*॥श्रीहरिः॥*
मायेला जिंकण्यासाठी जे सज्जन परमात्म्याला भजतात. ते कोण हे भगवंत आता सांगतात,
*-----------------------------*
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्याय:
*चतुर्विधा भजन्ते मां*
*जनाः सुकृतिनोऽर्जुन ।*
*आर्तो जिज्ञासुरर्थार्थी*
*ज्ञानी च भरतर्षभ ॥*
*॥७.१६॥*
(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१६)
*भावार्थ :- हे भरतवंशी पुरुषांत श्रेष्ठ अर्जुना ! 'अर्थार्थी' 'आर्त' 'जिज्ञासु' आणि 'ज्ञानी' अर्थात् 'निष्कामी' असे चार प्रकारांचे पुण्यशील भक्तजन मला भजतात.*
*-----------------------------*
*'सुकृतिन् ' कोण?*
'दुष्कृतिन्' (दुष्ट प्रवृत्तीचे लोक) ईश्वराला भजत नाहीत, हे सांगून झाल्यावर ‘सुकृतिन्' भजतात हे या श्लोकात सांगितले आहे. शास्त्रानुसार जे कर्मे करतात, जे सत्कर्मे करतात ते सुकृतिन् होत. हे चार प्रकारांचे असतात.
*आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी!*
'इन्द्रवर्षेने व्याकुळ झालेले व्रजवासी, वस्त्रहरणाचा भयंकर प्रसंग कोसळलेली द्रौपदी, ग्राहग्रस्त गजेन्द्र, जरासन्धाच्या कैदेत पडलेले राजे इत्यादी उदाहरणे *आर्त भक्तांची* होत.'
'भगवत्तत्त्व जाणण्याची इच्छा करणारे मुचकुन्द, उद्धव, श्रुतदेव इत्यादी *जिज्ञासू भक्त* होत.'
'इहलोक वा परलोकातील सुखाची इच्छा करणारे सुग्रीव, बिभीषण, ध्रुव इत्यादी *अर्थार्थी भक्त* होत' आणि
'सनकादि ऋषी,नारद, प्रल्हाद, शुकाचार्य इत्यादी *ज्ञानी भक्त* होत.'
*भक्तप्रकार भगवंतांनी भक्तांचे जे चार प्रकार सांगितले आहेत, ते उदाहरणासहित समजावून घेऊ या.*
*१) आर्तभक्त -*
आर्त भक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे *द्रौपदी* होय.
ज्या ज्या वेळेला तिच्यावर संकटे आली, त्या त्या वेळेला तिने आर्त होऊन भगवंतांनाच साद घातली. पांडवांना वनवास झाल्यावर युधिष्ठिराने वनात सूर्याची स्तुती गायिली. सूर्याने प्रसन्न होऊन त्याला भोजनाचे अक्षयपात्र दिले.
*सूर्यदेव युधिष्ठिराला म्हणाला,*
'जी तुझी इच्छा आहे, ते सर्व तू मिळवशील. मी तुला बारा वर्षे अन्न देईन. हे राजा! मी दिलेले,वाढण्याला योग्य असलेले तांब्याचे पात्र तू घे.
'हे सुव्रता! या पात्राने जोपर्यंत द्रौपदी वाढेल, तोपर्यंत स्वयंपाक घरात फल, मूल, आमिष आणि भाजी हे चार प्रकारचे संस्कारलेले अन्न तुला अखंड मिळत राहील. आजपासून चौदाव्या वर्षी तुला पुन्हा राज्य मिळेल.'
(महा. वन. ३.७१-७३)
*महात्मा पांडव* अशाप्रकारे वनात राहून मुनींच्यासह चित्रविचित्र कथांद्वारा मनोरंजन करीत होते, द्रौपदी जोपर्यंत भोजन करीत नसे,
तोपर्यंत सूर्याने दिलेल्या अक्षयपात्राने अन्न प्राप्त होत असे.
*जेव्हा* दुर्योधनाने ऐकले, की ज्याप्रमाणे नगरातील निवासी राहतात, त्याप्रमाणे पांडव तर वनात सुद्धा त्याचप्रकारे दान, पुण्यकर्म
करीत आनंदात रहात आहेत. तेव्हा त्याने त्यांचे अनिष्ट करण्याचा विचार केला. अशाप्रकारे विचार करून कूटकारस्थानविद्येत निपुण
असलेल्या कर्ण व दुःशासन इत्यादींच्या बरोबर जेव्हा तो दुष्ट धृतराष्ट्रपुत्र निरनिराळ्या उपायांनी पांडवांना संकटात टाकण्याच्या युक्तीचा विचार करू लागला,
*त्यावेळी* महायशस्वी, धर्मात्मा, तपस्वी, महर्षि दुर्वास ऋषि स्वत:च्या दहा हजार शिष्यांना घेऊन त्या ठिकाणी स्वेच्छेने आले.
परमक्रोधी *दुर्वास मुनि* आलेले पाहून बंधूंसह श्रीमान राजा दुर्योधनाने आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवून, नम्रपणे, विनीत भावाने त्यांचा सत्कार करून, त्यांना निमंत्रित केले. दुर्योधनाने स्वतःसेवकाप्रमाणे त्यांच्या सेवेत उभे राहून त्यांची सेवा केली. मुनिश्रेष्ठ दुर्वास कित्येक दिवसपर्यंत तिथेच राहिले. राजा दुर्योधन त्यांच्या शापाला घाबरून, रात्रंदिवस आळस सोडून, त्यांच्या सेवेत तत्पर राहिला. तेव्हा ते मुनिराज त्याच्यावर विशेष प्रसन्न झाले. आणि असे म्हणाले,
*'मी तुला वर देण्याची इच्छा करीत आहे. राजा! तुझे कल्याण असो. तुझ्या मनात जी इच्छा आहे, त्यासाठी वर माग. मी प्रसन्न झाल्यानंतर जी धर्मानुकूल गोष्ट असेल, ती तुला अलभ्य राहणार नाही.'*
शुद्ध अंत:करण असणाऱ्या महर्षि दुर्वासाचे हे वचन ऐकून, दुर्योधनाने मनातल्या मनात असे मानले, की जणु आपला पुनर्जन्म झाला आहे. दुर्वास मुनि संतुष्ट झाले तर काय मागावे या गोष्टीचा विचार कर्ण व दुःशासन इ. सह आधीच निश्चित झाला होता, त्या निश्चयाला अनुसरून दुष्टबुद्धि दुर्योधनाने अत्यंत प्रसन्न होऊन हा वर मागितला, की
*हे ब्रह्मन्! आमच्या कुलात महाराज युधिष्ठिर सर्वात ज्येष्ठ व श्रेष्ठ आहे. यावेळी तो धर्मात्मा पांडुपुत्र वनात वास्तव्य करीत आहे. युधिष्ठिर मोठा गुणवान व सुशील आहे. ज्याप्रमाणे आपण माझे अतिथि झालात, त्याप्रमाणे आपण शिष्यांसह त्यांचे अतिथि व्हावे.*
जर आपली माझ्यावर कृपा असेल तर माझी अशी प्रार्थना आहे, की आपण त्या ठिकाणी अशावेळी जावे, की जेव्हा अत्यंत सुंदर, सुकुमार यशस्विनी राजकुमारी द्रौपदी, सर्व ब्राह्मण व पाच पति यांचे भोजन झाल्यानंतर आणि स्वत:चेही भोजन आटोपल्यावर सुखाने बसून विश्रांती घेत असेल.
'तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे मी तसेच करीन.'
दुर्योधनाला असे म्हणून विप्रश्रेष्ठ दुर्वास जसे आले होते, तसे निघून गेले. त्यावेळी दुर्योधनाने स्वत:ला कृतार्थ मानले. आणि कर्णाचा हात आपल्या हातात घेऊन, तो अत्यंत प्रसन्न झाला. कर्णाने सुद्धा बंधूंसह राजा दुर्योधनाला म्हटले,
'हे कुरुपुत्रा! मोठ्या भाग्यानेच आपले काम झाले. तुझा उत्कर्ष होत आहे, ही देखिल मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुझा शत्रु संकटाच्या अपार महासागरात बुडाला, ही सुद्धा सौभाग्याची गोष्ट आहे. पांडव दुर्वास ऋषींच्या क्रोधाग्नीत पडले आहेत आणि आपल्याच महापापांमुळे दुस्तर नरकात जात आहेत.'
*त्यानंतर* एके दिवशी पांडव भोजन करून सुखाने बसले आहेत आणि द्रौपदीसुद्धा भोजन करून विश्रांती घेत आहे, असे जाणून दहा हजार शिष्यांसह दुर्वास ऋषि त्या वनात आले.
श्रीमान् राजा युधिष्ठिर अतिथिला पाहून बंधूंसह त्यांना सामोरा गेला. तो आपली मर्यादा कधीही सोडत नव्हता. त्याने त्या अतिथींना आणून श्रेष्ठ आसनावर आदराने बसविले, आणि हात जोडून नमस्कार केला. नंतर यथायोग्य पद्धतीने पूजा करून त्यांना, आतिथ्यासाठी निमंत्रित केले आणि म्हणाले,
*'भगवन्! आपले नित्यकर्म पूर्ण करून लवकर यावे.'*
हे ऐकून ते निष्पाप दुर्वास मुनि आपल्या शिष्यांसह स्नान करण्यासाठी निघून गेले. त्यांनी या गोष्टीचा थोडाही विचार केला नाही, की यावेळी शिष्यांसह हे पांडव, मला भोजन कसे देऊ शकतील? सर्व ऋषिमंडळींनी पाण्यात स्नान केले आणि ते ध्यान करू लागले.
*यावेळी* युवतींमध्ये श्रेष्ठ असलेल्या पतिव्रता द्रौपदीला अन्नाची मोठी चिंता निर्माण झाली. जेव्हा बराच विचार केल्यानंतर सुद्धा तिला कोणताही उपाय सुचला नाही, तेव्हा मनातल्या मनात कंसनिषूदन, आनंदकंद भगवान श्रीकृष्णाचे तिने स्मरण केले.
'हे कृष्णा! हे महाबाहू कृष्णा! हे देवकीनंदना! हे अविनाशी वासुदेवा! तूच संपूर्ण जगाचा आत्मा आहेस. हे अविनाशी प्रभो! तूच या विश्वाची उत्पत्ति व संहार करणारा आहेस. पूर्वी कौरवसभेत दुःशासनाच्या हातून ज्याप्रमाणे तू मला वाचविले होतेस, त्याचप्रकारे या चालून आलेल्या संकटातूनही माझा उद्धार कर.'
द्रौपदीने असे स्तवन केल्यानंतर अचिंत्यगती, परमेश्वर, देवाधिदेव, जगन्नाथ, भक्तवत्सल, भगवान केशवाला हे समजले की, संकट आले आहे. तो त्वरेने तेथे आला. भगवान कृष्णाला आलेला पाहून, द्रौपदीला मोठा आनंद झाला. तिने त्याला नमस्कार करून दुर्वास ऋषींच्या आगमनादिकाचा सर्व वृत्तांत सांगितला.
*तेव्हा भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीस म्हटले,*
'हे कृष्णे! यावेळी मला फार भूक लागली आहे. मी भुकेने अत्यंत व्याकुळ झालो आहे. प्रथम मला लवकर भोजन दे. नंतर सर्व व्यवस्था करशील.'
श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून द्रौपदीला मोठी लज्जा वाटली. आणि ती म्हणाली, 'भगवन्! सूर्यनारायणाने दिलेल्या पात्रातून मी भोजन केले नाही तोपर्यंत भोजन मिळते. हे देवा! आज तर मीही भोजन केले आहे. म्हणून आता त्यामध्ये अन्न राहिले नाही.'
हे ऐकून कमलनयन भगवान द्रौपदीला पुन्हा म्हणाला. हे कृष्णे! मी तर भूक व श्रमाने व्याकुळ झालो आहे. आणि तुला थट्टा सुचते आहे! ही थट्टेची वेळ नाही. लवकर जा आणि मला ती थाळी दाखव.'
अशा प्रकारे हट्ट करून भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीकडून ती थाळी मागविली. त्या थाळीच्या गळ्याला थोडी भाजी लागली होती. ती पाहून, श्रीकृष्णाने ती खाऊन टाकली आणि द्रौपदीला म्हटले,
*'या भाजीमुळे संपूर्ण विश्वाचा आत्मा यज्ञभोक्ता, सर्वेश्वर भगवान् श्रीहरी तृप्त आणि संतुष्ट होवो.."*
एवढे बोलून,भगवान श्रीकृष्ण सहदेवाला म्हणाला,
'तू लवकर जाऊन मुनींना भोजनासाठी घेऊन ये. सहदेव देवनदीत स्नानासाठी गेलेल्या त्या दुर्वास आदि मुनींना भोजनास बोलविण्यासाठी ताबडतोब गेला. ते मुनिलोक त्यावेळी पाण्यात उतरून अघमर्पण मंत्राचा जप करीत होते. अचानक त्यांना पूर्ण तृप्तीचा अनुभव येऊ लागला, वारंवार अन्नरसाच्या ढेकरा येऊ लागल्या. हे पाहून ते पाण्याबाहेर आले आणि परस्परांकडे पाहू लागले. ते सर्व मुनि दुर्वासांकडे पाहून म्हणाले,
*'हे ब्रह्मर्षी !'*
'आम्ही लोक राजा युधिष्ठिराला स्वयंपाक बनविण्याची आज्ञा देऊन स्नान करण्यासाठी आलो होतो. परंतु यावेळी एवढी तृप्ती होत आहे, की अन्न गळ्यापर्यंत आल्यासारखे वाटते. आता आम्ही कसे भोजन करावे?'
'आम्ही जो स्वयंपाक पांडवांकडून तयार करविला आहे, तो वाया जाणार. यासाठी आता आम्ही काय करावे?'
*भगवंतांची लीला दुर्वास ऋषींनी जाणली. ते म्हणाले,*
'खरे पाहिले असता, स्वयंपाक तयार करावयास लावून आम्ही राजर्षी युधिष्ठिराचा मोठा अपराध केलेला आहे. कदाचित् असे न होवो, की पांडव आमच्याकडे क्रूर दृष्टीने पाहून आम्हाला जाळतील.'
*'हे ब्राह्मणहो!'*
'परम बुद्धिमान राजा अंबरीषाच्या प्रभावाचे स्मरण करून,ज्यांनी भगवान् श्रीहरीच्या चरणाचा आश्रय घेतला आहे, त्या भक्तजनांना मी नेहमी घाबरत असतो. सर्व पांडव महात्मे, धर्मपरायण, विद्वान, शूरवीर, व्रतवारी आणि तपस्वी आहेत. ते नेहमी सदाचारपरायण असून भगवान् वासुदेवाला आपला फार मोठा आधार मानणारे आहेत. पांडव क्रुद्ध झाल्यानंतर आम्हाला अशाप्रकारे भस्म करून टाकतील, की जशी कापसाच्या ढिगाऱ्याला आग. म्हणून हे शिष्यांनो, आता पांडवांना विचारताच निघून जा.'
गुरु दुर्वास मुनींचे हे भाषण ऐकून, पांडवांना अत्यंत घाबरून ते सर्व ब्राह्मण दाही दिशांना पळून गेले. सहदेवाने जेव्हा देवनदीत त्या श्रेष्ठ मुनींना पाहिले नाही, तेव्हा तो तेथील तीर्थात इकडे तिकडे शोध घेत फिरू लागला. तेथे राहणाऱ्या तपस्वी मुनींच्या मुखातून, त्यांच्या पळून जाण्याची वार्ता ऐकून सहदेव युधिष्ठिराकडे परत आला. आणि त्याने सर्व वृत्तांत कथन केला. त्यानंतर मनाला ते सर्व पांडव त्यांच्या परत येण्याच्या आशेने बराच काळपर्यंत वाट पहात राहिले. पांडव विचार करू लागले, की
'दुर्वासमुनि अचानक अर्ध्या रात्री येऊन आम्हाला त्रास देतील, दैवाने प्राप्त झालेल्या या महान् संकटातून आमचा उद्धार कसा होईल?' अशा विवंचनेत असताना त्यांची ही दशा पाहून भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिर आदि सर्व पांडवांना प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हटले,
‘हे कुंतीपुत्रांनो! अत्यंत क्रोधी महर्षि दुर्वास ऋषिंकडून आपणावर संकट आले आहे, हे जाणून द्रौपदीने माझे स्मरण केले होते. यासाठीच मी त्वरेने येथे येऊन पोहोचलो. आता तुम्हा लोकांना दुर्वास ऋषिंकडून थोडेही भय उरले नाही. ते तुमच्या तेजाने घाबरून आधीच पळून गेले आहेत. जे लोक नेहमी धर्मतत्पर असतात, ते कधीही संकटात पडत नाहीत. मी आता तुमच्याकडे जाण्याची आज्ञा मागत आहे. येथून मी द्वारकानगरीला जाईन. आपले निरंतर कल्याण असो.'।
भगवान श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून द्रौपदीसह पांडवांचे चित्त स्वस्थ झाले. त्यांची सर्व चिंता दूर झाली आणि ते भगवान श्रीकृष्णाला म्हणाले,
‘हे विभो! हे गोविंदा! तुला आमचा सहाय्यक आणि संरक्षक मिळवून आम्ही मोठमोठ्या तरण्यास कठीण अशा संकटातून, अशा प्रकारे पार पडलो आहोत, की ज्याप्रमाणे महासागरात बुडणारी माणसे जहाजाचा आधार घेऊन समुद्र पार करतात. तुझे कल्याण असो. अशाप्रकारे भक्तांचे हितसमाधान करीत रहा.'
पांडवांनी असे म्हटल्यावर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला गेले.त्यानंतर द्रौपदीसह पांडव प्रसन्नचित्त होऊन एका वनातून दुसऱ्या वनात भ्रमण करीत सुखाने राहू लागले. अशा प्रकारे दुष्ट धृतराष्ट्रपुत्रांनी वनवासी पांडवांवर अनेक वेळा छळकपटाचा प्रयोग केला, परंतु तो निष्फळ झाला.
(महा. वन. अध्याय २६३)
*२) अर्थार्थी भक्त -*
*ध्रुवाचे* उदाहरण आदर्श अर्थार्थी भक्त म्हणून दिले जाते. स्वायंभुव मनु आणि महाराणी शतरूपा यांच्या पोटी प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन पुत्र जन्मले. उत्तानपादाला सुनीति (नावडती) आणि सुरुचि (आवडती) अशा दोन पत्नी होत्या. एकदा सुनीतीचा पुत्र ध्रुव राजाजवळ आला. त्यावेळी सुरुचीचा पुत्रयउत्तम, राजाच्या मांडीवर होता. ध्रुवालाही वडिलांच्या मांडीवर बसावेसे वाटले. परंतु सुरुचीने त्याला बसू दिले नाही. अपमान झालेला ध्रुव आईकडे रडत परतला.
सुनीति म्हणाली, जा.' 'बाळा! तू दुसऱ्याचे अमंगल चिंतू नकोस. तू श्रीहरीला शरण जा अपमानित झालेला ध्रुव वनात आला. तिथे त्याची नारदांशी भेट झाली. ध्रुव त्यांना म्हणाला,
'ब्रह्मन्! त्रैलोक्यात सर्वश्रेष्ठ असलेल्या पदावर विराजमान होण्याची माझी इच्छा आहे.'
नारदांनी त्याला,
*'ॐ नमो भगवते वासुदेवाय'*
हा मंत्रोपदेश केला. आपल्या तपश्चर्येने ध्रुवाने भगवंतांना प्रसन्न केले. भगवान् विष्णूंनी त्याला ध्रुवलोकाचे राज्य देऊन चक्रवर्ती सम्राट केले.
*३) जिज्ञासू भक्त -*
भगवत् तत्त्व जाणण्याची *उद्धवाची* तीव्र जिज्ञासा होती. भगवंतांनी ती पूर्ण केली.भागवताच्या अकराव्या स्कन्धाचे ७ ते २९ अध्याय म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला केलेला उपदेश होय. हा उद्धव भगवान श्रीकृष्णांचा सखा आणि मंत्री होता. द्रौपदीच्या स्वयंवरात व रैवतक पर्वतावरील उत्सवात हा सामील होता. बृहस्पतिकडून याला विद्या प्राप्त झाल्या होत्या. शाल्वाने द्वारकेवर आक्रमण केले, त्यावेळी श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीत याने नगरीचे रक्षण प्राप्त केले. भगवंतांकडून आत्मविद्या प्राप्त झाल्यावर हा तपश्चर्येसाठी बदरिकाश्रमात गेला.
*४) ज्ञानी भक्त -*
परमेश्वर स्वरूपाच यथार्थ ज्ञान होऊनही फलाशा-मानमरातबाच्या अपेक्षेविना जो झटतो तो खरा ज्ञानी भक्त. अशा भक्ताला परमेश्वरापाशी काहीच मागायचं नसतं.जो निष्काम बुद्धीन भक्ती करत रहातो, ईश्वरीविचार जनसामान्यांमधे नेण्यासाठी कृतार्थ झालेला हा ज्ञानी भक्त केवळ भक्तीसाठी भक्ती करीत असतो. कलावंत जसा कलेसाठी कला जोपासतो तसा हा ज्ञानी भक्त भक्तीसाठी भक्ती जोपासतो. तो शीलवान असतो.
*खरा ज्ञानी भक्त हा शीलवान, शीलवंत असतो. धर्म, सत्य, वृत्त, बल आणि लक्ष्मी यांच मूळ कारण शील असतं. इंग्रजीमध्ये ज्याला (character) चारित्र्य म्हणतात. शील हे किती महत्त्वाचे असते ते खालील भक्त प्रह्लादाच्या कथेवरून लक्षात घेता येते...*
*शीलवान भक्त प्रल्हादानं* इंद्राचं राज्य जिंकून घेतलं. गेलेलं राज्य परत कसं मिळवावं या विवंचनेत इंद्र पडला असताना देवगुरू बृहस्पतींनी त्याला उपदेश केला,
*'तू प्रल्हादाचं शील मागून घे.'*
इंद्र ब्राह्मणवेशात भक्त प्रल्हादाकडे गेला आणि त्याची सेवा करू लागला. भक्त प्रल्हाद प्रसन्न झाला आणि त्यानं त्या ब्राह्मणाला 'वर' मागायला सांगितलं. इंद्र म्हणाला, 'मला बाकी काहीही नको; फक्त तुझं शील दे.'
शील देताच प्रल्हादाच्या शरीरातून एक तेज बाहेर पडलं. प्रल्हादानं त्या तेजाला विचारलं, 'तू कोण आहेस
*'मी शील आहे...'*
तेवढ्यात दुसरं एक तेज भक्त प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडलं.
'तू कोण आहेस,' असं प्रल्हादानं विचारताच ते तेज म्हणालं,
*'मी धर्म आहे. जिथे शील आहे तिथेच धर्म असतो.'*
त्यानंतर तिसरं तेज बाहेर पडताच प्रल्हादानं तसाच प्रश्न केला. तेव्हा ते तेज बोललं,
*'मी सत्य आहे. जिकडे धर्म तिकडे सत्य असतं.'*
त्यानंतर चौथं तेज बाहेर पडलं. ते प्रल्हादाला म्हणालं,
*'मी वृत्त... जिकडे सत्य तिकडे वृत्त!' वृत्त म्हणजे सद्वर्तन.*
पाचवं तेज जेव्हा बाहेर पडलं तेव्हा ते म्हणालं,
*'मी बल आहे; वृत्त तिथे बल!'*
त्यानंतर एक स्त्री प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडली. प्रल्हादानं तिला विचारताच ती म्हणाली,
*'मी लक्ष्मी आहे. म्हणजे श्री: आहे. जिकडे बल असतं तिकडे मी असते. '*
शील गेल्यानंतर इंद्रानं पुन्हा प्रल्हादाच्या राज्यावर आक्रमण करून गेलेलं राज्य पुन्हा जिंकून घेतलं.
*थोडक्यात धर्म, सत्य, वृत्त, बल आणि लक्ष्मी यांच मूळ कारण शील असतं.*
शील गमावल्यामुळे आपण राज्य गमावून बसलो हे प्रल्हादाच्या ध्यानात आलं. इंद्राचं खरं स्वरूप त्याला कळून चुकलं.प्रल्हाद शीलवान होता. पण इंद्रानं त्याचं शील घेऊन त्याला पदभ्रष्ट केलं.
*भगवद्गीतेत* सांगितले आहे, या सर्व प्रकारच्या भक्तांमध्ये ज्ञानी भक्त श्रेष्ठ असतो. जे ज्ञानी भक्त असतात ते भगवंताच क्षराक्षर स्वरुप जाणतात आणि त्याला शरण जाऊन त्याची अनन्यभावानं भक्ती करतात. ते ज्ञानी भक्त भगवंताला अत्यंत प्रिय असतात आणि अशा ज्ञानी भक्तांना भगवंत प्रिय असतो. ज्ञानी भक्त हा भगवंताचा जणू आत्माच असतो. तो त्याच्याशी एकरूप झालेला असतो...
*सारांश:*
*आर्त - दुःखपीडित,*
*जिज्ञासू - ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगणारे,*
*अर्थार्थी - द्रव्यादिक काम्यवासना मनात ठेवणारे* आणि
*ज्ञानी - आत्मज्ञान होऊनही भक्ती करणारे असे चार प्रकारचे भक्त इथे सांगितले आहेत.*
*-----------------------------*
श्रीगीतासागर पूर्वार्ध - श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर.
श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य.
*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*
No comments:
Post a Comment