TechRepublic Blogs

Thursday, May 16, 2024

चिंतन

 चिंतन 

          श्रीराम,

     भक्तीमार्गाने आत्मनिवेदन भक्ती पर्यंत पोहोचणे किंवा देव पहाया गेलो व देवचि होऊन ठेलो'ह्याचा अनुभव घ्यायचा असेल आणि आयुष्याच्या अखेरीला पश्चात्तापाची वेळ आपल्यावर येऊ नये असे वाटत असेल तर मनाची भूमिका आणि अंतःकरणातील वृत्तींचा विचार नीट समजावून घेऊन त्यांचा वापर नेमकेपणाने करता आला पाहिजे. आपल्या अंतःकरणात आता कोणती वृत्ती उमटली आहे हे फक्त आपल्यालाच कळत असते. उदा :माझ्या मनात मला एखाद्या व्यक्तीबद्दल राग, द्वेष, लोभ वाटत असला तरी ती व्यक्ती समोर आल्यावर मात्र माझ्या चेहर्‍यावर लोकांना दाखवायला मी त्याची किती काळजी करते, किती प्रेम करते, हे दाखवत असते. त्यामुळे माझ्या आत काय चालू आहे हे समोरच्याला कळू शकत नाही. थोडक्यात, माझ्या मनात उमटलेल्या भावभावनांची मी खरी एकटीच साक्षीदार असते.

             त्यामुळे आपल्या मनात उमटलेली किंवा निर्माण झालेली प्रत्येक वृत्ती कशाची आहे.. रजोगुणाची, तमोगुणाची की सत्वगुणाची आहे, त्यात षड्रिपू किती आहेत, हे स्वतःचे स्वतःला तपासता आले पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे करताना माझे काही चुकत आहे हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा स्वतःकडे असावा लागतो.. अन्यथा मी कधीच चुकत नाही. मी वागतो /वागते.. ते बरोबरच असते, असे असेल तर.. राम कृष्ण हरी ||

                         ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment