TechRepublic Blogs

Sunday, April 7, 2024

चिंतन

 चिंतन ९१

        श्रीराम,

                 आनंदी असण्यासाठी मनोवृत्ती बदलावी लागते. शास्त्रात चार प्रकारच्या वृत्ती सांगितल्या आहेत. मनोवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धीवृत्ती आणि अहंवृत्ती. वृत्ती म्हणजे त्या त्या घटकात, त्याला, त्याच्या कार्याकडे प्रवृत्त करणारा बदल अंतःकरणात झाला की त्याला वृत्ती म्हणतात. समर्थ जेव्हा 'बुद्धि दे रघुनायका' असे म्हणतात, तेव्हा मन, चित्त हे शब्द न वापरता, रघुनायका संबंधी निश्चय करणारी बुद्धी दे व त्या बुद्धिवृत्तीने तोच निश्चय सतत ठेवावा असे मागणे मागतात.

                     भक्तीमार्गाने प्रवास करायचा असा निश्चय जर आपण करत असू तर आपल्या अंतःकरणातील संकल्प विकल्प करणारी मनोवृत्ती इथे उपयोगाला येत नाही. कारण मनोवृत्तीत ठाम निश्चय नसतो. करु की नको? असे प्रश्न निर्माण होत असल्याने या मनोवृत्तीच्या खेळात आपण अडकतो. हळूहळू मन स्वप्नरंजन सुरू करते.. त्यातच दिवसेंदिवस कसे संपून जातात ते समजतच नाही.. आणि एक दिवस असा येतो की आपल्या आयुष्याचे तास संपत आले असे समजते आणि आयुष्य व्यर्थ गेले असा पश्चाताप होतो... पण.. तोपर्यंत खुप उशीर झालेला असतो.

                 पश्चात्तापाची वेळ येऊ नये म्हणून मनोवृत्तीला आवर घालून निश्चयात्मक वृत्ती सतत वर ठेवणे हे मात्र १००% आपल्या हातात असते.  मग आपण तसे करतो का?

                             ||श्रीराम ||

No comments:

Post a Comment