नाही म्हणजे नाही, अशी त्याची भूमिका असते.
*त्यामुळे* देहाचे भोग भोगण्यात तो गढून जातो. त्यामुळे तो सत्कृत्य करत नाही. त्याच्या हातून दुष्कृत्यंच होतात.पण या जगात जे काही आहे ते परब्रह्मच आहे अन्य काही नाही, हे निश्चित. जग चालवणारी शक्ती स्वत: अज्ञात राहून जग चालवत असते. नाटक ही नाटककाराची कलाकृती असते. रंगमंचावरील नाट्यप्रयोग बघताना प्रेक्षक त्या नाटकाच्या कथेमध्येच गुंतून पडतात. प्रत्यक्ष नाटककाराचा, दिग्दर्शकाचा किंवा नाट्यगृहाचा विचारही त्याक्षणी त्यांच्या मनात येत नाही.
*त्याप्रमाणे*
ज्यानं विश्व निर्माण केलं त्याला विसरून आपण हे जग पहात असतो.नाट्यनिर्मितीमागे नाटककाराचं जसं कौशल्य असतं, तसंच विश्वनिर्मितीमागे ईश्वराचं कौशल्य असतं. फरक इतकाच की, नाटककरानं नाटक लिहिल्यानंतर
तो प्रत्यक्ष सादरीकरणातून अलिप्त राहिला तरी प्रत्यवाय नसतो. पण या विश्व-रंगमंचावर चाललेल्या या महानाट्यात नाटककार अलिप्त नसतो तर त्याच्या उपस्थितीमुळेच नाट्य सादर होत असतं. सादरीकरणात तो नसेल तर सादरीकरण होऊच शकणार नाही! आपण मात्र त्याचा सहभाग विसरून मायेमध्येच गुरफटून जातो.
ही सृष्टी कशी चालते, ती कुणी निर्माण केली याचा जे विचार करत नाहीत ते मूढ असुरीवृत्तीचे पुरुष होय. हे लोक स्वत:लाच श्रेष्ठ मानतात; परमेश्वराला ते शरण जात नाहीत.
*भगवान श्रीकृष्ण सांगतात -*
'जगामध्ये अधिकाधिक लोक अज्ञानरूपी मायेशी बद्ध असतात. ती मूर्ख माणसं (जे योग्य आणि अयोग्य यांच्यामध्ये फरक करू शकत नाहीत) असुरी स्वभाव म्हणजे अज्ञान धारण करून आपल्या सांसारिक लाभांसाठी उलट-सुलट कामं करत राहतात, ते माझी भक्तीही करत नाहीत आणि मला जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. असे लोक स्वतःमध्येच मस्त,आपल्या सुख-दुःखांना सत्य मानून, त्यांच्यामध्येच गुरफटून मायेच्या दलदलीत पडून राहतात. ते कधीही मुक्त होत नाहीत.'
*सारांश:*
*सृष्टीनिर्मात्याविषयी आदरभाव नसणं म्हणजेच ईशभावनारहित जीवन जगणं ही दुष्कृती होय. असे जे मूढ पुरुष विश्वनियंत्याचा विचारच करीत नाहीत किंवा ईश्वराला मानीत नाहीत ते कृतघ्न होत.*
*-----------------------------*
श्रीगीताशास्त्र- श्रीमद्भगवद्गीता भाष्य.
संपूर्ण भगवद्गीता - सरश्री.
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*
No comments:
Post a Comment