*प्रश्न. जन्मभर बेफिकिरीने वागून अंतकाळी भगवंताचे स्मरण शक्य आहे का?*
आठव्या अध्यायातील सहाव्या श्लोकात भगवंत म्हणतात,
*यं यं वापि स्मरन्भावं*
*त्यज्यत्यन्ते कलेवरम्I*
*तं तमेवैति कौन्तेय*
*सदातद्भावभाविताः॥*
*॥८.६॥*
'ज्या ज्या वस्तूचं स्मरण करीत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो त्याच त्या भावाला तो पुढे जाऊन प्राप्त होतो.'
*चांगल्या सवयी* अंगी बाणण्यासाठी सातत्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे. वाल्या कोळ्याच्या जीवनात नारदभेटीचा एक क्षण जीवनाचे परिवर्तन करणारा ठरला, पण वाल्याचा वाल्मीकी एका क्षणात झाला नसून अनेक वर्षाच्या निरंतर कठोर तपाने झाला. अजामिळाची गोष्ट ऐकून एखाद्याने विचार केला की आयुष्यभर मौज मस्ती, चैन करून मरण्याच्या क्षणी परमेश्वर स्मरण केले तरी मोक्ष मिळेल तर तो त्याचा भ्रम आहे. जीवनभर आपण ज्या गोष्टीत रमतो, त्याच अंतिम क्षणी सुद्धा आठवण्याची दाट शक्यता असते. लोभी व्यापाऱ्याला मरताना पण आपल्या पश्चात मुले आपला व्यवसाय नीट सांभाळतील ना याचीच चिंता असते.
आचार्य विनोबा भावे यासाठी फार छान उदाहरण देतात. एकाच दिशेने प्रवाह वाहिला पाहिजे. डोंगरावर पडलेले पाणी जर बारा वाटांनी वाहून गेले तर नदी होणार नाही. परन्तु एका दिशेने वाहणार्या धारेचा ओहोळ होईल, ओहोळाचा प्रवाह होईल, प्रवाहाची नदी होऊन सागराला मिळेल.
संस्काराचेही तसेच आहे. संस्काराचा पवित्र प्रवाह सतत जीवनात वाहत राहील तरच शेवटी मरण आनंदाचे होईल.
जन्मभर योगाभ्यास करणारा अंत होण्यापूर्वी काही कारणाने योगभ्रष्ट झाला तर त्याला पण पुनर्जन्म चुकत नाही (अध्याय 6), तर मग जन्मभर विलासी जीवन जगलेल्या सामान्य माणसाचे काय सांगावे. म्हणूनच कायम मृत्युची जाणीव ठेवून सदाचाराने वागले, उदात्त विचार जोपासले, परमेश्वर सामर्थ्याची व आपल्याला त्याच्या पासून मिळणार्या प्रेरणेची जाणीव व स्मरण ठेवून जीवन संग्रामात झोकून दिले तरच मृत्यू सुखाचा होईल, अन्यथा खंत व पश्चाताप करण्याची वेळही हातातून निघून जाईल.
(संदर्भ - विनोबा गीता प्रवचने, गीता तत्त्वमंजरी.)
No comments:
Post a Comment