श्रीराम समर्थ
आत्म्याच्या अनुसंधानांत स्वत:चा पूर्णपणें विसर पडणें हें अध्यात्मसाधनेचें फळ समजावें. सामान्य माणसाला प्रपंच्यामधें स्त्री-पुरुष संयोगांत उत्कटतेचा आणि स्वतःला विसरण्याचा सहज अनुभव येत असल्यानें *जीव आणि आत्मा* किंवा *भक्त आणि भगवंत* यांच्या तद्रूपतेला स्त्री-पुरुष संयोगाची उपमा देतात. *आत्म्याशीं एकरूप झालें असतां सर्व दृश्य मावळतें म्हणून जीवाच्या ठिकाणीं कोणतीहि वासना शिल्लक राहात नाहीं.* तो *आप्तकाम* म्हणजे सर्व वासना तृप्त झालेला, *आत्मकाम* म्हणजे भगवंतावांचून अन्य इच्छा नसणारा आणि *अकाम* म्हणजे मुळीं वासनाच नसलेला असा बनतो. जागेपणीं अवश्य असणारे अनेक संबंध आपोआप अन्तर्धान पावतात. चांगलेंवाईट, भयशोक, उच्चनीच इत्यादि सर्व भेद विलीन होतात. साधकानें भगवंतावर प्रेम करायला शिकलें पाहिजे. आपल्यापाशीं प्रेम नाहीं असें नाहीं, परंतु अनेक ठिकाणीं वाटणी झाल्यानें आपण सर्वस्वीं भगवंताचे होऊं शकत नाहीं. *म्हणून विवेकानें आणि अभ्यासानें इतर ठिकाणचें प्रेम गोळा करून एका भगवंताच्या ठिकाणीं केंद्रित करावें. हें साधण्यास रात्रंदिवस त्यांचें स्मरण फार उपयोगी पडतें.*
---------- *प्रा के वि बेलसरे*
**********
संदर्भ: *उपनिषदांचा अभ्यास* हें त्यांचेच पुस्तक पान ४४०/४४१
संकलन: श्रीप्रसाद वामन महाजन
No comments:
Post a Comment