🌼🌼🌼🌼🌼🌼
३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस. त्या निमित्ताने ही विशेष कविता...
*हिशोब काय ठेवायचा, रिटर्न काय मागायचा!*
अनंत काळाच्या अखंड ओघात
आपल्या अल्पशा आयुष्याचा...
हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा ! ll१ll
जीवनाने भरभरून दिले.
जे नाही मिळाले त्याचा...
हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा ! ll२ll
मित्रांनी अलोट प्रेम दिले
मग शत्रूंनी दिलेल्या त्रासांचा...
हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा ! ll३ll
मधुर आठवणी इतक्या आहेत
मग काही कटु अनुभवांचा...
हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा ! ll४ll
मिळाली कौतुकफुले कैकवेळा जनांकडून
मग बोच-या काट्यांचा...
हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा ! ll५ll
उगवणारा प्रत्येक सूर्य प्रकाशमान.
मग रात्रीच्या अंधाराचा...
हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा ! ll६ll
आनंदाचे दोन क्षण पुरे जगायला.
मग उदासवाण्या क्षणांचा...
हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा ! ll७ll
चंद्र शीतल, आल्हाददायक.
मग त्याच्यावरील लांछनांचा...
हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा ! ll८ll
नुसत्या आठवांनीही होते मन उल्हसित.
मग कुणी भेटल्याचा अन् न भेटल्याचा...
हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा ! ll९ll
काही तरी चांगलं आहेच प्रत्येकामध्ये.
मग किरकोळ दोषांचा...
हिशोब काय ठेवायचा आणि रिटर्न तरी काय मागायचा ! ll१०ll
नाही ठेवला हिशोब, नाही लिखापढी
आहे त्याच्यापाशी, 'चित्रगुप्ताची' चोपडी
हिशोबून सारे त्याने ठरवायचे...
वसूल करायचे की रिटर्न द्यायचे! ll११ll
*नव्या आर्थिक वर्षाच्या शुभेच्छा!*
(३१ मार्च २०२४)
🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment