माणसाच्या माणुसकीचा विकास त्याच्या येणाऱ्या अनुभवांच्या मोठेपणावर अवलंबून असतो. माणसाचे मनच त्याच्या अनुभवांचे आणि त्यांच्यातून निर्माण होणाऱ्या ज्ञानाचे प्रधान साधन आहे. म्हणून माणसाला जोपर्यंत आपल्या मनाचे अज्ञान असते तोपर्यंत त्याच्या अनुभवांचे क्षेत्र अगदी सीमित राहते.
माणूस इंद्रियांची सीमा ओलांडू शकत नाही. खरे म्हणजे माणसाच्या मनामधे इंद्रियांची मदत न घेता विशाल अनुभव घेण्याची मोठी सुप्त शक्ती आहे. शब्दस्पर्शादि इंद्रियांची स्वाभाविक कक्षा पार करून येणारे हे अनुभव इंद्रियांना नेहमी येणाऱ्या अनुभवांइतकेच खरे म्हणजे वस्तुनिष्ठ असतात.
त्या अनुभवांपैकी ईश्वराचे दर्शन हा सर्वात श्रेष्ठ व पवित्र अनुभव मानला जातो. ईश्वरदर्शनाच्या अनुभवांमध्ये माणसाचे मन ईश्वराशी समरस होऊन ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव घेते. यासाठी मनाचे परिवर्तन घडवून आणावे लागते. ईश्वराशी समरस होण्याची एक कला आहे.
मनाचे मूलद्रव्य, मनाची रचना आणि मनाचे कार्य यांचे अज्ञान आहे तो पर्यंत ही कला हस्तगत होत नाही. विज्ञानाचे ज्ञान अल्प असल्याने त्याने मनामध्ये परिवर्तन घडवून आणणे शक्य नाही. म्हणून मानवी मनाचे अज्ञान नाहीसे करण्यासाठी संतांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाकडेच वळावे लागते.
No comments:
Post a Comment