*भावार्थ मनोबोध*
*श्रीरविंद्रदादा पाठक*
संकलन आनंद पाटील
*नाम नेमके काय करते? मनावरती काम करते. श्रीमहाराज याला फार सुंदर म्हणायचे, 'नाम काय करते तर ते मनाला उलटे करते' म्हणजे मनच उलटे झाले म्हणजे ते अंतर्मुख होते. ते जाणिवेच्या दिशेने जाऊ लागते. आज* *आपले मन हे बहिर्मुख आहे. इंद्रियाधीन आहे. ते मन आपल्याला जाणिवेपासून लांब घेऊन जाते. या त्रिगुणांमध्ये घेऊन जाते. आपल्या देहाचे चोचले पुरवण्याकडे घेऊन जाते. पण नाम या मनाला उलटे* *फिरवते आणि हळूहळू उलटे करत स्वतःलाच जाणिवेकडे घेऊन जाते. ज्याक्षणी आपले मन जाणिवेमध्ये विलीन होते, त्याक्षणी ही सृष्टी आपल्याला* *परमात्मामय दिसू लागते. आणि हीच नामाची फलश्रुती आहे. हे कितीही वेळा जरी सांगितले तरी ते समजणार नाही. म्हणून* 'कळेना तरी सर्व शोधूनि पाहे ।।'.
*हे कितीही कल्पनेने सांगायचा प्रयत्न केला तरी सर्व काही शोधले तरी ते सापडणार नाही. ते केवळ अनुभूतीने जाणता येते. मग शेवटी नाम या जीवनामध्ये, या जाणीवप्रधान रूपाने सर्व सृष्टीकडे*
*बघायला लावायला लागले की, ही सर्व सृष्टी म्हणजे भगवंताची एक लीला होते. भगवंताच्या लीलेमध्ये जरी काही* *वर-खाली होत असेल, एखादा फायदा-नुकसान होत असेल, जरी आपला देह प्रारब्धानुसार वरखाली गटांगळ्या खात असला, तरी या सर्व गोष्टींमध्ये आपले समाधान हे शाश्वत राहते, कायम राहते.*
*ज्याचे समाधान शाश्वत राहिले, ज्याचे समाधान हे कायम राहिले त्याच्या जीवनातील संशय निघून गेला. तेच समर्थ आपल्याला इथे सांगतात की,* 'जिवा संशयो वाउगा तो त्यजावा ।'
*मी जीव आहे. हा भ्रम, द्वैतपसारा जातो तो केवळ नामाने जातो. हा जीव असल्याचा संशय, हा वाउगा संशय आपण त्यागू शकतो केवळ नामाने* *आलेल्या समाधानामुळे. हे समाधान टिकवण्यासाठी अखंड नामाची संगत ही* *आत्मज्ञानानंतरदेखील गरजेची असते. त्यामुळे मी ज्ञानी झालो, आता मला नामाची गरज नाही असा क्षण कधीच येत नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाम हे आपल्या जीवनाचा सारथी असते. अशा नामाचे आपल्या जीवनातील प्रथम* *क्षणापासून, प्रभातकाळापासून आपण जर चिंतन केले तर नामाने येणारी ही स्थिती आपल्याला याच जन्मात अनुभवता येते. हेच समर्थांच्या या श्लोकाचे मर्म. संकलन आनंद पाटील*
॥ जानकीजीवन स्मरण जय जय राम ।।
No comments:
Post a Comment