*दिसामाजी काहीतरी* ...
*पांढरे केस*
आजोबा बहुधा सैन्यातून निवृत्त झाले असावेत. पाचुंदाभर झुपकेदार मिश्या, ताठ कणा आणि पत्नीशी मृदू बोलणं - ही सगळी त्याचीच लक्षणं होती.
चार दिवसांपूर्वी ते गाड्यांच्या याच शोरुममध्ये आले होते. नुकत्याच बाजारात आलेल्या एका छोटेखानी ऑटोमॅटिक गाडीची त्यांनी चौकशी केली होती. तेथील त्या हटके रंगाचं मॉडेल त्यांना पसंतही पडलं होतं. किंमतीबद्दल त्यांनी सेल्समनशी घासाघीसही केली होती. पण डिस्काउंट द्यायला सेल्समनने साफ नकार दिला होत.
"मी हीच गाडी घेणार. चार दिवसांनी येतो. दुसऱ्या कोणाला देऊ नकोस," असं बजावून ते गेले होते आणि आज बरोब्बर चौथ्या दिवशी आले होते.
आज आजीही सोबत होत्या. आजोबा दुरूनच त्यांनी पसंत केलेली गाडी त्यांना दाखवत होते. रंग, त्यातील करामती आजींना आवडल्या असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. पण एक मोठी अडचण दिसत होती.
सेल्समन तीच गाडी एक सुंदर तरुणीला दाखवत होता, आणि एवढंच काय, पण आजोबांना सांगितलेल्या किंमतीपेक्षा तब्बल दोन लाख रुपये कमी घेऊन त्याने त्याच गाडीचा सौदा त्या तरुणीशी पक्का केला. ती तरुणी पैसे भरण्यासाठी अकाऊंटस् विभागात गेली आणि आजोबांनी सेल्समनचा ताबा घेतला.
"भल्या माणसा, मी चार दिवसांपूर्वी आलो होतो. ही गाडी नक्की घेणार म्हणून सांगून गेलो होतो. माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, तिला सरप्राइज द्यायचे आहे हे सांगितलं होतं. शहरात चालवायला आणि पार्किंगला ही छोटी आणि गिअरशिवायची गाडी तिला सुयोग्य राहील इतकं सगळं आपलं बोलणं झालं होतं.
माझ्याशिवाय कोणालाही ही गाडी देऊ नकोस असं मी तुला सांगून गेलो होतो. आणि तरीही तू ही गाडी त्या मुलीला विकून टाकलीस ? आणि तीही दोन लाख रुपये कमी किंमतीत ? मी डिस्काउंट मागितला तर मला केवढं प्रवचन दिलंस तू ! मॉडेल नवीन आहे, ऑटोमॅटिक आहे, हा रंग कमी मिळतो - सतराशे साठ कारणं सांगितलीस. मग आता काय झालं ?"
आजोबांचा सात्विक संताप झाला होता.
"आता एवढ्या सुंदर तरुणीला नाही कसं म्हणायचं ?" ओशट ओशाळं हसत सेल्समन आपली कैफियत मांडत होता.
तो पुढं काही बोलणार एवढ्यात गाडीच्या किल्ल्या घेऊन ती तरुणी त्यांच्याकडेच आली. सेल्समन तिच्याशी काही बोलणार एवढ्यात ती त्या वृद्धाकडे वळली, आणि त्यांच्या हातात गाडीच्या किल्ल्या देत म्हणाली, "आजोबा, you are simply great. तुम्ही म्हणालात तसंच झालं. याने दिला की मला डिस्काउंट ! आज्जी, happy birthday !"
तरुणी आजीला बिलगली आणि तोंडाचा आ वासलेल्या त्या सेल्समनला उद्देशून आजोबा म्हणाले, "हे केस उन्हात उभे राहिल्याने पांढरे नाही झाले, बाळा. पुष्कळ पावसाळे पाहिले आहेत. पुढच्या वेळी पांढरे केस दिसले की हा धडा लक्षात ठेवशील, अशी आशा ठेवतो."
आणि आजींकडे वळत ते म्हणाले, "चला, birthday girl, आज तुमच्या वाढदिवसानिमित्त मला लाँग ड्राईव्हला घेऊन चला."
इति
मकरंद
श्रीराम
No comments:
Post a Comment