*॥श्रीहरिः॥*
"अनन्यभक्ती" ही कशी असते याविषयी मार्गदर्शन करताना श्रीभगवंत म्हणतात,
*-----------------------------*
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता अष्टमोध्यायः
*पुरुष: स परः पार्थ*
*भक्त्या लभ्यस्त्वनन्यया ।*
*यस्यान्तःस्थानि भूतानि*
*येन सर्वमिदं ततम् ॥*
*॥८.२२॥*
(श्रीमद्भगवद्गीता अध्याय आठवा अक्षरब्रह्मयोग ८.२२)
*भावार्थ:- हे पार्था, ज्याच्या अंतर्गत ही सर्व भूतं आहेत आणि ज्यानं हे सर्व (विश्व) व्यापलेलं आहे तो परम पुरुष (परमात्मा) अनन्य भक्तीनंच प्राप्त होणारा आहे.*
सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची प्राप्ती अनन्य भक्तीनेच होते. ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले, तरी ते सर्वव्यापी आहे. आणि सर्व काही त्यांच्या ठायी स्थित आहे.
*-----------------------------*
*अक्षर* म्हणजे मूळ प्रकृतीहून अगदी निराळी, श्रेष्ठ, अनादी, अव्यक्ताहून अशी एक अवस्था आहे. तिला परमगती म्हणतात. मनुष्य त्या गतीला जाऊन मिळाला म्हणजे तो पुन्हा संसारात परत येत नाही, असं यापूर्वीच्या २०व्या आणि २१ व्या श्लोकात सांगून त्या श्लोकांचा उत्तरार्ध भगवंत या श्लोकात वर्णन करतात.
‘अव्यक्त' आणि ‘अक्षर' ही दोन्ही विशेषणं गीतेमधून कधी सांख्यांच्या प्रकृतीला तर कधी त्या प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या परब्रह्माला उद्देशून योजलेली असतात, हे इथे ध्यानात ठेवलं पाहिजे.
*'अक्षरब्रह्म'* म्हणजे ज्या ठिकाणी पोचल्यावर मनुष्यास पुनर्जन्म प्राप्त होत नाही तो. हा जो अव्यक्त आणि अक्षर भाव असतो त्यालाच सर्वोत्तम गती असं म्हणतात.
त्या भावाला प्राप्त होऊन जीव पुन्हा संसारमार्गात येत नाही. भगवंताचं ते परमपद असतं. पण अशी अवस्था येण्यासाठी प्रथम 'अहम्'ला विसरावं लागते. म्हणजेच,
*'अहं'* ला विशाल बनवावं लागतं - 'अहं'चं उदात्तीकरण करावं लागतं. एवढंच नाही तर मी 'अहं'ला विसरलो आहे, ही गोष्ट देखील विसरावी लागते!
नदीचं आणि सागराचं एकदा मीलन झालं म्हणजे नदी कधी सागरापासून विलग होत नाही. रात्र एकदा दिवसाला जाऊन मिळाली म्हणजे ती पुन्हा त्या दिवसापासून परत फिरत नाही.
बंदुकीतून गोळी सुटली की ती फिरून मागे येत नाही. मुखातून शब्दफेक झाली की तिला मागे घेता येत नाही. अनन्यभक्तीचा
ओघच मानवाला त्या आनंदसागराकडे नेत असतो.
*'अनन्यभक्ती'* चा अर्थ समजून घेतला पाहिजे. अनन्यभक्ती म्हणजे आत्मज्ञानरूप भक्ती. मीच स्वतः भगवान आहे, अशी साक्षत्काररूपी अनुभूती येणं म्हणजे अनन्यभक्ती! केवळ आरडाओरडा करून भजन करणं म्हणजे परमेश्वराची अनन्यभक्ती होऊ शकत नाही.
भक्तीमध्ये बुद्धिनिष्ठभावाचा ओलावा हवा. कर्मकांडात्मक शुष्क भक्ती उपयोगाची नाही! केवळ भजनाला जातो म्हणजे भक्ती करतो असं होत नाही. भक्ती ही दुसऱ्याला दाखविण्याची गोष्ट नाही.आपल्या 'भक्ती'मुळे दुसऱ्याला त्रास होत असेल तर अशी भक्ती कधीच फलद्रूप होणार नाही.
ज्यावेळी दुसऱ्यामध्ये असलेल्या परमेश्वराला ओळखण्याची समज येईल त्यावेळी अशी बाह्यतः कर्मकांडात्मक भक्ती माणूस सोडून देईल.
मग अंतर्मुख झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याच्या भक्तीला प्रारंभ होईल. त्या भक्तीचं अंतिम स्थान म्हणजेच 'अहं ब्रह्मास्मि' खऱ्या अर्थानं गाठलं जाईल. तेव्हाच पुरुष भगवंत स्वरूपात विलीन होऊन जाईल.
*भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात,*
की या अक्षर चैतन्य परमात्म्याला प्राप्त करण्याचा मार्ग आहे - अनन्य भक्ती.
ही तेव्हाच पूर्ण होते जेव्हा साधक स्वतःला शरीर, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे बघायला शिकतो. अन्यथा एक कच्चा साधक शारीरिक वेदना, मनामध्ये उठणारे नकारात्मक विचार, मनाचे विकार, मायेचं आकर्षण यांच्या अधीन होऊन त्यांच्यातच लीन होतो. सत्याप्रति अगाध प्रेम हेच मायेपासून वैराग्य देतं.
आत्यंतिक तृष्णेमुळे प्रेरित होऊन आत्मतत्त्वाचा शोध घेतल्यानंतर साधकाला, 'मी म्हणजेच ते चैतन्य आहे,' ही दृढता मिळते. हीच अनन्य भक्ती आहे. खरंतर साधक आपल्या हृदयातच 'स्व'चा शोध आणि अनुभव प्राप्त करतो. परंतु परमचेतना हीच संपूर्ण विश्वाचं अधिष्ठान आहे, ही जाणीव त्याच्यात असते.
*गीतेत* येथून पुढे भक्तीचा विषय आलेला आहे.भक्तीसंबंधीचा असा अधिकाधिक सुंदर उपदेश यापुढील गीताश्लोकांमध्ये येत राहील.
"अनन्यभक्तीचा" येथील अर्थ हा असा आहे.*'मला भक्तीशिवाय आणखी काहीही नको आहे!*
भक्तीची हीच कल्पना आपल्या पुराणांद्वारा, आपल्या संतांच्या जीवनांद्वारा स्पष्ट केली गेली आहे. यात सर्वोत्तम कथा आहे ती प्रह्लादाची.
त्या पाच वर्षांच्या बालकाची भक्ती पूर्णतः शुद्ध आणि अहैतुकी होती. त्याची कथा श्रीमद् भागवतामध्ये आलेली आहे. त्याला ईश्वरानुभूती प्राप्त झालेली होती. नरसिंह अवतारातील परमेश्वर या बालकाच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले,
“प्रह्लादा! मी तुझ्यावर अगदी प्रसन्न झालेलो आहे. माझ्याकडून तुला हवा तो वर मागून घे.”
भक्त प्रह्लाद सस्मित वदनाने म्हणाला,
“मी काही वणिग्वृत्तीचा नाही, की तुला वर मागेन. मी तुझ्यावर प्रेम करतो; एवढे मला पुरे आहे. त्याच्या बदल्यात असे मला काहीही नको.” म्हणून तर आपल्या धार्मिक वाङ्मयात सर्वश्रेष्ठ भक्ताचे उदाहरण म्हणून प्रह्लादाची प्रशंसा आढळते.
*नारद भक्तिसूत्र म्हणते,*
*भक्ता एकान्तिनो मुख्याः -*
"जे एकाग्र झालेले भक्त असतात, सर्व भक्तांमधील श्रेष्ठ भक्त होत. एकाग्र भक्ती कुठल्याही एखाद्या क्षुल्लक कारणाने विचलित होत नसते."
श्रीमद्भागवताच्या सातव्या खंडामध्ये जशी भक्त प्रह्लादाची कथा आहे, तशीच चौथ्या स्कंदामध्ये ध्रुवाचीही आहे. ध्रुव हा जितका विस्मयकारक बालक होता, तितकेच त्याचे जीवनही विस्मयकारक होते.
जेव्हा त्याला ईश्वरानुभूती प्राप्त झाली, तेव्हा त्याला सर्वोच्च असे अढळ पद हवे होते. भगवंत त्याला 'तथास्तु' म्हणाले. त्यानेच ध्रुव नक्षत्र झाला. मृत्यूनंतर तो ध्रुव तारा झाला.
भगवंत त्याला म्हणाले,
“मी तुला असे उच्च पद देतो की जिथे सप्तर्षि सदैव तुझ्याभोवती असतील. त्यांच्या केंद्रस्थानी तू मात्र सतत एकाच ठिकाणी राहशील. हेच तुझ्यासाठी सर्वोच्च पद असेल. ते मी तुला देतो.” ध्रुव संतोष पावला आणि परमेश्वर अंतर्धान पावला.
काही काळ गेल्यानंतर ध्रुव विचार करू लागला, "मी केवढा मूढ! परमेश्वरासंनिध जाऊन मी त्याला एक क्षुद्र पद मागितले. मी खरोखरीच मूढ म्हणायचा!"
नंतरच्या काळात त्याला याचा अतिशय पश्चात्ताप झाला.ध्रुवाची ही कथा चौथ्या खंडात आहे. पुढे सातव्या खंडात प्रह्लादाची कथा येते. तो पूर्णमुक्त होता.
“मला काहीही मागायचे नाही. मी वणिग्वृत्तीचा नाही. मी काही व्यापारी नाही." 'मी तुम्हास अमुक देतो; त्याच्या बदल्यात तुम्ही मला तमुक द्या', याला व्यापार म्हणतात, विनिमय म्हणतात. येथे असा कोणताही व्यापार-विनिमय नाही.
प्रह्लादाची भक्ती ही केवळ "अनन्यभक्ती" आहे. स्वामी विवेकानंद जसे 'प्रेमाकरिता प्रेम' म्हणाले ना, तसे हे आहे. (म्हणून प्रह्लादाच्या) या विचाराची आपल्याकडील आध्यात्मिक वाङ्मयात फार प्रशंसा आढळते.
*'भक्तीकरिता भक्ती'* ही खरोखरीच खूप उच्च अवस्था होय. ही अवस्था खूप उच्च आहे, हे माहिती असणेही चांगले आहे. नाहीतर भारतातील काही भक्तांप्रमाणे आपण आपल्या सर्व चांगल्या गोष्टीही आपल्या सामान्य स्थितीपर्यंतच्या निम्नस्तराला आणून ठेवू.
भक्त एखाद्या देवाची उदाहरणार्थ श्रीगणेशाची प्रार्थना करतो; पण प्रार्थिलेले काही त्याला मिळत नाही. मग तो कार्तिकेयाची प्रार्थना करतो,त्यानंतर शिवाची, नंतर आणखी एखाद्या देवाची. (त्याला असे वाटत असते की) त्याने प्रार्थिलेले त्याला मिळायलाच हवे. जणू परमेश्वर त्याचा दास आहे आणि त्याने मागितलेली कोणतीही वस्तू परमेश्वराने त्याला दिलीच पाहिजे.
*डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्* यांनी असे म्हटले आहे की,
*'आपण देवावर प्रेम करीत नाही; आपण देवाला वापरून मात्र घेतो.'*
प्रह्लादाची भक्ती काही अशा प्रकारची नाही. त्याच्या भक्तीत शुद्ध प्रेम होते. ते 'प्रेमासाठी प्रेम' आहे. वेदान्ताने अशा भक्तीला अहैतुकी भक्ती म्हटलेले आहे. हरी, श्रीविष्णू किंवा शिव ही एकाच दिव्य पुरुषाची वेगवेगळी नावे होत.त्या दिव्य पुरुषाचे स्वरूप असे आहे की, तो शुकासारख्या तरुणांची ज्यांनी आपले स्वरूप म्हणजे सनातन आत्मतत्त्व होय, याची अगोदरच अनुभूती घेतलेली आहे अशा शुकासारख्या तरुणांची अंत:करणे आकर्षून घेतो.
त्या तरुणांना अभिलाषा अशा नसतातच. तरीही ते हरीची भक्ती करीत असतात. कारण काय, तर त्यांच्यासारख्यांचीही अंतःकरणे स्वतःकडे आकर्षून घेण्याचा गुण त्यांना परमेश्वरात दिसतो म्हणून.
श्रीमद्भागवतात याबाबतचा एक सुंदर श्लोक (१.७.१०) आहे. शुक व प्रह्लादासारखी माणसे परमेश्वरावर प्रेम करतात. त्या परमेश्वरामध्ये अशी कोणती महानता आहे की ज्यांना काहीही मिळवायचे नाही अशी माणसेही त्याच्यावर प्रेम करतात?
आत्मारामाश्च मुनयः
निर्ग्रन्था अपि उरुक्रमे ।
कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिम्
इत्थंभूतगुणो हरिः ।।
'जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांची अविद्येची गाठ सुटली आहे आणि जे नेहमी आत्म्यातच रममाण झालेले असतात, असे लोकही भगवंताची निष्काम भक्ती करतात. कारण भगवंताचे गुण इतके मधुर आहेत की ते सर्वांना भगवंताकडे आकर्षून घेतात.'
तात्पर्य जो हरी सामान्य माणसांचीच अंतःकरणे नव्हे, तर शुक व प्रह्लाद यांच्यासारख्या असामान्य कोटीच्या माणसांचीही अंत:करणे आपल्याकडे आकर्षून घेतो तो हरी केवळ महान होय.
*सारांश:*
*परमगतीला जो प्राप्त होतो तो पुन्हा संसारात परत येत नाही. अनन्यभक्तीनंच ही गोष्ट साध्य होऊ शकते. अनन्यभक्ती ही आंतरिक भक्तीची अवस्था आहे. बाह्यभक्तीची अवस्था नाही.*
*-----------------------------*
संदर्भ ग्रंथ :-
श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य.
भगवद्गीतेचा सार्वजनीन संदेश.
*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*
No comments:
Post a Comment