साखरेचा जेव्हा पाक करतात तेव्हा त्यात एक गंमत असते. जोपर्यंत पाकात मळी असते तो पर्यंत त्यातून बारीक धूर निघतो आणि बुडबुड आवाज येतो आणि वर फेस निघत राहतो. पण फेस काढून काढून जेव्हा पाकातील सगळी मळी निघून जाते , तेव्हा मग धुरही निघत नाही आणि आवाजही होत नाही.
मग असतो तो शुद्ध स्वच्छ पाकच असतो. त्याचे छान मिष्टान्न तयार करतात. ते मिष्टान्न देवाच्या नैवेद्यात वाढले जाऊ शकते आणि त्याने आल्यागेल्याचे चांगले स्वागतही करता येते. श्रद्धावान मनुष्याच्या मनावरही अशीच सगळी प्रक्रिया घडते. श्रद्धा आणि ज्ञान यांचा परस्पर घनिष्ठ संबंध आहे.
जितकी श्रद्धा वाढेल तितके अधिकाधिक ज्ञान प्राप्त होईल. श्रद्धा नसेल तर ज्ञान प्राप्तीची आशा धरणे व्यर्थ आहे. जी गाय निवड करीत खाते ती दूध कमी देते. जी गाय पाला, चारा, कोंडा, कडबा, भुसार इत्यादी जे मिळेल ते गपागप खाते, ती गाय अगदी सुर्र सुर्र दूध देते. तिच्या दुधाची धार कधी संपतच नाही.
No comments:
Post a Comment