TechRepublic Blogs

Wednesday, April 10, 2024

मायेला जिंकण्यासाठी....

 *॥श्रीहरिः॥*


मायेला जिंकण्यासाठी जे सज्जन परमात्म्याला भजतात. ते कोण हे सांगताना भगवंतांनी त्यांचे चार प्रकार सांगितले. 


आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी!


हे चार भक्त सारखे नसून त्यापैकी ज्ञानी भक्त श्रेष्ठ आहे आणि तो मला विशेष प्रिय आहे हे भगवंत पुढील श्लोकात सांगतात, 


*-----------------------------*


॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अथश्रीमद्भगवद्गीता सप्तमोध्यायः


*तेषां ज्ञानी नित्ययुक्त* 

*एकभक्तिर्विशिष्यते ।*

*प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थ-*

*-महं स च मम प्रियः ॥*

*॥७.१७॥*


(दैनंदिन श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञानयोग ७.१७) 


*भावार्थ:- यांपैकी (उपासकांपैकी) एकभक्ती म्हणजे अनन्यभावे माझीच (परमेश्वराची) भक्ती करणारा आणि युक्त असा ज्ञानी भक्त श्रेष्ठ होय. कारण अशा ज्ञानी पुरुषाला मी अत्यंत प्रिय असतो आणि ज्ञानीही मला तसाच प्रिय असतो.*


*-----------------------------*


*आर्त, अर्थार्थी, व जिज्ञासू -* 

हे तिन्ही भक्त सकाम आहेत, तर ज्ञानी हाच निष्काम भक्त होय. म्हणून तो भगवंताला विशेष प्रिय आहे. अर्थात ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी. 


अशा थोर भक्तांचा गौरव गाताना भागवतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात,


'साधवो हृदयं मह्यं 

साधूनां हृदयं त्वहम् ।

मदन्य ते न जानन्ति 

नाहं तेभ्यो मनागपि ।। '

( भाग. ९.४.६८). 


अर्थात् ज्ञानी साधुजन माझा आत्मा- हृदय असून साधूंचे हृदय मीच आहे. साधुजन माझ्याविना वा मी त्यांच्याविना काहीही जाणत नाही.



जे *ज्ञानी पुरुष* भगवंताचं क्षराक्षर स्वरूप जाणतात आणि त्याला शरण जाऊन त्याची अनन्यभावानं भक्ती करतात ते ज्ञानीपुरुष भगवंताला अत्यंत प्रिय असतात आणि अशा ज्ञानी पुरुषांना भगवंत प्रिय असतो. 


*मायेच्या* पाशात बद्ध न होता हा ज्ञानी भक्त लोकसंग्रहार्थ निष्काम कर्म करीत रहातो.परमेश्वराच्या सर्वव्यापक स्वरूपाविषयीचं ज्ञान झाल्यामुळे ज्ञानी भक्ताचं चित्त परमेश्वर स्वरूपापासून विचलित होत नाही. अशा भक्ताला *अंतिम ज्ञान* प्राप्त झालेलं असल्यामुळे या जगात त्याला काहीही प्राप्तव्य नसतं. 


भगवंताजवळ त्याला काहीही मागायचं नसतं. 

*'आता उरलो उपकारापुरता'*

 

म्हणजे केवळ ईश्वराचंच काम करण्यासाठी हा जीव कार्य करीत असतो. या जीवाच्या मार्फत भगवंत स्वत:चं धर्मसंस्थापनेचं कार्य करवून घेतो. त्याच्या इच्छा-आकांक्षा या त्याच्या रहातच नाहीत. किंबहुना *'तू-मी'* असा भेदच न राहता आपण दोघे एकच आहोत अशी भगवंताची आणि ज्ञानी भक्ताची स्थिती असते.


*भक्त प्रल्हाद आणि नारद* 

हे अशा निष्काम कर्मयोगी भक्तांचं श्रेष्ठ उदाहरण म्हणून सांगता येईल. भक्त प्रल्हादानं समाजहिताकरता आपल्या जन्मदात्याचाही वध अवताराकडून करवला.प्रल्हादाला त्याच्या वडिलांनी आगीत टाकलं, कड्यावरून ढकलून दिलं, उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं. परंतु तो श्रेष्ठ भक्त असल्यामुळे आपल्या भक्तीच्या शक्तीनं या साऱ्या संकटांतून पार पडला.


*नारदांनी* तर भगवंताच्या कार्यासाठी आपलं सारं जीवन वेचलं. भगवंताचा भक्तिसंदेश घेऊन ते तिन्ही लोकांतून सतत संचार करीत असत. नारद एकदा भगवंतांना विचारतात, 


'भगवान, आपला श्रेष्ठ भक्त कोण?'


तेव्हा भगवान श्रीविष्णू सांगतात, 

'नारदा, तू आधी एक काम कर...


तेलाची भरलेली वाटी घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा करून ये. वाटीतलं एक थेंबही तेल मात्र सांडता

कामा नये.' 


नारदमुनी त्याप्रमाणे पृथ्वी प्रदक्षिणा करून येतात. आल्यावर सांगतात, 

'भगवंता, एक थेंबही न सांडता मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. '


भगवंत विचारतात, 

'या कालावधीत माझं स्मरण किती वेळा झालं?'


'एकदाही नाही. कारण माझं सारं लक्ष तेल सांडू नये याकडे होतं.'


'तात्पर्य: संसारात राहून परमेश्वराचं विस्मरण ज्याला होत नाही तोच खरा श्रेष्ठ भक्त. ईश्वरीविचाराशिवाय दुसरं काही नाही आणि त्याच्या कामा- शिवाय दुसरं स्वार्थप्रणित कार्य नाही अशी ज्या ज्ञानीयांची अवस्था असते ते खरे ईश्वराचे आत्यंतिक आवडते भक्त.'



खरंतर ज्ञानी भक्तच परमभक्त असतो. त्याच्या चेहऱ्यावर प्रत्येक वेळी संतोष, स्वीकाराचं सुख आणि आनंदाचा भाव झळकत असतो. सुख असो अथवा दुःख,मान किंवा अपमान, तो कोणत्याही बाह्य गोष्टी किंवा घटनांमध्ये अडकत नाही. भक्तीमध्ये तो नफातोट्याचा,लाभ-हानीचा विचार करत नाही. जीवनातील प्रत्येक घटनेविषयी त्याच्यामध्ये स्वीकार आणि समभाव असतो.


*सारांश:* 

*दैनंदिन व्यवहार करत असतानाही जो नित्य केवळ भगवंताचेच स्मरण करीत असतो आणि निष्काम बुद्धीनं त्याचंच कार्य करतो तोच खरा श्रेष्ठ आणि भगवंताचा आत्यंतिक प्रिय भक्त होय.*


*-----------------------------*


श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीता भाष्य. 



*।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।*

No comments:

Post a Comment