चिंतन ९०
श्रीराम,
सर्वच संतांनी कमी जास्त प्रमाणात मनाशी संवाद करून, त्याचे साधकांसाठी असलेले महत्त्व लक्षात आणून दिले आहे. तुकाराम महाराज - मन तेचि गजानन गणपति |असे म्हणतात. मन ओढी मना |बुद्धी बुद्धी क्षणक्षणा |अशी प्रामाणिक साधकाची होणारी उलघाल ते स्वानुभवाने लक्षात आणून देतात. मन बळिया माजी बळी |करी राखरांगोळी धैर्याची || हे मनाचे अचाट सामर्थ्य नाथ महाराज सांगतात.
थोडक्यात मोक्ष साधनेच्या संदर्भात मनाची नेमकी भूमिका समजावून घेतली तर मनाचा नेमकेपणाने वापर करता येतो. साधनेच्या प्रक्रियेची जाण तयार होऊन भक्तीमार्गाने गेल्यास नक्की काय घडावे, ते कसे घडते, घडण्यात अडचणी काय येतात? त्या कशा दूर कराव्यात, ह्यासंबंधी परिपूर्ण मार्गदर्शन मिळते.
आयुष्यात आता दुसरे करण्यासारखे काही नाही म्हणून मग श्रीरामाचे नाम घेऊया आणि परमार्थाचा अभ्यास करुया.. असे म्हणून अभ्यास किंवा नाम घेण्याचा विचार कोणी करत असतील तर त्यांचा परमार्थ कधीच साध्य होणार नाही असे आपले संत सांगतात.. कारण भक्तिमार्गावरुन ईश्वरापर्यंत जाण्यासाठी मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी असावे लागते.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment