TechRepublic Blogs

Tuesday, October 1, 2024

पुत्र

 🕉️ केसरी पुत्र ~


आज पहाटे पश्चिमवारे मंद,मंद वहात होते,शुक्रतारा निस्तेज होत गेला..

वसंतागमनामुळे कोकिळ सुस्वर आसंतात घुमत होता.त्या उच्च स्वराच्या प्रभावामुळे चिमण्या, राघू,मैना,बुलबुल किलबिल विरली होती..


आणि अचानक पूर्वेला,उषेच्या उबदार कुशीतून सुवर्ण बिंब हळूच डोकावले..

खुदकन् हासले. आणि समोरच्या झाडावरील सान पाखरे ,कोकिळ स्वराला डावलून स्वैर किलबिल करु लागली..स्वागत गीत गाऊ लागली.

बुलबुल तर भूप आळवू लागले...

वृक्ष पर्ण सळसळत अभिवादन करु लागले...


आज काय आहे????


बघता-बघता सुवर्ण बिंब ताटाएवढे गोल गरगरीत केशरी झाले...

ते सशक्त केशरबिंब कँमेरात पकडण्यासाठी केविलवाणी धडपड माझे अशक्त हात करत होते..


आणि हा सुंदर केशरी गोळा पकडण्यासाठी जन्मतःच केसरी-पुत्र हनुमानाने आकाशी झेप घेतली होती.🧜🏻‍♀️🧜🏻‍♀️🧜🏻‍♀️🧜🏻‍♀️


केशरी गोलाचा मोह जन्मतःच झालेल्या आणि सूर्याच्या प्रखरतेने हनुवटी पोळलेल्या या बाळाने पुढे आयुष्यात कोणताच मोह,स्वार्थ, लालसा,वासना,कामना धरली नाही.संयमन हे व्रत धरले.


 स्वत:तच सूर्य तेज,वायू वेग, जल प्रवाह निर्मिले.भय -क्षय व्यय  झाला.


अचाट शक्ती सामर्थ्य असूनही नि:स्वार्थी सहकारी, सेवक बनला.

वेळप्रसंगी तीळा एवढा तर कधी गगनाएवढे स्व-रुप करण्याचे सामर्थ्य असूनही विनम्रता होती.शूचिता  होती.


कधी पंचमुखी ,

तर कधी विमशती (20)भूजा, साक्षात ब्रह्मदेव आणि सप्त ऋषी सुद्धा या रूपाला घाबरले.आणि साष्टांग नमस्कार  या मरूत् रूपाला घातला.अखंड उर्जा बहाल केली.


कधी चौदा शस्त्रे धारी विराट रूप ,तर कधी एक गदाधारी सौम्य रुप.

कधी सागरपार करून लंका दहन..

तर कधी क्षणार्धात लंका ते अचल हिमालय वायूवेगे जाऊन इवल्या अंगुलीवर द्रोणागिरी उचलून आणणारे  अजस्र, भयंकर रूप पण हळवे ह्रदय दिसून येते.

तत्परता दिसते.


त्यांचीअचाट शक्तीने धास्तावून जाणार, 

तोच---

कवन -लेखन-वादन करणारा ,श्रीरामांचे चरणी बसणारा ,सतत रामनाम जपणारा ,सीतेला माई संबोधणारा,भोळा भाबडा राम भक्त  मनावर ठसतो.


अंजनी मूळ अप्सरा!!! एका ऋषींच्या शापामुळे वानर मुखी झाली.

बृहस्पती पुत्र केसरी यांची पत्नी झाली. तिचे पोटी  शिव अवतार जन्माला आला- तो  अंजनेय!!!पवनपुत्र !!!! 


 पवन पुत्र असल्याने चिरंजीव!!! 

जरा-मरण मुक्त!!!


अफाट शक्ती चा वापर सतत सहकारी परोपकारी वृत्तीने, केला.खराखुरा  देवदूत।

सेवा करत राहिला. मेवा कधीच नाही मागितला.

अजूनही जागृत शक्ती बुद्धी दैवत आहे.

सेवा करण्याची बुद्धी देतो.

त्याची उपासना केली तर

बुद्धी ला बळ देतो. समर्थ करतो. मनोबलदायी दैवत।

वानर आहे.. मर्कट नाही.


अश्या या वानररूपी दैवताचा आज जन्मोत्सव साजरा करुया.

श्री राम व हनुमंत यांकडून शिकायचे..स्वतःची दु:खे,विरह यातना ,वेदना,पीडा सर्व अंतरात गाडून, गिळून हासत हासत कार्यरत रहायचे. सतत जनहितार्थ झटायचे.स्वत्व वाततत्व जाळून जगत् दीप उजळायचा. हासत हासत जगायचे.💐


हनुमान जयंती नाही. जयंती म्हणजे मृत आत्म्याचा जन्म दिन!!!

मारुती हा मृत नाहीच. तो पवन पुत्र आहे. पावन मुर्ती 

आहे.

बजरंग आहे बलवंत आहे. तेज:पुंज गुणवंत केसरी पुत्र आहे.


आज त्याला मनोभावे वंदन करुन त्याच्या सम वासना,लालसा,हाव -धाव त्यजून निरपेक्ष सेवा करण्याची,परोपकारी वृत्ती मागुया..सुबुद्धीला सबळ कर विनवुया..

आणि वसंत गीत गाऊया।

जय हनुमंत।


धन्यवाद🌹

उन्नती गाडगीळ 🙏🏾

No comments:

Post a Comment