TechRepublic Blogs

Friday, May 10, 2024

ज्ञानी भक्त

 *॥श्रीहरिः॥*


मागील श्लोकात भगवंतांनी सांगितले ज्ञानी भक्त मला सर्वाधिक प्रिय आहे. मग इतर भक्त (आर्त,अर्थार्थी,व जिज्ञासू) प्रिय नाहीत का अशी शंका निर्माण होऊ शकते त्या शंकेचे निरसन करण्यासाठी भगवंत म्हणतात.. 


*-----------------------------*


 ॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः


*उदाराः सर्व एवैते*

*ज्ञानी त्वात्मैव मे मतम् ।*

*आस्थितः स हि युक्तात्मा* 

*मामेवानुत्तमां गतिम् ॥*

*॥७.१८॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१८) 


*भावार्थ :- सर्वच भक्त चांगले उदार आहेत. पण जो ज्ञानी (भक्त) तो म्हणजे मला माझा प्राणच वाटतो. कारण युक्तचित होऊन तो माझ्याच ठिकाणी स्थिरावलेला असतो.(केवळ माझ्याच) सर्वोत्कृष्ट गतीला तो प्राप्त झालेला असतो. (माझ्याशिवाय दुसरी अन्य श्रेष्ठ गती नाही हे त्याला ज्ञात झालेलं असतं.)*


*-----------------------------*


*भगवंतानी* १६व्या श्लोकात भक्ताचे चार प्रकार सांगितले.आता भगवंत म्हणतात की, हे चारही भक्त थोर आहेतच; परंतु १७व्या श्लोकात वर्णिलेला ज्ञानी भक्त हा माझा आत्माच आहे.



*'चोराच्या हातची लंगोटी'* 

अशी म्हण आहे. म्हणजे काहीही न होण्यापेक्षा काहीतरी होणं चांगलं. मग ते अत्यल्प प्रमाणातही का असेना... 

ही बाब भक्तीच्या बाबतीतही लागू होते. भलेही थोड्यापासूनच सुरुवात होते,भले अन्य लाभासाठी प्रारंभ होवो, परंतु भक्तीची छोटीशी ठिणगी पेटणं हीदेखील मोठी बाब आहे. कारण ही ठिणगीच पुढे जाऊन मोठ्या प्रकाश स्रोतामध्ये  परिवर्तित होऊ शकते.


*याच भावनेने भगवान श्रीकृष्ण सांगतात,* 

ज्ञानी भक्त सर्वोत्तम आहे परंतु अन्य भक्तदेखील उदार आहेत. कारण लोभापायी किंवा अन्य कारणांमुळे, कोणत्याही मार्गाने का असेना परंतु

किमान ते माझ्या भक्तीच्या मार्गावर अग्रेसर तर झाले आहेत! कमीत कमी त्यांच्या सत्ययात्रेला सुरुवात तर झाली आहे.


*अन्यथा* लोक आपली कामं पूर्ण करण्यासाठी किंवा दुःख दूर करण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबू शकतात. किमान ते ईश्वराला शरण तरी आले आहेत.



*भगवान श्रीकृष्ण म्हणतात -* 

निःसंशय हे सर्व भक्त उदार आहेत, परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झालाय त्यालाच मी माझ्या स्वतःप्रमाणे मानतो. माझ्या दिव्य- सेवेमध्ये युक्त झाल्याने तो निश्चितच माझी, सर्वोच आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो.



*आर्तभक्त* स्वतःच दुःख दूर व्हावे म्हणून भक्ती करतो हे आपण बघितलं.पण उदार आर्तभक्त दुसऱ्याच दुःख दूर व्हाव म्हणून झटतो. हीच मागणी तो भगवंतापाशी करतो. 


*त्याचप्रमाणे* जिज्ञासू भक्तामागे 'उदार' शब्द आला की तो दुसरा का दुःखी आहे, त्याचं दुःख मी कसं कमी करू शकेन, असा विचार करतो. उदार जिज्ञासू भक्त या प्रश्नांचं उत्तर मिळविण्यासाठी झटतो. आपल्याला ज्ञान मिळालं तर त्याचा समाजासाठी उपयोग करता येईल असा व्यापक हेतू त्याच्या जिज्ञासेमागे असतो.


*अर्थार्थी भक्त* द्रव्यप्राप्तीसाठी झटत असतो. पण उदार अर्थार्थी भक्त भगवंताजवळ धनाची मागणी करतो ती सात्त्विक कार्यासाठी. धर्मकार्यासाठी संपत्ती आवश्यक असल्यामुळे हा अर्थार्थी भक्त भगवंताजवळ अर्थाची मागणी

करतो. दाराशी आलेला याचक विन्मुख जाऊ नये, अतिथी, अभ्यागतांची सेवा करता यावी यासाठी घर धनधान्यानं भरलेलं असावं हा उदार भाव त्याच्या मागणीत असतो. 


*म्हणूनच,* 

आर्तभक्त, जिज्ञासूभक्त किंवा अर्थार्थी भक्त हे सर्व चांगलेच आहेत; परंतु तुलनाच करायची झाली तर ज्ञानी भक्त सर्वांत श्रेष्ठ आहे. कारण, 'तो माझा आत्माच आहे; आणि माझ्याशिवाय श्रेष्ठ असं दुसरं काहीही नाही हे त्यानं ओळखलेलं असतं.' असं भगवंत सांगतात.



*सामान्य कामी भक्त आणि ज्ञानी संत महात्मे किंवा ऋषिमुनी यांच्यात भेद हा असणारच.* वसिष्ठ, याज्ञवल्क्य, पतंजली, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम महाराज,संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी, श्रीगोंदवलेकर महाराज असे एकेक महान ज्ञानी भक्त होऊन गेले आहेत. त्यांनी भगवंतासाठी आयुष्यभर कार्य केलं. जनसामान्यांमध्ये ईशभक्ती जागृत व्हावी यासाठी ते झटले.असे उदार ज्ञानी भक्त श्रेष्ठ होत. किंबहुना ते ज्ञानीजन हे भगवंताचीच विभूती असतात. ते उत्तम गतीला पोचतात.



*एका* शिक्षकांच्या काही विद्यार्थ्यांमध्ये श्रेष्ठ कोण याची चर्चा चालू असते. त्या शिक्षकांचा हुशार मुलगादेखील त्यांचा विद्यार्थी असतो. एका विद्यार्थ्याला श्रेष्ठ ठरवल्यावर मुलगा वडिलांना विचारतो, 

'मग माझं काय?' 

शिक्षक म्हणतात, 

'अरे, तू तर माझा मुलगाच आहेस!' 

*ज्ञानी भक्ताचं परमात्म्याशी असं नातं असतं.*



*सारांश:*

*सर्व भक्तांमध्ये ज्ञानी भक्त श्रेष्ठ असतो. ज्ञानी हा भगवंताचा जणू आत्माच असतो. किंबहुना भगवंताचा लाडका पुत्र असतो. तो त्याच्याशीच एकरूप झालेला असतो.* 


*-----------------------------*


श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*

No comments:

Post a Comment