TechRepublic Blogs

Wednesday, July 16, 2025

रामहृदय

 *🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*


*काय सांगितले यापेक्षा कोणी सांगितले ते महत्त्वाचे*


     *श्रीमहाराज जेव्हा अनुग्रह देत तेव्हा अनुग्रहीतास त्रयोदशाक्षरी मंत्र , रामहृदयाची पोथी व माळ देत असत. रोज स्नान झाल्यावर एक माळ तरी जप व रामहृदयाचा एक पाठ करावाच असा श्रीमहाराजांचा आग्रह असे. वामनराव ज्ञानेश्वरी ( हे रामहृदयाची संथा देत ) यांनी एकदा श्रीमहाराजांना विचारले की , महाराज , रामहृदय संस्कृतमध्ये आहे.

 बहुतेकांना त्याचा अर्थ कळत नाही. त्याचा अर्थ न कळता ते पोपटासारखे म्हणून काय साध्य होणार ? ' त्यावर श्रीमहाराज म्हणाले , ' वामनराव, काय म्हणायला सांगतो यास विशेष महत्त्व नसून ते कोण म्हणायला सांगतो यात त्याचे महत्त्व आहे.

 जो म्हणावयास सांगतो त्याची शक्ती त्याच्या पाठीमागे असते. रोगी डाॅक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर त्यास तपासतो. रोगाचे निदान करून औषध देतो. औषधात काय काय आहे हे रोग्यास माहीत नसते. पण त्या औषधाने आपणांस बरे वाटेल या श्रद्धेनेच त्यास बरे वाटते.

 औषधात काय काय आहे हे समजल्याशिवाय औषध घेणारच नाही असे जर रोग्याने म्हटले तर ते हास्यास्पद होईल. त्याने श्रद्धेने औषध घेतले तर तो बरा होतो असा अनुभव येतो. तसे अर्थ न कळता पण श्रद्धेने रामहृदय म्हटल्यास साधकाचे काम आपोआप होते. '*

*||श्रीराम जय राम जय जय राम||*

No comments:

Post a Comment