एकदा मालाड येथे निरूपण सुरू होण्याला अवकाश होता. त्यावेळी एकाने असा विचार मांडला की निरूपण आणि त्याच्या आगेमागे जाणारा वेळ मिळून होणारा वेळ जर घरी नामस्मरणात घालविला तर निरुपणाचा हेतू चांगल्या तऱ्हेने साध्य होईल.
या बद्दल बरीच चर्चा झाली. निर्णय लागेना. तेव्हा या बद्दल श्री.महाराज यांना विचारावे असे ठरले. त्यानंतर एकाने हा प्रश्न श्री.महाराज यांच्यापुढे मांडला व दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले. त्यावर श्री.महाराज म्हणाले " मला वाटते की खरा मुद्दा या प्रश्नाने व्यक्त होत नाही.
या वेळात काय करावे यापेक्षा हे दोन तास सोडून दिले तरी उरलेल्या बावीस तासात आपण काय करतो आणि काय करायला पाहिजे हा मुद्दा आहे. निरूपण ऐकले काय किंवा नामस्मरण केले काय , उरलेले बावीस तास जर आपण नामाशिवाय घालविले तर किती तरी तास नामाशीवाय घालविले असे होईल ना? पोथीच्या दोन तासात नुसती करमणूक म्हणून ती न ऐकता,
आपल्या मनात भगवंता बद्दल प्रेम उत्पन्न होऊन नामस्मरणाची बुध्दी वाढीला लागावी या भावनेने ऐकली तर लाभ होईल. त्या ऐवजी तेव्हढा वेळ सर्वांनी नामस्मरण केले तरी उत्तमच होईल. कारण नामस्मरण करण्याची बुध्दी व्हावी हाच पोथीचा हेतू आहे. पण दोन तास मन नामात गुंतविणे ही गोष्ट सोपी नाही हे ध्यानात ठेवावे."
No comments:
Post a Comment