🍁🌿 *समर्थवाणी बोधामृत* 🌿🍁
*श्रीराम!*
‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’ हा श्लोक आपण नेहमी म्हणत असतो. योग म्हणजे संबंध. सदा सर्वकाळ एका भगवंताशीच संबंध राहावा, हे संबंधात्मिका भक्तीचे मर्म आहे. हा योग जन्मोजन्मीचे सर्व भोग संपवून समाधीसुखाचा आनंद देतो. पातंजल योगसूत्रामध्ये योगाच्या ज्या पायऱ्या किंवा अवस्था सांगितल्या आहेत. त्यातील शेवटच्या तीन पायऱ्या म्हणजे ध्यान धारणा समाधी. समर्थांनी भगवंताची प्रीती लागलेले दास जन्माला आलेले पाहिले. त्यांची रामप्रीती असंख्य उदाहरणाने सांगितली. त्यावर आपण सूक्ष्म चिंतन केले तर आपल्या मुखात एकच वाक्य येईल,
*बहु धारणा घोर चकीत जालों ।*
भगवंतावर अनन्यभावाने प्रेम करणारी भक्तमंडळी बघितली की ते त्या अवस्थेला पोचण्यासाठी ज्या अवस्थांमधून गेले त्या अवस्था आपल्याला अतिशय चकित करतात. त्यातील एक अवस्था म्हणजे ‘धारणा’. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे *धारणा नामचित्तस्य स्थानबन्ध: समासतः।* आपले चित्त एका ठिकाणी बांधून ठेवण्याला धारणा म्हणतात. तुमची आमची अवस्था अशी आहे की आपले चित्त प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या विषयांमध्ये अडकते. ज्या चित्तात सर्व प्रकारच्या तमोगुणी विषयांची पकड असते, ते चित्त ‘धारणा’शक्ति विकसित करू शकत नाही. अगदीच क्षुल्लक गोष्टींमध्ये जरा काही मनाविरुद्ध किंवा अनपेक्षित घडले की *‘चित्त दुश्चित्त झाले’* अशी आपली अवस्था. त्यामुळेच भक्त व साधकांची ‘बहु धारणा’ बघितली की आपण कमालीचे विस्मित होऊन जातो.
आपल्याला जर धारणशक्ति विकसित करायची असेल तर अगोदर ग्रहणशक्ति शुद्ध करावी लागेल. आपल्यात ग्रहणशक्ति आहे परंतु आपले चित्त विषयविचारांचे ग्रहण करीत असल्याने आपण परमात्मचिंतन धारण करू शकत नाही. ग्रहणशक्ति म्हणजे Grasping Power आणि धारणशक्ति म्हणजे Retention Power. चोवीस तासातील जास्तीत जास्त वेळ आपण निंदा, स्तुति, द्वेष, लोभ, मत्सर याच गोष्टी grasp करत राहिल्याने थोडावेळ केवळ देहाच्या पातळीवर केलेला तथाकथित परमार्थ किंवा सात्विक विचार आपण retain करूच शकत नाही. म्हणून आपण अगोदर grasping content म्हणजे ग्रहण करण्याची वस्तु केवळ आत्मवस्तू अर्थात भगवंतच राहील, याचा प्रयत्न करणे जरूर आहे. यालाच ‘ध्यान’ असे म्हणतात. हे ध्यान लागण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे ‘नामस्मरण’. श्रीमहाराज म्हणत त्याप्रमाणे दिवसभरातील शक्य तितका वेळ नामात घालवण्याचा प्रयत्न करूया. त्यातून आपल्यात आपोआप ग्रहणशक्ति आणि भगवद्चिंतनाची धारणशक्ति विकसित होईल. आणि याची परिणती सर्व विषयभोग विरून जाऊन सदा सर्वदा रामयोग घडेल. योग्यवेळी सावध होऊन साधनस्थ झालो नाही तर शेवटी आपल्याला म्हणावे लागेल,
*तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥*
📿 *॥ जय जय रघुवीर समर्थ ॥* 📿
No comments:
Post a Comment