चिंतन ८९
श्रीराम,
संतांच्या विचारांच्या संगतीत राहिलो तर प्रपंच, संसार ह्यांची चिंता न होता हरिचे चिंतन होईल आणि मन सतत हरिसारखे प्रसन्न राहिल. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटना, परिस्थिती, तसेच वस्तू आणि व्यक्ती ह्यांच्यात अडकलेली असते. जीवाला मिळणारे प्रत्येक सुख तो या चार गोष्टींवर अवलंबून ठेवतो आणि आपोआप त्यांच्या बंधनात अडकत जातो.. मग त्यातून लोभ, आसक्ती.. अपेक्षा, अहंकार तसेच मी माझे, ममत्व आणि अहंता सुरू रहाते. ह्या सगळ्याच्या हेलकाव्यात आयुष्य संपून जाते.
जीवनभर प्रत्येक माणूस दुसऱ्याला सुख देऊन किंवा दुःख देऊन, स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न करीत असतो. अपेक्षा, अहंकार, लोभ आसक्ती अतिप्रमाणात वाढत गेली आणि प्रारब्धाच्या खेळातील दान सतत आपल्या विरुद्ध पडत गेले की नैराश्य, डिप्रेशन या आजाराचे आपण शिकार होतो.
समर्थ सांगतात - जर आपल्याला कायमचा आनंद, कायमचे समाधान, शांतता आणि तृप्ती हवी असेल तर ती ज्याच्यापाशी अमर्याद आहे, अशा श्रीहरीचे स्मरण करावे. त्यासाठी संतांच्या संगतीत रहावे. त्यांचे विचारधन आत्मसात करावे आणि आचरणात आणावे. प्रपंच अनासक्तीने करुन व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती ह्यांच्या बंधनातून मुक्त व्हावे.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment