भक्तीची शक्ती..
राधाबाई एका दवाखान्यात आया म्हणून काम करायच्या. वय साधारण ५५/५६ असावे.
राधाबाईचा जन्म एका खेड्यातला. आठ भावंडातील राधा हे चौथे अपत्य. आधीची तीन आणि नंतरचे एक भावंड जन्मताच किंवा लहान वयातच गेलेली. आई वडील दुसऱ्यांच्या शेतात राबून चरितार्थ चालवायचे. घरात अगदी हालाखीची परीस्थिती नसली तरी श्रीमंती देखील नव्हती. दोन वेळेला खाऊन सुखी होते.
त्याकाळी प्रत्येक अपत्याची जन्मवेळ नोंदवण्याचे कोणाच्या डोक्यातच नव्हते. बाळंतपणं घरातच सुइणीच्या हाताने होत असत. मग जनगणनेचे अधिकारी जेंव्हा मुलाची जन्मतारीख विचारायचे तेंव्हा, "त्यो बघा भादव्यातला हाये. हे पाऊस कोसळत होता अन् हितं माझ्या सुनेला रातच्याला कळा सुरु झाल्या. लगालगा रुक्मावतीला बोलावून घेतलं अन् ह्यो जनमला."
घरातल्या आज्जीची ही अशी अनमान धपक्याने दिलेली उत्तरं. मग ते अधिकारी स्वतःच त्या मुलांकडे बघून मराठी महिन्याला इंग्रजीत रुपांतरीत करुन अंदाजे जन्मतारीख लिहायचे.
या अशा काळात जन्मलेल्या राधाबाईला वयात आल्या आल्या जे पहिले स्थळ आले ते शेजारच्या गावातील एका नात्यातल्या मुलाचे. बघण्याच्या कार्यक्रमातच सुपारी फोडली आणि मग राधाबाईचे लग्न झाले. पाठवणी करताना तिच्या लाडक्या विठ्ठलाची छोटीशी मुर्ती तिने आवर्जून सोबत घेतली.
राधाबाईचे वडील निस्सीम विठ्ठलभक्त. दरवर्षी पंढरीची वारी त्यांनी कधी चुकवली नाही. घरातील वारकरी वातावरणामुळे राधाबाईला लहानपणापासूनच विठ्ठलभक्तीचे वेड लागले.
एकदा राधाबाईच्या सासरच्या गावी भीषण दुष्काळ पडला. विहिरी आटल्या. नदी नाले कोरडे पडले. खायचे प्यायचे वांधे झाल्यावर कुटुंबाने शहराचा रस्ता धरला. तसेही गावात स्वतःची म्हणावी अशी काहीच मालमत्ता नव्हती.
शहरात आले आणि शहरातलेच होउन गेले. यथावकाश राधाबाईला एक मुलगा आणि पाठोपाठ एक मुलगी झाली. संसाराला हातभार म्हणून राधाबाई इतरांकडे घरकाम करु लागल्या. अशाच एका डॉक्टर बाईंकडे काम करताना त्यांचे स्वच्छ आणि टापटीप काम बघून त्या डॉ. बाईंनी राधाबाईला त्यांच्या दवाखान्यात आयाचे काम करणार का म्हणून विचारले. पगार देखील व्यवस्थित मिळणार म्हटल्यावर राधाबाई दवाखान्यात नोकरी करु लागल्या. घरी मुलांना सांभाळायला सासूबाई होत्याच.
काम करताना त्यांच्या तोंडात सतत पांडुरंगाचे नाम असायचे..
दरवर्षी वारीला जाण्यासाठी रजा मिळावी म्हणून, त्या आधी काही दिवस रजा घ्यायच्या नाहीत साठवून ठेवायच्या पण वारी करायच्याच.
काळ पुढे सरकत गेला. मुलीचे आणि मुलाचे लग्न झाले.
राधाबाई विचार करायच्या, कोण कुठली मी. एका खेड्यात जन्म झालेली पण आता दवाखान्यात नोकरी करते. शिकल्या सवरल्या लोकांसोबत रहाते. पोरं पण चांगली शिकून लग्न होउन मार्गी लागली. सगळी त्या विठ्ठलाची कृपा. विठ्ठलाच्या भक्तीने त्यांचे डोळे भरुन यायचे.
परंतु अचानक एकदा दवाखान्यात काम करताना त्या चक्कर येउन पडल्या. डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरीत उपचार सुरु केले. त्या शुध्दीवर आल्या पण त्यांना अर्धांगवायुचा झटका आल्याचे निदान झाले. त्यात त्यांचे दोन्ही पाय लुळे पडले. दुसऱ्याची मदत घ्यायची कधी सवय नसणाऱ्या त्या. त्यांचे सगळे जीवनच परावलंबी झाले. मुलाने त्यांच्यासाठी एका फळीला चाके लावून ती फळी त्यांना दिली. त्याच्या परीस्थितीत चाकाची खुर्ची घेणे त्याला शक्य नव्हते.
काही काळाने बरे वाटेल असे म्हणून त्यांनी दवाखान्यामधून काही महिन्यांची सुट्टी घेतली.
पांडुरंगाला गाऱ्हाणे टाकले,"काय चुकले रे बाबा. तुझ्या भक्तीत कुठे चूक झाली म्हणून अशी शिक्षा दिलीस?"
त्यांचे सगळ्यात मोठे दु:ख म्हणजे, वारीला जाता येणार नव्हते.
नियमितपणे मसाज चालू होता परंतु प्रगती शुन्य. विठ्ठलाचे नामस्मरण करत, ती मुर्ती उशाशी घेऊन त्या शांतपणे पडून रहायच्या. पण वरुन शांत वाटणाऱ्या राधाबाई मनात काही योजना आखत होत्या.
मग एकदा त्यांनी ठरवले, पंढरपूरला जायचे आणि त्या पांडुरंगाला जाब विचारायचा..
पण जायचे कसे. मुलाला सुनेला सांगितले असते तर राधाबाईंनाच वेड्यात काढले असते.
"गप्प बस घरात, असे कसे जाणारेस पंढरपूरला? इथल्या इथे चालता येत नाही तुला. खरडत जावे लागते. नाही तर छोट्या चाकाच्या फळीचा आधार घ्यावा लागतो. आम्ही सगळे करतोय न तुझे. शांत बस मग."
आषाढ महिना सुरु झाला आणि राधाबाईंची उलघाल खूप वाढली. पांडुरंगाच्या भेटीची आस, काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हती..
खूप खूप विचार केला आणि "जायचेच" हा विचार पक्का केला..
गुपचूप थोडेफार कपडे, पैसे जमा केले..
आणि एकदा भल्या पहाटे, घराला जाग यायच्या आधी, छोटेसे बोचके आणि विठ्ठलाची मुर्ती घेऊन त्या फळीवरुन निघाल्या.
विचार केला, "इथे असेच मारायचे त्यापेक्षा, त्या पांडुरंगाच्या भेटीला तरी जाऊ. भेटला तर ठीक नाहीतर भेटीला जाताना तरी मरण येइल."
रस्त्यात जागोजागी वारकऱ्यांसाठी खाण्याची, रहाण्याची सोय असतेच.
इकडे घरी त्यांच्या गायब होण्याने गोंधळ झाला. आजूबाजूला शोध घेतल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली.
"आईला नेहमीच फळीचा आधार घ्यावा लागतो तर आई कुठे लांब कशी जाउ शकली असेल." त्यांचा मुलगा उत्तर शोधायचा प्रयत्न करत होता.
मजलदरमजल करत राधाबाई पंढरपूरला पोहोचल्या..
चंद्रभागेच्या तीरावर पोहोचल्यावर अत्यानंदाने त्यांचे डोळे भरुन आले..
"बा इठ्ठला इथवर आणलस आता असच तुझ्या सोबत ठेव मला कायमची." असे म्हणून त्यांनी तिथली माती कपाळी लावली.
सगळीकडे वारकऱ्यांची गर्दी झाली होती. भजनाने, टाळ चिपळ्यांच्या नादाने, विठ्ठलाच्या नामघोषाने सारी पंढरी दुमदुमत होती. राधाबाई या साऱ्या भक्तीमय वातावरणात दंगून गेल्या होत्या. त्या भावावस्थेत त्यांनी कळसाला हात जोडले आणि फळी बाजूला करुन खरडत खरडत चंद्रभागेची एकेक पायरी उतरायला सुरुवात केली.
" बा विठ्ठला तुझ्या दारात आले, भरुन पावले. आता आपली म्हण नाहीतर दूर लोट पण मी काही अशा अपंग अवस्थेत पुन्हा माघारी जायची नाही. तुझ्या मनात असलं तसं होइल."
शेवटच्या पायरीवरुन त्यांनी स्वतःला चंद्रभागेच्या स्वाधीन केले. एकदोन गटांगळ्या खाल्ल्या आणि अहोआश्चर्य त्यांचे पाय नदीच्या पाण्यात टेकले. त्या त्यांच्या स्वतःच्या पायावर ऊभ्या राहिल्या. आधी त्यांना समजलेच नाही. मिटलेल्या डोळ्यासमोर निव्वळ तो सावळा विठ्ठल दिसत होता. तो त्यांना हाताला धरुन ऊभे करत होता आणि त्यांचे शरीर, त्यांचे पाय विठ्ठलाचे ऐकत होते. त्या सावकाश ऊभ्या राहिल्या, पुन्हा पाण्यात बसल्या. परत त्याने त्यांच्या हाताला धरुन ऊभे केले. राधाबाईंना हे स्वप्न की सत्य हेच कळेनासे झाले. डोळे उघडले तर विठ्ठल दिसणार नाही म्हणून त्यांनी डोळे आणखी घट्ट बंद करुन घेतले. पण आता ते झरझर पाझरु लागले होते. त्या पाण्याच्या पडद्याआडून विठ्ठलाचे रुप हळुहळू धुसर होत गेले. त्यांनी डोळे उघडले, खाली पायाकडे पाहिले. पाय हलवले आणि त्यांना पाय असल्याची जाणीव झाली. त्यांना ऊभे रहाता येत होते. त्यांना चालता येत होते. त्या पायऱ्या चढून वर आल्या आणि खाली मातीत त्यांनी लोटांगण घातले.
"अरे माझी हाक तू ऐकली. तू स्वतः मला ऊभी करायला आलास. तुझे पांग कसे फेडू सांग. हे माझ्या पायाचे दान माझ्या पदरात टाकून तू निघून देखील गेलास. इतका कसा रे तू भक्तांच्या हाकेला धावतोस." आणि त्या उठून मंदीरात धावत सुटल्या. तिथल्या गर्दीला, पहारेकऱ्यांना त्यांनी त्यांची हकीकत सांगितल्यावर विठ्ठलनामाचा जल्लोष झाला.
त्या जेंव्हा त्यांच्या घरी परत आल्या तेंव्हा त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवायलाच तयार नव्हते. डॉक्टर देखील अवाक झाले. पायांच्या नसा पूर्णपणे बाद झाल्यावर काहीही न करता केवळ चंद्रभागेत स्नान केल्याने यांचे पाय ठिक झाले. ही बाब डॉक्टरांना आश्चर्यचकीत करत होती. पण त्यांच्या समोर राधाबाईंच्या रुपाने हा ढळढळीत पुरावा होता.
भक्तीची शक्ती..
"बा विठ्ठला!!
तुझ्या पायी वीट
देखील भाग्यवंत.
आणि
मी कायम गरजवंत.
कृपा अशीच राहू दे!! 🙏🙏
©️®️स्मिता मिलिंद🍁
(सत्य घटनेवर आधारीत)
No comments:
Post a Comment